स्वप्नाचे लाॅकडाऊन
सखा आज दिवसभर कामाच्या गडबडीत होता. सकाळी उठल्यापासूनच त्याची धावाधाव सुरू झाली होती. गेले दोन तीन महिने घेतलेली मेहनत फळाला आली होती. वडिलोपार्जित जमिनीचा जेमतेम पाऊण एकर तुकडा त्याच्या वाट्याला आला होता. एका ओढयाच्या काठी त्याची जमिन होती.त्या ओढयाच्या पाण्यावर वडिल हयात असल्यापासून मळा पिकविला जायचा. मागच्याच वर्षी वडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि मळयाची अन् घराची जबाबदारी सखावर येऊन पडली. आता तोच घरातल कर्ता षुरूष झाला होता. सखानेही ती जबाबदारी अगदी मनापासून स्विकारली. आजपर्यंत बापाच्या सावलीत तो मेहनत करत होता.आता तो स्वत:च स्वत:ची सावली बनला होता. ढोर मेहनत म्हणावी इतकी मेहनत त्याने मळयात केली होती. बाजूला वाहणारा ओढा पावसाळा संपला तरी दीड दोन महिने झुळझुळ वाहत रहायचा. नंतर मात्र तो आटायचा, मग मात्र त्याच्या खोलगट भागात डबरा खोदून त्यातून कावडी भरभरून पाणी आणून कारळी,दोडका,पडवळ पिकवली होती. वेलीवरच्या प्रत्येक फळाने बाळसे धरले होते. सखाने त्यांना खत,पाणी काहीच कमी पडू दिलेच नव्हते. मग का नाही बाळसे धरणार....
आज तो भाजीची पहिली काढणी करणार होता. त्याची धावपळ दिवसभर चालली होती. तो त्याची बायको रखमा आणि एकुलती एक बारा वर्षांची सातवीत शिकणारी पण अचानक शाळेला सुट्टी लागल्याने त्यांच्या मदतीला आलेली त्यांची मुलगी शेवंता. अशी तिघेजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजीची काढणीला लागली होती. दुपारी चारघास खायला म्हणून तिघांचेही हात थांबले होते. तेवढाच काय तो कामाला ब्रेक लागला होता.नाहीतर तिघांचीही कामाची गाडी काही थांबायला तयार नव्हती. सूर्य कलतीला लागला आणि हयांच्या कारळी, दोडकी, पडवळाचे नीटपणे बांधाबांध करून ढिगारे लागले होते. मार्केटला दरवेळी भाजी घेऊन जाणा-या टेम्पोवाल्याला कालच सांगून ठेवलेले होते. तो रात्री आठवाजेपर्यत येतो असे म्हणाला होता. सगळी उस्तवार नीट झाली होती. सहा वाजून गेले होते.अंधार पडायला सुरूवात झाली.सखाने रखमा आणि शेवंताला घरी पाठवून दिले.आता एकदीड तासांनी तो टेम्पो आला आणि सगळा माल त्यात चढवला की आपण सुटलो. बाजारात आपल्या भाजीला चांगला दर मिळेल याची सखाला शंभर टक्के खात्री होती. मालच तसा होता त्याचा. वर्षभर काटकसर करत तो आलेला होता तरीही गाठीला पैसा म्हणून नव्हता. कसेतरी दिवस ढकलत मनाला मुरड घालून संसाराचा गाडा हाकत होता. पण वाण्याचे बील थकलेच होते. त्याने आता पैशासाठी तगादा लावायला सुरवात केली होती.कसाबसा थोपवून धरला होता त्याला. आता मात्र आपला माल विकला जाईल भरपूर पैसा हातात येईल. वाण्याची उधारी तर फेडूच पण सहा महिन्यांचे राशनही आताच भरून ठेवू. रखमाला साडी, शेवंताला ड्रेस, काय काय घेऊ...सखाच्या विचारांचे घोडे चौखूर उधळले होते.मनातला आनंद चेह-यावर ओघळू लागला होता. शेताच्या बांधावरच्या झोपडीत आपल्या आजूबाजूला भाजीच्या परडया घेऊन बसलेला सखा आनंदाच्या भरात एकटाच वेडयासारखा हसत होता. रात्र चढत गेली आठ वाजून गेले, घडयाळाच्या काटयाने दहालाही पार केले....मध्यरात्र उलटली- बारा वाजून गेले टेम्पोचा पत्ता नाही.येणा-या वाटेकडे डोळे लावून बसूनही दूरपर्यंत काहीच हालचाल दिसत नव्हती . तितक्यात थोडया अंतरावर बॅटरीचा उजेड दिसला. हळूहळू तो जवळ येऊ लागला आणि अंधाराला सरावलेल्या सखाच्या डोळयांनी तिकडून येणाऱ्या त्या सावल्या सहज ओळखल्या. त्या रखमा आणि शेवंता होत्या. सखाला आश्चर्य वाटले.एवढया रात्री या दोघी कशा आल्या ? त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. टेम्पोला काही...? त्याने मान झटकली आणि मनातील विचारही. एवढयात त्या दोघी बांधाजवळ पोहचल्या होत्या. शेवंता बाबा...! बाबा..! म्हणून हाका मारत होती तिला त्याने हलकेच ओ दिली. त्या पोहचण्याअगोदरच सखाने विचारले, "काय ग शेवंते, आता का आल्या आणि टेम्पो कुठं हाय ?" . प्रश्न शेवंताला विचारल असला तरी तो आपल्याला आहे हे रखमाने ओळखले आणि तिने धापा टाकत उत्तर दिले. "टेम्पोवाला नाय यनार, सगळां बंद हाय आजपासून ,त्या लाॅकडावून का काय बोलतान त्यां केलाय..!"
सखा करवदला. त्याला काहीच समजले नाही . त्याने परत विचारले, "म्हणजे काय झालां आसां..?" "मोदीनी सगळां बंद केलाय, तो करूना आलाय नं, म्हणून सगळया गा-या - घो-या बंद केल्यान. यक पुन गारी नाय कोठं जावाची यवाची आथा पंधरा तारखंपरेंत" रखमाने एका दमात सगळं सांगून टाकले. सखाला तिच्या बोलण्याचा सगळाच अर्थ लक्षात आलाच नाही,पण गाडया बंद अन् टेम्पो येणार नाही एवढे शब्द ऐकूनच तो जागच्या जागी धप्पकन् खाली बसला. समोरचा आधीचाच अंधार अधिक दाट झाला. मति गुंग झाली. समोरच्या भाजीच्या पिशव्या थरथर हलताना दिसू लागल्या. डोळयात भरलेल्या पाण्यात त्या धूरकट धूरकट दिसत होत्या. काय करावे सुचेना.तो नुसताच बसून राहिला. किती वेळ गेला हे समजलेच नाही .शेवटी रखमा हळूच म्हणाली, " आथा काय करांचा ,या भाजीचा काय कराचा..?" "बघू! " फक्त एवढाच एक शब्द सखा बोलला. त्याच्याजवळही आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही हे तिलाही माहित होते.
सगळी स्वप्ने क्षणात धुळीला मिळाली होती. सगळी भाजी बाजारपेठेपर्यंत नेणे शक्य नव्हते. मनाचा हिय्या केला. एक पिशवी शेवंताच्या डोक्यावर दिली.भाराने ती बिचारी वाकली पण तिने हूं की चू केले नाही. परिस्थिती मेणालाही लोखंड बनवू शकते हेच खरे!. एक पिशवी रखमाच्या डोक्यावर दिली आणि स्वत: सखाने दोन पिशव्या उचलल्या. "चला, उजाडेपर्यंत बाजाराच्या गावापर्यंत पोचलो पायजे.एवढा तरी विकू... बाकी देवाची मर्जी " असे म्हणून तो चालायला लागला. मागे शेवंता आणि रखमा पाय ओढत चालू लागल्या. गरीबाच्या गरीबीला दूर करायला देवालाही वेळ नसतो का? एवढाच एक विचार पावलागणिक करत सखा चालत होता. विस्कटलेल्या स्वप्नांचा एक तुकडा तरी हाती लागेल की नाही या विवंचनेत.......
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण - रायगड
मो.नं.8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com

No comments:
Post a Comment