तल्लफ
हा आहे चंद्रू. आईबापाने आवडीने चंद्रशेखर असे छान नाव ठेवले. पण हा ना धड चंद्र झाला ना शेखर. मात्र आपल्या कर्माने असे काही चार चाँद लावले की, घरच्यांना हा आमचा आहे. हे सांगायलाही लाज वाटावी. स्वतःच्या नावातील चंद्राला जागायचे म्हणून की काय .. हे वीरवर सोमरस प्राशनात कुणाला हार जाणा-यातले नव्हते. सकाळी तोंड धुण्याअगोदर पावशेर चे आचमन,नंतर आंघोळीनंतर नवटाक असे प्रतिप्रहरी करत करत रात्री मित्रमंडळीला सोबत घेऊन सार्वजनिक पेयपान कार्य सुरू होत असे ते, हे महाशय जमलेल्या गोतावळयासह जागच्या जागीच आडवे होऊन दिवसाचा शेवट केला जाईपर्यंत.नेहमीच्या बोलण्यात नवटाक,पावशेर चपटी,हाफ,खंबा असे शब्द असायचे.सोबतीला 'चाकना' म्हणून आयला,मायला,साले अशा सभ्य शिव्या दिल्याशिवाय वाक्यच पुर्ण होत नव्हते.
तसे सगळे चांगलेच चाललेले होते. "पिओ,पिलाओ और कहीं भी जाकर गिरो !" हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे ही याची ठाम समजूत होती. अर्धी बाटली रिचवल्यावर तर ती समजूत अधिकच दृढ होत असे. रोजच्या दिनक्रमात तसूभरही...... नव्हे छटाकभरही बदल चालत नाही. जर चुकून कधी या मदिराप्राशनाच्या पुण्यकर्मात खंड पडलाच तर मात्र मदिरादेवीचा कोप चंद्रुच्या हातापायांवर लगेच जाणवायचा. चांगलीच तल्लफ लागायची.त्याचे हातपाय व्हायब्रेट मोडवर ठेवलेल्या मोबाईल फोन सारखे थरथरायला लागायचे. तोंडातून सायलेंट विथ् व्हायब्रेशन मोडवर ठेवलेल्या मोबाईलसारखा 'घुंर्रर्र..घुंर्रर्र...' असा आवाज निघायचा. त्याला काही म्हणजे काहीच सुचत नसे. कुठूनतरी नवटाकभर पोटात गेली की मग मात्र 100% रिचार्ज झालेल्या मोबाईलसारखा चालायला लागायचा. बरं! हे महोदय शराबी चित्रपटातील अभिताभ बच्चनना मानणारे. मग काय "जहाँ चार यार मिल जाये वही रात हो गुलजार..." ही हया 'अखिल भारतीय मदिराप्राशक मंडळा' ची टॅगलाईनच होती. सगळे जण ही टॅगलाईन नुसते पाळत नव्हते, तर अक्षरशः जगत होते. सगळा कसा आनंदी आनंद गडे असा मामला होता. पिणारे पित होते.पाजणारे पाजत होते. गटारात, रस्त्याच्या कडेला पडणारे पडत होते.
पण देव आपल्याला वाटतो तेवढा दयाळू नाहीच ना ? लोकांचे सगळे बिनबोभाट,शांतपणे चालू असले की त्याला लोकांची परीक्षा घेण्याची लहर येते. मग काय कुठेतरी मिठाचा खडा टाकलाच म्हणून समजा. तसेच झाले नेमके. जगभर कोरोनाची साथ आली. मार्च महिना अर्धा संपेपर्यंत भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली.देशात लाॅकडाऊन जाहीर केले. सगळे बंद झाले. दुकाने,गाडया,बार सगळेच. चंद्रुला प्यायला मिळेना.चार दिवस इथून तिथून कशीतरी मिळेल त्या भावात विकत घेऊन घसा ओला करत राहिला.पण तिही मिळेनाशी आणि मिळाली तरी परवडेनाशी झाली. दारूची तल्लफ यायची. बैचेनी वाढत चालली. पंधरा एप्रिल आली की, सर्व ठीक होईल या आशेने तो दिवस ढकलत राहिला.पण कसले काय नि कसले काय... तो पुढे 3 मे पर्यंत वाढला. बेचैनी वाढत होती. विड्राॅवल सिम्प्टम्स वाढू लागले, हातपाय थरथरू लागले.कसाबसा मे महिना उजाडला.आता फक्त तीनच दिवस आणि मग काय! त्यानंतर 'झुम बराबर झुम शराबीचाच ठेका धरायचा अशी स्वप्ने त्याला पडू लागली. पण हाय रे कर्मा तो लाॅकडाऊनही सतरा तारखेपर्यंत वाढवला. चंद्रुला आता आपण जगू शकणार नाही असे वाटायला लागले. इतके दिवस त्याच्या दारू पिण्याला वैतागलेली घरातली माणसेही त्याची कीव करू लागली. आणि मग ती आनंदाची बातमी आली. उद्यापासून म्हणजे 4 मे पासून वाईन शाॅप उघडणार. बातमी ऐकून त्याची अवस्था अगदी "आनंद पोटात माझ्या माईना रे माईना.." अशी झाली .रात्रभर डोळयाला डोळा लागला नाही.कधी एकदा उजाडते आणि वाईन शाॅपसमोर लाईनला उभा राहतो असे त्याला झाले होते. सकाळी लवकर उठून तो तयार झाला. छान आंघोळ केली. कपडे घातले.एवढी तयारी जत्रेला किंवा सणाला देवळात जायला ही केली नव्हती कधी. पण आजचा मूड काही औरच होता. शर्टच्या खिशात हात घालून पैशांचा अंदाज घेतला .फक्त वीस रूपयेच होते त्यात. पँटचे तिन्ही खिसे तपासून पाहिले.सर्व मिळून पंचेचाळीस रूपये मिळाले. फक्त पासष्ट रूपयांत काय येणार?? त्याचा आनंद कुठल्या कुठे विरून गेला.
चंद्रुचा बाप हे पहात होता. तो खूप चिडला होता चंद्रुवर. पण जसा त्याचा चेहरा उतरलेला पाहिल्यावर बाप मनातून हलला. काय वाटले कोण जाणे पण, बाप उठला आणि आपल्या शर्टाच्या खिशात घरखर्चाला ठेवलेली शेवटची पाचशेची नोट काढून चंद्रुच्या हातावर ठेवली. बोलला काहीच नाही पण डोळे पाण्याने डबडबले होते. चंद्रुचे तिकडे लक्षच नव्हते. आपल्या खडूस बापाने पैसे दिले हेच विशेष हे मात्र त्याच्या मनात आलेच. पण विचार करायला वेळच नव्हता त्याच्याकडे. तो जवळजवळ धावतच गेला. वाईनशाॅप समोर लांबच लांब रांग लागली होती. सर्वजण ठराविक अंतर राखून उभे होते. जशी दुकान उघडण्याची चाहूल लागली, तशी मात्र रांग उधळली. जो तो पुढे घुसू लागला.एकच गोंधळ माजला. तेवढयात पोलिसांची गाडी आली. दुकानदाराला दुकान न उघडण्याची सूचना केली.पोलिसांनी शिस्त पाळण्याची सूचना दिल्या.पण कोणी ऐकेनात. झाले! पोलिसांनी दणादण दणादण बॅटिंग करायला सुरवात केली. समोर आलेल्याचा पार्श्वभाग चेंडू आणि हातातला दंडूका बॅट आहे अशा अविर्भावात प्रत्येक चेंडूवर सिक्सर मारायला सुरवात केली. चंद्रुचे फुटबॉलच काय, आख्खी पाठीमागची पीचच पोलिसांनी खेळून काढली. दणादण बसणा-या दंडूक्यात हातातली पाचशेची नोट कुठे पडली याची शुद्धही त्याला राहिली नाही. धडपडत, वाकडातिकडा खेकडयाच्या चालीने तो घरी पोहोचला. घसा कोरडा पडला होता.पण आता तहान पाण्याची लागली होती. दारूची तल्लफ मात्र चांगलीच जिरली. आता तो घरात पोटावर झोपून आहे. पाठीवर काळया रेघांची नक्षी आणि काळे फुटबॉल घेऊन !!!
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ईमेल peavin.g.mhatre@gmail.com
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ईमेल peavin.g.mhatre@gmail.com

No comments:
Post a Comment