Tuesday, December 3, 2019


दगडाच्या वस्तू..
सुंदर माझे जाते गं
फिरते बहुत ।
ओव्या गाऊ कौतुके
तू ये रं बा विठ्ठला ।।
जीव शिव दोन्ही सुंडे गं
प्रपंचाच्या नेटे गं ।
ओव्या गाऊ कौतुके
तू ये रं बा विठ्ठला.........
        काही वर्षे मागे गेलो तर खेडयातली पहाट अशा जात्यावरच्या ओव्यांनी आणि सोबत जात्याच्या एकलयीतील घरघरीने उगवत असलेली आपण अनुभवलेली असेलच. नसेल अनुभवली तर आपण एका स्वर्गीय सुखाला पारखे झालो असे समजायला काहीच हरकत नाही. काय छान, सुखद अनुभव असायचा तो. पहाटे पहाटे कोंबडा आरवला की , घरातल्या कर्त्या स्त्रिया उठून झाडलोट करून जात्यावर बसत. जमिनीवर अंथरलेल्या एका धडशा फडक्यावर दगडी जाते ठेवून जात्याच्या वरच्या पाळीवर असलेल्या छोटया छिद्रात लाकडी खुंटा ठोकून बसवत.  शेजारी सुपात दळणासाठीचे, आदल्यादिवशी पाण्याने धुवून कडक उन्हात वाळवून ठेवलेले तांदूळ भरुन ठेवलेले असायचे. मग दोघीजणी जात्याच्या दोन बाजूला समोरासमोर बसत. दोघींनीही आपला डावा पाय घडी करून जवळ घेतलेला असायचा तर दुसरा पाय जात्याच्या समांतर बाजूला लांब पसरलेला असायचा . शेजारी असलेल्या अंथरूणावर लहान मुले अर्धवट झोपेत लोळत पडलेली असत ,त्यांचा डोक्यावरून मायेने सावकाश हात फिरवत फिरवत नंतर एक हात खुंटयाला व दुसर्‍या हाताने सुपातील दाणे जात्यात टाकत. जात्याच्या मुखात दाण्यांची मूठ पडताच. त्यांच्या मुखातूनही सुरेल ओव्या आपोआपच बाहेर पडत. दोघींही खुंटयाला धरलेला हात अगदी सहज ताळमेळ राखत जात्याला गोलाकार फिरवत. 'जात्यावर बसले की ओवी आपोआप सुचते' अशी एक म्हण आहे आणि ती खरीही आहे.सूर्योदयापर्यंत एक दोन पायल्यांचे दळण सहज दळून काढत. ब-याच वेळी तर एकटीच जाते ओढून दळण करत असे. जसजशा ओव्या बाहेर पडत तसतसे पीठही जात्यातून बाहेर पडू लागायचे. हे जाते म्हणजेच जुन्या काळातील हा एक ग्राईंडरच होता. जात्याचेही दोन तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार हे तांदूळ दळणासाठी वापरले जाते जे साधारणत: दीड फूट व्यासाची एकावर एक ठेवलेली दोन गोल पाळं असलेले ते "पीठजाते" . तर दुसरे दगडाचेच पण जवळपास अडीच ते तीन फूट व्यासाचे जाते असायचे जे भात दळून तांदूळ काढण्यासाठी उपयुक्त पडत असे.त्याची ओळख "भात जाते " अशी आहे .....आणि हो , जात्याचा एक अनोखा उपयोगही क्वचित प्रसंगी खेडेगावात करत. जर कोणी पाण्यात बुडाला आणि त्याला पाण्याबाहेर काढले की त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला जात्यावर बसवून गरगर फिरवत.  एकदा का त्याचे पोट ढवळून निघाले की उलटीवाटे सर्व पाणी पोटाबाहेर पडे. अशाप्रकारे माणसाचा जीव वाचवण्यासाठीही हे जाते उपयोगी पडे........प्राचीन काळापासून माणूस जाते वापरत आला आहे. अगदी मोहेंजोदडो उत्खननात लोथल येथे दगडी जाती सापडली आहेत.हे जाते म्हणजे अश्मयुगीन माणसाची भटकंती संपून शेती करणा-या स्थिर मानवी समाजाची निर्मिती झाल्याचे निदर्शक असल्याचे सक्षज लक्षात येते.           जाते हा जसा जुन्या काळातील ग्राईंडर होता, तसाच त्याकाळी घरोघरी एक दगडी 'मिक्सर' असायचा.आठवला का हा मिक्सर कसा असायचा तो ???.... हो ! बरोब्बर ... तोच आपला " पाटा-वरवंटा" . छान पंचकोनी आकाराचा दगडाचा पाटा आणि दंडगोलाकार मधला भाग फुगीर असलेला वरवंटा प्रत्येक घरात हमखास आढळून येत असे. मिरची - खोब-याचं वाटण वाटायचे असो ,की खरपूस भाजलेल्या सुकटीची सुक्या किंवा ओल्या मिरच्या घालून वाटलेली झणझणीत चटणी असो, पाटा-वरवंटा हा लागायचाच. जंगलातून आणलेली हिरवी करवंदे ठेचून त्यांची छान 'कंदोरी' बनवायची असेल तर पाटा-वरवंटा हवाच असायचा. पण हा पाटा फक्त वाटण वाटणे किंवा चटणी वाटण्यापुरताच मर्यादित नाही , तर नवीन जन्मलेल्या बालकाची पाचवी करताना सटवाईची पूजा करण्यासाठी हाच दगडी पाटा अजूनही वापरतात.तीच गोष्ट तेच लहान मूल मोठे होऊन त्याचे लग्न करायचे ठरले की,लग्नात  देव उठवण्यासाठी आवश्यक असतो तो पाटा वरवंटाच. एवढेच नव्हे तर घरातील आजी आजोबा आपल्या उरल्यासुरल्या दातांनी जेव्हा चणे-फुटाणे खाता येत नसतील तर ते यावरच छानपैकी वाटून खात.
     जाते असो किंवा पाटा-वरवंटा असो. पीठ नीट दळून बारीक होण्यासाठी , वाटण बारीक वाटून होण्यासाठी त्यावर तिरक्या,आडव्या तिडव्या बारीक खाचा पाडलेल्या असायच्या. या अशा खाचा पाडण्याला 'टाकी लावणे' म्हणतात.दर दोन तीन वर्षांनी जात्याला आणि पाटयाला लावावी लागत असे (ते प्रल्हाद शिंदेंचं 'तुझ्या जात्याला लाव गं टाकी... हे गाणं आठवतं का.).. त्या टाकी लावणा-यांची म्हणजे पाथरवटांची "जात्याला,पाटयाला टाक्की लावून घे गं बाई.... किंवा 'ऐ टाक्कीय्य.."अशी हाक गेल्या काही वर्षांत ऐकायलाच मिळत नाही. घरोघरी आलेल्या इलेक्ट्रिक मिक्सर,ग्राईंडरने त्यांचा व्यवसाय कधीचाच मोडकळीस आला आहे.
          आणखी एक दगडी वस्तू पूर्वी घराघरात असायची. ते म्हणजे घराचे नाभी स्थान मानले जाणारे 'दगडी ऊखळ.'  याबात जुने लोक किती आग्रही असत त्याचे उदाहरण दयायचेच झाले तर........
    एकदा एक माणूस घरात पाहुणा आला. त्याला पाणी हवे होते पण दिलेले पाणी त्याने प्यायला नकार दिला .कारण म्हणे तुमचे घर अपूर्ण आहे.घराला नाभीच नाही,म्हणजे घरात उखळ नाही आणि अशा घरचे पाणी मी पिऊ शकत नाही.नंतर त्याला घरातील उखळ दाखवल्यानंतर त्याने पाणी घेतले. आता शहरात तर अजिबात उखळ नसते. बिल्डरांनी जागेची कमतरता आणि ग्राहकांची अगतिकता याचा अचूक फायदा घेत अशा भारतीय अन् त्यांच्या मते बिनउपयोगी वास्तूशास्त्रानुसार घर मिळणेच शक्य नाही अशी मखलाशी करून आपले स्वत:चे उखळ मात्र पांढरे करून घेतले.तर गावात खूप जुनी घरे वगळता ते कुठेही पहायला मिळणार नाही. नवीन पिढीला हे सगळं थोतांड आहे पटवून देण्यात तथाकथित 'फुरोगामी'(?) यशस्वी झालेत.त्याऐवजी चायनीज फेंगशुईच्या वस्तू त्यांच्या गळ्यात मारुन आपल्या तुंबडया भरून घेतात. इकडे आपण घरचे सोडून परक्याला आपले मानून आम्ही 'अॅडव्हान्स' झाल्याचा तोरा मिरवत बसलो आहोत आणि आम्हीच दगड आहोत हे जगाला दाखवून देत आहोत.
        दगडी वस्तूंबद्दल बोलायचे आणि खलबत्त्याची आठवण काढायची नाही हे कदापि शक्य नाही. स्वयंपाकघरातील एखादया कोप-यात का होईना पण आपले स्थान पक्के करून ठेवलेला खलबत्ता गृहिणींसाठी बहुपयोगीच. आले लसणाची पेस्ट बनवण्या पासून खोबरे कुटण्यापर्यंत खलबत्ता कामी यायचा. कधीकधी हाताशी हातोडी नसेल किंवा नेमक्या वेळी ती सापडत नसेल तर खलबत्त्यातील बत्ता हातोडी म्हणून वापरता येत असायचा.(कित्येकांना खल आणि बत्ता हे दोन शब्द आहेत हेच माहित नाही, ज्यांना माहित आहे त्यांना खल कुठला आणि बत्ता कुठला हेच ओळखत नाही..अगदी 'नटबोल्ट' सारखे) अर्थात याच्या दगडी रूपाबरोबरच लोखंडी,  पितळी असे वेगवेगळे अवतार साथीला असतातच. अगदी आयुर्वेदातील काही चाटणे,भस्मे घोटण्यासाठी तर संगमरवरी खलबत्तेही वापरतात.
       काळ बदलला , माणसे बदलली , घरे बदलली,  तशा घरातील वस्तूही बदलल्या . अगदी आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांसाठी खस्ता खात त्यांना मोठे केल्यानंतर जसे त्या मुलांच्या घरात म्हातारे आईवडिल अडगळीत पडतात, अगदी तशाच यावस्तूही आता एकतर अडगळीत पडलेल्या दिसतात नाहीतर घराबाहेर फेकलेल्या दिसतात. काळाची चक्रे उलटी फिरवता येत नाहीत हे निर्विवाद सत्य असले तरी कधीकाळी माणसाचे जीवन सुकर करणा-या या वस्तूंचा किमान परिचय तरी आपल्या भावी पिढीला करून दयायला काय हरकत आहे. 
             "राकट देशा, कणखर देशा ,
               दगडांच्या देशा.."
अशी ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्रात तरी हे व्हायलाच हवे नाही का ????

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com
      
   
   

5 comments:

  1. जुन्या आठवणी जाग्या झाल्या . आजीच्या ओव्या ऐकत आपणही जात्याची खुंटी फिरवत बसायला मज्जा यायची

    ReplyDelete
  2. Tumchya kde dagdachi bhandi miltat ka

    ReplyDelete