Wednesday, August 28, 2019


          आली गो बाय,  पिठोरी माय....
   आला आला म्हणता म्हणता श्रावण संपायलाही आला. श्रावण महिन्यातील शेवटची अमावास्या हाच या महिन्याचा शेवटचा दिवस . हा दिवस म्हणजेच पिठोरी अमावस्या . सणांचा महिना म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रावणातला शेवटचा सण. हा सण गणेशोत्सवाची नांदीच मानावी लागेल.  गावागावात थोडयाफार फरकाने पण आवर्जून साजरा केला जाणारा हा सण. ज्यांच्या घरी गणपती बसवतात अशा प्रत्येक घरी पिठोरी अमावास्येला पूजा केली जाण्याचा प्रघात आहे. पण हळूहळू संयुक्त कुटूंब पद्धती कमी होत गेली आणि छोटी छोटी विभक्त कुटुंबाची संख्या वाढायला लागली तशी एका कुटुंबाकडे गणपती तर दुसर्‍या कुटुंबाकडे पिठोरी अशी सोईस्कर विभागणी होत जात जात पिठोरी आणि गणेशोत्सव यांची सांगड सैल होत होत त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध कुणाला जाणवणारही नाही इतका दूरचा झाला.
           काही भागात शेतकरीही आपल्या बैलांची पूजा याच दिवशी करतात. त्यांना गोडधोड खाऊ घालतात .बहुतांश ठिकाणी हा दिवस 'मातृदिन' म्हणूनच साजरा करतात, कारण एक अशी मान्यता आहे की ज्या स्त्रीची मुले जगत नाहीत त्या स्त्रीने जर हे व्रत केले तर तिची मुले दगावत नाहीत, ती दीर्घायुषी होतात.याबद्दलची एक कथा सांगितली जाते की, एका नगरात एक ब्राह्मण राहात होता.  त्या ब्राम्हणाच्या वडिलांचे श्राद्ध असायचे श्रावणी अमावास्येला आणि त्याने श्राद्ध घालूत ब्राम्हणभोजन घालायला घेतले की नेमकी त्याची सून बाळंत होऊन मूल दगावत असे. परिणामी सर्व ब्राम्हण उपाशी राहत आणि असे एक-दोन नव्हे तर तब्बल सहा वर्षे घडले. पण सातव्या वर्षी जेव्हा असेच घडले, तेव्हा मात्र त्याचा राग अनावर होऊन त्याने ते मृत मूल सुनेच्या पदरात घालून तिला जंगलात हाकलून दिले .तिथे झोटिंगाच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे सुनेने योगिनींची शिवपूजा झाल्यानंतर त्यांनी विचारलेल्या "कोणी आहे का?" या प्रश्नावर "मी आहे. "असे उत्तर दिले.योगिनींनी तिची हकीकत ऐकून तिची सर्व मुले जिवंत करून दिली.म्हणूनच आज जेव्हा कोणतीही स्त्री हे व्रत करते तेव्हा असेच विचारते आणि तिची मुलेही "मी आहे" असे उत्तर देऊन वाण पाठीमागून घेतात.
           पिठोरीची पूजा करताना कसलीही मुर्ती नसते तर उपलब्धतेनुसार पाच फळझाडांच्या व पाच फुलझाडांच्या फांदया पाटावर ठेवून त्यांची पिठोरी केली जाते. यामध्ये आंबा, पेरु, फणस,  चिकू अशा कोणत्याही फळाच्या फांदया वापरल्या जातात पण यासगळयात एक फुलझाड मुख्यतः न चुकता समाविष्ट असते, ते म्हणजे तेरडयाचे. तेरडा हा या पत्री मधला अविभाज्य घटक आहे . ब-याच ठिकाणी तर नुसत्या तेरडयाचीच पिठोरी केली जाते. तसेच आता काही पंधरावीस वर्षापासून एका आणखी वनस्पतीची भर पडली आहे जिला शुभाचे पान म्हटले जाते. विशेषतः काही भागांतील( आमच्या उरण मधीलही) काही कोळी भगिनी या पानांना पिठोरीतच नव्हे तर कुठे प्रवासाला निघताना,धंदयाला जाताना ही पाने सोबत ठेवतात. साधारणतः पिठोरी अमावास्येच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पत्रीला म्हणजेच ज्या ज्या झाडांच्या फांद्या वापरणार त्यांना आमंत्रण दिले जाते. त्या झाडांसमोर जाऊन ऊदया पिठोरीची पत्री देण्याची विनंती केली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती तोडून आणून घरासमोर किंवा दाराच्याबाहेत शक्यतो उजवीकडे ती पत्री ठेवून मुळांवर पाणी टाकून धुतात, ज्याला 'पत्रीचे पाय धुणे' म्हणतात.त्यानंतर पुन्हा घरात येण्याचे आमंत्रण देवून घरात आणतात आणि पाटावर ठेवून वेगवेगळ्या प्रकारे सजवून पूजा केली जाते.
          पिठोरीचा उपवास हा निर्जल असतो पण काही प्रकृतीनिहाय बदलही करतात. कोणी नुसत्या चहावर, तर कोणी फळाहारावर उपवास करतात. पूजा करताना प्रथमत: तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या छोटया पाच-सात पणत्या म्हणजेच 'टिवल्या' पेटवून पूजा करतात.काही ठिकाणी टिवल्यांऐवजी तांदळाच्या पिठाचाच आत नारळाची 'चव'(खवलेला नारळ गुळात शिजवून तयार केलेली) घालून एक मोठा दिवा बनवतात. या दिव्याला 'भंडारा' म्हणतात. हा दिवा पेटवून पूजा केली की पिठोरी ऊजळली म्हणतात.याचा अर्थ पूजा संपन्न झाली असे म्हणतात. नंतर आरती करुन प्रसाद वाटतात. पुर्वी प्रसादात नुसत्या पिठाचा ऊकडलेला गोळा दिला जायचा. ग्रामीण भाषेत त्याला 'उंडरा' म्हणत. हाच उंडरा नविन जन्मलेल्या बाळाचा तिस-या दिवशी 'लाठा' नावाचा पाचवीसारखा एक संस्कार केला जातो तेव्हाही प्रसाद म्हणून देत असत. आता मात्र मोदक,करंजी मोदक,खीर , पुरीपासून ते पेढे मिठाईपर्यंत सगळयाचा प्रसाद दिला जातो.अशी ही साठा उत्तरांची सुफळ संपूर्ण कहानीची पिठोरीमाय आपणां सर्वांना आनंद देत असते आणि पाठोपाठ आता आपला बाप्पाही येणार ही गोड हुरहूर लावून जाते, श्रावण गेला भादवा आला सांगते, मनभरून आशिर्वाद देते.
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण,रायगड
मो. 8097876540
e mail - pravin.g.mhatre@gmail.com
        

No comments:

Post a Comment