नागपंचमी....श्रावण महिना सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण. लहानपणापासूनच श्रावण महिन्याची ओढ लागलेली असायची. नाही ! तसा श्रावण पाळणारा किंवा उपवास करणा-यांपैकी मी नाही. मी उपवास करतो ते फक्त वारसा हक्काने मिळाले असल्याने. एक संकष्टी चतुर्थी जो आई करायची आणि दुसरा श्रीकृष्णजन्माष्टमीचा जो बाबा करायचे. पण हा महिना आवडत असे त्याला कारण होते ते या महिन्यात येणारे सण आणि त्यामुळे शाळेला मिळणा-या सुट्टया. सोबतच श्रावणी सोमवारी अर्धा दिवसाची शाळा (आमच्या लहानपणी श्रावणी सोमवारी शाळा सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असायची, सध्या मात्र सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत असते) उन्हाळी सुट्टीनंतर शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली की तेव्हापासून ते सरखेल कान्होजीराजे आंग्रे पुण्यतिथीची अर्धा दिवस सुट्टी वगळता दोन महिने शनिवार रविवार याच सुट्टया असायच्या .पण एकदा का श्रावण सुरु झाला की सुट्टयाच सुट्ट्या मिळायच्या. त्यामुळे ' श्रावणमासी हर्ष मानसी.... ' हे आमच्यासाठी पुर्णत: खरे असायचे. याची नांदी व्हायची ती नागपंचमीच्या सुट्टीने. नागपंचमीचा उपवास जिच्या पाठीवर भाऊ आहे अशा मुली किंवा महिलाच करतात. त्या गावाशेजारच्या जंगलात असणा-या वारूळाला जाऊन नागाची पूजा करतात.आमच्या गावाशेजारी असे वारूळ वगैरे नव्हते, पण दोन अशी ठिकाणे होती जिथे हमखास नाग पहायला मिळायचा. पहिले ठिकाण गावाच्या उत्तरेला ज्या भागाला का कोण जाणे पण 'बाभूळ' हे नाव आहे, जिथे बोरीचे झाड होते परंतु बाभूळ असल्याचे आठवत नाही. तेथे एका कातळावर असलेल्या फटीत एक नाग असायचा. दुसरे ठिकाणी होते गावाच्या दक्षिण सीमेवर असलेले शंकर मंदिर. इथे दिसणारा नाग वर्षभर तसा कधी पहायला मिळत नसायचा.पण या महिन्यात तो कुठून यायचा माहित नाही . तो देवळाच्या बाहेर भिंतीत असलेल्या फटवजा बिळात बसलेला दिसायचा. एरवी हे शंकर मंदिर गावाबाहेर असल्याने सुनसान असायचे.ज्याला शांतता हवी असेल असा कोणीतरी येथे येऊन बसायचा. परीक्षा काळात काही विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी या मंदिरात येत. बाकी इतरवेळी हा परिसर शांत असायचा. पण नागपंचमीला सकाळ पासून दुपारपर्यंत वर्दळ खूप असायची. उपवास करणा-या बहिणी सोबत फक्त प्रसाद खाण्यासाठी मी पण जात असे. हा प्रसादही काही भारी नसायचा. उकडलेले हरभरे,भाताच्या (साळीच्या) लाहया, असलेच तर गूळ एवढाच काय तो प्रसाद असायचा. पण तो ही अमृतासमान वाटायचा.
बरीच वर्षे उलटली आता शिक्षण पुर्ण झाले अन् शाळा सुटली आणि पुन्हा नशीबात शाळाच आली. फक्त भूमिका बदलली होती शिकणारा मी आता शिकवणारा झालो होतो. 1994 च्या जुलै महिन्यात नोकरीच्या गावी हजर झालो. गाव पुर्ण डोंगरात वसलेले.आजूबाजूला रिझर्व फाॅरेस्ट. गावात येण्यासाठी चार रस्ते होते. पण कुठल्याही बाजूने जा सव्वा तासापेक्षा कमी वेळेत तुम्ही वाहतूक योग्य रस्त्यावर पोहचू शकत नाही. माझे नशीब होते त्यापेक्षा अधिक जोरदार(?) बनले असावे बहुतेक. शाळेवर हजर झालो आणि त्या शाळेत माझ्याआधी असणा-या एकमेव शिक्षक सहकारी यांची बदली झाली. दोन दिवसांत काहीच अनुभव नसलेला मी शाळेचा मुख्याध्यापक/स्कूलमास्तर बनलो. शाळेला पहिली सुट्टी मिळाली ती नागपंचमीची. गावाच्या समाजमंदिराच्या खोलीत एकटाच राहत होतो. सुट्टी असल्याने थोडा उशीरा उठलो. बाहेरून छान लयदार गाण्याची लकेर ऐकायला येत होती. ऊठून बाहेर आलो. खोलीच्या मागच्या दारातून तर समोरचे दृश्य मनमोहक असेच दिसत होते. सगळीकडे शेतांवर कोवळी हिरवाई पसरलेली. सकाळचे कोवळे ऊन शेतातील भाताच्या पिकाच्या पात्यावर असलेल्या दवबिंदूंवर चमकत होते. त्या शेताच्या बांधावरून जाणाऱ्या ,आपल्या पाठीवर भाऊ असू दे किंवा पाठीवरच्या भावाला अखंड आयुष्य लाभू दे यासाठी नागपंचमीचा उपवास करणा-या भगिनींची एक रांग एका लयीत चालत ,गाणी गात वारूळाला चालल्या होत्या. आजपर्यंत असे दृश्य फक्त चित्रपटातच पाहिले होते.असे कुठे खरोखर करत असेल हे कधी वाटले नव्हते. ते प्रत्यक्षात समोर पाहून अगदी सहज मनात बालकवींची "श्रावणमासी हर्ष मानसी...." कविता तरळू गेली. ओठांवर कवितेच्या शेवटच्या ओळी अवतरल्या...
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत"
🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540

No comments:
Post a Comment