Friday, December 20, 2019


दीपवनी

आपल्या महाराष्ट्र राज्याला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि त्यापैकी साधारणतः 180 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या रायगड जिल्ह्यात आहे. उरण,अलिबाग,मुरूड,म्हसळे,श्रीवर्धन हे तालुके किनारपट्टीवरचे आहेत. या तालुक्यात राहणारे बहुतेक लोक हे आगरी आणि कोळी समाजाचे आहेत. भरभरुन पडणारा पाऊस आणि त्यावर पिकणारे तांदळाचे पिक, किना-याला लागून असलेल्या खाडया आणि त्यात मिळणारे मासे... यांच्या सहज उपलब्धतेनुसारच या भागातील लोकांच्या दररोजच्या आहारात भात आणि मासे यांचा समावेश असणे म्हणजे काही विशेष नाही. पनवेलची खाडी,  धरमतरची खाडी, रोहयाची खाडी,  राजापूरची खाडी यांनी याभागातील सगळयाच लोकांच्या ताटात भात अन् माशांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही याची  कायमस्वरूपी सोय करून ठेवलेली आहे. बरे या मासेमारीचे स्थळ-कालपरत्वे प्रकार तरी किती आहेत हे सांगणे देखील कठिण आहे. पावसाळ्यात सुरवातीला अंडी घालण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वर चढणा-या माशांची उधवण किंवा वलगण असूदे नाहीतर किना-यावर लांबलचक जाळे पसरून धरलेले वाणं असो. डोल लावून मासे धरने असो किंवा छोटे जाळे म्हणजेच आसूने मासेमारी करणे असो... या तालुक्यातील लोक या मासेमारीच्या परंपरागत कलेत अगदी निपुण आहेत. यातीलच एक वेगळा आणि थोडा अपरिचित प्रकार आहे,तो म्हणजे 'दीपवनी'.
     दीपवनी हा मासेमारीचा प्रकार जास्त परिचित नसण्याची कारणे अनेक आहेत. एकतर याप्रकारासाठी विशिष्ट नैसर्गिक अरुंद खाडी असावी लागते. त्याचप्रमाणे   थोडा संथ पण समुद्राकडून खाडीच्या वरच्या चिंचोळ्या भागाच्या दिशेने वाहणारा वारा, कमी थंडी ,ऊबदार वातावरण आणि संध्याकाळ व रात्र यांच्यामधल्या वेळात पूर्ण ओहोटी लागणे याचाच अर्थ सर्वसाधारणपणे शुद्ध पक्षातील षष्ठी ते अष्टमी अशी तिथी असणे आशा सर्व बाबी जुळून येणे आवश्यक असते. तसेच यासाठी किमान पाच-सहा माणसांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकत्रित, सुसूत्रतेने काम करणे गरजेचे असते. विशेषतः शेवटच्या क्षणी थकल्याने किंवा आळसाने जर एक दोघांनी दुर्लक्ष केले तर हाती काहीच पडत नाही.जवळजवळ चारपैकी एका फेरीत यश मिळते. तीनवेळा थोडक्यातच समाधान मानावे लागते.कधीकधी अगदी रिकाम्या हाताने हात हलवत परत फिरावे लागते.
         दीपवनीला आवश्यक योग्य वातावरण बहूदा माघ -फाल्गुन महिन्यात असल्याने या काळातच दीपवनीला जायचा बेत चतुर्थीलाच एखादयाच्या मनात घोळू लागतो. मग तो आपल्या काही साथीदारांना आपला बेत सांगतो .कोणकोण येणार याची चाचपणी झाली की मग आवश्यक असणारे साहित्य जमविले जाते. फारसे काही विशिष्ट सामान हवे असते असे नाही , पण तरीही प्रत्येकासाठी एक एक आसू व उजेडासाठी कंदील-बॅटरी यांची जमवाजमव केली जाते.  आसू म्हणजे बांबू वळवून त्याची एक गोल फ्रेम बनवलेली असते. दिसताना हा आकार मराठी चार (४) या अंकासारखा परंतु त्या चाराची गाठ खूप मोठी व वरचे दोन्ही हात अगदी छोटे असतील असा हा आकार असतो. त्यावर लहान विणीचे जाळे लावलेले असते.कोकणात साधारणतः प्रत्येक घरी ही आसू पूर्वी असायचीच.म्हणूनच ती सहज उपलब्ध होते. सोबतच उजेडाची पक्की सोय झाली की,  दुसर्‍या दिवशी एक दोघेजण संध्याकाळच्या वेळेत खाडीकडे सहजच रमतगमत फिरायला जाऊन भरती ओहोटीचा अंदाज घेऊन पुढील दिवशी पाण्याची स्थिती कशी असेल याचा आदमास घ्यायचे. त्या अंदाजाने त्यानंतरच्या दिवशी संध्याकाळी किती वाजता निघायचे याची निश्चित वेळ ठरवत असत.
         ज्या दिवशी दीपवनीला जायचे असेल त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या आसूची डागडुजी(यालाच ग्रामीण भाषेत 'तांगलान-तुंगलान' म्हणतात) करून कुठे फाटलेले जाळे तांगलुन घेत. आसूचा गांरां म्हणजेच बांबूची फ्रेम मोडली वा सैल झाली नाही ना , जाळे सर्व बाजूंनी योग्यप्रकारे घट्ट बांधले आहे ना याची खातरजमा करून आपापली आयुधे जय्यत तयार ठेवत.  कंदील असेल तर त्यात राॅकेल भरून काच स्वच्छ पुसून साफ करणे ,पट्टीची वात योग्य लांबीची आहे किंवा नाही , नसेल तर किराणा दुकानातून ती विकत आणणे. ती कंदीलात भरणे ही कामे उरकून घेतली जात. संध्याकाळी सुर्य मावळतीकडे झुकू लागला की हे सगळे वीर आपापल्या आयुधांसह खाडीच्या मुखाशी समुद्राजवळ पोहोचत.  कधीकधी या सगळ्यां वीरांसोबत  माझ्यासारखा एखादा बाजारबुणगाही असायचा. जो प्रत्यक्ष या कामगिरीत सहभागी होऊन चिखलात उतरत नसे. पण बांधावर उभा राहून कंदील-बॅटरी सांभाळणे,  पकडलेले मासे जवळच्या पिशवीत भरणे किंवा त्यांचे कपडे वागविणे अशी कामे तो करत असे.  म्हणून त्याला 'वागव्या' असेच म्हणत. यावेळेपर्यंत ओहोटी लागायला सुरवात झाली असायची.पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आणि सूर्य मावळून अंधार पडायला सुरूवात झाली की ते पाण्यात उतरून आसूने मासे पकडत पकडत समुद्राच्या उलट दिशेने वरवर येत . ते सगळे एका रेषेत सर्व खाडीची रुंदी अडवून धरत, पाण्यात जोरजोराने खळबळ माजवत पुढेपुढे सरकत येत. जेणेकरून मासे घाबरून वरच्या दिशेने पळतील. यावेळी खरेतर कोणीही आपल्या जाळयात मासे मिळतात किंवा नाही याची काळजी न करता जास्तीत जास्त पाण्यात खळबळ माजवणे हे उद्दिष्ट ठेवूनच चालत असत. मिळालाच एखाददुसरा मासा तर तो बोनस समजून वागव्याच्या दिशेने भिरकावून देत आणि तोही चपळाईने तो मासा उचलून पिशवीत टाकत असे,कारण नंतर दीपवनी यशस्वी झाली नाही तर हेच मासे कालवणापुरते म्हणून आधार ठरत.
           हळूहळू रात्र चढायला सुरवात होई, भरतीचे पणीही कमीकमी होत जाई. कंदील धरणा-याने तो एव्हाना पेटवलेला असे.बॅटरी असेल तर मात्र गरजेपुरती चालू बंद करीत असे .छातीभर पाण्यात मासे पकडायची सुरवात केलेली असायची ती आता गुडघाभर पाण्यापर्यंत आलेली असायची. आता खाडीची रुंदीही कमी झालेली असल्याने अडकलेले मासे इकडेतिकडे उडया मारताना दिसू लागत. खरी मासे पकडायची संधी आता मिळू लागलेली असायची. हीच वेळ असायची ज्यात या मासेमारांचे कौशल्य पणाला लागणार असायचे. नीट एकमेकांच्या सहकार्याने आता माशांची वाट अडवून धरत, त्यांना खाली समुद्रात परत जाऊ न देता वरवर पळवणे हे कठीण काम आता सुरू झालेले असायचे. कमी पाण्यात अडकलेले मासेही जाळयात सहज मिळू लागत असतानाच ,त्यांना अडवून ठेवण्यासाठी लगेच पुन्हा जाळे पाण्यात मारावे लागत असल्याने जाळयात आलेला मासा पटकन पकडून पिशवीवाल्याकडे फेकून पुन्हा पाण्याकडे वळावे लागत असते. हे सर्व एकदम पाच सहा जण करत असल्याने पिशवी वागव्याचीही तारांबळ उडालेली असायची. टण् टण् उडया मारत माशांना पाण्यात पुन्हा जाऊ न देता पटापट पकडून पिशवीत टाकताना जी काही कसरत करावी लागे की, त्यालाही दमायला होई.त्यातच मासा जर पाण्यात गेला हे पकडणा-याला दिसले तर त्याच्या शिव्याही खाव्या लागत .पण त्याबरोबरच मज्जाही यायची व आनंदही वाटायचा. मासा पकडला आणि यशस्वीपणे पिशवीत गेला की लढाई जिंकल्याचा आनंद व्हायचा ,पण ही लढाई मात्र हातघाईवरची असायची. शेवटचे टोक जवळ आलेले असायचे ओहोटीचे पाणी पुर्ण खाली गेलेले असे.आता पायाच्या खुब्यापर्यंतच्या पाण्यात आणि छोटया छोटया खडड्यांत अडकलेले मासे जाळे बाजूला फेकून नुसत्या हातांनीच पकडायला सगळेजण सुरूवात करत.  सगळं व्यवस्थित जुळून आलेले असेल तर सगळीकडे मासेच मासे असत. फक्त उचलून पिशवीत टाकायची लगबग असायची.पिशव्या माशांनी भरून टरारून फुगलेल्या असायच्या.  नीट काही जुळले नसेल तर गुडघाभर पाण्यापासूनच अंदाज आलेला असायचा .सगळेच निराश होऊन मिळेल तो लहानमोठा मासा पकडून रात्रीच्या कालवणापुरते तरी मिळावेत अशी आशा करत असत. ब-याचवेळी निराशा पदरी घेऊनच परत फिरावे लागले तरीही पुन्हा मिळतील या आशेने ते पाण्याबाहेर पडत. तिथल्याच खड्डयात चिखलाने बरबटलेले अंग आणि आसू स्वच्छ धुवून घरचा रस्ता धरत.
            दीपवनीचे वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारे मासे हे फक्त बोय (बोईट) या प्रकारचेच असतात. वेगळयाप्रकारचे मासे क्वचितच असतात. या मासे पकडण्याच्या पद्धतीत खूप कष्ट करावे लागते. जवळजवळ दोन तीन किलोमीटर छातीभर पाण्यापासून ते टीचभर पाण्यात येईपर्यंत चिखलातून सलग मासेमारी करावी लागते त्यामुळे शारीरिक क्षमतेचाही कस लागतो. यशापेक्षा अपयशाचीच हमी जास्त असते .तरीही "लाख नाहीतर खाक " या न्यायाने उत्तम एकजूटपणे काम करण्याची कुवत आणि मिळेल त्यात आनंद मानण्याची वृत्ती यामुळे दीपवनीला जाणारे बहाद्दर पुढचा दीपवनीचा मुहूर्त साधायला आनंदाने तयार होतात. काही दिवसांनंतर पुन्हा तेच नियोजन अन् तीच कृती त्याच उत्साहाने करायला तयार होतात. शेवटी नियतीही त्यांच्यापुढे हात टेकते आणि मग भरभरून मासे घेऊन येतानाचा त्यांचा आनंद काय वर्णावा .....तो आनंद प्रत्यक्ष अनुभवण्याचाच असतो.
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com

No comments:

Post a Comment