Sunday, August 25, 2019

टोपीवाल्याचे भूत

                    साखरचौथ होऊन दोन तीन दिवस झाले असतील. आज अचानक सकाळपासूनच पाऊस धो-धो पडायला सुरूवात झाली होती. सगळेच चिंतेत पडले होते. शेतातली गरवी पिके पोटरीवर आलेली होती. अशावेळी पावसाने फूल झोडपले तर फुसक्या पलिंजाशिवाय काहीच हाती येणार नाही आणि चिरेकोलमसारखी कापणीला आलेली हळवी पिके तर साफ आडवी होऊन त्याला रो फुटेल की काय अशी चिंता सगळयांना लागून राहिली होती. पण या चिंतेच्या वेळीही काहीजण खुश होते. "आज पवलीला जितारी परतीन ,चिवण्यांचा तर काय बोलूच नको.. "अशी चर्चा ही रंगली होती.
पवलीवर जाण्यासाठी त्याने ही तयारी करायला सुरूवात केली. दोन मोठया बगल्या काढून त्यांची डागडुजी केली. आसू ही तांगळून घेतली. संध्याकाळी चारच्या सुमारास दोन बगल्या नि आसू काठीला लावून काठी खांदयावर मारली आणि निघाला. पाऊस कोसळतच होता. घरातून निघतानाच भिजून पार चोथा झाला होता. अंगावर घेतलेला प्लास्टिकचा कागद असून नसल्यासारखाच होता, पण आपण नुसतेच भिजत चाललो नाही एवढे समाधान होते. पवलीवर पोहचल्यावर त्याने बगल्या खाली ठेवल्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. पावसाने झाकून धरल्यामुळे काळोख झाल्यासारखे वाटत होते. इकडेतिकडे नजर फिरवली माणसांच्या आकृत्या धूरकट धूरकट दिसत होत्या. बरेच जण मांडायला(मच्छी पकडायला) आले होते हे दिसतच होते.
त्याने आपला लंगोट वर गुडाळला आणि प-हयावरून दुस-या बाजूला सावकाश उतरला .अंदाजाने हात पाण्यात घालून बगल्याच्या मागील तोंडात असलेला पेंढयाचा बोळा काढून बांधावर फेकला . तिथूनच हात पोहचवून एक बगली ओढली आणि ती दोन मांडयांच्या मध्ये दाबून धरून मागच्या बाजूच्या काठयांना जोराचा पिळा देउन त्यावर दोरी आवळून बांधली. पुन्हा एकदा पिळ देउन नीट आवळली आहे याची खात्री केली. मग बगली सरळ करून तिचे तोंड बगल्याच्या मागील बाजूला नीट बसवले व दाब दिला नंतर बगलीची दोरी मागे रोवलेल्या काठीला बांधली. बगली नीट बसल्याचे पाहून तो वर आला. व प-हयाच्या समोरचा मातीचा अडसर दूर केला. आतील चिखलावर हात फिरवून तो सपाट केला. पाणी जोराने वाहू लागले. त्याने शांतपणे हातपाय धुतले. बगली, आसू व काठी उचलून मेंढीवरच्या पापटात आला. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. फक्त सकाळ पासूनचा जोर आता कमी झाला होता. भिजलेल्या लंगोटयाला पिळून त्याच लंगोटयाने अंग डोके पुसले आणि तो पापटातील तटकीवर बसला. त्या चारेक फुटाच्या तटकीवर अंग टाकले .
तासाभराने ऊठून बघितले. प-हयासमोरचे पाणी चिवण्यांनी भरलेले होते ,पण मध्येच खवली, जिताडा आलेच तर दूर पळत होती. त्याने पटकन पेंढयाचा लोळा बनवला. सावकाश जवळ जाऊन प-हयात तो लोळा धप्पकन टाकला. अडकलेली चिवणी, खवली, एखाददुसरे जिताडे बगल्यात गेली. असे दोनेक वेळा केले आणि मग तो पाण्यात उतरला. बगली हलवून अंदाज घेतला. बगली पूर्ण भरल्याचे समजताच दुसरी बगली घेऊन ती पहिल्या बगलीच्या जागी लावली आणि माशांनी भरलेली बगली घेऊन वर आला. स्वच्छ हातपाय धुतले. काठी घेतली. एका हातात बगली व दुसर्‍या हातात काठी घेऊन एकदा प-हयावर नजर टाकली आणि घरचा रस्ता धरला. घरी आल्यावर उनउनित पाण्याने आंघोळ केली. तोपर्यंत गरमागरम चहा झाला होता. चहा पिऊन पलंगावर पडला. काही कळायच्या आत झोपीही गेला. कोणीतरी जेवायला उठण्यासाठी हाक मारली म्हणून ऊठला. बाहेर अंधार पडला होता.घडयाळात साडेआठ वाजून गेल्याचे पाहिल्यावर पट्कन ऊठला. तोंड धुतले. जेवणाचे ताट तयारच होते. ताटात ताज्या माशांचे कालवण होते. पोटभर जेवला.पानाचा डबा काढून सुपारी अडकित्त्याने कातरून तोंडात टाकली आणि खांबावरच्या खिळ्यावर अडकवलेला कंदिल काढला. गरणी व रॉकेलची बाटली घेऊन कंदिलात तेल भरले. सावकाश काच काढली. एक फडके घेऊन ती आतून लख्ख पुसून काढली. मनासारखी काच स्वच्छ झाल्यासारखी वाटल्यावर ती पुन्हा नीट कंदिलाला लावली. बाजूचा खटका दाबून काच वर केली. काडी पेटवून आतल्या वातीला लावली. वात पेटल्यानंतर पुन्हा तो खटका दाबून काच खाली केली. कंदिल उचलला ,कोप-यातली काठी घेतली आणि पवलीवर जायला निघाला. आता पाऊस पूर्ण थांबला होता, पण अजून चंद्र उगवला नव्हता त्यामुळे कंदिलाच्या उजेडातच रस्त्याचा अंदाज घेत पवलीवर पोहोचला. आजूबाजूच्या काही ठिकाणी कंदिलांचा उजेड दिसत होता. अर्धा-पाऊण तास बसला. पुन्हा दोन तीन वेळा लोळा टाकला. पाण्यात उतरून बगली हलवली. ब-यापैकी भरली होती. मग प-हया चिखलपेंढयाने बांधून पाणी थांबवले. बगली काढून बगल्याच्या मागच्या भागात पेंढयाचा बोळा घट्ट बसवला. हातपाय धुतले. बरीच रात्र झाली होती. त्याने इकडेतिकडे पाहिले. आता कुठेच कंदिलाचा उजेड दिसत नव्हता, त्याच्या मनात विचारआला म्हणजे सगळे घरी गेले होते तर आणि आपण एकटेच या खारीत राहिलो की काय ??. लगेच बगली, काठी उचलली आणि घरचा रस्ता धरला. आता चंद्र ऊगवला होता. त्याचा अंधुक प्रकाश पडला होता. चालत चालत मधल्या कातलावर आला.चंद्राच्या उजेडातत्याला समोर बोरणीजवळ असलेल्या कोंडवरीच्या शेजारी कोणीतरी एक टोपीवाला माणूस बसल्यासारखा दिसला .एवढया रात्री आणि पांढरी टोपी घालून कोण बसलेला असावा ? तेवढया त्या टोपीवाल्याची टोपी वर झाल्यासारखी वाटली. आपल्याकडेच तर बघत आहे की काय... आणि काहितरी आठवल्याने त्याच्या अंगावर शहारा उठला... भूत तर नसेल????? भूताचा विचार आल्याबरोबर तो परत फिरला. मागे जाऊन एका दगडावर बसला. काय करावे सुचेना. पंधरा वीस मिनिटे झाली. तो टोपीवाला डोके वरखाली करत होता आणि हयाची काही पुढे जाण्याची हिम्मत होत नव्हती. तो खाली वाकून टोपीवाल्याकडे बघत होता आणि अचानक "काय रं आहयां काय बसलास ? "असा मागून आवाज आला. त्याची बोबडीच वळली. पण आवाज ओळखीचा होता. मागे वळून बघितले तर त्याचा मित्रच होता. त्याने त्याला टोपीवाल्याबद्दल सांगितले. तो अजूनही डोके वरखाली करतच होता. पण आता ते दोघे होते आणि घरी जाण्याचा तोच रस्ता असल्याने दोघेही घाबरत घाबरत पुढे निघाले. मित्र पुढे आणि तो मागे असे चालत आले त्या टोपीवाल्याच्या जवळ आला आणि मित्र जोरजोराने हसायला लागला .त्यानेही बघितले आणि तोही हसायला लागला......... कारण तो भूत किंवा कोणी टोपीवाला माणूस नव्हता तर ते एक रूईचे झाड होते. त्यावर पांढर्‍या फुलांचा गुच्छ होता आणि वारा आला की वरखाली होत होता. पण चंद्राचा अंधूक प्रकाश, ढगाळ वातावरण आणि रात्रीची वेळ यामुळे टोपावाला बसल्याचा भास होत होता. तुम्ही कधी घेतलाय असा अनुभव ??


प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

No comments:

Post a Comment