मेंदीच्या पानावर........
"मेंदीच्या पानावर...
मन अजून झुलते गं... "
अगदी लहानपणापासून रेडिओवर लता मंगेशकरांनी गायलेल्या या गीताने मन सतत प्रसन्न केले होते. हळूहळू विस्मरणात जाणा-या या आणि अनेक मराठी गीतांना पुन्हा उजाला देण्याचे काम 'मेंदीच्या पानावर... ' या सरगम कॅसेट च्या सिरीज व ऑर्केस्ट्राच्या रूपाने झाले अन् परत मराठी गीतांचे तेच गारूड मराठमोळ्या मनावर राज़्य करु लागले ,अगदी नववधूच्या हातावर सजलेल्या मेंदीलाही जणू काही संगीताचे सूर लाभले. मेंदी आणि नववधू हे ठरलेले सूत्र. हातावरची मेंदी जितकी रंगेल तेवढे प्रेम भावी पतीकडून मिळणार अशी अटकळ सहज बांधून तिच्या मैत्रिणी तिला लाजायला भाग पाडतात आणि तिही म्हणते...
"मेहंदीसे लिख गोरी हाथ पे मेरे
तू मेरे बलमा का नाम.... "
पण ही मेंदी नेमकी कोठून मिळते, ती कशी दिसते हे कोणाकोणाला माहित आहे ? आजकाल आपण पाहतो ती मेंदीच्या कोनांमध्ये भरलेली पेस्ट स्वरूपातली मेंदी मूळत: एका झुडपाच्या पानांची पेस्ट असते बरं का.. तसे पाहिले तर खेडेगावांमध्ये तशी काही अपरिचित वगैरे नाहीच ही मेंदी. ब-याच जणांच्या कुंपणासाठी लावलेली असणारच ही झाडे. त्याचीच हिरवी पाने वापरली जातात. लहानपणी मी मेंदी लावताना घरातल्या सगळ्यांना पाहिले ते औषध म्हणूनच. पावसाळ्यात शेतीची कामे सुरू झाली , की जवळजवळ दीड-दोन महिने सतत पाण्यात काम करावे लागत असल्याने हातापायांची कातडी कुजून हातापायाला कुह्ये (चिखल्या) व्हायच्या. दररोज सकाळी शेतावर जाताना आणि संध्याकाळी परत आल्यावर त्यांना तेल, हळद,करवंटीचे तेल असे काही ना काही लावले जायचे . अशातच कधीतरी संध्याकाळी मेंदीचा पाला आणला जायचा. गावात ओळखीमध्ये मेंदीचे झाड होते. त्यांच्याकडून हा पाला आणत असत. नंतर मेंदी तयार करण्याची तयारी केली जायची. विशेष काही तयारी नसायचीच. फक्त पाटयावर मेंदीची पाने वाटून घेणे, पळसाची सुकी पाने शोधून ठेवणे, बांधायला फडकी किंवा चिंध्या शोधून ठेवणे हीच ती कामे असायची. पण ती कोणी करायची यावरूनही 'मीच का? ' हा प्रश्न पुढे येऊन भांडणे-रागाराग व्हायची. पण हा कार्यक्रम सुद्धा एखादया ''सेलिब्रेशन 'सारखाच असल्याने घरातले वातावरण वेगळेच वाटायचे. त्या दिवशी रात्री लवकरच जेवणे उरकून अंथरून घालून सगळे तयार असायचे. अंथरण्या-पांघरण्यासाठी आज जुनी, फाटकी पांघरूणेच असायची कारण मेंदीच़्या रसाने त्यावर डाग पडले तरी (आणि ते पडणारच याची पक्की खात्री असल्याने) हरकत नसायची. मेंदी फक्त स्त्रियाच लावतात पण या उपक्रमात मात्र आम्हीही सहभागी व्हायचो. एकएक करत सगळ्यांचे हात बांधले जायचे. पहिल्यांदा डावा हात व नंतर उजवा हात असाच क्रम शक्यतो असायचा. मेंदी लावण्याची नव्हे थापण्याची कृती सरळसाधी होती. प्रथम तळहात सरळ ठेवून वाटलेल्या मेंदीच्या पानांचा लगदा त्यावर थापायचा, नंतर अंगठा मुडपून आत घ्यायचा व त्यावर बोटे घेऊन मुठ आवळायची, वर आलेल्या नखांवरही तो लगदा लावायचा. पळसाचे सुके पान घेऊन ते त्या मुठीवर खालून लावायचे. वरून दुसरे एक पान लावून त्याभोवती फडके आवळून बांधायचे. एकदम बॉक्सिंगसाठी तयार झाल्याप्रमाणे दिसायचे सगळे.तसेच पायांवरही बांधले जायचे, मात्र पायावर मेंदी बांधणा-यांमध्ये आम्ही नसायचो.ऱात्री झोप यायचीच नाही.आवळलेले हात, त्यात ओल्या मेंदीची मिचमिच, साधा मच्छर चावला तरी खाजवताही येत नसायचे त्यामुळे ती रात्र कधी संपते असे व्हायचे .त्यातच रात्री जर बाथरूमला जावे लागले तर जास्त पंचाईत व्हायची. अशातच कधीतरी झोप लागायची. सकाळी ऊठल्यावर बहुतेककरून आमच्या हाताच तेे बॉक्सिंग ग्लोव्हज सुटून अंथरूणावर पडलेले असायचे आणि लाल लाल नक्षी त्यावर पडलेली असायची. झोपेत तेच हात नाका-तोंडाला लावले असले तर तेथेही लाल ठिपके दिसायचे.हातावर तर सुरकुत्या पडलेल्या असायच्या. सकाळी कोणी लिंबाचा रस, कोणी साखरेचे पाणी लावून नंतर हात धुवायचे आणि मग एकमेकांसमोर हात पकडून "माझी मेंदी किती रंगली, तुझी किती रंगली... " याची तपासणी व्हायची. ना कसली नक्षी , ना कसले डिझाईन फक्त आणि फक्त लालेलाल हात बस्स! ज्याची जास्त काळपट तो जास्त खुष. कारण ती मेंदी जेवढे दिवस टिकेल तेवढे दिवस कुहयांपासून बर्यापैकी सुटका होत असे. पण हळूहळू हे बंद होत गेले. आतातर वेगवेगळ्या प्रकारची औषधे उपलब्ध होऊ लागली त्यामुळे तशी गरजच उरली नाही. पाने वाटून पेस्ट बनवून घेण्यासाठी श्रम करणार कोण. नंतर सुकी पावडर मिळू लागल्यावर आमच्यासारखे काडी पहलवान म्हणजे अगरबत्ती किंवा माचिसच्या काडीने मेंदीची नक्षी काढणारे कुडमुडे कलाकार तयार झाले, अर्थात यात व नंतर मेंदी कोनाने नक्षी काढणा-यांत विनायक गावंड आणि माझी भाची संगिता हे तत्कालीन एक्सपर्ट होते हे आठवणीने नमूद करावे लागेल. मेंदीचे मूळ स्थान आफ्रिका असल्याचे मानले जाते. लिथ्रेसी कुळातील असून शास्त्रीय नाव लॉसोनिया अल्बा/लॉसोनिया इनरविस आहे. हिंदी भाषेत मेहंदी, इंग्रजीत Henna(हीना), कानडीत कोरांत तर संस्कृतमध्ये मेंधिका, नखरंजक, यवनेष्टा इत्यादी नावांनी ओळखली जाते. पानांमध्ये लॉसोन(हेन्बोटॉनिक अँसिड) असल्यामुळेच मेंदी रंगते. शीतल स्वभावी गुणधर्मामुळे सर्दी असणा-याने केसांना लावू नये असे सांगतात, पण दाढदुखी, तोंडातील फोड, पायाच्या भेगा-दाह, कापले-खरचटले किंवा कृमीदंश या सर्वांसाठी पाने अतिशय उपयुक्त ठरतात. फुलांपासून हीना नावाचे अत्तर काढतात, अर्थात याचा वास आवडणारे तसे कमीच लोक असतात(कुणाला आवडत असेल तर माफ करा, तुम्ही Limited Edition आहात). सध्या मात्र कोनातील मेंदी वापरून सुंदर अत्युकृष्ट नक्षी काढणा-यांची चांगलीच चलती आहे. मग त्यात आर्टिस्टीक ब्रायडल, सिल्व्हर, गोल्डन ब्लॅक असे नानाविध प्रकार उदयास आले आहेत. पण मुळचे राजस्थानी व मथुरेतील मेंदी कलाकार मात्र मागे पडू लागले आहेत. चालायचेच चमचम करणा-यांचीच दुनिया आहे. तेथे काळाप्रमाणे बदलले नाही तर मात्र कोणाचाच निभाव लागणार नाही.एकंदरीतच रुप बदललेली मेंदी आजही सगळयांचे जीवन रंगीत करतच आहे. त्यात केमिकल्सची भेसळ झाली तरी मूळचा लाल रंग काही कोणी बदलू शकणार नाही.
सर्व रूपगर्विता सतत
"फुलविते मेंदी माझा रंग गोरापान ....
.हेच म्हणत राहणार यात तिळमात्र शंकाच नाही .
प्रविण म्हात्रे
पिरकोन-उरण , रायगड
mob 8097876540
पिरकोन-उरण , रायगड
mob 8097876540


आमच्या घरी झाड होते मेंदीचे पण 1995 ला घर बांधताना आजोबांनी काढून टाकले. अर्थात त्याच्या फांद्या आम्ही इतर अनेक ठिकाणी लावल्या. त्यातली अजून काही जिवंत आहेत. मेंदीचे कोण जोपर्यंत सर्वमान्य झाले नव्हते तोपर्यंत आम्ही त्या झाडांचा वापर करायचो पण आताशा फक्त एक काटेरी झुडूप म्हणूनच शिल्लक आहे
ReplyDeleteसध्या सगळीकडेच ही परिस्थिती आहे. तरीही कधी तरी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तरी उपयोग करून आपल्या घरातील लहान मुलांना दाखवायचा प्रयत्न जरूर करा👍🙏
ReplyDelete