झटपट 'तापोटी' पेटवा
आला थंडीचा महिना
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला
मधाचं बोट कुणी चाटवा...
तुम्ही जर दादा कोंडके यांचे चाहते असाल (तसा उभा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे म्हणा) तर थोडी जरी थंडी पडली की हे गाणे आठवणार नाही असे होऊच शकत नाही. जरा कुठे गारठा वाढायला लागला की हे गाणे आठवणा-यांची संख्याही वाढायला लागते. याच शेकोटीला उरणच्या काही भागात 'तापोटी' म्हणतात. वास्तविक पाहता ही तापोटी किंवा शेकोटी माहित नाही असा कुणी असणे शक्यच नाही , परंतु बहुतेक वेळा ही गरज म्हणून पेटवली जाणारी असल्याने ती तेवढयापुरतीच लक्षात राहणारी असते तिच्याशी संबंधित काही आठवणी असण्याची तशी शक्यता नसल्यातच जमा असते. खरंच थंडीचा कडाका वाढला म्हणून आजूबाजूचा ओलसर कचरा गोळा करून पेटवलेली, जुन्या टायरची शेकोटी पेटवून शेकत बसलेले असताना काळकुट्ट धूर निघणारी आणि तो चुकून श्वासाबरोबर जोराने आत ओढला गेला तर दम कोंडून झालेली घुसमट आठवण्याची बाब आहे का ???? .तसेच आग पेटत रहावी म्हणून प्लास्टिकची पिशवी टाकून आग पेटवत ठेवली पण अनवधानाने त्याच वितळलेल्या प्लास्टिकवर नेमका पाय पडल्याने आलेले फोड कुणाला आठवावेसे वाटणार ?? .. गरज आणि नाईलाजाने पेटत्या आगीजवळ बसून हात-पाय शेकून घेणे एवढीच तिची ओळख असते. बाकी तिच्यात काहीच विशेष वाटत नाही....पण या तापोटीच्या ख-या आठवणी म्हणजे काही फक्त ती गवतपेंढा टाकून पेटवलेली आग नसते,तर तीस-पस्तीस वर्षापूर्वीच्या काळातील ग्रामीण जीवनाचे एक वेगळया प्रकारचे दर्शन त्यातून अप्रत्यक्षपणे घडत असते .त्यावेळी तापोटी ही थंडी आहे म्हणून नाही तर आनंद मिळवण्यासाठी पेटवली जायची .
आज घरोघरी गॅस आहेत. पूर्वीची "घरोघरी मातीच्या चुली..." ही म्हण आता कालबाह्य झाली असली तरी .दोन-तीन दशकांपूर्वी खरोखरच घरोघरी मातीच्याच चुली होत्या. चूल म्हटले की त्यासाठी सरपण ,लाकूडफाटा आवश्यक आहेच. ते सरपण आणणे हे काम घरातील स्त्रीयांनाच करावे लागायचे. ते काम वाटते तितके सोपे नव्हते ,कारण तात्पुरता लाकूडफाटा गावाशेजारच्या माळरान किंवा कुरणांतून जमवता यायचा. मात्र वर्षभराच्या सरपणाची सोय करण्यासाठी मात्र दूरच्या डोंगरावरील जंगलात जावे लागायचे. जवळपास आठ-नऊ किलोमीटरचे हे अंतर पायी चालत जायचे जंगलात लाकडे तोडायची. त्याची मोळी बांधायची आणि परत तेवढेच अंतर परत यायचे हे काही साधेसोपे काम नव्हते. तरीही त्याचे छान नियोजन त्यांनी केलेले असायचे सगळ्याजणी पहाटे उठून स्वत:साठी व घरातल्यांसाठी भाक-या, कालवण बनवून एकत्रितपणे निघत.काळोखातच सहा-सात किलोमीटर अंतर कापून उजेड पडण्यास सुरुवात झाली की नेहमीच्या ठिकाणी पाण्याची सोय पाहून थांबून भाकरी खाऊन घेत. साधारणतः दिसू शकेल एवढा उजेड पडला की मग वेगवेगळ्या गटाने पुढे डोंगरावरील झाडी झुडपांत घुसून जाळण्या योग्य अशा झाडांची लाकडे तोडून जंगलातील वेल किंवा झाडांच्या सालींची दोरी वळून लाकडांची मोळी बांधून परत ठरलेल्या ठिकाणी येऊन इतरजणींची वाट पहात आपल्या सोबतच्या सगळयाजणी जमल्यानंतर मोळया उचलून घरचा रस्ता धरत. पुन्हा तेवढेच अंतर चालत निघायचे तेही एवढे थकून डोक्यावर मोळीचे वजन घेऊन. यात थोडी आनंदाची बाब एवढीच असायची की, परत येताना घरातील दुसरी कोणीतरी व्यक्ती अर्ध्या रस्त्यात मदतीला येत असे. डोक्यावरचा भार जरी कमी झाला तरी परत तेवढे अंतर पायीच चालावे लागत असे. त्याबाबतीत कोणतीही पर्यायी सोय नव्हती. वातावरणाच्या दृष्टीने हे थकवणारे काम हिवाळयातच करावे लागे, कारण थंड वातावरणात ते सुसहय व्हायचे. त्याचबरोबर पावसाळा नुकताच संपून गेलेला असल्याने झाडे झुडपेही वाढून पाने गळायला सुरवात झालेली असायची. त्यामुळे जास्त उपलब्धता आणि तोडण्यास सोपी, झटपट लाकडे जमवणे शक्य होत असे.
हिवाळा सुरू झाला की घरातील आई, काकी, ताई या सरपण आणण्यासाठी पहाटे लवकर उठल्या की मग लहान मुलांनाही जाग यायची.तो काळ असा होता की कुणाजवळ स्वेटर असणे , घरात चादरी असणे हे चैनीचेच आहे असे वाटायचे. मोठया माणसांसाठी जास्तीत जास्त एखादा वर्षानुवर्षे वापरत आलेला भोकं पडलेला मफलर असायचा. अंथरुण आणि पांघरुण दोन्हीसाठी आईचे लुगडेच असायचे. त्यामुळे रात्रभर आईच्या ऊबदार कुशीत निजलेली मुले थंडी आणि घरात आईची कामाची चाललेली खुडबूड यामुळे आईसोबतच उठून आईने पेटवलेल्या चुलीजवळ येऊन शेकत बसत.पण आईला मात्र कामाची घाई असल्याने तिला मुलांची मध्ये होणारी लुडबूड अडचणीची ठरायची.मग आई त्यांना घराशेजारी साठवून ठेवलेल्या भाताच्या पेंढयाच्या दोनचार गुंडया देउन तापोटी कर जा असे सांगून त्यांना बाहेर पिटाळत असे. खरेतर मुलांनाही तेच हवे असायचे, पण त्या दिवसांत शेतीची मळणीची कामे नुकतीच उरकलेली असल्याने घराशेजारी,घरावर,आजूबाजूला भाताच्या पिकाचा पेंढाच पेंढा असल्याने आग पेटवणे धोक्याचे असल्याने घरातील वडीलधारी माणसे तापोटी केल्यावर ओरडत असत. आता मात्र आईनेच सांगितल्यामुळे त्यांचे भागून जात असे.मग काय लगेच सुरक्षित असा कोपरा शोधून पेंढा पसरवला जायचा.घरात जाऊन चुलीतील पेटते लाकुड सावकाशपणे उचलून आग सांभाळत बाहेर आणून आग पेटवायची.सावकाश थोडा थोडा करत पेंढा टाकून आग पेटवत ठेवायची. मस्त शेकत बसायचे. हा आगीचा उजेड दिसल्यावर शेजारची मुलेसुद्धा उठून शेकायला येत. यावेळी मात्र तापोटी करणा-यातला मालक जागा व्हायचा. तो लगेच मालकी हक्क दाखवत येणाऱ्या प्रत्येक मुलाला आधी थोडातरी पेंढा आणायला सांगायचा.त्याने पेंढा आणल्याशिवाय त्याला जवळ घेतले जात नसे. तो जबरदस्तीने आलाच तरी त्याला दूर करणे, त्याच्या आणि शेकोटीच्या मध्ये उभे राहून ऊब मिळू न देणे असे चालायचे. कधी त्यांना धूर ज्या दिशेला जात असेल तिकडे उभे करणे किंवा चक्क हाताने धूर त्यांच्या दिशेने ढकलणे असे प्रकारही करत असत. बिचा-यांचे डोळे आधीच झोपेमुळे लाल झालेले असायचे त्यात धूर डोळ्यात गेल्याने डोळ्यांना पाण्याच्या धारा लागत.तो तापोटी पेटवणारा तिथला बाॅस असायचा. पेंढा कमी पडल्यावरही पेंढा आणायला तो इतरांनाच पिटाळून स्वत: शेकत बसायचा. असे जरी असले तरी सगळयांनाच शेकत बसायला मज्जा वाटायची. जर यातून आनंद मिळत नसता तर अंथरूण सोडून कोण कशाला घराबाहेर पडले असते.सकाळी सकाळी तापोटीजवळ बसून शेकायची गंमतच न्यारी.....पेटत्या तापोटी जवळ बसून मग 'कोंबडा-कोंबडा' खेळाला सुरुवात होत असे. पेंढा पेटला आणि आगीचा लोळ वर उठला की सोबत पेटत्या काडयाही वर उडत याच पूर्ण जळून विझलेल्या काडयांना कोंबडा म्हणत .प्रत्येकजण आपापली वर उडालेली काडी निवडून 'माझा कोंबडा जास्त वर गेला,तुम्हाला हरवले...' असे ओरडत.खेळ म्हणावे असे काही नसले तरी मिळणारा आनंद काही वेगळाच असायचा.याच वेळी काही म्हातारी माणसे पण येउन शेकत बसत.ती मात्र हयाची बाॅसगिरी उडवून लावतच वर कुरकुर करत हळूहळू इतरांना बाजूला ढकलत मोक्याची जागा बळकावत.
आजकाल स्वेटर , शाल व इतर वेगवेगळी साधने उपलब्ध झाली आहेत. भाताचा पेंढाही साठवून ठेवत नाहीत त्यामुळे तापोटी करणे शक्य नाही आणि तशी गरजही उरली नाही.उरल्यात त्या आठवणी.....
प्रविण म्हात्रे
पिरकोन -उरण-रायगड
मो. 8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com
पिरकोन -उरण-रायगड
मो. 8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com

























