Wednesday, March 12, 2025

लाने गो झांजुराचे.....

लाने गो झांजुराचे.....



'होळी' समस्त आगरी-कोळी बांधवांचा सण. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. होळी सणाची तशी खूप गाणी गाजलेली आहेत. "सन शिमग्याचा आला हो..." ,"आमचे दाराशी हाय शिमगा.." अशी कितीतरी गाणी आठवतात आणि त्यांचा अर्थ ही समजतो. पण एक गाणे लहानपणापासून ऐकत आलो आहे.  -हीदम आवडायचा म्हणून ऐकायचो,वाटेल तो शब्द घुसवून (आजही यु ट्यूब वर सर्च केलं तर हे गाणे सबटायटलसह पहायला मिळते आणि तिथेही हेच केलेले आढळते)चाल कायम ठेवून ते गाणे म्हणायचो, पण अर्थ समजत नव्हता. 
         ते गाणे म्हणजे गीतकार बुधाची कोळी यांनी लिहिलेले, पांडुरंग आगवणे यांनी गायलेले आणि शंकर कोळी यांनी संगीतबद्ध केलेले "लाने गो झांजुराचे...." 
त्याचा मला माहित झालेला अर्थ मी सांगायचा प्रयत्न करतो.

"लाने गो झांजुराचे,हावलाय झांजुराचे 
हावलुबाय गोरिये गो...
पैयाचा धुल्लेरा गो हावलाय ,धुल्लेरा गो 
उरल तुझे मिरीये गो ,
पैयाचा धुल्लेरा गो हावलाय ,धुल्लेरा गो 
पोरी तुझे मिरीये गो"

इथे छान से रुपक वापरलेले आहे. सण होळीचा आणि वर्णनही होळीचेच ,पण त्याचवेळेस संस्कृतीचे ही दर्शन घडते. लाने (खरा उच्चार ल्हाने)म्हणजे लहान आणि झांजुर म्हणजे पैंजण. एकंदरीत या ओळींचा अर्थ आहे, की रंगाने गोरी असलेली अन् लहान लहान पैंजण पायात घातलेली ही आमची  हावलुबाय आहे.
         फाल्गुन म्हणजे शिमगा महिना हा आपल्या कडे लग्नसराई सुरू होण्याचा. याच वेळेस होळीचा सण येतो. अशावेळेस होळीची गाणी म्हणता म्हणता बालपण सरून वयात येणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला गाण्यातूनच तुझे आता लग्नाचे वय झाले आहे. जास्त धावू नकोस, पाय सांभाळून टाक असे सूचविले जाते.
       लहान लहान पैंजण पायात घातलेल्या गो-यापान अशा आमच्या हे हावलुबाय तू इकडे तिकडे धावू नकोस.नाहीतर तुझ्या पायाने उडालेली धूळ(धुल्लेरा) तुझ्या नव्या साडीच्या नि-यांवर (आगरी-कोळी भाषेत मि-यांवर) उडेल . याचाच अर्थ असा की आता तू वयात येत आहेस.तुझे वागणे सांभाळ.कसलाही धुल्लेरा तुझ्या चारित्र्यावर उडू देऊ नकोस.
        गाण्यात हे सर्व होळीला अर्थात हावलुबायला उद्देशून आहे ,पण सूचवायचे घरातल्या लेकीला.
      
    "मीरचोली फाटली गो हावलाय फाटली गो.
कोपरां दाटली गो..
चिंता न् परली गो हावलाय परली गो
पाठीचे बंधवाना..." 




जुन्या काळात स्त्रिया खणाची चोळी वापरत असत. चोळीच्या खणाचे दोन प्रकार खूप प्रसिद्ध होते. एक गझनीची चोळी आणि दुसरी मिरचोळी. या गाण्यात मिरचोळीचा उल्लेख आहे. या चोळीला एकमेव बटण वरच्या बाजूला आणि खाली गाठ बांधण्यासाठी थोडी लांब टोके असतात.ती दाटली म्हणजेच फिट्ट झाली आहे असा गीतकाराने केला आहे. शाकुंतलातील 'कंचुकी दाटली' अर्थात मुलगी वयात आली. हा संदर्भ इथे आहे. वयात आलेल्या बहिणीला पाहून तिच्या पाठीच्या बंधवांना/ भावांना तिला सांभाळण्याची आणि तिच्या लग्नाची चिंता सतावत आहे. 

"बोंबुसा मारीली गो हावलाय मारीली गो
गावाचे मरव्यानी,
होमूसा रचिला गो हावलाय रचिला गो
गावाचे रयतीनी" 

आता गीतकार पुन्हा होळीचे वर्णन करतो आहे. यातून गावाची एकी दिसते. गावागावात दवंडी पिटवण्याचे  करण्याचे काम गावातला 'मढवी' करतो. तोच होळीची बोंब मारतो. होळी पेटवण्यासाठी लाकडे लावून होम रचायचे काम गावातल्या रयतेने म्हणजे सर्व गावकऱ्यांनी केले आहे. असेच सर्व गावकरी माझ्या लेकीच्या लग्नासाठी माझ्या मागे उभे राहणार आहेत ही हावलायबायला प्रार्थना.

"आगन्या लाविली गो हावलाय लाविली गो
गावाचे पटलानी.
सती हावलाय डुलते गो हावलाय डुलते गो 
अग्नीचे होमामंदी..." 
   
 होळीला अग्नी देण्याचा मान गावाच्या पाटलाचा असतो आणि त्याने होळी पेटवली आहे. आमची सती हावलाय त्या अग्नीच्या होमात डुलत आहे. 
एकंदरीत छान गाणे ऐकल्याचे समाधान मिळते.


प्रविण म्हात्रे 
पिरकोन,उरण,रायगड
8097876540



No comments:

Post a Comment