Wednesday, March 12, 2025

लाने गो झांजुराचे.....

लाने गो झांजुराचे.....



'होळी' समस्त आगरी-कोळी बांधवांचा सण. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. होळी सणाची तशी खूप गाणी गाजलेली आहेत. "सन शिमग्याचा आला हो..." ,"आमचे दाराशी हाय शिमगा.." अशी कितीतरी गाणी आठवतात आणि त्यांचा अर्थ ही समजतो. पण एक गाणे लहानपणापासून ऐकत आलो आहे.  -हीदम आवडायचा म्हणून ऐकायचो,वाटेल तो शब्द घुसवून (आजही यु ट्यूब वर सर्च केलं तर हे गाणे सबटायटलसह पहायला मिळते आणि तिथेही हेच केलेले आढळते)चाल कायम ठेवून ते गाणे म्हणायचो, पण अर्थ समजत नव्हता. 
         ते गाणे म्हणजे गीतकार बुधाची कोळी यांनी लिहिलेले, पांडुरंग आगवणे यांनी गायलेले आणि शंकर कोळी यांनी संगीतबद्ध केलेले "लाने गो झांजुराचे...." 
त्याचा मला माहित झालेला अर्थ मी सांगायचा प्रयत्न करतो.

"लाने गो झांजुराचे,हावलाय झांजुराचे 
हावलुबाय गोरिये गो...
पैयाचा धुल्लेरा गो हावलाय ,धुल्लेरा गो 
उरल तुझे मिरीये गो ,
पैयाचा धुल्लेरा गो हावलाय ,धुल्लेरा गो 
पोरी तुझे मिरीये गो"

इथे छान से रुपक वापरलेले आहे. सण होळीचा आणि वर्णनही होळीचेच ,पण त्याचवेळेस संस्कृतीचे ही दर्शन घडते. लाने (खरा उच्चार ल्हाने)म्हणजे लहान आणि झांजुर म्हणजे पैंजण. एकंदरीत या ओळींचा अर्थ आहे, की रंगाने गोरी असलेली अन् लहान लहान पैंजण पायात घातलेली ही आमची  हावलुबाय आहे.
         फाल्गुन म्हणजे शिमगा महिना हा आपल्या कडे लग्नसराई सुरू होण्याचा. याच वेळेस होळीचा सण येतो. अशावेळेस होळीची गाणी म्हणता म्हणता बालपण सरून वयात येणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला गाण्यातूनच तुझे आता लग्नाचे वय झाले आहे. जास्त धावू नकोस, पाय सांभाळून टाक असे सूचविले जाते.
       लहान लहान पैंजण पायात घातलेल्या गो-यापान अशा आमच्या हे हावलुबाय तू इकडे तिकडे धावू नकोस.नाहीतर तुझ्या पायाने उडालेली धूळ(धुल्लेरा) तुझ्या नव्या साडीच्या नि-यांवर (आगरी-कोळी भाषेत मि-यांवर) उडेल . याचाच अर्थ असा की आता तू वयात येत आहेस.तुझे वागणे सांभाळ.कसलाही धुल्लेरा तुझ्या चारित्र्यावर उडू देऊ नकोस.
        गाण्यात हे सर्व होळीला अर्थात हावलुबायला उद्देशून आहे ,पण सूचवायचे घरातल्या लेकीला.
      
    "मीरचोली फाटली गो हावलाय फाटली गो.
कोपरां दाटली गो..
चिंता न् परली गो हावलाय परली गो
पाठीचे बंधवाना..." 




जुन्या काळात स्त्रिया खणाची चोळी वापरत असत. चोळीच्या खणाचे दोन प्रकार खूप प्रसिद्ध होते. एक गझनीची चोळी आणि दुसरी मिरचोळी. या गाण्यात मिरचोळीचा उल्लेख आहे. या चोळीला एकमेव बटण वरच्या बाजूला आणि खाली गाठ बांधण्यासाठी थोडी लांब टोके असतात.ती दाटली म्हणजेच फिट्ट झाली आहे असा गीतकाराने केला आहे. शाकुंतलातील 'कंचुकी दाटली' अर्थात मुलगी वयात आली. हा संदर्भ इथे आहे. वयात आलेल्या बहिणीला पाहून तिच्या पाठीच्या बंधवांना/ भावांना तिला सांभाळण्याची आणि तिच्या लग्नाची चिंता सतावत आहे. 

"बोंबुसा मारीली गो हावलाय मारीली गो
गावाचे मरव्यानी,
होमूसा रचिला गो हावलाय रचिला गो
गावाचे रयतीनी" 

आता गीतकार पुन्हा होळीचे वर्णन करतो आहे. यातून गावाची एकी दिसते. गावागावात दवंडी पिटवण्याचे  करण्याचे काम गावातला 'मढवी' करतो. तोच होळीची बोंब मारतो. होळी पेटवण्यासाठी लाकडे लावून होम रचायचे काम गावातल्या रयतेने म्हणजे सर्व गावकऱ्यांनी केले आहे. असेच सर्व गावकरी माझ्या लेकीच्या लग्नासाठी माझ्या मागे उभे राहणार आहेत ही हावलायबायला प्रार्थना.

"आगन्या लाविली गो हावलाय लाविली गो
गावाचे पटलानी.
सती हावलाय डुलते गो हावलाय डुलते गो 
अग्नीचे होमामंदी..." 
   
 होळीला अग्नी देण्याचा मान गावाच्या पाटलाचा असतो आणि त्याने होळी पेटवली आहे. आमची सती हावलाय त्या अग्नीच्या होमात डुलत आहे. 
एकंदरीत छान गाणे ऐकल्याचे समाधान मिळते.


प्रविण म्हात्रे 
पिरकोन,उरण,रायगड
8097876540



Monday, May 8, 2023

 

दि  ग्रेट भेट...



         व्वाहवा.....अखेर आज तो दिसलाच .अगदी जवळ, माझ्या दररोजच्या शाळेत येण्याजाण्याच्या रस्त्यावरच थोडा बाजूला तो होता. एवढा जवळ असूनही मला याआधी तो कसा दिसला नाही.याचे राहून राहून आश्चर्य वाटले. त्यांचे असे अचानक दिसणे खरोखरच शाॅकिंग होते. पण दिसल्यावर गाडीच्या स्टेअरिंगने लेफ्ट टर्न कधी मारला हे मलाही समजले नाही. त्याच्या अगदी जवळ जाऊन गाडी उभी केली आणि दुसरा धक्का बसला त्यांच्यापासून अगदी पंधरा वीस फूट अंतरावर दुसरा आनंदाने डुलताना दिसला.थोडी नजर फिरवली तर पलीकडे तिसरा ही होता. आश्चर्य वाटावे पण किती ???  एक दोन नव्हे तर चक्क तीन असूनही मला याआधी कधी दिसले नाहीत म्हणजे मी नाकासमोर चालणारा पर्यायाने गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे.

असो !!!

गेली चार पाच वर्षे मी त्याला शोधत होतो. खरंतर दोन-तीन वर्षांपूर्वी कर्जतला इलेक्शन ड्युटीला जाताना तो चौक रोडवर दिसला होता आणि गेल्या महिन्यात खालापूरला जाताना चौक फाटयाच्या अलिकडे दुसऱ्या एका ठिकाणी तो दिसला होता.पण इच्छित स्थळी जाण्याची मुलांना घाई असल्याने तसाच पुढे गेलो.त्याचा परिणाम असा झाला, की मला पुन्हा एकदा त्याला आमच्या उरण परिसरात पाहण्याची आस लागली होती. अन् अनपेक्षितपणे उरणच्या अगदी जवळ द्रोणगिरी नोडमध्ये तो मला दिसला.....


 मित्रहो! मी ज्याच्याबद्दल बोलत आहे. तो आहे माझा आवडता 'बहावा'. एप्रिल-मे दरम्यान फुटभर लांबीच्या पिवळयाधम्मक फुलांच्या तोरणांनी सजलेला, शंभर झाडांच्या गर्दीतूनही आपले लक्ष वेधून घेणारा 'बहावा' दिसला की तोंडातून आपोआप "वाहव्वा बहावा!!!" असे शब्द बाहेर पडलेच पाहिजेत, असा हा बहावा किंवा छोट्या छोट्या कानाच्या आकाराच्या पाकळ्यांची फुले असणारा तो म्हणजेच 'कर्णिकार' .  हिंदीमध्ये 'अमलताश' म्हणतात . तर याचे संस्कृत नाव आहे 'आरग्वध'.आणि इंग्रजीत 'लेबर्नम'(Labernum) म्हणून ओळखला जातो. फुलांचा सोनेरी रंग इंग्रज साहेबाला एवढा आवडला की त्यांनी त्यांचे नामकरण Golden Shower Tree अर्थात 'सोनेरी वर्षाव करणारे झाड' असे करून टाकले.

बहाव्याचे कुळ - Caesalpinaceae  आणि

शास्त्रीय नाव - कॅशिया फिस्टुला (Cassia fistula L) आहे. बहाव्याच्या शेंगा गोलाकार नळी सारख्या फुटभर लांबीच्या असतात. पोकळ नळीला फिस्टुला म्हणतात त्यामुळे हा झाला कॅशिया फिस्टुला....पिवळा बहावा तसा सर्वांच्या परिचयाचा आहे. पण त्याचे पिवळयाप्रमाणेच गुलाबी बहावा(Cassia Javania), सफेद बहावा(Cassia Nodosa) असे इतर रंगाचे थोडेसे दुर्मिळ आणि अपरिचित प्रकार सुद्धा आहेत.बहाव्याच्या शेंगा हे अस्वलाचे सर्वात आवडते खाद्य आहे.माकडे , पोपट,कोल्हे हे सुद्धा या शेंगा आवडीने खातात.पण अस्वल आपले पोट साफ करण्यासाठी हमखास खातात.  त्यामुळे बहुतेक यांचा बीजप्रसार अस्वलामुळेच होतो असा समज ब-याच जणांचा होता आणि तो ब-यापैकी खराही आहे , कारण बहाव्याच्या बिया रुजणे किंवा रुजविणे तेवढे सोपे नाही. अस्वलाच्या पोटातील पाचकरसांमुळे बी चे कठीण कवच रुजण्यालायक बनते.अन्यथा नुसतीच बी रुजत घातली तर ती रुजणे अशक्य असते.

बहाव्याची बी रुजवायची असेल तर पॉलिश पेपवर घासून वरचे टणक थोडेसे आवरण काढून टाकावे किंवा नेलकटरने थोडे वरून कट करावे . कोमट पाण्यात हे बी दोन दिवस भिजत ठेवावे.मग गोणपाटात गुंडाळून ते पाण्यात भिजवून ठेवावे. बी रुजण्याची शक्यता वाढते. बहाव्याची शेंग औषधी गुणधर्म असलेली आहे.शेंगेमध्ये असलेला पिकलेल्या चिंचेसारखा गर उत्तम सारक म्हणजेच पोट साफ करणारा आहे. जर जास्त काविळ झाली असेल,जास्त पिवळेपणा असेल तर गाईचे तूप दोन चमचे दोन-तीन दिवस देऊन नंतर तिसऱ्या दिवशी शेंगेतील साधारणतः 20 ग्रॅम गर  पाण्यात मिसळून प्यायल्यास साधे जुलाब होऊन पित्त बाहेर पडते व रुग्णाला आराम पडतो. तंबाखूला स्वाद आणण्यासाठीही गराचा वापर करतात.कातडे कमावण्यासाठी बहाव्याची साल उपयोगात आणली जाते. बहाव्याच्या झाडाचे लाकूड मजबूत असल्याने इमारती लाकूड म्हणून घरबांधणीत वापरतात.

असा हा मनाला भुरळ घालणारा सुवर्ण वृक्ष तुम्हाला ही आवडत असेलच नाही का ???

 

प्रविण गि. म्हात्रे

पिरकोन,उरण,रायगड

मो. 8097876540  

Wednesday, July 28, 2021

पानफुटी

 पानफुटी Kalanchoe pinnatum 

(Brayophyllum pinnatum)



पानांपासून नवीन रोप येणारी म्हणून पानफुटी.मुतखडा फोडून विरघळवणारी म्हणून पाषाणभेद. त्यामुळेच हिंदीतही पत्थरचट्टा किंवा पत्थरचूर या नावाने ओळखली जाणारी .तसेच धायमारी, एअर प्लांट,कटकटक ही औषधी असूनही कमी माहितीमुळे फक्त शोभेचे झाड म्हणूनच लावली जाणारी ही वनस्पती आहे. त्यातही यासारखीच दिसणारी, पानांपासूनच उगवणारी ग्रामीण भागात मालदवणी या नावाने ओळखली जाणारी कुंपणासाठी उपयोगी असणारी वनस्पती आणि ही यामध्ये थोडा गोंधळ असल्याने थोडीशी दुर्लक्षित झालेली आहे.
       

मुतखडा झाला असेल तर त्या माणसाची अवस्था इस पल खुशी, उस पल गम...  अशी झालेली असते. दुखणे बंद झाले की खुशी,  पण एकदा का सुरू झाले की त्याची अवस्था तोच जाणो. मग अशावेळी जो कोणी काही उपाय सांगेल तो करायची तयारी असते. बरेच जण वेगवेगळे उपाय सांगतात आणि ते उपाय अमलातही आणले जातात. या सर्व उपायांमध्ये हमखास व खात्रीलायक उपाय सुचवला जातो तो म्हणजे पानफुटीचे पान. साधारणतः पक्व अशी दोन पाने सकाळी उपाशीपोटी चावून चावून खाऊन त्यावर तांब्याभर कोमट पाणी पिण्याचा उपाय बहुतेक सर्वच करतात.पानांची आंबटसर चव आवडत असल्याने लोक हा उपाय आनंदाने करतात. बहुतांश लोकांना त्याचा फायदाही होतो. त्यामुळे पानफुटी आणि मुतखडा हे एक कायमस्वरूपी सूत्र बनले आहे. पानफुटी ही औषधी वनस्पती आहे आणि मुतखडयावर रामबाण औषध आहे एवढेच लोकांना माहीत आहे.परंतु पानफुटी फक्त एवढयाच उपायासाठी उपयोगी नाही तर तिचे इतरही बरेच उपयोग आहेत.
       पानफुटीचे पान जखम भरून येण्यासाठीही फारच फायदेशीर आहे. गायीच्या साजूक तूपात पानफुटीची पाने खलून मिश्रण एकजीव करून घ्यायचे. त्या मिश्रणाचा लेप जखमेवर लावायचा. जखम जर खोल असेल तर त्यात हे मिश्रण भरले तर जखम लवकर बरी होते. कान दुखत  असेल तर पानाच्या रसाचे दोन-तीन थेंब कानात टाकले तर कानदुखी थांबते असा अनुभव आहे. भाजलेल्या जागी पाने ठेचून त्याचा लेप लावला तर थंडावा येऊन जळजळ,  दाह कमी होतो व जखम वेगाने बरी होते. किडनी आणि यकृत(Liver) च्या विषबाधा,विषाणूबाधा अशा ब-याचशा समस्यांमध्ये पानफुटीचा उपयोग होतो.
अंगावर फोडया झाल्याअसतील, मधमाशी-गांधीलमाशी यासारख्या किटकाने दंश केला तर दंशाच्या जागी पानांचा लगदा करून लावतात. 



  पानफुटीची लागवड करणे सोपे आहे. कारण याच्या पानाला जे करवतीसारखे खाचे असतात त्यात मुकूल असतात आणि त्यामधून नवीन रोप तयार होते. खूप कमी पाण्याची आवश्यकता भासते. फूले घंटीसारखी असतात त्यावर काही छोटे पक्षी येतात व ते परागीभवन व बीजप्रसार करतात. पण मुख्यतः याचे परागीभवन कीटक फुलपाखरांमार्फतच होत असते. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू माॅरमानच्या Host plant मध्ये पानफुटीचाही समावेश असल्याचे दिसून आले आहे. . असे हे झुडूप शोभेचे झाड म्हणून का होईना ,पण आपल्या घरासमोर,परसात अगदीच जागा नसेल तर कुंडीत जरूर लावा.

प्रविण म्हात्रे

पिरकोन,उरण,रायगड

मो.8097876540

Tuesday, July 27, 2021

दगडी पाला

 दगडी पाला 

(Tridax procumbens)



दगडीपाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. कुणी सहज मोडली जाणारी वेल म्हणून कंबरमोडी म्हणतो, तर कुणी टणटणी.  एकाच दांडयावर येणारे फूल बघून कुणी एकदांडी म्हणतो तर कुणी बंदुकीच्या गोळीसारखे वाटणारे फूल बघून त्याला बंदुकीच्या गोळीचे फूल म्हणतो. ही सहज मोडून पडणारी वेल असल्याने बरेच शेतकरी हयाला कुटकुटी असे म्हणतात. बांधावर, ओसाड माळरानात ,अगदी रस्त्याच्या कडेला कच-यासारखी उगवणारी ही वेलवर्गीय वनस्पती किती औषधी गुणयुक्त आहे हे माहित करून घेतले तर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.



     ग्रामीण भागातील ही टणटणी किंवा कुटकुटी सहज हातासरशी उपलब्ध असल्याने अतिपरिचयात अवज्ञा या उक्तीप्रमाणे दगडी पाला जरी औषध म्हणून वापरता जात असला तरी औषधी वनस्पतीचा मान मात्र त्याला कधीच मिळाला नाही. जमिनीवर वेडयासारखा पसरत जाणारा वेल मग तण समजून उपटून फेकून देण्याच्याच उपयोगाचा आहे असेच समजले जाते. पण एकदा का पायाला ठेच लागली किंवा कुठे खरचटले-कापले की हाच पाला शोधायची घाई होते. दोनचार पाने हातावर चुरगळून रस जखमेवर टाकला की रक्त थांबलेच पाहिजे. विशेष म्हणजे ही जखम लवकर भरून येते आणि ती पिकून त्यात सेप्टीक होण्याची भीतीही नसते. 

जर कुणाला मुतखडयाचा त्रास असेल तर दगडीपाल्याची काही पाने घेऊन ती आधी मिठाच्या पाण्याने धुऊन नंतर एकदोन वेळा नुसत्या पाण्यात स्वच्छ धुवावीत.  साधारणतः अर्धा ते पाऊण कप पिण्याच्या पाण्यात त्या पानांचा रस काढून मिसळा आणि सकाळी अनोशेपोटी (रिकाम्या पोटी)  तो दोन तीन दिवस प्या. खडा विरघळून पडेल.  हया पानावर बारीक लव असते अन् बहुतांश वेळी तो धूळीत कच-यात असल्याने मिठाच्या पाण्यात धुवूनच वापर करणे उत्तम. 

 सध्या त्वचाविकार वाढत आहेत खरूज, गजकर्ण, त्वचा लाल पडणे, सोरायसिस असे त्वचेचे विकार मोठया प्रमाणात झालेले आढळतात.  या सर्वांवर दगडी पाल्याचा रस सर्वोत्तम आहे. जर तातडीची गरज नसेल तरीही जेव्हा कधी कुठे दगडी पाला मिळेल तेव्हा पाने तोडून घ्या,  ती वाळवा आणि त्याची पावडर बनवून ठेवा. नित्य नेमाने चिमूटभर ही पावडर खाल्ली तर अशुद्ध रक्तामुळे होणारे आजार कमी होतात. सलग दोन वर्षे जरी खाल्ले तरी साईड इफेक्ट्स अजिबात होत नाहीत. पाने तोडताना फूल जपले जाईल याची मात्र काळजी घ्या. कारण ते फूल सुकते व तळाशी काळया बिया शिल्लक राहतात व वा-याने बीजप्रसार होऊन वेल वाढतात. 

   भाजलेल्या त्वचेवर जर दगडीपाला गोमूत्रात घोटून नियमित लावला तर ती बरी होते (सध्या गोबरभक्त,मूत्रजीवी काहीही सांगून लोकांना भरकटवत असल्याने गोमूत्राचा वापर काहीना खटकण्याची शक्यता वाटते) पण कोणाल पटो न पटो उपाय अगदी रामबाण आहे. दगडीपाला गोमूत्रासह घेतला तर रक्तदोषासाठी उत्तम, रक्त सकस होते. रक्तक्षय कमी होतो. 

त्यामुळे जर कोठे ही वेल दिसली तर संवर्धन जरूर करा. 


प्रविण म्हात्रे

पिरकोन, उरण, रायगड

Sunday, July 25, 2021

कोरफड

 कोरफड (Aloe vera)



 मूळची वेस्ट इंडिजची असलेली ही वनस्पती आफ्रिका, दक्षिण आशिया मार्गे भारतीय महाद्वीपामध्ये येऊन स्थिरावली. नुसती स्थिरावलीच नाही तर रानावनात रानटी म्हणूच जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र हळूहळू तिच्यातले औषधी गुण जसजसे उमगू लागले तसतशी तिची लागवड जाणिवपूर्वक लोक करू लागले. आफ्रिका,अमेरिका सारख्या खंडामधील काही देश कोरफडीची लागवड व्यापारी तत्वावर करू लागले .आपल्या भारतातही अशी व्यापारी तत्वावर लागवड केली गेली . काही ठिकाणी यशस्वीही झाली , पण काही ठिकाणी अमेरिकन कंपनीच्या नावावर काही फसव्या कंपन्या येऊन शेतक-यांना भरपूर फायदयाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकारही झाला. अर्थात काहीही असले तरी कोरफडीचे औषधी गुणधर्म मात्र वादातीत आहेत हे निश्चित.कोरफड, कुमारी, धृतकुमारी, ग्वारपिठा, कन्या  आणि ग्रामीण भागात खोरकाण अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही औषधी वनस्पती प्राचीन काळापासून भारतीय उपचारपद्धतीत आपले स्थान टिकवून आहे. आपण जरी कोरफडीला सरसकट Aloe vera(अॅलोवेरा) म्हणत असलो तरी Liliaceae कुळातील या वनस्पतीच्या भारतात   Aloe vera (अॅलोवेरा) आणि Aloe indica(अॅलो इंडिका) अशा दोन महत्त्वाच्या जाती प्रचलित आहेत. कोरफडीला संस्कृत भाषेत कुमारी असे म्हटले जाते कारण कुमारीकांच्या अनेक समस्यांवर कोरफड रामबाण औषध आहे. कोरफडीपासून बनणारे कुमारी आसव उत्तम आसव मानतात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे.  त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जीवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत ॲलोइन व बार्बालाइन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.

 


ग्रामीण भागात परसदारी कोरफड असायचीच. आजही इमारतीच्या गच्चीतील कुंडीत एकतरी कोरफड असतेच असते.

         खोकलंची वरकाण

         दूर करी खोरकाण

असे आमचे एक चुलते ब-याचवेळा म्हणत. वरकाण म्हणज सतत न थांबता येणारी खोकल्याची उबळ आणि खोरकाण म्हणजे कोरफड.  त्यावरून कोरफड ही खोकल्यावर हमखास औषध आहे हे सिद्ध होते. कोरफडीच्या गरापासून तयार केलेला काळाबोळ हा तर गुणकारीत वरच्या नंबरवर आहे. लहान बाळांना खोकला झाला किंवा दूधाचे अपचन होऊन पोटात गुबार धरला तर कोरफडीचा एक तुकडा चुलीतल्या आगीवर खरपूस भाजून तो खायला देत. बाळ अगदीच लहान असेल तर त्या भाजलेल्या तुकडयाचा रस पाजत असत. भूक लागत नसेल तर चमचाभर कोरफडरसात मध घालून जेवणापूर्वी घेतले तर भूकही लागते आणि पचनक्रियाही सुधारते. केसांच्या ब-याच समस्या कोरफडगराने दूर होतात. सोबत वेगळा कंडिशनर वापरण्याचीही आवश्यकता भासत नाही. आजकालच्या बहूतांश आयुर्वेदिक शांपूंमध्ये कोरफड वापरली जातेच. कानदुखी असो वा खरूज,नायटा-एक्झिमा असले त्वचाविकार असो कोरफड लगाव सब रोग भूल जाव. कोरफडीचे सरबत करतात. काही भागात कोरफडीचे लाडू, बर्फीही बनवतात. (मराठी सिरीयल पहात असाल तर फुलाला सुगंध मातीचा या सिरियलमधील शुभमने पाककला स्पर्धेत कोरफडीपासून तब्बल पाच पदार्थ बनविल्याचे पाहिले असेलच) 

  कोरफड जेल त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ व चमकदार बनते. हे जेल बनविणे सहज शक्य आहे. पानांवरील हिरवी साल काढून आतील गर घ्यावा. तो मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यावा.गाळणीने रस गाळून घ्या . तो रस मंद आचेवर शिजवून घट्ट जाडसर झाला त्यात जेलिंग एजंट(जिलेटिन वगैरे) व जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह मिसळून सेट करण्यास ठेवावे. हे जेल त्वचेवर, केसांवर लावता येते. 

काळा बोळ कसा बनवावा ते पहा--

कोरफडीची पक्व पाने घ्यावी. साल काढून त्याचा रस काढावा. गराचे तुकडे तांब्याच्या भांड्यात पाणी घालून मंद आचेवर शिजवावे. शिजवलेले तुकडे लाकडी दांड्याने दाबून गरापासून साल वेगळी करावी. अशा गराचा अर्क शिजवून घट्ट केल्यास बोळ तयार होतो. गर शिजवताना लाकडी काठी टाकून पाहावी. रस काठीला चिकटून थंड झाल्यावर काठीपासून वेगळा झाला तर बोळ उत्तम प्रतीचा झाला असे समजावे.

 अशी ही औषधी कोरफड आपल्या घरात,परसात हमखास असायलाच हवी. 

प्रविण म्हात्रे

पिरकोन, उरण, रायगड

मो. 8097876540

Email -  pravin.g.mhatre@gmail.com

 

Saturday, July 24, 2021

तुळस


 तुळस (Holy Basil) 

    

तुळसी हार गळां,  कासें पितांबर.....

   किंवा 

    तुळसीमाळा गळा कर ठेवून कटी...

विठुरायाच्या आरतीत वा अभंगात तुळसीचा उल्लेख हमखास असतोच. तुळस ही विठ्ठलाला प्रिय आहेच , तशीच ती भगवान विष्णूलाही तेवढीच प्रिय आहे. भारतीय पुराणात आणि आयुर्वेदात तुळस निर्विवादपणे आपले महत्त्व टिकवून आहे. घर आणि घरासमोर तुळशी वृंदावन ही पुर्वापार चालत आलेली पद्धत आहे. तुळस ही देवता आहे तिची नियमित पूजा करावी असे आपले शास्त्र सांगते. 


तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते। 

तद्गृहं नोपसर्पन्ति कदाचित् यमकिंकराः।।

तात्पर्य : ज्या ज्या घरी तुळशीची पूजा होते

त्या घरात यमभय कमी असते म्हणजेच त्या घरातील माणसे निरोगी असतात,कमी आजारी पडतात. पर्यायाने मृत्यूची शक्यता कमी होते . असा स्कंद पुराणात तुळशीचा उल्लेख आलेला आहे. 

  आजच्या विज्ञानयुगात ब-याच लोकांना हे थोतांड वाटते. थोडे पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, आपण विलायतीलाजवळ करताना देशी ज्ञानाकडे कानाडोळाच करत आलो. वास्तविक पाहता तुळस ही अँटीबॅक्टेरियल- अँटीव्हायरल वनस्पती आहे.  सर्व वनस्पती दिवसा कार्बन डाय ऑक्साईड वायू घेतात आणि आॅक्सिजन वायू बाहेर सोडतात.पण असे मानले जाते की तुळस मात्र चोवीस तास आॅक्सिजनचे उत्सर्जन करते. त्यामुळे तुळशीच्या आसपास वावरणाऱ्या माणसांना त्याचा फायदा होतो. तसे पाहिले तर कोणतेही झाड चोवीस तास आॅक्सिजन उत्सर्जित करणे शक्‍य नाही पण तुळशीच्या पानांमधून निघणा-या वासाने आसमंतातील रोगजंतू मरून जातात त्यामुळे हवा निर्जंतुक होते व तिथे असणा-यांना शुद्ध हवा मिळते व त्यांचे आरोग्य सुधारते हे माहित असल्यामुळेही हा समज पसरला असावा. 


     तुळशीचे साधारण तुळस, राम तुळस, कृष्णतुळस,  लक्ष्मीतुळस, कापूरतुळस,  रानतुळस,  श्वेततुळस,भूतुळस, रक्ततुळस,नीलतुळस अशा कितीतरी प्रकार आहेत. सर्व प्रकार औषधी गुणयुक्त आहेत. प्रत्येकाचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत. तरीही कृष्णतुळस आणि रानतुळस सर्वात जास्त गुणकारी आहेत.  रानतुळशीचाच एक प्रकार असलोला तुक्कुमराई हे सब्जाचेच एक रुप आहे आणि ते औषधीही आहेच. ओला-कोरडा खोकला, कफ, अपचन, पोटात गुबार धरणे, ताप, तोंडाची चव जाणे, सर्दी-पडसे, कान दुखणे, लहान मुलांना होणार्‍या उलटया थांबत नसतील अशा अनेकानेक आजारा तुळशीची पाने खाणे, तुळशीपानांचा रस , चहा किंवा काढा अशा कोणत्याही स्वरूपात खा आणि आजार विसरून जा. 


प्रविण म्हात्रे

पिरकोन उरण रायगड

8097876540

Wednesday, May 12, 2021

बोर्डाचीच परीक्षा


 कठीण प्रश्न, उत्तर किती कठीण ???


               तो अमिर खानचा *थ्री इडियट्स* सिनेमा आठवतो का ?  अर्थात कोण त्या सिनेमाला विसरला असेल म्हणा !  देशातील एकंदरीत शिक्षणपद्धतीवर बरेच सणसणीत आसूड ओढणारा असाच होता तो सिनेमा. आता तुम्ही म्हणाल यावेळी त्याची आठवण काढण्याचे कारण काय ? त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण त्यातील त्या वीरू सहस्रबुद्धे चे ते पेन तुम्हाला आठवत असेलच. त्यांच्या इंजिनियरींग काॅलेजमधून शिकलेल्या कित्येक तथाकथित हुशार  विद्यार्थी तेच पेन बक्षीस म्हणून मिळवायची स्वप्ने पहात होती.विशेष असेच होते ते पेन कारण अनेक वर्षांच्या संशोधनातून खास अंतराळवीरांना(Astronauts) वातावरण विरहित आणि गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत लिहता येण्यासाठी बनविलेले होते. हीच त्या पेनची खासियत जेव्हा वीरू सहस्रबुद्धे सांगत असतो त्यावेळी रँचो एक साधा सोपा प्रश्न विचारून वीरू सहस्रबुद्धेला निरुत्तर करतो,  आणि तो प्रश्न होता... "सर,अंतराळात लिहण्यासाठी पेन शोधण्यासाठी एवढा प्रचंड खटाटोप अन् संशोधन करण्यापेक्षा त्यांनी पेन्सिलचा वापर का नाही केला ? " 

        विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की नाही ! एखाद्या प्रश्नाचे उत्तर सोप्या पद्धतीने मिळत असेल तर ते सहज सोपे मिळते म्हणून निरुपयोगी, अर्थहीन समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि वेगळे आणि कठिण उत्तर शोधण्यासाठी काथ्याकूट करत बसायचे. हा कुठला शहाणपणा. नाही म्हणायला larger than life , beyond the limits विचार करणारे असा साधा विचार करतच नाहीत म्हणा.  सुमारे दोनशेच्या आसपास शोध लावणा-या न्युटनने नाही का मांजर आणि तिच्या पिलांना येण्याजाण्यासाठी एक मोठे आणि एक छोटे भोक दरवाजाला पाडले होते. 

        एवढे घडाभर तेल नमनालाच वापरल्यावर एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि तुमच्याही तोंडून थ्री इडियट्स मधील प्राध्यापकांच्यासारखा गोंधळलेला प्रश्न बाहेर पडला असेल की,  "अरे, भाई आखिर कहना क्या चाहते हो..?" सांगतो, सांगतो....  विषय आहे दहावीच्या परीक्षेचा,निकालाचा आणि 'पुढे क्काय्य?? ' या सग्ळयांसमोर उभ्या ठाकलेल्या जागतिक(?) समस्येचा. आधी आॅनलाईन, मग थोडा विरोध झाल्यानंतर आॅफलाईन,  नंतर आॅफलाईनच पण शाळेतच परीक्षा केंद्र ठेवून अशा विविध पर्यायांची चाचपणी करता करता   CBSE बोर्डाने दहावीची परीक्षाच रद्द केल्याने हो-नाही करत अखेर SSC बोर्डाची दहावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. एक प्रश्न सोडवला असे वाटत असतानाच पुढचे काही प्रश्न उपस्थित झाले.  त्यातही सर्वात मोठी अडचण CBSE बोर्डाच्या जेमतेम 9 ते 10% शाळांमध्ये 11 वी 12वीचे वर्ग जोडलेले नसतील. बाकि सर्व शाळांमध्ये ते वर्ग असल्याने त्यांना आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यात अडचणी वाटली नसावी बहूतेक, पण SSC बोर्डाच्या शाळांमध्ये परिस्थिती नेमकी त्याच्या उलट आहे.  इथे दहावीपर्यंतच्याच शाळा बहुसंख्येने असल्यामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया ही गंभीर समस्या पुढे आली. उपाय म्हणून शाळांनी केलेल्या अंतर्गत  मुल्यमापनवर प्रवेश देता येतील किंवा नाही याबाबत शाळांची मते मागविण्यात आली. याबाबतीतही उत्तर नकारात्मकच आले. 70% शाळा बोर्डाची परीक्षा होणारच या विश्वासावर विसंबून राहिल्याने अंतर्गत मुल्यमापन केलेच नाही.ब-याचशा शाळा तर वर्षभर निष्क्रिय राहिल्याचेच समोर आले. ज्यांनी केले त्यांनीही आॅनलाईन मुल्यमापनाबाबत अविश्वासच दर्शविला. थोडीशी वाट मोकळी करण्याचा प्रयत्न म्हणून अकरावीला 200 गुणांची प्रवेश परीक्षा घेण्याचा विचारही केला. कोरोनाने सर्व वातावरण एवढे अनिश्चित करून ठेवले आहे की, कोणता निर्णय घेतला तरी त्यावर सहमती कमी आणि असहमतीच जास्त प्रकट होते.  करावे तरी काय असा प्रश्न सध्या बोर्ड आणि शासनाला पडला आहे. अगदी त्या गाढव विकायला घेऊन जायला निघालेल्या गंगारामसारखी त्यांची अवस्था झाली आहे.काहीही करा लोकं बोल लावतातच. 

       सर्व जाणकार,  अभ्यासू आणि अनुभवी लोक सोबत असूनही एवढी वर्षे दहावीच्या परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने विनासायास पार पाडणारे बोर्ड आणि शासन सध्या तरी प्रचंड गोंधळलेले आहेत. आता वेळ आली आहे ती घाईघाईने निर्णय जाहीर करण्याची नव्हे तर शांतपणे विचार करण्याची . सर्व पालकांना विश्वासात घेऊन, थोडा धीर धरायची विनंती करून एक दीर्घ मुदतीची उपाययोजना तयार करण्याची ही वेळ आहे. तोपर्यंत या कठिण समस्येवर थोडा काळ सगळयांना धीर धरायला लावणारा एकच निर्णय आहे तो म्हणजे जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली तर अकरावी प्रवेशप्रक्रिया एका छोटयाशा परंतु सर्वसमावेशक अशा पायाभूत( Baseline) चाचणीने (सर्वांना भारदस्त वाटावे म्हणून लागल्यास तिलाCET म्हणा हवे तर पण स्वरूप विद्यार्थ्याला विदयाशाखा निवडण्यासाठी सोईचे पडेल असेच हवे ) पार पाडली जाईल असे स्पष्टपणे सांगून टाकावे.  परिस्थितीत अशीच अनिश्चितता राहिली तरीही हीच प्रक्रिया परीक्षेचे विकेंद्रीकरण करून मर्यादित विदयार्थीसंख्येसह योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडण्याची. यावेळी शाळानिहाय तुकड्यांचे गणित जुळवणे फार महत्त्वाचे ठरेल.  निकषांमध्ये थोडीफार ढिलाई  दयावी लागेल.  पण जर प्रक्रिया मार्गी लावायची असेल तर सगळयात सोपा मार्ग हाच आहे अर्धा मे आणि अर्धा जून मिळून एक महिना पूर्वतयारीसाठी हाती आहे. मला तरी मांजरीसाठी मोठे आणि पिलांसाठी छोटे अशी दोन दोन भोके दरवाजाला पाडण्यापेक्षा एकच मोठे भोक पाडावे असेच वाटते..... बाकी आमची ' सरडयाची धाव कुंपणापर्यंतच..'  आमचे विचार एवढयावरच सिमित आहेत. खोलात जाणा-यांनी अजून समुद्रमंथन करावे. भले मग अमृत निघो वा हलाहल.... ते आपण काळावर सोपवू या 


प्रविण म्हात्रे

पिरकोन,उरण,रायगड