भटकंती
उरणला राहा़यला गेल्यापासून बऱ्याच वर्षानंतर यावर्षी पहिल्यांदाच उन्हाळी सुट्टीत गावी दोन दिवस सुट्टीसाठी आलो. आल्यापासून रियान फुल्ल टाईमपास करतच होता .गर्मीने बेजार केले होते. नशीब एवढेच की लाईट होती, तसा आल्याआल्याच बेडरूमचा पंखा बंद आहे व लाईटही नीट लागत नसल्याचे सांगितल्यावर आपला काही निभाव लागणार नाही असे वाटले होते, पण मीच बोर्ड खोलून बघितला . थोडी जळमटे साफ केली व बटणाची आदलाबदल केल्यानंतर दोन्ही गोष्टी ठीक झाल्यामुळे समाधान वाटले. संध्याकाळी सहज चला डोंगरावर फिरायला असे म्हटल्याबरोबर लगेच मी, तुषार, दर्श, दिदी,हर्षल हे नेहमीचे खिलाडी तर तयार झालेच, पण वेदांगी, आत्या, विश्रांती, कविता याही तयार झाल्या सोबतच गाडयाबरोबर नाळयाची यात्रा या न्यायाने लास्ट बट नॉट लिस्ट 'द रियान' अशी दहा जणांची टीम तयार झाली (भाई असता तर क्रिकेट टीम झाली असती)सुरूवात गायच्या माळापासून झाली. इथे गावोगावी फिरून विरगळी शोधून माहिती देणा-या तुषारला आपल्याच गावातील ज्या विरगळीमुळे या भागाला गायचा माळ(गाईचा माळ) हे नाव मिळाले ती विरगळ शोधूनही सापडली नाही याची खंत जाणवली. पण 'द रियान' मात्र उत्साहाने माहिती देत होता. पुढे शंकर मंदिरात दर्शन घेऊन तिथल्या विरगळींचे व इतर दगडांचे निरीक्षण केले. तुषार योग्य ती माहिती देत होताच. तिथून पुढे बोरणीतून चालत गेल्यावर मोहाच्या झाडाने माझे लक्ष वेधून घेतले. पिकलेले मोहाचे फळ खायला मिळेल का या आशेने गेलो पण जेमतेम बोराएवढया आकाराची सर्व फळे होती म्हणून मोहफुले मिळतात का हे पाहायचा मोह झाला, तेही नाही. मग गुपचूप मोहफळांचे फोटो काढले आणि पुढे गेलेल्या सगळयांना गाठले. तोपर्यंत सगळे हरिभाऊनानाच्या कुरणातील गजांत लक्ष्मीच्या मुर्त्यांजवळ पोहोचले होते. गाईड द रियानने त्यात एलिफंट असल्याचे दाखवून आमच्यासारख्या सामान्यांच्या 'सामान्य'ज्ञानात मोलाची भर घातली. नंतर जांभळीखालच्या नंदीजवळ गेलो. एक सिनियर व दोन ज्युनियर संशोधक (तुषार, दर्श, हर्षल) आपल्या कामाला लागले.सर्व थकलेले पांथस्थ येथेच थोडे विसावले .सोबत आणलेल्या वडापाववर ताव मारता मारता करवंदीच्या जाळीवर पिकलेली काळी कुळकुळीत करवंदे बघून थकवा विसरून सगळे त्या जाळीवर तुटून पडले. अर्थात सावधपणेच ,नाहीतर करवंदीचे काटे आपलेच मांस तोडील हे सगळं जाणून होते. येथे उंचीचा फायदा मिळाला. माझे लक्ष बाजूला असलेल्या करंजाच्या झाडाकडे गेले. झाडाखाली सुकलेल्या फुलांचा सडा पडलेला दिसला,झाडावरच्या शेंगाही सुकल्या होत्या. मी बिया मिळवण्यासाठी शेंगा गोळा केल्या पण वटवाघळे आणि मुंग्यांनी सर्वच बिया कुरतडून भुसा केला होता. कशाबशा चारपाच बिया मिळाल्या. याच बियांपासून करंज तेल (करजेल तेल) काढतात. जे डोक्यातील कोंडा, केस गळणे व मालिशसाठी वापरतात, वास मात्र तीव्र असतो व चवही कडू असते. ती इतकी कडू असते की डोक्याच्या केसांना लावले तरी तोंड कडू होते. बाजूलाच शिवणीची फळे म्हणजेच शिवणां पडलेली दिसली. ती गोळा करताना त्याच्या बियाही मिळत होत्या. या शिवणीच्या बिया आमच्या लहानपणीचे चलन,खाऊ व खेळसाहित्य होत्या .अगदी लहानपणीचे 'दाम आणि बदामच'.
चला आता काशेडोंगरीवर जाऊ या असा आदेश मिळताच सर्व दलाने तिकडे कूच केले. कुंपण पार केल्यानंतर तिथे पडलेली शिवणां दिसली म्हणून शोधू लागलो, तर अनपेक्षितपणे तेथे पडलेली दुसरीच काही फळे बघू आश्चर्य वाटून मी त्या फळांचे झाड पाहू लागलो तर झाडही ओळखू येईना. ती फळे म्हणजे रिठे होते. ते तिथे मिळण्याची मला तरी अपेक्षा नव्हतीच. "अरे इथे रिठी कुठे आहे ?" म्हणून शोधू लागलो. तेवढया वर बघा आण्णा वर झाडावर पण रिठयांचे घोस आहेत असा वेदांगीचा आवाज आला. झाडावर सुकलेले रिठे तर दिसत होते पण त्या झाडाची काही ओळख पटेना कारण आमच्या घरामागेच रिठयाचे झाड आहे आणि ते तर वर्षभर हिरव्या पानांनी भरलेलेच मी पाहिले होते. या झाडावर मात्र पान नावालाही नव्हते. रिठयाचे औषधी गुण माहित असल्याने महिलावर्गाने लगेच ते जमवायला सुरूवात केली. डोंगरावर चढायला सुरुवात केल्यानंतर आमचा तज्ञ गाईड रियान महत्वपूर्ण माहिती देऊ लागला. उदा. "आण्णा आता आपण डोंगरावर चाललो, पप्पा हा डोंगर आहे " अशी आम्हाला माहित नसलेली माहिती तो देत होता.
चढतानाच शेमतीचे /शेमटीचे झाड दिसले. छोटी लिंबोळ्याएवढी गुलाबी-हिरवी फळे छान वाटत होती. डोंगरीवरील उंबराचे झाड दिसते का पाहिले ,तर निसर्गाच्या किमयेचे अनोखे दर्शन घडले. मूळ उंबराचे झाड दिसण्याअगोदर वडाचे झाड दिसले. नीट पाहिल्यावर एकमेकांत मिसळून गेलेली दोन्ही झाडे दिसली.वडाच्या पिंपळया खाणाऱ्या पक्षांची, विशेषत: कावळयांचीच ती करामत असावी. वर गेलो तर आनंद झाला. इतकी वर्षे तुळतुळीत टकलासारखी असणारी विनाझाडांची काशेडोंगरी आता वरद-विलासच्या मेहनतीने ब-यापैकी हिप्पी झालेली दिसली. झाडे लावल्याबद्दल मनोमन त्यांना धन्यवाद दिले .थोडा आराम, थोडे खानपान व थोडेसे फोटोसेशन झाल्यावर आपण आपल्या कुरणात जाऊ या अशी ईच्छा कविताने व्यक्त केली व त्याप्रमाणे उतरायला सुरुवात केली. उतरताना आसनाच्या मुळांनी तयार झालेल्या नैसर्गिक पायर्या, ज्या चढताना दिसल्याच नव्हत्या त्या पाहिल्या. कुरणात पोहोचल्यावर प्रथम सगळे सरळ खिरणीच़्या म्हणजेच रांजणीच्या झाडाजवळ गेलो. फळे होती पण 'पहूँच के बाहर' असल्याने एकदोन दगड भिकावून तो नाद सोडून दिला. तोच तुषारने भोकरीची साल व काटेसावरीच्या काटयांचा कात अशी पानपट्टी तयार केली. आम्ही आनंदाने तिचा आस्वाद घेतला. काळोख पडायला लागला होता. त्यामुळे घरचा रस्ता धरला. तरीही ताडाच्या झाडाखाली एखादे ताडफळ (आम्ही तारफूलच म्हणतो) मिळते का या आशेने नजर टाकली. मिळालेच तर तारफूलाचे पोळे बनवले असते. पण निराश होण्याशिवाय पदरी काहीच पडले नाही. घरी पोहोचल्यावर आपण खूप थकल्याचे जाणवले पण त्याहीपेक्षा जास्त आनंद मिळाला होता. लगेच मुलांचा ऊदया कोठे जायचे हा प्रश्न आला त्याला हसूनच 'बघू' असे उत्तर दिले. बघूया आता कुठे दौरा निघतो ते.
प्रविण म्हात्रे ,पिरकोन-उरण
मो. 8097876540




No comments:
Post a Comment