Thursday, April 25, 2019


माझ्या बकुळ फुला.... 


                        लहानपणी "या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या..." म्हणत ताल धरणे असो किंवा तरुणपणी "तुझी पाऊले बकुळ फुले , गुज एक सांगती, सुकल्यावरही सुगंध देती , अशीच मजला हवीय प्रिती.. " असे मागणे मागत आसो वा " त्या सगळ्या बकुळ फुलांची शपथ तुलाआहे..." अशी शपथ घालणे असो! बकुळ फुले सतत सुगंधासह सा-यांच्याच मनात कायम 'वास' करत असतात. कोकणात ओवळी किंवा ओवल/ओमवल म्हणून ओळखली जाणा-या बकुळीला इंग्रजीत मात्र Spanish cherry म्हणतात. हिंदीत मालसौरी, आसामीमध्ये गोकुळ हे नाव आहे. शास्त्रीय नाव Mimusops elengi, कुल Sapotaceae हे मोहाच्या कुटुंबातील मानले जाते. फळांना ववळे किंवा ओवळां म्हणतात व ती खातातही मात्र पूर्ण पिकलेले असेल तरच खावे, अर्धवट पिकलेले फळ घशाला लागते आणि कच्चे असेल तर आंवढाच बसतो. अर्थात अतिसारावर मात्र ही फळे उत्तम मानली जातात. फळांची,फुलांची वाळवून भुकटी करून ती जखमेवर लावली तर जखम लवकर भरून येण्यास मदत होते. झाडाची साल हिरडया मजबूत बनण्यास उपयुक्त ठरते.

 पण मला अतिशय आवडतात ती बकुळीची फुले. शेजारी गजूआत्याच्या घरामागे एक बकुळीचे झाड आहे आणि गजूआत्याची नात भारती. बकुळीच्या झाडावर तिचे खूप प्रेम होते आणि विशेष म्हणजे ते झाडही त्या प्रेमाची कदर करत असावे, कारण बारा-तेरा वर्षांपूर्वी ते झाड पावसाळ्यात कोसळले आता बकुळीची फुले संपली असेच वाटले होते पण अक्षरशः जमिनीवर आडवे पडलेले असूनही ते झाड कमी प्रमाणात का होईना फुले देत होते.आज त्याचीच दुसरी फांदी वाढून मोठा वृक्ष झाला आहे व फुलेही देत आहे. (दोन वर्षापूर्वी जेव्हा ते झाड तोडायला निघाले तेव्हा रडलीही,आज तिचे वय चाळिशीच्या आसपास आहे हे लक्षात घ्या)                               
                               "काका, ववलीवर फुलां आलीन , 
                                 पाच-सहा तुला ठेवलीन हं.......... "
                    हा भारतीने दिलेला निरोप मला आताच्या
Your account no. ********621
 is credited with ******* rupees 
या मेसेजपेक्षाही अधिक जास्त आनंद देणारा आणि श्रीमंत झाल्याचा फील आणायचा.
माझा खजिना ☺
माझ्या पैशाच्या पाकिटात पैसे तसे अभावानेच असत, पण बकुळीची सुकलेली फुले हमखास असत. त्यामुळेच माझे पाकिट वजनदार असे.म्हणूनच तर कोलकातातील भारतातील जुने व मोठे म्युझियम बघायला गेल्यावर वीसेक मिनिटांत बाहेर पडून त्याभोवती असलेल्या बकुळीच्या फुलांकडे धाव घेतली होती.
संगमेश्वर (रत्नागिरी) मंदिरातील छ्तावरील नक्षी 
संगमेश्वरच्या मंदिरात छतावर कोरलेली बकुळीच्या फुलांची नक्षी बघून खूप खुश झालो होतो. शेवटी बकुळीचं गारुडच काही वेगळे आहे हेच खरे!


प्रविण म्हात्रे  , पिरकोन ,उरण
रायगड     mob - ८०९७८७६५४०

No comments:

Post a Comment