कोरफड (Aloe vera)
मूळची वेस्ट इंडिजची असलेली ही वनस्पती आफ्रिका, दक्षिण आशिया मार्गे भारतीय महाद्वीपामध्ये येऊन स्थिरावली. नुसती स्थिरावलीच नाही तर रानावनात रानटी म्हणूच जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र हळूहळू तिच्यातले औषधी गुण जसजसे उमगू लागले तसतशी तिची लागवड जाणिवपूर्वक लोक करू लागले. आफ्रिका,अमेरिका सारख्या खंडामधील काही देश कोरफडीची लागवड व्यापारी तत्वावर करू लागले .आपल्या भारतातही अशी व्यापारी तत्वावर लागवड केली गेली . काही ठिकाणी यशस्वीही झाली , पण काही ठिकाणी अमेरिकन कंपनीच्या नावावर काही फसव्या कंपन्या येऊन शेतक-यांना भरपूर फायदयाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकारही झाला. अर्थात काहीही असले तरी कोरफडीचे औषधी गुणधर्म मात्र वादातीत आहेत हे निश्चित.कोरफड, कुमारी, धृतकुमारी, ग्वारपिठा, कन्या आणि ग्रामीण भागात खोरकाण अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही औषधी वनस्पती प्राचीन काळापासून भारतीय उपचारपद्धतीत आपले स्थान टिकवून आहे. आपण जरी कोरफडीला सरसकट Aloe vera(अॅलोवेरा) म्हणत असलो तरी Liliaceae कुळातील या वनस्पतीच्या भारतात Aloe vera (अॅलोवेरा) आणि Aloe indica(अॅलो इंडिका) अशा दोन महत्त्वाच्या जाती प्रचलित आहेत. कोरफडीला संस्कृत भाषेत कुमारी असे म्हटले जाते कारण कुमारीकांच्या अनेक समस्यांवर कोरफड रामबाण औषध आहे. कोरफडीपासून बनणारे कुमारी आसव उत्तम आसव मानतात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जीवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत ॲलोइन व बार्बालाइन ही मुख्य ग्लुकोसाइड्स असतात.
ग्रामीण भागात परसदारी कोरफड असायचीच. आजही इमारतीच्या गच्चीतील कुंडीत एकतरी कोरफड असतेच असते.
खोकलंची वरकाण
दूर करी खोरकाण
असे आमचे एक चुलते ब-याचवेळा म्हणत. वरकाण म्हणज सतत न थांबता येणारी खोकल्याची उबळ आणि खोरकाण म्हणजे कोरफड. त्यावरून कोरफड ही खोकल्यावर हमखास औषध आहे हे सिद्ध होते. कोरफडीच्या गरापासून तयार केलेला काळाबोळ हा तर गुणकारीत वरच्या नंबरवर आहे. लहान बाळांना खोकला झाला किंवा दूधाचे अपचन होऊन पोटात गुबार धरला तर कोरफडीचा एक तुकडा चुलीतल्या आगीवर खरपूस भाजून तो खायला देत. बाळ अगदीच लहान असेल तर त्या भाजलेल्या तुकडयाचा रस पाजत असत. भूक लागत नसेल तर चमचाभर कोरफडरसात मध घालून जेवणापूर्वी घेतले तर भूकही लागते आणि पचनक्रियाही सुधारते. केसांच्या ब-याच समस्या कोरफडगराने दूर होतात. सोबत वेगळा कंडिशनर वापरण्याचीही आवश्यकता भासत नाही. आजकालच्या बहूतांश आयुर्वेदिक शांपूंमध्ये कोरफड वापरली जातेच. कानदुखी असो वा खरूज,नायटा-एक्झिमा असले त्वचाविकार असो कोरफड लगाव सब रोग भूल जाव. कोरफडीचे सरबत करतात. काही भागात कोरफडीचे लाडू, बर्फीही बनवतात. (मराठी सिरीयल पहात असाल तर फुलाला सुगंध मातीचा या सिरियलमधील शुभमने पाककला स्पर्धेत कोरफडीपासून तब्बल पाच पदार्थ बनविल्याचे पाहिले असेलच)
कोरफड जेल त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ व चमकदार बनते. हे जेल बनविणे सहज शक्य आहे. पानांवरील हिरवी साल काढून आतील गर घ्यावा. तो मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यावा.गाळणीने रस गाळून घ्या . तो रस मंद आचेवर शिजवून घट्ट जाडसर झाला त्यात जेलिंग एजंट(जिलेटिन वगैरे) व जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह मिसळून सेट करण्यास ठेवावे. हे जेल त्वचेवर, केसांवर लावता येते.
काळा बोळ कसा बनवावा ते पहा--
कोरफडीची पक्व पाने घ्यावी. साल काढून त्याचा रस काढावा. गराचे तुकडे तांब्याच्या भांड्यात पाणी घालून मंद आचेवर शिजवावे. शिजवलेले तुकडे लाकडी दांड्याने दाबून गरापासून साल वेगळी करावी. अशा गराचा अर्क शिजवून घट्ट केल्यास बोळ तयार होतो. गर शिजवताना लाकडी काठी टाकून पाहावी. रस काठीला चिकटून थंड झाल्यावर काठीपासून वेगळा झाला तर बोळ उत्तम प्रतीचा झाला असे समजावे.
अशी ही औषधी कोरफड आपल्या घरात,परसात हमखास असायलाच हवी.
प्रविण म्हात्रे
पिरकोन, उरण, रायगड
मो. 8097876540
Email - pravin.g.mhatre@gmail.com


No comments:
Post a Comment