Sunday, August 25, 2019

खोडकर

#म्हण-जी खोडी बाळा, तीच जन्मकळा....

                   नाव कृष्णा भंडे. नावात , वागण्यातही तसाच आतरंगी आणि जन्मानेही कृष्णच....कारण अगोदरची सात मुले गेली हा मात्र जगला म्हणूनच त्याचे नाव ठेवले कृष्णा.घरची परिस्थिती बेताची, बाप ड्रायव्हर पण पिणे खूप , ब-याचदा जाताना दोन पायावर चालत गेलेला बाप सहा पायांवर (दोन माणसांनी बकोट पकडून) परत यायचा.त्यामुळे घरातून शिक्षणाबाबत उदासिनताच. बुद्घिमत्ता असली आणि तिचे योग्य समुपदेशन झाले नाही तर ती नको त्या गोष्टीसाठी कशी वापरली जाऊ शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हा कृष्णा.
तर हा तिसरीच्या वर्गात पहिल्यांदा माझ्याकडे आला तोपर्यंत हा मला पुर्णपणे माहित असलेला व अभ्यासाच्या नावाने बोंब असलेला आणि सध्याच्या भाषेत अप्रगत म्हणावा असा पण मनोमनी खरोखर वर्णन करायचे तर फक्त आणि फक्त 'ढ' म्हणावा असा हा अस्सल नमुना माझ्याकडे सोपवताना आमच्या मुख्याध्यापकबाईंना कोण आनंद झाला होता...सर आता तुम्हीच बघा याच्याकडे , अशा शे-यासह महाराज माझ्या स्वाधिन झाले आणि मीही आता बघतोच तुझ्याकडे या अविर्भावातच त्याचे वर्गात स्वागत केले.
अभ्यासाला सुरूवात झाली . रोजचा गृहपाठ अपूरा असलेले विद्यार्थी दोनचार असायचेच पण पुर्ण अभ्यास न केलेला हा न चुकता सगळ्यांसोबत तर असायचाच पण इतरांचीही घाबरू नका काही करत नाहीत सर अशी समजूत घालत असायचा.कितीही ओरडा , मारा ,काही फरक पडणार नाही चेह-यावर . सतत हसू चेह-यावर आणि आपला मात्र तिळपापड होणार. फळयावर लिहलेले वाच म्हणावे तर तोंड ऊघडणार नाही , लिह म्हणावे तर ढिम्म हलणार नाही.याला काहीच येत असा माझा पक्का समज...पण खरे तसे नव्हतेच छोटया,मधल्या सुट्टीत हे साहेब फळयावर लिहलेले वाचत असत .पण आपण वाच सांगितले तर एकदम आळिमिळी गुप्पचिळी.
जसजसे दिवस जाऊ लागले तसे हे कृष्णा प्रकरण मला ऊलगडायला लागले. हा वरवर दगड वाटणारा अस्सल हिरा असल्याचे जाणवू लागले आणि माझ्यापुढे आव्हान वाढू लागले .शिकवत असताना हयाने विचारलेले कित्येक प्रश्न मलाच निरूत्तर करायला लागले . रबराचे झाड असते म्हणावे तर हा विचारणार मग आपल्या देशात ती कुठे आहेत ? , पृथ्वीची परिघाची लांबी सांगावी तर ती कोणी मोजली ? किती मोठी टेप लागली ? मध्ये कोणी कापली , तोडली नाही का ??? आता याला काय आणि कसे उत्तर देणार. ब-याच वेळा नंतर सांगतो किंवा रागावून वेळ मारून न्यावी लागे. हळूहळू मी शिकवताना जवळ मोबाईल गुगल चालू करून ठेवू लागलो (त्यावेळी शाळेत मोबाईल वापरावर बंदी होती) .आलाच प्रश्न तर शिकवता शिकवता सर्च करायचे आणि मिळाले उत्तर तर सांगायचे असा क्रम सुरू झाला.
एकदा केंद्रप्रमुख वर्गात आले मी घडयाळात किती वाजले ते शिकवत होतो. नंतर काही घडयाळाची वर्तुळे काढून देऊन किती वाजले ते काटे काढून दाखवायला सांगितले .केंद्रप्रमुखसरांनी एकेकाला बोलवून काटे काढायला सांगितले प्रत्येकाने काढले की ते बरोबर काढले का ?असे विचारायचे.मुले हो म्हणायची.एकाने पाच वाजले काढले .सरांनी तोच प्रश्न विचारला.सगळे म्हणाले बरोबर.पण हा एकटाच म्हणाला चूक आहे.मग त्यालाच बोलावले , त्याने मिनिटकाटा 11 वर व तास काटा 5 वर काढला आणि हेच बरोबर आहे सांगू लागला. केंद्रप्रमुख गालातल्या गालात हसून माझ्याकडे पाहू लागले,मला काहीच समजेना .अचानक टयूब पेटली...बापरे ! याचा असा अर्थ घेतला का सरांनी ....शाळा पाच वाजता सुटते आणि हा पाच असे लिहतो याचा अर्थ शाळा पाच मिनिटे आधी सोडतो असा होतो. मी त्याला विचारले हे कसे तुला माहित तर त्याने दिलेले उत्तर होते ,की आम्ही पहिलीला असताना एवढे वाजले की रांग लावून शाळा सुटायची. वस्तुस्थिती अशी होती की आमच्या शाळेला दोन वर्गखोल्या होत्या पण तीन शिक्षक असल्याने व मी एकटाच पुरूष शिक्षक असल्याने मी माझा वर्ग घेऊन व्हरांडयात बसत असे .त्या दिवशी एक शिक्षिका रजेवर असल्याने मी आत बसलो होतो आणि त्याच वर्गात हा पहिलीला असताना बसत असायचा .पहिलीला पाच मिनिटे आधी आवरायला सांगून रांग लावताना पाच वाजायचे व शाळा सुटायची , पण हयाने घडयाळात पाच वाजले म्हणजे 11 वर मिनिटकाटा पाहिलेला नंतर कोण पाहतो घडयाळाकडे आणि तोच संबोध त्याच्या मनात पक्का बसला होता.
मला जसाजसा कृष्णा मला उलगडत गेला तसतसा तो मला प्रत्येक वेळी नव्याने भेटत गेला.माझे त्याच्यावर रागावणे,चिडणे बंद झाले. तो जवळ येऊ लागला .बोलू लागला.माझ्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागला.वर्ष संपले पुढे चौथी माझ्याकडेच पण शाळा सुरू झाल्यावर कृष्णा आलाच नाही .एक दिवस त्याच बाप दिसला .बोलावून विचारले तर बोर्डिंगला टाकला आहे लवकरच दाखला मागणीपत्र येईल असे सांगितले .
माझ्यापुढचे आव्हान संपले पण आजही मी विचार करतो....कोण कोणाचा गुरू होता....मी त्याचा की तो माझा ????. कारण माझ्यापेक्षा त्यानेच मला खूप काही शिकवले होते. नवी दृष्टी दिली विदयार्थ्यांकडे पाहण्याची.....म्हणून वाटते तोच माझा गुरू......पण तरीही मला पूर्ण खात्री आहे की, कुठेही गेला तरी कृष्णा काही बदलणार नाही.....कारण म्हणतात ना " जी खोडी बाळा, तीच जन्मकळा"
प्रविण म्हात्रे ,पिरकोन
मो. 8097876540

No comments:

Post a Comment