Wednesday, September 25, 2019

चला चिरनेरला..हुतात्म्यांच्या आठवणी जपायला.....
             
उरण तालुक्यातील चिरनेर हे गाव या दिवशी एका वेगळयाच आवेशात , उत्साहात आणि तेवढयाच लगबगीत असल्याचे दिसते.गावातील महागणपतीच्या सुप्रसिद्ध , जागृत देवस्थानामुळे हे गाव तसे दर संकष्टी चतुर्थीला येणा-या भाविकांमुळे दरमहा एक दिवस गजबजलेले असते . पण 25 सप्टेंबरच्या सकाळी मात्र हेच गणेश मंदिर आणि परिसर देवभक्तीमय नव्हे तर देशभक्तिमय वातावरणात बुडालेला दिसतो, कारण या गावाला आणि या मंदिराला जसे धार्मिक महत्व आहे तेवढेच ऐतिहसिक महत्वही आहे. याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण आणि हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी सगळे लोक येथे जमलेले असतात.
           25 सप्टेंबर 1930 रोजी इंग्रज सरकारने लादलेल्या जंगलबंदीला विरोध करण्यासाठी परिसरातील लोकांनी *सविनय कायदेभंग* करून जंगलात घुसण्याचे ठरवले . अनेकांची उपजिविका ज्यावर अवलंबून होती .त्या जंगलात जाण्यास, सरपणासाठी लाकूडफाटा तोडण्यास मज्जाव असल्याने चिडलेल्या या लोकांनी कायदा मोडायचा असे ठरवून सर्व लोक अक्कादेवीच्या डोंगरात जमले.तेव्हा झालेल्या गोळीबारात आठजण नागरिक व एका मामलेदारासह पाच सरकारी सेवक हुतात्मा झाले तर चौदाजण जखमी झाले आणि सत्तेचाळीस जणांवर खटला भरण्यात आला .त्याचा हा स्मृतीदिन प्रथम  1931 साली साजरा केला तो *सेनापती बापट* यांनी .मात्र नंतर थोडा दुर्लक्षित राहिलेला हा कार्यक्रम 1957 पासून शासकीय स्तरावरून जिल्हाधिका-यांच्या अखत्यारीत साजरा केला जाऊ लागला. *शंकरराव चव्हाण*(1975) , *शरद पवार* (1989) , *बँ.अंतुले*(1981) , *मनोहर जोशी* (1997) अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
( _योगायोगाने पुढील वर्षीचा स्मृतीदिन येण्याआधी नामदार शरद पवार वगळता सर्वांचे पद गेले असे सांगतात_ )
         आठ हुतात्म्यांमध्ये हुतात्मा नाग्या कातकरी प्रत्यक्ष चिरनेर अक्कादेवीचा असूनही थोडा उपेक्षितच राहिला .अगदी स्मृतीस्तंभावरही त्याचे नाव सुरूवातीला नव्हते .विशेष म्हणजे चार दिशांना वंदे मातरम् च्या चार पाटया व सात हुतात्म्यांसह पाच सरकारी सेवकांची नावे या स्मारकावर होती पण *नाग्या महादू कातकरी* यांचे नाव मात्र नव्हते.पण 23 जानेवारी 2003 रोजी निवडणूक अचारसंहिता असल्याने गाजावाजा न करता शासनाच्यावतीने सायंकाळी 5.30नंतर नावाची पाटी लावली व त्यांना न्याय मिळाला .म्हणूनच तर 25सप्टेंबर 1930 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढयातील एक महत्वपूर्ण दिवस मानला जातो. याच दिवशी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध अगदी तळागाळातील, साध्यासुध्या आगरी,  कोळी, कातकरी  जनतेने सत्याग्रह केला. चिरनेर, दिघोडे, मोठीजुई, धाकटीजुई, कोप्रोली, पाणदिवे आणि अशाच आजुबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येऊन हा लढा दिला .कारण त्यांचे पूर्ण जीवनमान,  त्यांचा उदरनिर्वाह ज्या जंगलावर अवलंबून होते त्या जंगलावरचा त्यांचा हक्क, त्यातील झाडांझुडपांपासून मिळणाऱ्या सरपणाचा लाकूडफाटा तोडायला त्यांना बंदी केली होती.एकंदरीत त्यांच्या पोटावरच पाय देण्याचेच काम जुलमी इंग्रजांनी केले होते.  गरीब असला म्हणून काय झाले, पण एकदा का कोणी आपल्या जगण्यावरच जर बंधने आणत असेल तर त्याचा उद्रेक हा  निश्चित होत असतो. चिरनेरचा जंगल सत्याग्रह याचेच उदाहरण म्हणता येईल.  मूळ सत्याग्रह चिरनेरजवळ असलेल्या अक्कादेवी डोंगरावर झाला. पण त्यानंतर सत्याग्रहींना चिरनेरच्या महागणपतीच्या मंदिरातील सभागृहात कोंडून ठेवण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच गोळीबार केला गेला.आजही त्या गोळीबाराच्या खुणा तेथे जपल्या गेलेल्या आहेत. तुम्ही कधी जर महागणपतीच्या मंदिरात गेलात तर आवर्जुन सभामंडपाच्या उत्तरेकडील खिडकीचे निरीक्षण करा.  तुमचे लक्ष त्या खिडकीच्या एका गजावर गेल्याशिवाय राहणार नाही.तो गज वेगळया रंगाने रंगवलेला आहे. ब्रिटीश सैन्याने केलेल्या गोळीबारात एक गोळी त्या गजाला घासून गेल्याची खूण तुम्हाला त्या गजावर पहायला मिळेल आणि त्याला स्पर्श केलात तर इतिहासातील एका घटनेचा साक्षीदार झाल्यासारखे वाटून मन रोमांचित होईल.


               दरवर्षी हा जंगल सत्याग्रहाचा दिवस मोठया उत्साहात साजरा केला जातो. मान्यवरांच्या हस्ते येथे उभारलेल्या हुतात्म्यांच्या पुतळयांना व ज्योतिस्तंभाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी पोलिस दलाकडून केले जाणारे संचलन आणि त्यानंतर झाडल्या जाणा-या गोळीबाराच्या तीन फैरी अंगावर शहारा उठवून जातात आणि आपोआपच तोंडातून हुतात्म्यांच्या जयजयकाराच्या घोषणा बाहेर पडतात. पुर्वीपासूनच या कार्यक्रमाला
मोठमोठया नेते , पुढारी , मंत्री अगदी मुख्यमंत्र्यांनीही येथे    उपस्थिती लावलेली आहे. त्याबरोबरच विचित्र योगायोगामुळे एका अंधश्रद्धेलाही जन्म दिला आहे, की जो कोणी या कार्यक्रमासाठी त्याचे पद टिकत नाही. त्यामुळे असेल कदाचित पण हळूहळू येथे येणा-या मोठया पाहुण्यांची संख्या कमी होत गेली, मात्र जनमानसांतील या
कार्यक्रमाबाबतचा आदर अजूनही तसाच असल्याचा दिसतो.
        याचबरोबर या कार्यक्रमात जरा आजूबाजूला पाहिलेत तर या जमलेल्या गर्दीतून वाट काढत, थोडेसे अंग चोरत जाणारे काही आदिवासी लोक तुम्हाला दिसतील. काहींचे नवे पण पारंपारिक पोषाख,  हातात ढोल-ढोलकीसारखी पारंपारिक वादये घेऊन जाणारे हे लोक सुद्धा जंगल सत्याग्रहाच्या हुतात्म्यांना वंदन करायला मूळ आक्कादेवी कातकरवाडीवर जात असतात. तेथील स्मारकाच्या साक्षीने आजूबाजूच्या रानसई , भु-याचीवाडी, वांधणेवाडी,वेश्वीवाडी ते पेण तालुक्यातील वेगवेगळ्या कातकरवाडीवरचे लोक आपल्या समाजातील हुतात्मा नाग्या कातकरी यांना मानवंदना देण्यासाठी जमतात. नाच-गाणी सामुदायिक भोजन अशाप्रकारे हा कार्यक्रम ते साजरा करत असतात, अगदी चिरनेरच्या दिमाखदार सोहळयापेक्षाही हा पारंपारिक सोहळा हटके असला तरी आपला आब राखून आहे. मग येताय ना 25 सप्टेंबरला चिरनेरला...????

प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

No comments:

Post a Comment