Tuesday, December 1, 2020

 

द्रोणागिरी




#द्रोणागिरी लहानपणा पासूनच एक गुढरम्य ओढ असलेला हा डोंगर. मावळतीला जाणारा सूर्य नेहमीच याच्या आड होताना पाहत आलो आहे. पावसाळ्यात पावसाची आलेली सर हया डोंगराला ओलांडून पुढे सरकली की हा दिसेनासा व्हायचा किंवा धुरकट,अस्पष्ट होत जायचा.पण त्यावरूनच आता थोडयाच वेळात पाऊस आपल्यापर्यंत पोहोचणार हे सहज लक्षात येत असे त्यामुळे वेळीच धाव मारून घर गाठणे शक्य होत असे. 

हा डोंगर गूढ वाटण्याचे एक कारण म्हणजे दिवसा जेव्हा हवा संथ वाहत असेल तेव्हा डोंगराच्या वर लक्ष वेधून घेणारा धुराचा मोठ्ठा पट्टा आणि रात्रीच्या अंधारात आकाश उजळवून टाकणारा तांबडा-पिवळा प्रकाश हे होते. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे कुणाकडून तरी समजले की मागच्या बाजूला (खरंतर उत्तरेकडे) ONGC कंपनीचा प्रोजेक्ट आहे आहे त्याच्या चिमण्यांमधून तो धूर आणि आग बाहेर पडते. तेव्हा लहानपणी कधीतरी डोंगराच्या पलिकडे जाऊन पाहूया असे वाटायचे. तेव्हा आपण त्याच्या अगदी शेजारी रहायला जाऊ असे कधी वाटले नव्हते.

द्रोणागिरी डोंगराबाबत गुढ वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण होते, ते म्हणजे या डोंगराबाबत ऐकत आलेल्या दंतकथा. नावावरूनच हा डोंगर अगदी रामायणाशी आपला संदर्भ जोडत असल्यानेच काही लोक असे सांगत की, महाबली हनुमान जेव्हा मुर्छा येउन पडलेल्या लक्ष्मणासाठी हिमालयातील संजिवनी असलेला द्रोणागिरी पर्वत घेउन लंकेला जात होता तेव्हा त्याचा एक तुकडा खाली पडला तोच हा द्रोणागिरी पर्वत! आणि याच दंतकथेला जोडून तयार झालेली दुसरी एक अशीच वंदता अशी आहे की, हा मूळ द्रोणागिरी पर्वताचाच तुकडा असल्याने या डोंगरावरही कुणाला माहीत नाही परंतू संजिवनी वनस्पती आहे. या वंदतेवर विश्वास बसावा म्हणून काही लोक असे सांगतात की, 

एकदा एक कोळीण (या डोंगराच्या पायथ्याशी करंजा नावाचे कोळयांचे गाव व बंदर आहे) मासे विकायला या डोंगराच्या पायवाटेने जात असताना माशांवर घोंगावणा-या माशा हाकलण्यासाठी तिने एक झुडपाची फांदी मोडून त्याने ती चालताचालता डोक्यावरच्या मच्छीच्या टोपल्यावरून माशा हाकलायला लागली. काही अंतर पुढे गेल्यावर तिच्या असे लक्षात आले की टोपल्यातले सर्व मासे जिवंत होऊन उडया मारायला लागले.तिने फांदी फेकून दिली आणि मासे सांभाळू लागली. मासे जिवंत होण्याचे कारण ती फांदी म्हणे संजीवनीची होती. पण नंतर शोध घेऊनही ते झुडूप कोणाला सापडले नाही.


तर असा हा द्रोणागिरी डोंगर म्हणूनच माहित होता. पण तेथे एक किल्ला आहे हे अगदी पाचसहा वर्षापूर्वीही माहीत नव्हते.नंतर whatsapमेसेजमधून किल्ल्याची माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे त्याचेअवशेष माझ्या बेडरूम व किचनच्या खिडकीतून दिसतात.तेव्हा मात्र तो किल्ला आहे हेच माहीत नव्हते . पण दुर्ग मावळा परिवारातर्फे या किल्यावर राबवलेल्या गडस्वच्छता मोहिमांमुळे किल्ला पहायला जावेसे वाटत होते. आमचा मित्र चेतन गावंड हा दुर्गमावळा परिवाराच्या मोहिमांमध्ये सहभागी होत असे त्याला तसे सांगितले. तो ही नित्यनेमाने प्रत्येक मोहिमेच्यावेळी मेसेज पाठवून यायला सांगत होता. पण मी भलताच बिझी(?😜) असल्याने मुहूर्त सापडत नव्हता.

पण अचानक महेंद्र गावंड चेतनसोबत किल्लयावर गेल्याचे पाहिल्यावर पुन्हा एकदा जायचे ठरले. चेतनने आजचा मंगळवार(दि.1.12.2020 चा दिवस सांगितला आणि तो मुहुर्त मी,माझा मुलगा दर्श ,महेंद्र गावंड आणि किरण गावंड या तिघांनी गाठला. अनपेक्षितपणे चेतनने मात्र कात्रजचा घाट दाखवला. 

खूप छान अनुभव होता..... धन्यवाद महेंद्र,किरण आणि चेतनला सुद्धा.....(किल्ल्यावरील भटकंतीबाबत सविस्तर पुढे लिहेन आज एवढयावरच थांबतो🙏🙏)

प्रविण म्हात्रे

पिरकोन- उरण- रायगड

मो.8097876540

Saturday, October 3, 2020

सोबती

                        सोबती 



ते

एक

पाऊल

कुणीतरी ?

माझ्याकरता

कधी टाकेल का ?

मीच माझा सोबती

आहे माझे हे भाग्य का ?

होऊन त्यांचा मीच साथी

संगतीने वाट सरेल का ?

सोबतीने चालणारा मी सखा

मीच त्यांचा सोबतीही होईन का ? 


प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण






Monday, September 14, 2020

माझी वाट

                                                                              माझी वाट



हा

माझा

प्रयत्न

साधा साच

साथ   करत

असो नसो कोणी

आपण च   आपली

वाट   शोधत    रहावं

देईल  कुणी  साथ   अशी

आशा नाही की  अपेक्षा  नाही

फक्त  विश्वास   आहे   स्वत:  वर

कुणास    ठाऊक    असेही   घडेल

                   ती  वाट   कुणाचा   राजमार्ग   ठरेल 


प्रविण गिरीधर म्हात्रे

पिरकोन,उरण,रायगड

मो 8097876540

Saturday, August 15, 2020

अजि म्या भूत पाहिले



अजि म्या भूत पाहिले...
           जवळपास तीस-बत्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दहावीची परीक्षा झाली होती.परीक्षेत लावायचे तेवढे दिवे आणि रोवायचे तेवढे झेंडे रोवून झाले होते. पण आता वर्षभर न केलेल्या अभ्यासाचे टेन्शन घालवायचे दिवस आले होते. वर्षभर कानावर फक्त "काय , कसा चाललाय अभ्यास ? " "झाला का अभ्यास ,की झोपाच काढताय? " हे आणि असलेच प्रश्न पडत होते. अहो ! ज्यांनी स्वत: बोर्डाच्या परीक्षेत सिक्सर मारले होते, म्हणजे सहा-सहा विषयात ज्यांची दांडी गुल झाली होती. ते सुद्धा ज्ञानाचे डोस पाजत होते.पास होण्यासाठी अभ्यास कसा करायचा हे सांगत होते. गपगुमान त्यांचे ऐकून आम्ही मात्र आमच्याच मनाचे करत होतो.पर्यायाने अभ्यास सोडून सगळेच करत होतो. कशीबशी मार्च महिन्याची बारा तारीख उजाडली आणि शेवटचा भूगोलाचा पेपर देउन तीस मार खाँ च्या आवेशात परीक्षा हाॅलच्या बाहेर जे काही पडलो ते सरळ उंडरायला सुरुवात झाली.आता काय कोणाच्या बापाची (आस्मादिकांच्याही....जरी घाबरत असलो तरी ) बिशाद होती आडवायची. सकाळी-संध्याकाळी फक्त पोटपूजेसाठी घराची पायरी चढत होतो. बाकी कानात वारा गेलेल्या खोंडासारखे गावभर उधळणेच चालले होते.
           दिवस डोंगरात, कुरणांत जात होता. रात्री ही गप्प घरात झोपणे होत नव्हते. याकाळात रात्रीचे मनोरंजन म्हणजे गावात किंवा आजूबाजूच्या गावात लग्न, वैयक्तिक किंवा सार्वजनिक मंडळाची सत्यनारायण महापूजा,वाढदिवस अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने ठेवले जाणारे पडदयावरचे - व्हिडिओवरचे सिनेमे पहाणे. सिनेमाची इतकी हौस की,  व्हिडिओवर रात्रीत तीन तीन चार चार सिनेमे पहात बसायचो. सकाळी  होऊन शेजारच्या घरातील माणसे दातांना मिश्री लावत दात घासत येत तरी आम्ही सिनेमातच घुसलेलो असायचो. एकंदरीत काय तर सिनेमाच्या शौकापायी आमच्या रात्री घरात किंवा गावात जाण्यापेक्षा आजूबाजूच्या गावांतच जास्त साज-या होत होत्या.
   असेच एकदा शेजारच्या गावात पडदयावर 'धरम वीर' हा सिनेमा असल्याचे समजले. आमची गँग नेहमीप्रमाणेच तयार होतीच.  रात्री प्रत्येकजण घरातल्या अतिमहत्त्वाच्या कामाचा निपटारा करून म्हणजे जेवण उरकून मोहिमेवर जाणाऱ्या सैनिकाच्या जोशात बाहेर पडला.फरक एवढाच सैनिक त्याच्या सामानाच्या बॅगेसह बाहेर पडतो, आम्ही अंगात एकावर एक अशी दोन स्वेटर घालून,कानाला मफलर गुंडाळून जय्यत तयारी करून निघालो. सिनेमाच्या ठिकाणी पोहचलो आणि आम्हाला प्रश्न पडला... 'नक्की आजच सिनेमा आहे की उदया , की कालच झाला ? ' तिथेच एक माणूस बसलेला होता, त्याला विचारले 'पिक्चर कधी हाय दादा? '. त्याने उत्तर देण्याआधीच त्याच्या 'हाले-डुले-सरकार' वरून समजले की तो पिऊन तर्र..  आहे. त्याचे काही ऐकण्याआधीच आम्ही युटर्न घेतला.  पण त्याचे फक्त शब्द कानावर पडले " बयनं, काल झाला पिक्चर नि हये आज आले." ते सगळयांनी ऐकले आणि ज्याने खबर आणली होती त्याला सगळे सभ्यपणे असभ्य शिव्या दयायला लागले.आता काय करायचे??? एवढयात एकजण बोलला ,"चला ! आता डोंगरातल्या रस्त्याने शाॅर्टकट जाऊ या." नाहीतरी पोपट झालाच होता.  "चला , जाऊया..." सर्वांचे अनुमोदन मिळाले.
        रस्ता सोडून आम्ही जंगलातील पायवाट पकडली. तशी सगळयांच्याच माहितीची वाट होती, पण रात्रीचे साडे अकरा होऊन गेलेले आणि उजेडाला हातात असलेली बॅटरीही सेल संपल्याने अगरबत्ती पेटवल्यानंतर जेवढा उजेड पडेल तेवढाच देत असल्याने ती असली काय आणि नसली काय,काहीच फरक पडत नव्हता. पण प्रत्येकजण आपापल्या मस्तीत चालत होता. डोंगराच्या अर्ध्या चढावर पोहचलो आणि सगळ्यात पुढे असणारा थबकला. जागीच थांबला. त्याच्या अचानक थांबण्याने मागोमाग चालणारे धडाधड एकमेकांवर आदळले. ते रागाने काही बोलणार तोच त्याने तोंडावर हात ठेवत गप्प बसायची खूण केली. तो थरथरत होता. त्याने दाखवलेल्या दिशेकडे पाहिले तर तिथे एका आंब्याच्या झाडाखाली तीन आकृत्या डोके वरखाली करत नाचत होत्या. तिथेच भूत पाहिल्याचे किस्से ब-याचजणांकडून ऐकले होते. सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. सगळे उलट पावली धूम पळत सुटले. घाई,भिती आणि रात्रीची वेळ . उतारावरून धावताना पहिला घसरला. दुसरा त्याला अडखळून पडला तो कोलांटया उड्या मारत वीस-पंचवीस फूट खाली कोलमडत गेला. तिसरा दगडावरून पाय घसरून पडला, त्याचे दोन्ही गुडघे सोलवटून निघाले. पडत- धडपडत कसेबसे परत येऊन मुख्य रस्त्याने गाव गाठले. गुपचूप घरात झोपलो. रात्रभर खुट्ट जरी झाले तरी. दरदरून घाम फुटत होता.
    दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे एकत्र जमलो.रात्रीच्या घडलेल्या प्रसंगाची चर्चा सुरू झाली.रात्री पळपळत आलेले आता मात्र बारा हत्तीचे खोटेखोटे बळ दाखवत होते. प्रत्येकजण "मी नाही घाबरलो, पण हा पळाला म्हणून त्याच्यासोबत मी फिरलो." असे म्हणत होता. शेवटी एकजण म्हणाला,"चला त्या झाडाजवळ जाऊन बघू." तसे सगळे टरकले,पण आपण घाबरतो हे दुसऱ्याला समजले तर चिडवून हैराण करतील हे माहित असल्याने कोणीच तसे दाखवत नव्हते. "चला..!" कोणीतरी बोलला आणि सगळे पाय ओढीत निघाले. डोंगर चढायला सुरुवात केली. दुरुनच समोर ते झाड दिसू लागले. थोडे जवळ पोहचले तर झाडाच्या पाठीमागे तशीच पांढरी डोकी वरखाली होताना दिसत होती. "नको,आपण नंतर कधीतरी जाऊ, आज नको." फक्त आपल्यालाच ती दिसली असे समजून एकजण बोलला. सगळ्यांच्या मनात तेच होते.आता मागे फिरणार तोच एकाला हुक्की आली. "नको ! आता आलो आहोत तर जाउन बघू या." आता मात्र नाईलाज झाला. तसेच सगळे पुढे झाले. ह्रदयाचे ठोके शंभररीपार झाल्यासारखे धडधड पडत होते. थोडे जवळ पोहचले आणि सगळे एकसाथ हसायला लागले.
     तिथे कोणीच नव्हते. होत्या त्या झाडाखालच्या करवंदीच्या जाळीत अडकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या. वा-यावर जाळी हलत होती आणि पिशव्याही. नसलेल्या खोटया भूताने सगळयांचीच आधीची रात्र 'डरावनी' केली होती हे मात्र खरे होते.
      
प्रविण गिरीधर म्हात्रे
मु.पिरकोन,ता.उरण,जि.रायगड
मो.नं.8097876540
ईमेल  pravin.g.mhatre@gmail.com

Thursday, August 6, 2020

माझे घरटे


                

   

                    माझे घरटे

                                विस्कटलेल्या घरटयाला माझ्या
                                पुन्हा आकार देत होतो
                                आज केलेल्या तांडवाने तुझ्या
                                हताश होऊन पहात होतो......

                          असा रे कसा तू पाषाणह्रदयाचा
                          का माझा अंत पाहतो
                          मी नाही थिटया काळजाचा
                          बघ कसा तुलाच भिडतो......

                                चोच हेच आहेत हात माझे
                                तीच माझे शस्त्र ही
                                उध्वस्त कर तू घरटे माझे
                                बांधेन पुनश्च मी ही.....

                           वारा असो की असो वादळ
                           घरटे तर बनणारच
                           तू उधळ ते हवे तेव्हा
                           माझी पिढी जन्मणारच.......

                                बघ माणसा हिम्मत माझी
                                तू का हतबल होतो
                                हात , पाय तुझ्यापाशी
                                का तू धीर सोडतो......

                           चल! हो सज्ज , ऊठ माणसा
                           कर मात या संकटावर
                           एक क्षुल्लक जंतू एवढासा
                           फत्ते कर त्याच्यावर......

                                                        प्रविण म्हात्रे
                                                  पिरकोन,उरण,रायगड
                                                   मो.8097876540


Tuesday, July 28, 2020

निकाल



निकाल

निकाल म्हणजे काय रे गडया
चढलास फक्त एक पायरी  
आनंद कसला यशाचा वेडया
अपयशाने का दुःखी तरी


परीक्षा होती एका यत्तेची
जीवनाची सुरू झालीच नाही
कसोटी लागेल बुद्धीमत्तेची
ओळख अजून झालीच नाही


  एका कागदाच्या तुकडयाचा
तू मानकरी झालास  तरीही
  मोठाछोटा आकडा त्यावरचा
  तुझे नशीब कधी ठरवत नाही


     खचून नको आज जाऊ 
     कर सामना या सत्याचा 
          उत्तीर्ण- अनुत्तीर्ण यांचा बाऊ
 नाही काहीच कामाचा


 आज वेळ नसेल कदाचित
    ऊदया तुझी वाट पाहत आहे
     पुढे पडणारे पाऊल अवचित
       यशाची पहाट उजळणार आहे



प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड








Friday, July 24, 2020

नागपंचमी




नागपंचमी
नागपंचमी....श्रावण महिना सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण. लहानपणापासूनच श्रावण महिन्याची ओढ लागलेली असायची. नाही ! तसा श्रावण पाळणारा किंवा उपवास करणा-यांपैकी मी नाही. मी उपवास करतो ते फक्त वारसा हक्काने मिळाले असल्याने. एक संकष्टी चतुर्थी जो आई करायची आणि दुसरा श्रीकृष्णजन्माष्टमीचा जो बाबा करायचे. पण हा महिना आवडत असे त्याला कारण होते ते या महिन्यात येणारे सण आणि त्यामुळे शाळेला मिळणा-या सुट्टया. सोबतच श्रावणी सोमवारी अर्धा दिवसाची शाळा (आमच्या लहानपणी श्रावणी सोमवारी शाळा सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असायची, सध्या मात्र सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत असते) उन्हाळी सुट्टीनंतर शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली की तेव्हापासून ते सरखेल कान्होजीराजे आंग्रे पुण्यतिथीची अर्धा दिवस सुट्टी वगळता दोन महिने शनिवार रविवार याच सुट्टया असायच्या .पण एकदा का श्रावण सुरु झाला की सुट्टयाच सुट्ट्या मिळायच्या. त्यामुळे ' श्रावणमासी हर्ष मानसी.... ' हे आमच्यासाठी पुर्णत: खरे असायचे. याची नांदी व्हायची ती नागपंचमीच्या सुट्टीने. नागपंचमीचा उपवास जिच्या पाठीवर भाऊ आहे अशा मुली किंवा महिलाच करतात. त्या गावाशेजारच्या जंगलात असणा-या वारूळाला जाऊन नागाची पूजा करतात.आमच्या गावाशेजारी असे वारूळ वगैरे नव्हते, पण दोन अशी ठिकाणे होती जिथे हमखास नाग पहायला मिळायचा. पहिले ठिकाण गावाच्या उत्तरेला ज्या भागाला का कोण जाणे पण 'बाभूळ' हे नाव आहे, जिथे बोरीचे झाड होते परंतु बाभूळ असल्याचे आठवत नाही. तेथे एका कातळावर असलेल्या फटीत एक नाग असायचा. दुसरे ठिकाणी होते गावाच्या दक्षिण सीमेवर असलेले शंकर मंदिर. इथे दिसणारा नाग वर्षभर तसा कधी पहायला मिळत नसायचा.पण या महिन्यात तो कुठून यायचा माहित नाही . तो देवळाच्या बाहेर भिंतीत असलेल्या फटवजा बिळात बसलेला दिसायचा. एरवी हे शंकर मंदिर गावाबाहेर असल्याने सुनसान असायचे.ज्याला शांतता हवी असेल असा कोणीतरी येथे येऊन बसायचा. परीक्षा काळात काही विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी या मंदिरात येत. बाकी इतरवेळी हा परिसर शांत असायचा. पण नागपंचमीला सकाळ पासून दुपारपर्यंत वर्दळ खूप असायची. उपवास करणा-या बहिणी सोबत फक्त प्रसाद खाण्यासाठी मी पण जात असे. हा प्रसादही काही भारी नसायचा. उकडलेले हरभरे,भाताच्या (साळीच्या) लाहया, असलेच तर गूळ एवढाच काय तो प्रसाद असायचा. पण तो ही अमृतासमान वाटायचा. 
बरीच वर्षे उलटली आता शिक्षण पुर्ण झाले अन् शाळा सुटली आणि पुन्हा नशीबात शाळाच आली. फक्त भूमिका बदलली होती शिकणारा मी आता शिकवणारा झालो होतो. 1994 च्या जुलै महिन्यात नोकरीच्या गावी हजर झालो. गाव पुर्ण डोंगरात वसलेले.आजूबाजूला रिझर्व फाॅरेस्ट. गावात येण्यासाठी चार रस्ते होते. पण कुठल्याही बाजूने जा सव्वा तासापेक्षा कमी वेळेत तुम्ही वाहतूक योग्य रस्त्यावर पोहचू शकत नाही. माझे नशीब होते त्यापेक्षा अधिक जोरदार(?) बनले असावे बहुतेक. शाळेवर हजर झालो आणि त्या शाळेत माझ्याआधी असणा-या एकमेव शिक्षक सहकारी यांची बदली झाली. दोन दिवसांत काहीच अनुभव नसलेला मी शाळेचा मुख्याध्यापक/स्कूलमास्तर बनलो. शाळेला पहिली सुट्टी मिळाली ती नागपंचमीची. गावाच्या समाजमंदिराच्या खोलीत एकटाच राहत होतो. सुट्टी असल्याने थोडा उशीरा उठलो. बाहेरून छान लयदार गाण्याची लकेर ऐकायला येत होती. ऊठून बाहेर आलो. खोलीच्या मागच्या दारातून तर समोरचे दृश्य मनमोहक असेच दिसत होते. सगळीकडे शेतांवर कोवळी हिरवाई पसरलेली. सकाळचे कोवळे ऊन शेतातील भाताच्या पिकाच्या पात्यावर असलेल्या दवबिंदूंवर चमकत होते. त्या शेताच्या बांधावरून जाणाऱ्या ,आपल्या पाठीवर भाऊ असू दे किंवा पाठीवरच्या भावाला अखंड आयुष्य लाभू दे यासाठी नागपंचमीचा उपवास करणा-या भगिनींची एक रांग एका लयीत चालत ,गाणी गात वारूळाला चालल्या होत्या. आजपर्यंत असे दृश्य फक्त चित्रपटातच पाहिले होते.असे कुठे खरोखर करत असेल हे कधी वाटले नव्हते. ते प्रत्यक्षात समोर पाहून अगदी सहज मनात बालकवींची "श्रावणमासी हर्ष मानसी...." कविता तरळू गेली. ओठांवर कवितेच्या शेवटच्या ओळी अवतरल्या...
"देवदर्शना निघती ललना हर्ष माइ ना ह्रदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत"
नंतर काही वर्षे नागपंचमी समजायची ती टी.व्ही वरच्या बातम्यांमधून. नागपंचमी जवळ आली की की बत्तीस शिराळयाच्या सणाची बातमी आणि दरवर्षी साधक-बाधक चर्चेचे ते गु-हाळ सुरू व्हायचे. शेवटी तो सणच बंद झाल्यावर त्या बातम्या कमी प्रमाणात येऊ लागल्या. हा सण शेतक-याचा मित्र असलेल्या नागाचा आदर करण्यासाठी साजरा व्हावा यासाठी आपल्या संस्कृतीत आला असावा,पण कालांतराने तो सापालाच घातक ठरू लागला.'नाग दूध पितो' आणि ते पाजले तर तो आणि भगवान शंकर प्रसन्न होतील या एका गैरसमजातून हा सण त्यांच्यासाठी मृत्यूघंटा वाजवणारा ठरू लागला. शेवटी न्यायिक लढाईने नागांना दिलासा दिला. आजकाल ब-याच सर्पमित्रांच्या मदतीने आणि प्रबोधनाने लोकांमध्ये बदल घडू लागला आहे. दिसला साप की घे काठी आणि मार त्याला ही वृत्ती आता बदलू लागली आहे. आता साप दिसल्यावर काठी शोधण्याऐवजी सर्पमित्रांना फोन केला जातो. हे नक्कीच आनंददायी आहे. श्रद्धा की अंधश्रद्धा यात अडकून न पडता ही नागपंचमी नागांना त्यांचा परिवेश कसा उपलब्ध करून देता येईल व ते आपले शत्रू नसून उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांचे प्रमाण मर्यादित ठेवण्यात मदत करणारे मित्रच आहेत हे ध्यानात ठेवून साजरी करू या 
🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540

Sunday, July 19, 2020

अलबेला श्रावण आला




अलबेला श्रावण आला
श्रावण आला श्रावण आला
मनी मानसी हर्ष जाहला
हिरवाईची नवी नवलाई
लेऊन सजली धरणी आई

क्षणोक्षणीचे रुप बदलते
    पाऊस सरता ऊन ही पडते
    सप्तरंगांची उधळण करूनी
इंद्रधनू हे अवतरते गगनी

सोनेरी थेंबांच्या ओल्या
गवतावरती ओळी पसरल्या
रानफुलांची सुंदर नक्षी
अलगद उडती त्यावर पक्षी
    सृष्टी अवघी सजते नटते
श्रावण रंगी रंगून जाते
    फुले मनाचा मोर पिसारा
    अलबेला हा श्रावण सारा



                                 प्रविण म्हात्रे
                                                      पिरकोन,उरण,रायगड
                                                         मो.8097876540















Saturday, July 11, 2020

माझी कविता



'माझी' कविता

वेगळीच कमाल झाली
कविताच रुसून बसली
माझ्यावर कविता करा
म्हणून अडून बसली

कसे सांगावे तिला 
कविता अशी सुचत नाही
ह्रदयांतरी कोरलेले
कागदावर उतरत नाही

मनतले प्रेम असे 
शब्दांत सांगायचे नसते
ह्रदयाचे गुज हे 
ह्रदयानेच पहायचे असते

शब्दांच्या पसा-यात
अर्थांचाच बोध होतो
अंतरंगाच्या उलगडण्यात
अंतरंगाचा शोध घेतो

माझी कविता अशी
शब्दांची उपाशी नाही
आपले नाते सांगायला
ही कविता पुरेशी नाही


प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540

Saturday, July 4, 2020

गुरु




गुरू
आंगठा मागणारा गुरू
या जगाने पाहिला आहे
एकच जरी असलातरी
तो चर्चेत राहिला आहे

शिष्यासाठी शिष्याशी लढणारे 
द्रोणाचार्य कोणा दिसत नाहीत
दुर्योधनासाठी अर्जुनाला भिडणारे
कृपाचार्य कोणा माहित नाहीत

शिष्यासाठी अखंड झिजत
जन्म आपला वाहिला आहे
शिष्य बनतो येथे राजा
तो अश्रितच राहिला आहे

विसरू नको कधी गुरूला
घडवत जीवन राहिला आहे
गुरू असतो गुरूच
शिष्यालाच वाहिला आहे


प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540

Tuesday, June 30, 2020

विठ्ठल


 

   विठ्ठल

विठ्ठल तो चित्ती
पाहिन मी डोळा
रंगूनी रंगात नाचे
भक्तांचाची मेळा...

विठ्ठल तो जळी
विठ्ठल तो स्थळी
मनात भरूनी उरे 
आसमंती माऊली.....

वैष्णवांची ध्वजा 
फडकली गगनी
पाहिला मी हरी
येथल्या जनी.......

जीवा लागलिसे
भेटीचिच आस
दिसे माझा विठू
माझ्या आसपास...

नाही आता देवा
पंढरीची वारी
तूच येरे बा
येरे झडकरी.....

नुरले भान आता
राहिला ना धीर
धाव घेई देवा
जाहलो अधीर....

मनातली इच्छा नेली 
पूर्णत्वास कुणी
रुप घेउनी आला
माझा बाळ गुणी.....


प्रविण म्हात्रे
पिरको,उरण,रायगड
मो.8097876540









Sunday, June 28, 2020

शब्द शब्द



शब्द शब्द...
मनातले जाणायला नेहमीच
शब्द अपुरे पडतात...
मनातले सांगायला शेवटी
शब्दच पुरे पडतात....

अंतकरणातील संवाद कधी
शब्द बनून येत नाही....
शब्दांविना संवाद कधी
साधता ही येत नाही....

शब्दांचेच असतात तीर
अन् शब्दांचीच कमान...
तेच धरतात नेम आणि
शब्दच करतात गेम....

शब्दांची स्फोटक अस्रे अन्
शब्द हीच तीक्ष्ण शस्त्रे....
तेचि येती कधी लेऊन
शालजोडीतली वस्त्रे....

शब्द वापर समजून जरा
आपलापरका धरून ठेव...
शब्द शब्द जपून ठेव
माणूसपणा जपून ठेव.....

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540





Sunday, June 7, 2020

घाला







घाला
  
                                   कोरोनाने घातला घाला
                                   घराचाच तुरुंग झाला
                                   'निसर्ग' घेतोय बदला
                                   'निसर्ग'च बनून..... 
                         
                               विषाणू तो केवढा
                               जगा घाली मरणवेढा
                               वारा लावी स्वर चढा
                               वादळाला आणून...
         
                                    एकटा कमी म्हणून काय
                                    दुसरा आपले पसरी पाय
                                    आता तरी एकच उपाय
                                    जगा माणूस बनून..
                                                                                        प्रविण म्हात्रे
                                                                                        पिरकोन,उरण,रायगड



















Tuesday, June 2, 2020

देव

देव...
म्हणे देव क्वारंटाईन झाला
दरवाजे बंद करून बसला
म्हणावे त्यांना पहा रस्तोरस्ती
मानवरूपी किती देव फिरती
घासातला घास काढून देतो
पायातले पोस सोडून देतो
दरवाजे बंद असले तरीही
बाहेर मदतीचा हात देतो
भेटायला त्याला नका जाऊ
सोबत आता करत राहू
देव नाही शोधायची गोष्ट
आपल्यातच आहे झाले स्पष्ट
म्हणेल जो देवच नाही
डोळे असून अंधळाच राही
शोधत राहिल दगडधोंडयात
आतला देव नजरेपल्याड
नका करू वाद - विवाद
माणूस बनून साधू संवाद
देव आहे का विचारू नका
विचारा.... मी माणूस आहे का ??
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540

Tuesday, May 26, 2020

बिब्बा


बिब्बा
'चिडका बिब्बा' ब-याच वेळा एखादयाचे चिडखोर,भांडखोरपणाचे वर्णन करताना हा शब्दप्रयोग आपण केलेला असेल किंवा दुसऱ्याला तरी बोलताना ऐकलेला असेल."बिब्बा घालणे" हा वाक्प्रचारसुद्धा ऐकला असेल आपण. हा बिब्बा असतोही तसाच चिडका!  कारण याच्या बीमध्ये असणारे तेल खूपच तीव्र दाहक असते. काजूसारखे दिसणारे आणि काजूसारखीच बाहेरच्या बाजूला बी असणा-या बिब्ब्याच्या बी मधील तेल काजूच्या बी मधील तेलापेक्षा जास्त तीव्र असते. एकवेळ काजू परवडला पण बिब्बा..बापरे बाप!!!  औषधी गुणधर्म असलेल्या याचा वापर फार जपून करावा लागतोच, परंतु जर एखाद्यावर जर बिब्बा ऊतत(त्वचेवर साईड इफेक्ट होऊन फोड येणे, जखम होणे) असेल तर स्वतः वापरायचे सोडूनच दया घरातील दुसऱ्या कुणी जरी लावला आणि तो लावताना एखाद्या टोकदार तारेत घुसवून(शक्यतो गोधडीची सुई वापरतात)  तापवावा लागतो.नंतर त्यातून फक्त थेंबभर निघणारे तेल  काढताना हवेत त्याची जी थोडीफार वाफ मिसळते त्या वाफेनेही त्रास, अ‍ॅलर्जी होऊ शकते. काहीजणांना तर बिब्ब्याच्या झाडाखालून गेले तरी  हातपाय,तोंड सुजण्याचा त्रास होतो.याचे तेल लाकूड टिकावे व त्याला भुंगा,वाळवी लागू नये यासाठी लावतात.पण लावताना जपून लावावे लागते. नाहीतर हात,तोंड,डोळे,घसा सुजलाच म्हणून समजा. मी आठवी नववीत असताना सारडेगावाच्या डोंगरात दात्यावर असलेल्या झाडावर बिब्ब्याची बोंडे खाण्यासाठी काढायला चढलो होतो. एक दोन मिळाली पण हातपाय लालभडक झाले होते व चेहरा जड झाला होता. घरी हे समजू दिले नाही, नाहीतर अजून घरचा प्रसाद मिळाला असता.
         बिब्बा,भिलावा,भल्लातक अशी अनेक नावे आहेत.  इंग्रजीमध्ये तर मार्किंग नट(marking nut) म्हणतात.  'अॅनाकार्डिएसी' कुळातला बिब्बा ' सेमेसरपस अॅनाकार्डियम(semecurpus anacardium) या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. जहाल,जहरी असला तरी औषधी गुणही तेवढेच आहेत. पोटाच्या विकारासाठी तेलाचा एक थेंब दुधात टाकून ते तोंडात दात,ओठ,जीभ यांना स्पर्श न करता सरळ घशात ओतून पितात. त्याचबरोबर काही काळ मीठ खाणे थांबावे लागते. ग्रामीण भागात घरोघरी तसेच आजीच्या बटव्यात बिब्बा हमखास असतो. पायात मोडलेला काटा काढल्यानंतर त्यावर बिब्ब्याच्या तेलाचा चटका देऊन राखेने दाबून धरताना अनेकांनी आपल्या घरातील आजी किंवा आईला पाहिले असेलच.  वेदनाशामक म्हणून आयोडेक्स सगळयांना माहित आहेच, या आयोडेक्समध्येही बिब्बा वापरलेला असतो. संजीवनी वटी, भल्लातकहरितकी,भल्लातकासव यासारख्या आयुर्वेदिक औषधे यापासून तयार केली जातात. जपून ,पूर्ण माहिती घेऊन वापर केला तर खूप औषधी गुण असलेला बिब्बा अनाठायी वापरला तर मात्र घातक ठरू शकतो. याने झालेली जखम लवकर बरी होत नाही. त्यामुळे काळजी घ्यावी. मी शिकलेला/ली आहे मला सर्व येते हा वृथाभिमान सोडून वय आणि अनुभवाने समृद्ध असलेल्या गावातील आजी आजोबांकडून माहिती घ्या. यासारख्या अनेक आसपास असलेल्या संजीवनी बुटींचा खजिना ते तुम्हाला दाखवून देतील.
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540

Monday, May 25, 2020

शाळा सुरू करताना



        शाळा सुरू करताना....
         लाॅकडाऊन 4.0 संपायला आला आहे. कोरोनाचा कहर सुरूच आहे. पण बंद पडलेले जनजीवन हळूहळू सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचवेळी मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सुरू होणार का ?  केव्हा होणार ?? आणि कशा सुरू होणार हे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले. शिक्षण आॅनलाईन की आॅफलाईन यावर चर्चा झडू लागल्या. आॅनलाईनचे फायदे-तोटे जो तो आपापल्या परिने मांडत आहे. ब-याचवेळेस फायदे मांडताना शाळा फक्त शहर वा शहरालगत आहेत असे मानून मांडणी केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि शिक्षण यांचा विचार करायला कोणालाही वेळउसंत नाही. अभ्यासाची एक लिंक पाठवली की विदयार्थी अभ्यास करतील,पालकाजवळ मोबाईल आहे म्हणजे तो आपल्या पाल्याला तो वापरू देईल,स्वत: त्याला शिकविल अशी अनेक मते गृहित धरली जात आहेत.
     आधी सप्टेंबरला, नंतर जुलैच्या उत्तरार्धात , मग 1 जुलै असे करत करत आता शासनस्तरावर 15 जून पासून शाळा सुरू करण्यासाठी हालचाल चालू झाली आहे. सध्या तरी रेडझोन वगळता ग्रीनझोनमध्ये शाळा सुरू करणे प्रस्तावित आहे. पण रेड झोन मधील शाळांचे काय???  या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळण्यापुर्वीच काही शिक्षणतज्ञ(?) वेगवेगळे उपाय सुचवायला लागले आहेत. विशेष म्हणजे यातील कोणाचेही विचार ग्रामीण भागातील शिक्षण,शाळा आणि शिक्षक यांच्या समस्या विचारात घेऊन मांडणी केली आहे असे आजघडीला तरी दुर्दैवाने घडत नाही.
       खरे पाहता काळाची गरज आहे ती सरकारी शाळा व त्यात दिले जाणारे शिक्षण सक्षम होण्यासाठी प्रयत्न करण्याची. गावातील हजारो कुटुंबे पुर्वी जी मुलांच्या शिक्षणासाठी शहराकडे धाव घेत होती,त्यातील शेकडो कुटुंबे आज कोरोनाच्या भितीने गाव जवळ करताना दिसत आहेत. त्यातील बहुतांश हातावर पोट असणारे लगेचच शहराकडे येतील असे वाटत नाही.आलेच तरी एकेकटे येतील ,सहकुटुंब येतीलच अशी परिस्थिती नक्कीच नाही. परिणामी गावाकडील शाळांना बुस्टर डोस मिळाला तर येथील रोडावणारा पट वाढेलच .पण जर चांगल्या सुविधांसह ( कारण अजूनही पालक काय भुललासी वरलीया रंगा रे.... या मानसिकतेचेच आहेत.) उत्तम शिक्षण मिळण्याची शक्‍यता वाटली तर तो पट टिकेलही आणि पालकांच्या खिशाला कमीतकमी कात्री लागून तो शिकेलही.
       ज्ञानरचनावाद शाळांमध्ये रुजू लागलेला आहेच. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत अशात शिकवणे दुय्यम व शिकणे प्रथम होताना दिसत असूनही काही विचारवंत उशीरा शाळा सुरू झाल्याने मुलांचे खुपच शैक्षणिक नुकसान होणार असे म्हणत आहेत. वास्तविक पाहता मागील सत्रातील 'अध्ययन- अध्यापन' ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. फक्त मुल्यमापन बाकी राहिले होते.परंतु मुल्यमापनालाच शिक्षण समजण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असे ते मानत आहेत आणि त्याच मानसिकतेतून शाळा सुरू होण्यास थोडाफार विलंब झाल्यास फार मोठे नुकसान होईल असे भासवले जात आहे. (हेच लोक एखाद्या शिक्षकास अध्यापन सुरु करण्यास पाच मिनिटे उशीर झाला तर 5 गुणिले वर्गातील विद्यार्थी संख्या एवढी मिनिटे शैक्षणिक नुकसान झाले असे मानत होते) .  गेल्या तीन चार वर्षात 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वीतेचा' थोडा विचार केला तर हा अतिरेक आहे हे कोणीही मान्य करेल.
       उशीरा शाळा सुरू झाल्याने होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा वेळेआधी व नंतर जास्त वेळ भरून नुकसान भरून निघेल असे मानणारे अनेक लोक आहेत त्यामध्ये पालक, शिक्षक आणि अधिकारीही आहेत.  कारण अभ्यासक्रम पुर्ण करणे म्हणजे शिक्षण झाले अशी ठाम समजूत सगळयांच्या मनात आहे. पण जरा थोडे मागे जाऊन असेच वेळेआधी जादा तासिका घेऊन विदयार्थी प्रगत करण्याचे उपक्रम आठवून पहा. ज्यांनी ते ग्रासरूटवर राबवले त्या शिक्षकांना आणि ज्यांनी ते सहन केले त्या विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन विचारा की, सकाळी 9 ते 10 असा एक तास जादा घेतल्यानंतर परिपाठानंतर लगेच शिकवावेसे वाटत होते का ?  दुपारनंतर 3 ते 5 या वेळेत त्यांची मानसिकता काय होती. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही यावेळी अध्ययन- अध्यापनाच्या मानसिकतेत नसायचे ही वस्तुस्थिती आहे.फक्त ती कागदोपत्री नोंदली गेली नाही एवढेच.
      आज जी आपत्कालिन परिस्थिती आहे तिचा विचार करता बौद्धिक पेक्षा मानसिक सक्षमतेची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे वेळ वाढवून, अतिरिक्त ताण देऊन फायदयापेक्षा तोटेच जास्त होतील. पाठयक्रम-अभ्यासक्रम स्वतंत्रपणे पुर्ण करणे हे उद्दिष्ट ठेवले तर आधिच ताणलेले रबर तुटण्याच्या बेतास येऊ नये म्हणजे मिळवले. आता नजरेसमोर हवीत ती शिक्षण आणि त्याची उद्दिष्टे .त्यासाठी सामाईक विषयांचे, सामाईक घटकांचे एकात्मिकरण करून घागर में सागर भरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असायला हवा. एक ना धड भाराभर चिंध्या करण्यापेक्षा नीर-क्षीर विवेक साधून नवनीत काढणे कधीही चांगलेच. शिक्षण हे आनंददायी हवे हे बोलण्यातून नव्हे तर कृतीतून दिसायला हवे.
     कोरोना जाईल किंवा त्यासोबत जगावे लागेलही पण त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक मनाने तरी खंबीर राहिल याचा विचार प्राधान्याने व्हावा हीच अपेक्षा...
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
      

Monday, May 4, 2020

तल्लफ



तल्लफ
       

            हा आहे चंद्रू. आईबापाने आवडीने चंद्रशेखर असे छान नाव ठेवले. पण हा ना धड चंद्र झाला ना शेखर.  मात्र आपल्या कर्माने असे काही चार चाँद लावले की, घरच्यांना हा आमचा आहे. हे सांगायलाही लाज वाटावी. स्वतःच्या नावातील चंद्राला जागायचे म्हणून की काय .. हे वीरवर सोमरस प्राशनात कुणाला हार जाणा-यातले नव्हते. सकाळी तोंड धुण्याअगोदर पावशेर चे आचमन,नंतर आंघोळीनंतर नवटाक असे प्रतिप्रहरी करत करत रात्री मित्रमंडळीला सोबत घेऊन सार्वजनिक पेयपान कार्य सुरू होत असे ते, हे महाशय जमलेल्या गोतावळयासह जागच्या जागीच आडवे होऊन दिवसाचा शेवट केला जाईपर्यंत.नेहमीच्या बोलण्यात नवटाक,पावशेर चपटी,हाफ,खंबा  असे शब्द असायचे.सोबतीला 'चाकना' म्हणून आयला,मायला,साले अशा सभ्य शिव्या दिल्याशिवाय वाक्यच पुर्ण होत नव्हते.
         तसे सगळे चांगलेच चाललेले होते. "पिओ,पिलाओ और कहीं भी जाकर गिरो !" हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे ही याची ठाम समजूत होती. अर्धी बाटली रिचवल्यावर तर ती समजूत अधिकच दृढ होत असे. रोजच्या दिनक्रमात तसूभरही...... नव्हे छटाकभरही बदल चालत नाही. जर चुकून कधी या मदिराप्राशनाच्या पुण्यकर्मात खंड पडलाच तर मात्र मदिरादेवीचा कोप चंद्रुच्या हातापायांवर लगेच जाणवायचा. चांगलीच तल्लफ लागायची.त्याचे हातपाय व्हायब्रेट मोडवर ठेवलेल्या मोबाईल फोन सारखे थरथरायला लागायचे. तोंडातून सायलेंट विथ् व्हायब्रेशन मोडवर ठेवलेल्या मोबाईलसारखा 'घुंर्रर्र..घुंर्रर्र...' असा आवाज निघायचा. त्याला काही म्हणजे काहीच सुचत नसे. कुठूनतरी नवटाकभर पोटात गेली की मग मात्र  100% रिचार्ज झालेल्या मोबाईलसारखा चालायला लागायचा. बरं! हे महोदय शराबी चित्रपटातील अभिताभ बच्चनना मानणारे. मग काय "जहाँ चार यार मिल जाये वही रात हो गुलजार..." ही हया 'अखिल भारतीय मदिराप्राशक मंडळा' ची टॅगलाईनच होती. सगळे जण ही टॅगलाईन नुसते पाळत नव्हते, तर अक्षरशः जगत होते. सगळा कसा आनंदी आनंद गडे असा मामला होता. पिणारे पित होते.पाजणारे पाजत होते. गटारात, रस्त्याच्या कडेला पडणारे पडत होते.
       पण देव आपल्याला वाटतो तेवढा दयाळू नाहीच ना ?  लोकांचे सगळे बिनबोभाट,शांतपणे चालू असले की त्याला लोकांची परीक्षा घेण्याची लहर येते. मग काय कुठेतरी मिठाचा खडा टाकलाच म्हणून समजा. तसेच झाले नेमके. जगभर कोरोनाची साथ आली. मार्च महिना अर्धा संपेपर्यंत भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली.देशात लाॅकडाऊन जाहीर केले. सगळे बंद झाले. दुकाने,गाडया,बार सगळेच. चंद्रुला प्यायला मिळेना.चार दिवस इथून तिथून कशीतरी मिळेल त्या भावात विकत घेऊन घसा ओला करत राहिला.पण तिही मिळेनाशी आणि मिळाली तरी परवडेनाशी झाली. दारूची तल्लफ यायची. बैचेनी वाढत चालली. पंधरा एप्रिल आली की,  सर्व ठीक होईल या आशेने तो दिवस ढकलत राहिला.पण कसले काय नि कसले काय... तो पुढे 3 मे पर्यंत वाढला. बेचैनी वाढत होती. विड्राॅवल सिम्प्टम्स वाढू लागले, हातपाय थरथरू लागले.कसाबसा मे महिना उजाडला.आता फक्त तीनच दिवस आणि मग काय!  त्यानंतर 'झुम बराबर झुम शराबीचाच ठेका धरायचा अशी स्वप्ने त्याला पडू लागली. पण हाय रे कर्मा तो लाॅकडाऊनही सतरा तारखेपर्यंत वाढवला. चंद्रुला आता आपण जगू शकणार नाही असे वाटायला लागले. इतके दिवस त्याच्या दारू पिण्याला वैतागलेली घरातली माणसेही त्याची कीव करू लागली. आणि मग ती आनंदाची बातमी आली. उद्यापासून म्हणजे 4 मे पासून वाईन शाॅप उघडणार. बातमी ऐकून त्याची अवस्था अगदी "आनंद पोटात माझ्या माईना रे माईना.." अशी झाली .रात्रभर डोळयाला डोळा लागला नाही.कधी एकदा उजाडते आणि वाईन शाॅपसमोर लाईनला उभा राहतो असे त्याला झाले होते. सकाळी लवकर उठून तो तयार झाला. छान आंघोळ केली. कपडे घातले.एवढी तयारी जत्रेला किंवा सणाला देवळात जायला ही केली नव्हती कधी. पण आजचा मूड काही औरच होता. शर्टच्या खिशात हात घालून पैशांचा अंदाज घेतला .फक्त वीस रूपयेच होते त्यात. पँटचे तिन्ही खिसे तपासून पाहिले.सर्व मिळून पंचेचाळीस रूपये मिळाले. फक्त पासष्ट रूपयांत काय येणार??  त्याचा आनंद कुठल्या कुठे विरून गेला.
       चंद्रुचा बाप हे पहात होता. तो खूप चिडला होता चंद्रुवर. पण जसा त्याचा चेहरा उतरलेला पाहिल्यावर बाप मनातून हलला. काय वाटले कोण जाणे पण, बाप उठला आणि आपल्या शर्टाच्या खिशात घरखर्चाला ठेवलेली शेवटची पाचशेची नोट काढून चंद्रुच्या हातावर ठेवली. बोलला काहीच नाही पण डोळे पाण्याने डबडबले होते. चंद्रुचे तिकडे लक्षच नव्हते. आपल्या खडूस बापाने पैसे दिले हेच विशेष हे मात्र त्याच्या मनात आलेच. पण विचार करायला वेळच नव्हता त्याच्याकडे. तो जवळजवळ धावतच  गेला.  वाईनशाॅप समोर लांबच लांब रांग लागली होती. सर्वजण ठराविक अंतर राखून उभे होते. जशी दुकान उघडण्याची चाहूल लागली, तशी मात्र रांग उधळली. जो तो पुढे घुसू लागला.एकच गोंधळ माजला. तेवढयात पोलिसांची गाडी आली. दुकानदाराला दुकान न उघडण्याची सूचना केली.पोलिसांनी शिस्त पाळण्याची सूचना दिल्या.पण कोणी ऐकेनात. झाले!  पोलिसांनी दणादण दणादण बॅटिंग करायला सुरवात केली. समोर आलेल्याचा पार्श्वभाग चेंडू आणि हातातला दंडूका बॅट आहे अशा अविर्भावात प्रत्येक चेंडूवर सिक्सर मारायला सुरवात केली. चंद्रुचे फुटबॉलच काय, आख्खी पाठीमागची पीचच पोलिसांनी खेळून काढली. दणादण बसणा-या दंडूक्यात हातातली पाचशेची नोट कुठे पडली याची शुद्धही त्याला राहिली नाही. धडपडत, वाकडातिकडा खेकडयाच्या चालीने तो घरी पोहोचला. घसा कोरडा पडला होता.पण आता तहान पाण्याची लागली होती. दारूची तल्लफ मात्र चांगलीच जिरली. आता तो घरात पोटावर झोपून आहे. पाठीवर काळया रेघांची नक्षी आणि काळे फुटबॉल घेऊन !!!
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ईमेल peavin.g.mhatre@gmail.com

Friday, May 1, 2020

बेभरवशाच्या पुलाखाली


        बेभरवशाच्या पूलाखाली....


        "ऐ ! कोन है रे तू , कहाँसे आया है ?" एक पोलिस उड्डाण पुलाखाली खांबाला टेकून झोपलेल्या शिवरामला त्याच्या दंडुक्याने ढोसत विचारत होता. शिवरामला तो आवाज दूरवरून कुठून तरी आल्यासारखा भासत होता.दंडुक्याचे टोक टोचत होतं, पण अनावर झोपेमुळे मेंदूच्या संवेदना शिथिल झालेल्या आणि डोळयांवर आलेली झापड यामुळे  डोळे उघडताना पापण्यांवर मणामणाचे ओझे ठेवल्यासारखे उघडायला त्रास होत होता. गेल्या तीन दिवसांपासूनची ती झोप अशी थोडीच झटकन उडणार होती.मागच्या दोन रात्री पुर्ण जागून काढलेल्या.म्हणूनच तर आज बसल्या जागी कधी डोळयाला डोळा लागला हे शिवरामला कळले सुद्धा नाही. पोलिसाच्या दंडुक्याचा दाब वाढल्यावर मात्र तो जागा झाला. आजूबाजूचे भान यायला काही वेळ गेला. पोलिसाने परत तोच प्रश्न विचारला. एव्हाना झोप उडालीच होती. आपल्या दोन्ही बाजूला आपल्या दोन लहानग्या मुली अजून झोपलेल्याच आहेत याच समाधानात चेह-यावर नकळत थोडे स्मित उमटले. पोलिसाच्या प्रश्नांचे उत्तर दयायला हवे होते. दोनवेळा एकच प्रश्न विचारावा लागल्याने तोही थोडा तापला होता. पण काय सांगावे, कुठून सुरुवात करावी हे काही त्याला सुचेना . काय सांगणार होता तो....  त्याच्या डोळयांसमोरून मागचा सगळा चित्रपट झरझर झरझर सरकत गेला.
       आपली बायको आणि दोन मुली असा त्याचा छानसा आटोपशीर संसार होता. श्रीमंती अशी नव्हती, पण चारजणांचे पोटभरेल एवढी कमाई होईल अशी नोकरी होती. सुशील,सुगरण पत्नी होती. दोघांचे एकमेकांवर आणि आपल्या दोन मुलींवर खूप प्रेम होते.घरात आनंदाला तोटा नव्हता. 'हम दो हमारे दो' असा सुखी संसार होता. पण नशीबाने वाकडी नजर फिरवली आणि दोन वर्षांपूर्वी पत्नी साधे तापाचे कारण होऊन आजारी पडली. एकातून दुसरे निघत निघत तिने जी खाट पकडली ती सहा महिन्यांपूर्वी शेवटचा श्वास घेतला तेव्हाच सुटली. संसाराचे एक चाक निखळलेच पण जाता जाता संसाराचा गाडाही खिळखिळा करून गेले.पत्नीच्या आजाराच्या दीड वर्षात शिवरामच्या गाठीशी असलेला सगळा पैसा तर संपलाच वर तिच्या उस्तवारीत कामाकडे दुर्लक्ष झाल्याने नोकरीही सोडावी लागल्याने घरात येणारा पैशाचा ओघही थांबला. शिवरामवर दोन मुलींची जबाबदारी टाकून पत्नी निघून गेली . तो पुरता हतबल झाला .पण त्याने छोटया मुलींकडे पाहून स्वत:ला सावरले. पुन्हा कामाला सुरुवात केली. आईची कमतरता भासू नये म्हणून जपू लागला. दोघींच्या चेह-यावरचे विरलेले हसू पुन्हा दिसू लागले,तसा त्याचा हुरूप वाढला. दोन मुली हेच त्याचे विश्व बनले.
         नशीबाला मात्र ते सुखही पहावलं नाही.एके दिवशी तो छोट्या मुलीला आंघोळ घालत होता. सहज मानेवरून हात फिरवताना त्याचा हात थबकला. मानेवर कसलीशी गाठ होती. मनात शंकेची पाल चुकचुकली. वेळ न घालवता सरळ दवाखाना गाठले. डाॅक्टरांनी तपासणी केली.  "आता निश्चित काही सांगता येणार नाही .पण तरीही मोठया डाॅक्टरकडे तपासून घे", डॉक्टर म्हणाले. "पण नेमकं काय झालं आहे डाॅक्टर ? "  डाॅक्टर काय सांगणार याचा अंदाज त्याला आला होताच. पण मन धावा करत होते की देवा माझा अंदाज खोटा ठरू दे, डाॅक्टरांच्या मुखाने तूच बोल,की माझी मुलगी ठीक आहे. "मला तरी साधी गाठ वाटत नाही,कॅन्सरची शक्यता नाकारता येत नाही. मी चिठ्ठी लिहून देतो. तू मुंबईला जाऊन चेक करून घे " डाॅक्टर म्हणाले आणि त्यांनी समोरच्या पॅडवर चिठ्ठी लिहून ती सखारामच्या हाती दिली.
       दोन मुलींना घेऊन मुंबई गाठली. चेकअप,औषधे,जेवण यात ब-यापैकी पैसा खर्च झाला.पण आनंदाची गोष्ट ही की सगळे रिपोर्टस नाॅर्मल आले. कॅन्सरची वाटलेली भिती खोटी ठरली याचा आनंद मोठा होता. खिशात फक्त परतीच्या प्रवासाइतके पैसे उरले होते. उदया सकाळची गाडी पकडून गावी परत जायचे याच आनंदात लाॅजवरच्या काॅटवर झोपी गेला. सकाळी लाॅजच्या मालकाने उठवले तेव्हा जी बातमी ऐकली त्याने तो घाबरला. देशभर लाॅकडाऊन केल्याने सर्व गाडया, रेल्वे रात्री बारा वाजल्यापासून बंद झाल्याचे ऐकताच घाईघाईने सामानाच्या पिशव्या उचलून तो मुलींसह स्टेशनवर जायला निघाला. रस्त्यावर येताच समोर पोलिस बाहेर फिरणा-यांना दंडुक्याने झोडपत असल्याचे पाहिले आणि तो घाबरला. परत येऊन पाहतो तर लाॅजवाला लाॅजला कुलूप लावून निघून गेलेला. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली. बाजूलाच उड्डाणपूलाखाली काही माणसे बसलेली पाहिली आणि तो त्यांच्या जवळ गेला. "कुठं जायचंय पाव्हनं? " त्यांच्यापैकी एकाने विचारले. "गावाला, सांगलीला जायचंय." शिवरामने सांगितले. "कसं जाणार दादा!  सगळंच बंद हाय की." त्याने फक्त मान डोलावली. एक दिवस गेला, दुसरा -तिसरा करता करता चौथा दिवस उजाडला . बाकीचे मनाचा हिय्या करून चालतच गावाला पायी चालत जायला निघाले .पण लहान मुलींना घेऊन आपल्याला ते शक्य होणार नाही हे समजून तो तेथेच पूलाच्या खांबाला टेकून बसून होता.पोलिस दिसताच लपायचे. कोणी खायला दयायला आले तर घेऊन मुलींना खाऊ घालायचे,सकाळी कुठे दूध मिळाले तर मिळेल त्या भावात घेऊन  मुलींना दयायचे, रात्रभर जागून त्यांच्यावर लक्ष ठेवायचे असे चालले होते. पण शेवटी झोप अनावर झाली आणि नेमका पोलिसांना दिसला. सगळी हकीकत त्याने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्याला तेथून दुसऱ्या एका पूलाखाली नेले. तेथे हिरवे कापड लावून तात्पुरती राहण्याची सोय केली होती. बरीच लोकं होती तिथे.किमान आधार तरी झाला. खायला देणारे अन्न देत होते पण देताना फोटो काढत होते.त्यामुळे घेताना उगाचच भिकारी असल्यासारखे वाटून ते नको वाटायचे. नाईलाज होता, उपाशी तरी किती दिवस राहणार ,घेणे भागच होते !!!
        पण आता वेगळीच भिती सखारामचे मन खाऊ लागली होती. जेव्हा कधी ही बंदी उठेल तेव्हा काय ?? जवळचा पैसा संपत आला होता.तिकिटाला ठेवलेले पैसे दूधात अर्धेअधिक संपले होते.काही दिवसांत तेही संपणार !  बंदी उठल्यावर आज खाऊ घालणारेही बंद होणार. ना घरी परतायला पैसा, ना खाण्याची,राहण्याची सोय.  एका   न सुटणा-या कोडयात शिवराम पडला. ते कोडेही कधी सुटेल याचीही मुदत नाही. सगळेच बेमुदत.  कसलीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या एका निर्णयाचे परिणाम हजारो शिवराम भोगत आहेत..... त्याच बेभरवशांच्या भरोशावर.

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540

Sunday, April 26, 2020

स्वप्नांचे लाॅकडाऊन

स्वप्नाचे लाॅकडाऊन


             सखा आज दिवसभर कामाच्या गडबडीत होता. सकाळी उठल्यापासूनच त्याची धावाधाव सुरू झाली होती. गेले दोन तीन महिने घेतलेली मेहनत फळाला आली होती. वडिलोपार्जित जमिनीचा जेमतेम पाऊण एकर तुकडा त्याच्या वाट्याला आला होता. एका ओढयाच्या काठी त्याची जमिन होती.त्या ओढयाच्या पाण्यावर वडिल हयात असल्यापासून मळा पिकविला जायचा. मागच्याच वर्षी वडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि मळयाची अन् घराची जबाबदारी सखावर येऊन पडली. आता तोच घरातल कर्ता षुरूष झाला होता. सखानेही ती जबाबदारी अगदी मनापासून स्विकारली. आजपर्यंत बापाच्या सावलीत तो मेहनत करत होता.आता तो स्वत:च स्वत:ची सावली बनला होता. ढोर मेहनत म्हणावी इतकी मेहनत त्याने मळयात केली होती. बाजूला वाहणारा ओढा पावसाळा संपला तरी दीड दोन महिने झुळझुळ वाहत रहायचा. नंतर मात्र तो आटायचा, मग मात्र त्याच्या खोलगट भागात डबरा खोदून त्यातून कावडी भरभरून पाणी आणून कारळी,दोडका,पडवळ पिकवली होती. वेलीवरच्या प्रत्येक फळाने बाळसे धरले होते. सखाने त्यांना खत,पाणी काहीच कमी पडू दिलेच नव्हते. मग का नाही बाळसे धरणार.... 
       आज तो भाजीची पहिली काढणी करणार होता.  त्याची धावपळ दिवसभर चालली होती.  तो त्याची बायको रखमा आणि एकुलती एक बारा वर्षांची सातवीत शिकणारी पण अचानक शाळेला सुट्टी लागल्याने त्यांच्या मदतीला आलेली त्यांची मुलगी शेवंता. अशी तिघेजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजीची काढणीला लागली होती. दुपारी चारघास खायला म्हणून तिघांचेही हात थांबले होते.  तेवढाच काय तो कामाला ब्रेक लागला होता.नाहीतर तिघांचीही कामाची गाडी काही थांबायला तयार नव्हती. सूर्य कलतीला लागला आणि हयांच्या कारळी, दोडकी, पडवळाचे नीटपणे बांधाबांध करून ढिगारे लागले होते. मार्केटला दरवेळी भाजी घेऊन जाणा-या टेम्पोवाल्याला कालच सांगून ठेवलेले होते. तो रात्री आठवाजेपर्यत येतो असे म्हणाला होता. सगळी उस्तवार नीट झाली होती. सहा वाजून गेले होते.अंधार पडायला सुरूवात झाली.सखाने रखमा आणि शेवंताला घरी पाठवून दिले.आता एकदीड तासांनी तो टेम्पो आला आणि सगळा माल त्यात चढवला की आपण सुटलो. बाजारात आपल्या भाजीला चांगला दर मिळेल याची सखाला शंभर टक्के खात्री होती. मालच तसा होता त्याचा. वर्षभर काटकसर करत तो आलेला होता तरीही गाठीला पैसा म्हणून नव्हता. कसेतरी दिवस ढकलत मनाला मुरड घालून संसाराचा गाडा हाकत होता. पण वाण्याचे बील थकलेच होते. त्याने आता पैशासाठी तगादा लावायला सुरवात केली होती.कसाबसा थोपवून धरला होता त्याला. आता मात्र आपला माल विकला जाईल भरपूर पैसा हातात येईल. वाण्याची उधारी तर फेडूच पण सहा महिन्यांचे राशनही आताच भरून ठेवू. रखमाला साडी, शेवंताला ड्रेस, काय काय घेऊ...सखाच्या विचारांचे घोडे चौखूर उधळले होते.मनातला आनंद चेह-यावर ओघळू लागला होता.  शेताच्या बांधावरच्या झोपडीत आपल्या आजूबाजूला भाजीच्या परडया घेऊन बसलेला सखा आनंदाच्या भरात एकटाच वेडयासारखा हसत होता. रात्र चढत गेली आठ वाजून गेले, घडयाळाच्या काटयाने दहालाही पार केले....मध्यरात्र उलटली- बारा वाजून गेले टेम्पोचा पत्ता नाही.येणा-या वाटेकडे डोळे लावून बसूनही दूरपर्यंत काहीच हालचाल दिसत नव्हती . तितक्यात थोडया अंतरावर बॅटरीचा उजेड दिसला. हळूहळू तो जवळ येऊ लागला आणि अंधाराला सरावलेल्या सखाच्या डोळयांनी तिकडून येणाऱ्या त्या सावल्या सहज ओळखल्या. त्या रखमा आणि शेवंता होत्या. सखाला आश्चर्य वाटले.एवढया रात्री या दोघी कशा आल्या ? त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. टेम्पोला काही...? त्याने मान झटकली आणि मनातील विचारही. एवढयात त्या दोघी बांधाजवळ पोहचल्या होत्या. शेवंता बाबा...!  बाबा..! म्हणून हाका मारत होती तिला त्याने हलकेच ओ दिली. त्या पोहचण्याअगोदरच सखाने विचारले,  "काय ग शेवंते,  आता का आल्या आणि टेम्पो कुठं हाय ?" . प्रश्न शेवंताला विचारल असला तरी तो आपल्याला आहे हे रखमाने ओळखले आणि तिने धापा टाकत उत्तर दिले.  "टेम्पोवाला नाय यनार, सगळां बंद हाय आजपासून ,त्या लाॅकडावून का काय बोलतान त्यां केलाय..!"
सखा करवदला. त्याला काहीच समजले नाही . त्याने परत विचारले,  "म्हणजे काय झालां आसां..?" "मोदीनी सगळां बंद केलाय,  तो करूना आलाय नं, म्हणून सगळया गा-या - घो-या बंद केल्यान. यक पुन गारी नाय कोठं जावाची यवाची आथा पंधरा तारखंपरेंत" रखमाने एका दमात सगळं सांगून टाकले. सखाला तिच्या बोलण्याचा सगळाच अर्थ लक्षात आलाच नाही,पण गाडया बंद अन् टेम्पो येणार नाही एवढे शब्द ऐकूनच तो जागच्या जागी धप्पकन् खाली बसला. समोरचा आधीचाच अंधार अधिक दाट झाला. मति गुंग झाली. समोरच्या भाजीच्या पिशव्या थरथर हलताना दिसू लागल्या. डोळयात भरलेल्या पाण्यात त्या धूरकट धूरकट दिसत होत्या. काय करावे सुचेना.तो नुसताच बसून राहिला. किती वेळ गेला हे समजलेच नाही .शेवटी रखमा हळूच म्हणाली,  " आथा काय करांचा ,या भाजीचा काय कराचा..?"  "बघू! " फक्त एवढाच एक शब्द सखा बोलला. त्याच्याजवळही आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही हे तिलाही माहित होते.
    सगळी स्वप्ने क्षणात धुळीला मिळाली होती. सगळी भाजी बाजारपेठेपर्यंत नेणे शक्य नव्हते. मनाचा हिय्या केला. एक पिशवी शेवंताच्या डोक्यावर दिली.भाराने ती बिचारी वाकली पण तिने हूं की चू केले नाही. परिस्थिती मेणालाही लोखंड बनवू शकते हेच खरे!.  एक पिशवी रखमाच्या डोक्यावर दिली आणि स्वत: सखाने दोन पिशव्या उचलल्या.  "चला,  उजाडेपर्यंत बाजाराच्या गावापर्यंत पोचलो पायजे.एवढा तरी विकू... बाकी देवाची मर्जी " असे म्हणून तो चालायला लागला. मागे शेवंता आणि रखमा पाय ओढत चालू लागल्या. गरीबाच्या गरीबीला दूर करायला देवालाही वेळ नसतो का? एवढाच एक विचार पावलागणिक करत सखा चालत होता. विस्कटलेल्या स्वप्नांचा एक तुकडा तरी हाती लागेल की नाही या विवंचनेत.......

प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण - रायगड
मो.नं.8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com

       

शिक्षणपद्धती बदलाची गरज??? 



खरंतर आताच काही आखाडे मांडणे किंवा काही उपाययोजनांवर चर्चा करणे थोडे घाईचे,  कदाचित अवास्तव वाटेल कारण देशातील कोरोना संकट अजूनही क्षितीजावर घोंगावणा-या वादळासारखे आहे.  वारे वहायला सुरुवात झाली आहेच,  सर्व विस्कळीत झालेलेच आहे.  पण त्याचा गाभा नेमका कुठे आहे आणि त्याची विनाशक शक्ती किती आहे,  ते किती भयंकर असू शकेल, जग , पर्यायाने आपण यातून कधी सावरू शकू याचा फक्त अंदाजच घेऊ शकतो.निश्चितता नाहीच . लाॅकडाऊन किती दिवसांपर्यंत अजून सुरू ठेवावे लागणार आहे , सर्व जगरहाटी सुरळीतपणे कधी सुरू होईल आणि त्यासोबतच मार्चच्या मध्यापासून बंद झालेल्या शाळा पुन्हा कधी सुरू होणार हे जिथे सांगता येणे अशक्यप्राय आहे.तेथे पुढचे निर्णय कसे घेता येतील. 3 मे पर्यंत लाॅकडाऊन आहेच. म्हणजेच 1 मे त्यातच जाईल.  अधिकृतपणे यादिवशी या शैक्षणिक वर्षाची सांगता होईल. पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू होईल का हे आजच सांगणे धाडसाचे ठरेल.परंतु त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात तरी व्हायलाच हवी. शाळा किती दिवस बंद ठेवता येतील ? सुरू केल्याच तरी कोणती खबरदारी घ्यावी लागेल ? ...महत्त्वाचे म्हणजे पूर्वपरंपरांगत शिक्षणपद्धतीच अवलंबून चालेल की काही वेगळे मार्ग शोधावे आणि चोखाळावे लागतील का याबाबत थोडे तरी विचारमंथन होणे आवश्यक आहे.
आपणही आपल्या मगदूराप्रमाणे थोडासा विचार करून पाहू या की काय करता येईल. कोणती शिक्षणाची पद्धत अबलंबता येईल ते!
          1) ONLINE STUDY(इंटरनेट द्वारे)  -
   सध्या शिकण्या- शिकवण्याच्या परंपरागत पद्धतीला सक्षम पर्याय म्हटला की online study चा विचार सर्वात प्रथम केला जातो. त्याला सुरूवातही झाली आहे. आपापल्या जागी बसून शिक्षक आणि विद्यार्थी अध्ययन-अध्यापन करत आहेत असे एक चित्र पुढे येऊ पाहत आहे. आपण एकविसाव्या शतकातील विसाव्या दशकात येऊन ठेपलेलो आहोत त्यामुळे एवढी मजल तरी मारणे अपेक्षितच आहे. ......पण !!! , हा पण च या मार्गावरील सर्वात मोठा अडथळा आहे. कारण घरोघरी मोबाईल पोहोचला आहे, अँड्रॉइड फोन ही मोठया प्रमाणावर वापरले जात आहेत, whatsapp,  facebook सारखे सोशल मीडियावरही गर्दी वाढत आहे पण आजही महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये मोबाईलची रेंज नाही, टाॅवर नाही, आहे तोही सक्षम नाही अशी अवस्था आहे. पालकाकडे मोबाईल आहे पण तो आपल्या पाल्याला वापरण्यासाठी किती वेळ देईल हे कोडेच आहे. ब-याच जणांची तर मानसिकताही अशी विचित्र आहे की,  एकवेळ आपले काम उरकून घेण्यासाठी मुलाला गेम खेळायला मोबाईल देतील. त्यासाठी वेगवेगळे हिंसक गेम डाऊनलोड करून देतील पण एखादे शैक्षणिक अॅप मग ते Diksha सारखे उपयुक्त का असेना. ते मात्र कोणी डाऊनलोड करायला,  लिंक ओपन करायला तयार होत नाहीत. दुसरा एक धोका आहे तो म्हणजे मुलांचे मोबाईल अॅडिक्शन वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मोबाईलवर पाठयांश समजून घेणे, तो सोडवणे, परत त्याचा प्रतिसाद देणे यासाठी किमान तीन चार तास (काही जाणकार हा वेळ सहा सात तासांचा मानतात) मोबाईल स्क्रीनला डोळे लावून बसणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण सध्या तरी हा एक पर्याय म्हणून स्विकारायला हरकत नसावी.
        2) ODD-EVEN system (सम विषम पद्धत)
   आजच्या घडीला तरी एक हास्यास्पद कल्पना वाटावी अशी ही पद्धत आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री मान. केजरीवाल यांनी वाहनांसाठी ही पद्धत अवलंबली तेव्हाही लोक हसलेच होते. पण कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी गर्दी कमी करून सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे.  त्यामुळे शाळांमधील बालके एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर रहाणे आवश्यक आहे. यामध्ये दोन पर्याय असू शकतात.  पहिला साधारणतः सगळयांना पचनी पडेल असा पर्याय म्हणजे दैनिक दोन सत्रात शाळा भरवणे.इथे इयत्तांची विभागणी असेल . काही इयत्ता सकाळ सत्रात तर काही दुपार सत्रात भरवणे. जेणेकरून विद्यार्थी संख्या विभागली जाऊन सोशल डिस्टंन्सिंग राखता येईल. दुसरा पर्याय अजून कोणी अंमलात आणलेला नाही परंतु तो जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये राबवता येऊ शकतो .एका वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन विभाग करून दिवसाआड शाळेत बोलावणे. शाळेत शिक्षकांनी शिकवणे व त्याचे दृढीकरण व स्वाध्याय सोडविण्याचे काम पालकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी घरात राहून करणे, त्या दिवशी दुसरा गट शाळेत येईल. असे नियोजन असेल. या पद्धतीला मान्यता मिळणे तसे कठिणच आहे कारण येथे पालकांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आणि निर्णायक असू शकते.  तसेच नोकरदार पालकांसाठी दिवसाआड मुले घरी असणे हे खूपच समस्या निर्माण करणारे ठरेल. तसेच शिक्षकांनाही दुप्पट काम करावे लागेल. शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणे व घरी असलेल्यांच्या संपर्कात राहून त्यांनाही आवश्यक ते मार्गदर्शन करणे ,आधीच्या दिवसाच्या गृहपाठाचा काटेकोर आढावा घेणे आणि सोबतच चालू दिवस व पुढच्या दिवशीच्या अभ्यासाचे नियोजन अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागेल.
       थोडी मेहनत आणि थोडी जबाबदारी स्वीकारली आणि या दोन्ही मधला सुवर्णमध्य साधला तर या कोरोना संकटातून बाहेर पडेपर्यंत शिक्षणप्रक्रिया थांबणार नाही आणि पुनश्च जोमाने काम करणे शक्‍य होईल.सर्व पुर्ववत झाल्यानंतर मग नियमित अभ्यास पद्धती सुरू करता येईलच तोपर्यंत वर्तुळाकार चक्रात फिरण्याऐवजी कधीतरी ते भेदून बाहेर पडण्याची धमक दाखवली तर  हे ही अशक्य नाही.

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो नं 8097876540

Monday, April 6, 2020

*इंडियाना जोश आणि वैज्ञानिक अंधश्रद्धा*
     
 वैज्ञानिक अंधश्रद्धा ???? विज्ञान आणि अंधश्रद्धा हे गणित कुणाच्याही पचनी पडणे तसे अवघडच. विज्ञान अंधश्रद्धा दूर करते, मग वैज्ञानिक अंधश्रद्धा खरंच असू शकतात का ?  हा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. पण काही गोष्टींचा विचार केला तर काही महाभाग असे आहेत की हे पवित्र(?) कर्म अगदी इमानेइतबारे करत आहेत . अर्थात ते या सगळ्या अफवा आहेत, अफवा आणि अंधश्रद्धा वेगवेगळ्या बाबी आहेत अशी मल्लिनाथी करू शकतात.परंतु अशा अफवांमधूनच पुढे अंधश्रद्धा दृढ होत असतात हे सर्वश्रृत आहेच. हे लोक इतर लोक कसे बुरसटलेल्या विचारांचे आणि आम्हीच कसे अत्याधुनिक विचारसरणीचे असा मुखवटा घालून फिरणारे आहेत . भारतीय संस्कृती खूप जुनी आहे. परंतु ती जुनी आहे म्हणून टाकाऊ,मागासलेली आहे असा यांचा जावईशोध त्यांचा त्यांनीच लावलेला असतो.
         सन 1979 चा मे महिना आणि जुलै महिन्याच्या पूर्वार्धात अशीच एक अफवा पसरली होती. आकाशातून आपल्यावर काहीतरी पडणार, आपण मरून जाऊ असे सगळया लोकांना वाटू लागले होते. खरंतर ते काहीतरी म्हणजे ' *स्कायलॅब* ' होती जी काम करेनाशी झाल्याने समुद्रात पाडून टाकण्याचे प्रयत्न सुरु केले होते पण देशातील सर्वांना ते 78 टनाचे धूड आपल्याच गावावर पडणार,सगळे मरून जाणार असे वाटत होते. सगळयांनी मरणारच आहोत म्हणून घरात पाळलेल्या कोंबडया कापून खाल्ल्या (त्याकाळी आतासारख्या दर रविवारी,बुधवारी चिकन-मटन खात नसत.काही खास कारणालाच कोंबडे कापत). शेवटी 11 जुलै 1979 स्कायलॅबचा काही भाग हिंदी महासागरात व काही भाग आॅस्ट्रेलियाच्या जवळ पडल्याची बातमी रेडिओवर ऐकली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर 1998 साली अशीच *मोठी लाट येणार* सर्व वाहून जाणार... अशी आवई उठली, पुन्हा एकदा लोकांनी कोंबडया कापून खाल्ल्या पण तेव्हाही ते जिवंत राहिले.
    *विज्ञानाने पसरवलेली सर्वात मोठी अफवा होती ती Y2K बाबतची*. Y2K म्हणजे सन 2000. दुसरे सहस्रक सुरू होताच म्हणे सर्व कंप्युटर बिघडतील 00 वर्षामुळे बॅकिंग क्षेत्र गडबडेल, क्षेपणास्त्राचे टाईम बिघडले तर आपोआप लाँच होऊन अनर्थ होईल,  एकंदरीत जग संकटात येईल असे सांगितले जात होते. त्यावरही तोडगा निघाला . जगाने 2000 साल पाहून आज 20 वर्षे पालटली. पुढे 2012 साल पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यावर आधारित सिनेमाही आला.  त्यातील ग्राफिक्स व स्पेशल इफेक्ट्सने तर जग हादरून गेले. पण ते वर्षही सुखनैव पार पडले.यादरम्यान मोबाईल फोन आले. निरोप देण्याघेण्याचे काम करता करता या मोबाईलने घडयाळ, ट्रांझिस्टर, कॅमेरा, आलार्म क्लाॅक अशा अनेक गॅझेटसना आपल्यात सामावून घेउन टाकले. फेसबुक,ट्विटर,वाॅट्स अप, ईन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाने जगाचे भावविश्व व्यापून टाकले. मग सुरू झाले अंधश्रद्धा पसरवणारे मेसेज. अमुक मेसेज,अमुक जणांना पाठवा असे पारंपारिक अंधश्रद्धाळू मेसेज पाठवता पाठवता *"आज रात्री मोबाईल दूर ठेवा, अमक्या वेळी काॅस्मिक किरणे बाहेर पडतील.."* असे वैज्ञानिक अंधश्रद्धा पसरवणारे मेसेज सुरू झाले. अशातच मोदी सरकार सत्तेत आले आणि मग काय पाहता. सत्ताधारी आणि विरोधक यांचे आयटी सेल कार्यरत झाले.  अंधभक्त, 40 पैसेवाले, चाटू अशी कमेकांची संभावना करत भारतीय संस्कृती आणि विज्ञान या दोहोंचेही अक्षरशः वाभाडे काढणारे, एकमेकांच्या मताला छेद देणारे मेसेज सुरू झाले. कोणतेही,कसेही लाॅजिक लावून फक्त आणि फक्त विरोधाला विरोध करत अंधश्रद्धा पोसली- वाढवली जाऊ लागली. जुन्या अंधश्रद्धा एकवेळ परवडल्या पण विज्ञानाचे नाव घेऊन अकलेचे तारे तोडणा-यांना कसे रोखणार??
     आजच्या घडीला तर टाळया,थाळया आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे तर या दोन्ही बाजूंच्या दिवटयांनी तर अफवा,अंधश्रद्धांचे भडके उडवायला सुरवात केली आहे. साध्या टाळया वाजवायला सांगितल्या तर त्यावर अफलातून शोध लावत त्याद्वारे कायकाय होऊ शकते हे सांगणारे संस्कृतीवादी आणि हे कसे चुकीचे आहे हे सांगणारे तथाकथित बुद्धीवादी यांनी जो हैदोस समाजमाध्यमांवर घातला त्यातून ज्या पोलिस,डाॅक्टर,नर्स यांचे आभार प्रदर्शन राहिले दूरच ते राहिले बाजूला आणि हयांच्याच कोंबडझुंजी सुरू झाल्या.  थाळया फोडणे, सिलेंडर बडवणे, संचारबंदीचे उल्लंघन करून मोर्चे काढणे असले प्रकार घडले. हे कमी की काय म्हणून पुन्हा एकदा मोदीजींनी आपण सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी लाइट बंद करून दिवे, मोबाईल टॉर्च पेटवून एकमेकांना आपण एकत्र आल्याचे समाधान देण्याचा प्रस्ताव मांडला आणि मग काय पाहता... दोन्ही बाजूचे संशोधक धडाधड पाहिजे तसे खोटयाला ख-याचा मुलामा देऊन आपले घोडे दामटू लागला.  कुणी म्हणे अमुक एवढे तापमान होईल, तर कुणी म्हणे पाॅवर ग्रीड फेल होऊन देश काही दिवसांसाठी अंधारात जाईल...
        शेवटी काहीच झाले नाही . यातून दिसून आला तो आपल्या भारतीयांचा 'जोश'  आणि अतिउत्साह. ज्याला आपण इंडियाना जोन्सच्या तालावर "इंडियाना जोश" म्हणू शकतो. भारतावर राज्य करायचे असेल तर हया जोश चा वापर ज्याला करता आला तो देशाचे काहीही भले न करताही देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवू शकतो हे कित्येक वेळा दिसून आले आहे. हा जोश वाढविण्यासाठी कोणी धर्म नावाची कफूची गोळी देतो,तर कोणी देशाच्या, राज्यांच्या सीमा धगधगत्या ठेवून आपली पोळी भाजून घेत असतो. सर्वसामान्य मात्र फक्त आणि फक्त जळतच राहतो.  तो कधी बाॅम्बस्फोटात मरतो,कधी सैनिक म्हणून सीमेवर मरतो,कधी नोटबंदीच्या रांगेत मरतो , तर कधी आपले चंबूगबाळ सावरत आपले गाव गाठण्यासाठी उपाशीपोटी बायकापोरांसकट रस्तोरस्ती भटकत,धडपडत ऊर फुटेस्तोवर चालत राहतो. पण मरतो तोच. ज्याने हा जोश दाखवलेला असतो तोच.  *इंडिया नेहमीच सुरक्षित असतो खतरे में नेहमीच भारत असतो.*
     पण तरीही आमचा हा इंडियाना जोश कधीच कमी होणार नाही. हे कोरोनाचे संकट टळू दे, मग पुन्हा आम्ही आमचे झेंडे घेऊन फडकवायला तयारच आहोत. खरं ना?????

प्रविण म्हात्रे
पिरकोन, उरण,रायगड

Friday, March 6, 2020


आयी होली आयी रे
"मल दे गुलाल मोहे
आयी होली आयी रे...."
     
   सगळीकडे होळीची धूम. स्पीकरवर होळीची गाणी वाजू लागतात....कानावर कामचोर चित्रपटातील "मल दे गुलाल मोहे..." गाण्याचे बोल ऐकू लागतात आणि कोणीही असो प्रत्येकाचे ते आवडते गाणे असल्याने मनापासून ऐकायला सूरूवात केली जाते. पण त्यातील "आयी आयी रे याद आयी ..आयी होली आयी रे....."  या ओळींवर मात्र मनात विचारचक्र फिरायला सुरूवात होते.जर का ऐकणारा वयाची तिशी पार केला असेल तर अगदी पंचवीस -तीस वर्षापूर्वीच्या होळीच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या नाही तर नवलच.....
            होळी म्हटले की एक वेगळीच मजा यायची. माघ महिना संपला की लग्नसराई सुरू झालीच. लग्नघराच्या किंवा आसपासच्या घरांवर लावलेले लाऊड स्पिकरचे कर्णे जोरजोराने वाजू लागत. त्यातच हमखास एक गाणे असायचे ते म्हणजे...
माघ मास गेला नि शिमगा उंगवला
माय शोधावा शोधावा भरतार मला....
लग्नाची धामधूम असायचीच पण कोणीतरी याच गाण्याचा आधार घेऊन बोलायचे
"अरे शिमगा सुरू झाला, होळी जवळ आली. होळी , मुल्हारी आणि पिलू शोधून ठेवा. "
मग काय म्हणता.  असले उदयोग करायला एका पायावर तयार असलेली तरूण आणि किशोरवयीन मुलांची फळी कुणाच्या तरी आदेशाचीच फक्त वाटच पहात असल्यासारखी कामाला लागायची.सगळयांनाच होळीचे वेध लागलेले असायचे तशी बच्चे कंपनीही काही मागे नसायची. इकडे मोठी मुले माणसे होळीच्या दिवशी लागणाऱ्या  मुख्य होळीसाठी मोठे झाड,  होळीच्याच शेजारी दुसरी एक लहान होळी लावली जाते तिला ग्रामीण भाषेत मुल्हारी (मुराळी) म्हणतात.त्यासाठी लागणारे दुसरे झाड आणि होळीच्या दिवसा आधीपासून पाच दिवस छोटया छोटया अगदी एखादया फांदीच्याच होळया संध्याकाळी सूर्यास्तानंतर दररोज लावल्या जातात त्यांना पिलू म्हणतात,  अशी सगळी झाडे शोधायची. हेरून ठेवलेली झाडे ही काटे सावरीचीच असायची. दुसरे झाड शक्यतो वापरले जात नाही.त्यातही मुख्य गोष्ट अशी असायची की ,  ही झाडे जेव्हा आणली जात तेव्हा त्या झाडाच्या मालकाची परवानगी वगैरे न घेताच तोडून आणत. मग त्याचा मोबदला देणे वगैरे तर दूरचीच बात. उलट मालकाच्याच नावाने जोरजोराने बोंबा मारत रात्रीच्या काळोखात आपल्या गावाच्या वेशीच्या जवळ असलेल्या माळरानात किंवा कुणाच्यातरी कुरणात आणून ठेवत.  तिकडे।                   
  लहान मुलंही मागे नसत त्यांचे तर काय विचारता. एकदा का आमलकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पहिले पिलू लावले की,  सगळेजण त्या होळीतील थोडीशी राख घरी घेऊन येत आणि घरातील मोठ्यांना, वडिलधा-यांच्या कपाळावर ती राख लावून त्यांना नमस्कार करत.  नंतर त्यांची खरी होळी सुरू होत असे. लहान मुली आपल्या आईच्या , ताईच्या  मागे "मला साडी दे, मला साडी नेसव..."  अशी भुणभुण लावायला सुरवात करत . तर मुलांनी दुपारच्या वेळीच जुना पत्र्याचा डबा , एखादे टिनपाट शोधून ते दगडाने ठोकूनठोकून त्याचा सपाट पत्रा बनवलेला असायचा. मोठ्या माणसांची मदत घेऊन वरच्या बाजूला खिळयाने दोन भोके पाडून त्यात दोरी ओवून बांधून घेतलेली असायची .  हा पत्रा म्हणजेच त्यांचा ढोल-ताशा असायचा.  त्याचबरोबर उकडलेल्या मक्याच्या बोंडाचा दाणे खाऊन उरलेला मधला कडक भाग एका काठीला खुपसून त्याचा ढोल वाजवायचा ढुम्मा केलेला असायचा. रात्रीच्या वेळेस एका मुलाला शर्टपँट घालून व एका मुलीला साडी नेसवून आताच लग्न झालेल्यांचे बाशिंग बांधून त्यांना नवरानवरी बनवत. जर बाशिंग नाहीच मिळाले नाही तरी काहीच अडत नसे.बाशिंग नसेल कसले तरी फूलापानांचे बाशिंग त्या छोटया नवरानवरीला बांधत. पत्र्याचे बँडवाले मक्याच्या कणसाच्या ढुम्म्यासह तयारच असायचे. इतर छोटया 'करवल्या' आयांच्या साडया लावून त्या तो साडीचा बोंगा सांभाळत तयार होऊन आल्या की,  बँडवाले "डिच्चिक डिच्चिक..." वाजवायला सुरुवात करत . ही वरात गावभर फिरवली जायची. एकाच वेळेस वेगवेगळ्या आळयांमधील मुलांच्या दोनचार वराती निघालेल्या असायच्या .त्या आमनेसामने आल्या तर मग काय..  डिच्चिक डिच्चिकचा स्वर टीपेला पोहचायचा कणसाचे,काठीचे तुकडे तुकडे होत. पुन्हा नवीन कणीस-काठी तयार केली जायची.पत्रा चेचून चेचून वाकडातिकडा होऊन जायचा.पण कोणीही माघार घ्यायला तयार नसायचा. शेवटी ज्याच्या कणसे-काठया संपल्या, पत्रे फुटले ते माघार घेत.हा सण खोडया काढण्याचा. दुसर्‍याला बिनधास्तपणे अपशब्द वापरण्याचा , दुसऱ्याचे ऐकायचा आणि इतरांना मुद्दाम त्रास देउन त्यातूनच एक चांगली सामाजिकता जपण्याचा विरोधाभासी वाटणारा असा सण असल्याने या वरातींवर विरूद्ध पार्टी छुपा हल्ला करत असे. ही वरात एखाद्या काळोख्या गल्लीत आली की त्यांच्यावर धूळ-माती उधळली जायची. मग मात्र संपूर्ण वरातच ऊधळली जायची. आलटून पालटून सगळयांनीच हे हल्ले केलेले आणि सोसलेले असायचे. पण पाच दिवस हेच चालायचे. तात्पुरता राग आला तरी हे सगळे खेळ म्हणूनच अगदी 'खिलाडूवृत्तीने' स्विकारले जायचे.
          एकदा का होळीचा दिवस ऊगवला की , होळीचे झाड सजवून वाजत गाजत आणून होळीच्या माळावर उभे केले जायचे. हे करताना इतरांच्या नावाने बोंबा मारणे सुरू असायचे.संध्याकाळी होळीचे पूजन करत.होळीच्या रात्री बारा वाजेपर्यत जागरण करत थांबायचे .मग टाईमपास म्हणून कुटुंब ,आळी अशा गटागटात काळे चणे ऊकडून ते खात असत , त्यपैकी चारपाच चणे जपून ठेवावे लागत , नाहीतर दुस-या दिवशी कोणी वांगनी (मूळ शब्द 'वानगी') दाखवा म्हणाले आणि जर ते नसतील तर दंड म्हणून पुन्हा सगळयांसाठी चणे आणून दयावे लागत. त्यामुळे ही खबरदारी घ्यावीच लागे.
होळीच्या दुस-य़ा दिवशीची धुळवड , खेळ मागणे चालायचे.या खेळीयांची सादरीकरणासाठी आवडती कथा रामरावण युद्धाची ,हनुमंताची संजीवनी आणण्याची. सोंग घेणारे फकीर, घरपट्टीवाले बनत. काहीच जमणार नसेल तर पत्र्याचा ताशा वाजवत प्रत्येक घरासमोर जाउन....
"हा हा हावली शी शी शिमगा
ऐनचे बैना घेतल्याबिगर जाईना
यां घर माझे वलखीचा
दारी वृंदावन तुळशीचा.."
असे गाणे म्हणत खेळ मागत फिरत.
विशेषत: काही मुली एका कलशावर नारळ ठेवून प्रत्येक घरासमोर तो मांडून गाणे म्हणत.....
"चिच बाय चिचुकले चिचचा पाला
भलतूबाय नारीला हिरवा चुडा
चुडा भरून जेली मंगले दारा
मंगलेदारीचा फुलेला चाफा
भर गं भलतूबाय केसानु खोपा "
असे गाणे म्हणत .(ही भलतूबाय फक्त कोणाचे नाव माहित नसेल तेथे वापरत ज्या स्त्रीचे नाव माहित असेल तर तीचेच नाव घेत).काही मुलं त्यांचा नारळ पळवायचा प्रयत्न करत, पण पळवलाच तरी त्यांच्या हाती काहीच लागत नसे.....कारण नारळ पळवणार याची जाणीवअसल्याने त्यापण होळीसाठी मोदक करायला फोडलेल्या नारळाच्या करवंटया चिकटवून तो नारऴ कलशावर ठेवत असत  त्यामुळे चोरणा-यांचा पोपट व्हायचा.
होळी संपली तरी खेळ संपत नसत. होळी पेटवून  ती बाजूला असणा-या पाण्यात टाकलेली असायची ती नंतर काढून  शेताच्या बांधावर ठेवून त्याचा सी- साँ खेळणे ती गोल फिरवून सगळयांना पाडणे अशाप्रकाचे वचित्र खेळ असत त्यातही काही खरचटले , लागले आणि ते घरात  कळले तर पुन्हा घरचा प्रसादही मिळायचा. तशीच होळी तळयातही विसर्जित केलेली असायची.तेेथेही अशाच त-हेचे खेळ असायचे.ब-याच वेळा बुचकळून पाणी पिल्याचेही आठवत असेलच ब-याचजणांना .....आता मात्र या आठवणीच उरल्यात.  एकतर तो होळीच्या सणातला निरागसपणा आणि खिलाडूवृत्ती हरवलेली आहेच. त्याबरोबरच झाडांची संख्याही कमी झाली आहे.झाडे तोडून सण साजरा करणे आता परवडणारे नाही.  पाच पिलू पेटवण्याची पद्धत तर जवळपास नष्टच झाली आहे ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. पर्यावरणाची जाण ठेवून परिसरातील आणि आपल्या मनातील आतल्या कच-याची होळी साजरी करून आनंदाची धुळवड खेळायला काय हरकत आहे ? ...आनंद देणे आणि घेणे हेच तर सणांमधून घडायला हवे.......
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com