Monday, November 4, 2019


      ऐरणीच्या देवा तुला...
         
दिवाळीची सुट्टी नुकतीच संपलेली. पण सुट्टीचा रंग अजूनही मनावरून उतरलेला नाही. शाळेत जायचे म्हणजे पॅरोलवर सुटलेला कैदी परत तुरूंगात जाताना जशी अवस्था असेल ,अगदी तशी सर्व बच्चेकंपनीची स्थिती असते. नेहमीप्रमाणेच गुरूजी शाळेत शिकवत असताना निम्म्याहून अधिकांचे लक्ष बाहेर जाणा-या - येणार्‍या रहदारीतच गुंतलेले असते. तब्बल एकवीस दिवसांची सुट्टी कधी आणि कशी संपली हे कुणालाही कळलेले नसते. त्यातच सुट्टीचा म्हणून दिलेला भरभक्कम अभ्यासही थोडा थोडा गाळून पण सर्व अभ्यास पूर्ण केल्याचा आभास करून गुरूजींना गुंडाळण्याचा केलेला प्रयत्न गुरुजींनी पहिल्या नजरेतच उधळून लावल्याने आणि दोन दिवसांच्या वाढीव मुदतीच्या बोलीवर पूर्ण करण्याच्या विचाराने अस्वस्थ होऊन "कशाला दिली होती ती सुट्टी" असा समग्र सुट्टी उपभोगताना डोक्याच्या आसपासही न फिरकलेला विचार आता मात्र डोक्याचा अक्षरशः 'गोविंदा' करत असतो. अशातच समस्त शिष्यवर्गाची अभ्यासाबाबतची आवड आणि तळमळ जाणून असल्याने तसेच त्यांचा वकूबही जाणून असणा-या गुरूजींनी गेल्या तीन आठवड्यांत सगळयांच्याच पाटया को-या झाल्या असणार,  किंबहुना थोडाफार विस्मरणाचा गंजही चढलेला असणार हे माहित असल्याने पाढे पाठांतराचा हूकूम सोडून एक तासाची डेडलाईन देऊन त्यांनी आपल्या लेखी कामात आपली मान घातलेली असल्याने आणि काही केले तरी पाढयांना आपल्या डोक्यात घुसण्याचा मार्ग सापडण्याची शक्यता अंधूक असल्याने पाढे पाठांतर करण्याऐवजी टंगळमंगळ करण्यात शाळेच्या छपराची कौले, खिडक्यांचे गज, अगदी समोरच्याच्या शर्टाला पाठीवर पडलेले डाग (कधीकधी भोकं ही) मोजून झालेली असल्याने बाहेर लक्ष घोटाळत राहते.
         अशातच शाळेच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काहीशी लगबग सुरु झालेली असते. एक लोहारदादा त्याचे बि-हाड घेऊन आलेला असायचा. त्याचीच सामान लावायला सुरुवात झालेली असायची.  एवढा वेळ पाठांतराचा नुसता अभिनय करणारे सर्वजण खिडकीकडे धावून खिडकीच्या गजांवर चढून तिकडे पहात गलबला करायला सुरुवात झाल्यानंतर गुरुजीही मान वर करून एकदा टेबलावरचा रूळ आपटून वर्गात शांतता प्रस्थापित करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करतात. पण आपल्यातच गुंग असलेल्यांना तो आवाज ऐकूही गेला नाही.नाईलाजाने त्यांना आपले काम सोडून उठावे लागते. ते उठलेले पाहताच सगळी पाखरे पटापट आपापल्या जागेवर जाऊन बसतात.वर्गात पुन्हा अस्वस्थ शांतता पसरते. हळू आवाजात कुजबूज करत नजरेनेच एकमेकांना खुणावत असतानाच घंटेचा टण्णटण्ण आवाज कानावर पडतो. पाखरांनी भरलेल्या झाडावर कोणी दगड मारला तर ती जशी फुर्रकन उडतात तशीच सर्व मुले वर्गाबाहेर पडली. सगळा घोळका लोहार उभारत असलेल्या तंबूजवळ पोहोचला.एव्हाना त्याने चार पहारी चार कोप-यांना ठोकून मध्ये एक काठी उभी केलेली होती आणि त्यावरून तंबूची कनात  ओढून घेऊन तिचे चार कोपरे ठोकलेल्या पहारींना ताणून बांधलेले असतात.तंबू तयार झाल्यावर एक छोटा खड्डा खणून त्यात भाता बसवून घेतो व नंतर पुढे थोडया अंतरावर खड्डा खणून ऐरण पक्की बसवून घेतो. या  सगळ्या कामात आजूबाजूला जमलेले छोटे प्रेक्षक आणि त्यांची लुडबूड,ढकलाढकली यांमुळे अडथळा येत असल्याने मध्येच त्यांच्यावर ओरडत बाजूला होण्यास सांगत होता. इतक्यात शाळा भरल्याची घंटा वाजते. सगळे वर्गात जातात अर्थात दोनचार टाळकी अजूनही घुटमळत असतातच, पण गुरूजींनी आवाज दिल्यावर नाईलाजाने तेही वर्गात जातात. त्यानंतर शाळा कधी सुटते याकडेच लक्ष असल्याने वारंवार खिडकीकडे पहातच वेळ जातो आणि एकदाची शाळा सुटल्याची घंटा वाजताच. बाहेर काढलेली पाटी - पुस्तक दप्तरात भरतच धाव ठोकतो ते थेट तंबूजवळ थांबायला जातो. आता भाता सुरु केलेला असतो पण त्याच्या आगीवर ठेवलेले असते एक बारा ठिकाणी चेपलेले, पोचे आलेले पातेले... आणि त्यात शिजत असते डाळतांदूळ एकत्रच घातलेली खिचडी. त्याची मुले ती कधी शिजते आणि खायला मिळते याकडे आशाळभूतपणे पहात बसलेली असत... कदाचित दिवसभरात त्या बिचा-यांच्या पोटात काही गेलेले नसावे. गडबड करणा-या पोरांना तो लोहार जवळजवळ हाकलूनच लावतो. नाईलाज म्हणून आणि दिवसभरातून घरी जायचे असल्याने ती सगळी घरचा रस्ता धरतात.
                 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच येऊन सर्व मुले त्या तंबूभोवती गम्मत पहात उभी असतात. आता मात्र लोहारदादाला त्यांच्याकडे लक्ष दयायला वेळ नसते, तो आपल्या कामात गर्क असायचा. त्याची घरवाली भाता हलवत स्वत:च्याच तंद्रीत बसलेली असायची. तिलापाहून 'साधीमाणसं' चित्रपटातील
           " ऐरणीच्या देवा तुला
            ठिणगी ठिणगी व्हाऊ दे
           आभाळागत माया तुझी
           आम्हांवर -हाऊ दे..."
असे म्हणणारी जयश्री गडकर डोळयासमोर तरळून जायची. ऐरणीच्या देवाची आभाळागत माया हयांना मिळत असेल की नाही ही शंकाच आहे, पण आभाळाच्या मायेच्या छताखाली आयुष्यभर झोपावे लागते हे मात्र खरे....डोळयासमोर साक्षात बसलेली जयश्री गडकर आणि तिचा अवतार एकदम पाहण्यालायक असायचा, तोंडावळयावरून  मूळ सुस्वरूप असल्याचे जाणवत असूनही कित्येक दिवस अंगाला पाणी लागले नसावे असे मळकट ध्यान , केसाचा पिंजरा आणि सतरा ठिकाणी ठिगळं लावलेले दोन तुकडे जोडून तयार केलेले पातळ .नेहमी मनात विचार यायचा की कपडयांचे ठिक आहे, नसतील परवडत पण बाकी स्वच्छ रहायला काय हरकत असावी. पण जेव्हा खरे कारण समजले तेव्हा मात्र बसलेला धक्का खूप मोठा होता.त्याचे कारण असे होते की अशा भटकंती करणा-या आणि उघडयावर संसार असणा-या समाजातील स्त्रिया आपल्या रक्षणा करता जाणूनबुजून तशा रहात. गावात सुया-दाभण,बांगडया विकायला येणाऱ्या गोसाविणींच्या काळया दातांचे रहस्यही तेच होते. जास्तीत जास्त कुरूप दिसण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे.
          आगीत लालभडक झालेले लोखंड चिमट्याने पकडून ऐरणीवर ठेवून लोहारदादा तिला काही तरी बोलतो.तोंडातील तंबाखूच्या तोब-यामुळे तो काय बोलला हे कोणालाच समजत नाही पण ती मात्र लगेच भात्याची दोरी सोडून पटकन उठून उभी राहते, शेजारी पडलेला घण उचलते आणि त्या रसरशीत लालबुंद लोखंडावर दणादण घाव घालायला सुरुवात करते. शून्यात नजर ठेवून बसलेल्या तिला पाहून एवढी ताकद तिच्या अंगात असेल असे वाटतच नव्हते. हळूहळू तो लोखंडाचा तुकडा आकार घेऊ लागतो.  कोयता, विळा असे वळण घेतो, अर्थात ते तापवून लालभडक करणे व घणाचे घाव घालणे या क्रियेची चारपाच आवर्तने झाल्यावरच. मनाजोगते तयार झाल्यानंतर त्याला पाणी दयावे लागे. पाणी देणे म्हणजे गरम असतानाच लगेच पाण्यात बुडवून ते थंड करणे. असे केल्याने त्याचा कठिणपणा वाढतो व धार जास्त काळ टिकते. त्यानंतर धार लावून त्याला लाकडी मूठ (थरव) बसविले जाते.  ती मूठ बसवताना पाहणे हेही बघण्यालायक असे.पण खरी एकाग्रता पहायला मिळायची ती विळयाला धार लावतानाच.  खरं पाहता हे दिवस शेतीच्या कापणीचे. शेतात भाताचे पिक कापणीसाठी तयार  झालेले असायचे. कापणीसाठी विळे आवश्यकच अन् तेही धारदार हवेत. त्यामुळे गावकरी विळयांना धार लावायला येणार हे वर्षानुवर्षांच्या अनुभवाने माहित झाल्यानेच तर तो गावात आलेला असायचा. विळयाला धार लावणे हे खरे कसब,  कारण त्याचे बारीक बारीक दात नीट योग्य वळणासह धार देउन तयार करणे सोपे नसायचे . त्यासाठी आधी धार लावायची आणि मग नंतर तो विळा पायात पकडून काणस घेऊन एक एक बारीक दाता पाडत जायचा, सरळ भागावर सरळ त्रिकोणी आणि जसजसे वळण येईल तसे त्या वळणाला अनुसरून दाता तिरका करत जायचे हे काम अगदी तल्लीन होऊन तो करत असे.मध्येच डोळयासमोर पकडून एक डोळा मिटून दुसऱ्या डोळयाने दाते आणि धार ठीक असल्याचे पहायचा हे पाहताना गंमत वाटायची. पण मोठया माणसांना त्याच्या श्रमाची किंमत वाटत नसे  ते धार लावून घेतल्यानंतर पैसे देताना कुरकुर करत. एखाददुसरा विनाकारण शिव्याही दयायचा.  तसे लोहारदादाची शरीरयष्टी पाहता त्या माणसाला तो एका हाताने उचलून सहज पंधरा फूट फेकून देऊ शकेल असे वाटायचे, पण तो मात्र कधी हसून तर कधी दुर्लक्ष करून वेळ मारून न्यायचा.  काय करणार??  प्रश्न त्याच्या आणि कुटूंबाच्या पोटाचा असायचा तेथे मनाला आणि रागाला मुरड घालावीच लागते हे बारा गाव हिंडणारा लोहारदादा जाणून असायचा. 
      एवढया वेळात शाळा उघडून प्रार्थनेची घंटाही झालेली असायची.  सोबत गुरूजींनी मारलेली हाकही ऐकू यायची.  मग तो रूपाने काळाकभिन्न ,आडदांड असलेला लोहारदादा मुलांना लटक्या रागाने म्हणायचा " जा बाबांनो जा शाळेत, इथे काय बघून मिळणार तुम्हाला ????  चार बुकं शिकाल तर आरामात सावलीत बसून कमवाल..जा... " मुलंही निघून जायची. दोनतीन दिवसानंतर संध्याकाळी कधीतरी तो आपले बस्तान उचलून दुसऱ्या गावी जायचा.  त्या जागी उरलेल्या असायच्या ठोकलेल्या पहारींच्या आणि भाता पेटवलेल्या आगीच्या राखेच्या खुणा.....  सोबत मनात घुमत राहणारे त्याचे बोल "चार बुकं शिकाल तर सावलीत बसून कमवाल..."
शिक्षणाचं महत्त्व एक निरक्षर,अनाडी माणूस किती चपखल शब्दात सांगू शकेल याचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण नसावे बहुतेक....
 
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

No comments:

Post a Comment