Wednesday, December 4, 2019


कळीदार कपुरी पान........





"कळीदार कपुरी पान , 
कोवळं छान केशरी चुना
रंगला कात केवडा, 
वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा....."
सुलोचना चव्हाण यांनी गायलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले हे अजरामर गीत असो किंवा
"पान खाएँ सैया हमारो, साँवली सुरतीया होंट लाल लाल... " हे आशाताईंच्या आवाजातील शंकर जयकिशन यांचे गाणे आसो...पान म्हटले की सगळयांनाच 'होंट लाल लाल... ' ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.त्यात अजून 'खईके पान बनारसवाला... म्हटल्यावर तर 'बंद अकलका ताला ' खुलायला पण वेळ लागत नाही. असे हे पान आपल्या सर्वांना 'विडयाचे पान ' या नावाने परिचित आहे. भरपेट झालेले जेवण आणि त्यावर केलेले तांबुलप्राशन' आपल्या आयुर्वेदातही मानाचे स्थान पटकावून बसलेले आहे. पण हे खायचे पान फक्त खाण्यासाठीच वापरले जाते असे नाही.आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात यानेच आदयपूजन केले जाते .ते आणि या पानावर ठेवलेली सुपारी हेच त्या गजाननाचे रुप मानले जाते आणि त्याचेच पूजन करुनच शुभकार्याला सुरुवात केली जाते.
नागवेल पानाच्या उत्पत्तीची एक कथा सांगितली जाते ती अशी......
देव दानव मिळून समुद्रमंथन केले. एक एक करत रत्ने निघत गेली आणि एकदाचे ज्यासाठी हा सर्व खटाटोप केला होता त्या अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी अवतरला. अमृत प्रथम आपल्यालाच मिळावे यासाठी देव आणि दानव दोघेही आतुर झाले .शेवटी श्रीविष्णूने मोहिनीरुप घेऊन देवांना अमृताचे वाटप केले व राहिलेले काही थेंब नागराज नावाच्या हत्तीच्या म्हणजेच गजराजाच्या साखळदंड बांधलेल्या खांबाजवळ झटकले त्यातनच एक वेल उगवून ती नागाप्रमाणे वळसे घेत सरसर त्याखांबावर वर चढत गेली.तिच्या त्या सर्पाकार चढण्यामुळे आणि नागफणीसारख्या पानांमुळे तिला नागवेल म्हणू लागले .अमृतबिंदूंपासून उत्त्पत्त्ती झाल्यामुळेच त्या पानांचा विडा भोजनानंतर खायला देवांनी सुरुवात केली आणि अर्थातच मग त्याला सर्वमान्यता मिळाली .यथाकाल हे खायचे पान म्हणून परिचित झाले.
नागवेल पायपरेसी कुलातले आहे अन् त्यामुळेच पायपर बीटल हे शास्त्रीय नाव दिल गेले आहे. नागवेलीचे मूळ स्थान जावा बेटे असून कपूरी, मलबारी, अशा जाती प्रसिद्ध आहेत.वेलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे कांडे आलटून पालटून कलंडतच चढत जाते आणि आपल्या नावातील नाग या शब्दाला न्याय देते.नागवेलीचा त्रयोदशगुणी विडयाला तर धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही ठिकाणी सर्वगुणसंपन्न मानले जाते आणि ते खरेही आहे ,कारण यात कात, चुना, सुपारी, विलायची, लवंग, बडीसोप, खोबरे, जायपत्री, जेष्ठमध, कापूर, कंकोळ, केशर आणि खसखस असे तेरा आरोग्यदायक घटक असतात. यातील प्रत्येकाची गुणकारी अशी ओळख आहे .मग हे तेरा एकाच विडयात असतील तर मग काय बोलायलाच नको. यासह गोविंदविडा, पानपट्टी , पुडीचा विडा, पुनेरी, मद्रासी, तिखट, कलकत्ता , बनारसी असे कितीतरी प्रकार व रुपाने हे पान आपल्याला भेटतच राहते. कोणी पान खात असेल किंवा नाही पण प्रत्येकाने कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी मसाला पान हे खाल्ले असेलच. अगदी लहानपणी किंमत परवडत नसल्यानेदोन तीन मित्रांनी एक मसाला पान विकत घेऊन ते वाटून खाल्लेले असणारच नाही का...
पान खातानाही काही संकेत पाळले जातात.पानाचा विडा तयर करताना प्रथम त्याचा देठ आणि शेवटचे टोक तोडून टाकतात. देठ आणि टोक खाऊ नये असे मानले जाते. यामागे पानाच्या आत वास्तव्य करत असलेल्या देवदेवता आहेत, कारण पानवेलीच्या पानाची उजवी बाजू ब्रम्हदेवाची , डावी बाजू पार्वतीची, मध्ये सरस्वती , लहान देठात श्रीविष्णू ,मोठया देठात अहंकाराची देवता व टोकात दारिद्रयलक्ष्मी, तर पानाखाली मृत्यूदेव आहे असे मानतात आणि त्यामुळेच देठ व टोकाची गच्छंती होते.
नागवेल पानाचे औषधी गुणधर्म ब-यांच जणांना माहीत असतील .वात व कफाच्या विकारावर तसेच मुखशुद्धीसाठी पान खाल्ले तर आराम पडतो. डोके जड होणे, दुखणे, शिंका येणे- नाक गळणे यावरही रामबाण उपाय आहे.
मात्र याच दैवी पानासोबत काही लोक तंबाखू , मावा असे विघातक पदार्थ खातात आणि कुठेही लाल पिचकाऱ्या मारुन भिंती, जिन्याचे कोपरे, सार्वजनिक वाहनांतील खिडक्या घाण करतात तेव्हा मात्र राग तर येतोच पण किळसही वाटते. यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणवणारेही असतात हे दुर्दैव !! अशावेळी लहानपणी प्रत्येक लग्नघराच्या चुना व निळीच्या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर अगदी बाळबोध लिपीत, वाकडया तिकडया अक्षरात लिहलेला.... " या बसा पान खा, पण भिंतीवर थुंकू नका..." हा वरवर प्रेमळ वाटणारा पण सूचनावजा सल्ला आजही ठिक ठिकाणी असावा असे जरूर वाटून जाते.....भोजनानंतर खाल्लेला पानाचा विडा हा अन्नयज्ञातील सांगतेची आहुती समजून त्याचे पावित्र्य राखून खावा हीच अपेक्षा...
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण
मो.8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com

No comments:

Post a Comment