Thursday, June 27, 2019




जफाल (मोगली एरंड) 

"एरंडाच्या बिया खाल्ल्याने चार जणांना विषबाधा " अशा प्रकारच्या बातम्या बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात आलेल्या आपण वाचलेल्या असतीलच. पण खरंतर ज्या झाडाच्या बिया खाऊन ही विषबाधा झालेलीअसते त्या एरंडाच्या बिया नसतातच, तर त्या असतात 'मोगली एरंड' या वनस्पतीच्या बिया. जेव्हा जेव्हा आपण अशा बातम्या वाचतो, तेव्हा आपल्या मनात हेच विचार नक्कीच येणार, की ही एक विषारी वनस्पती असावी. वास्तविक हे खरे नाही कारण या वनस्पतीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये केला जातो. हे एक उत्तम रेचक म्हणजेच पोट (कोठ) साफ करणारे औषध आहे , अगदी जमालगोटाच की. मोगली एरंड म्हणजे कोणते झाड असा प्रश्न कदाचित आपल्या उरण भागातील वाचकांना पडला असेल, तर त्यांच्या माहितीकरीता सांगतो की, मोगली एरंड म्हणजे आपण ज़्याला जफाल या नावाने ओळखतो ते झाड. जफाल हे नाव जँट्रोफाचाच अपभ्रंश आहे असे वाटते. . आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की मग याला मोगली एरंड हे नाव कसे पडले असावे ?... तर त्याचे असे आहे....पुर्वी मोगल सैनिक आपल्या मशाली जास्त वेळ पेटत राहण्यासाठी याच्या बियांचा (ज्या खाऊन विषबाधा होऊन उलटी-जुलाब होतात त्याच बरंक्का !!!) वापर करत असत. मोगल सैनिक वापरायचे म्हणून मोगली .आहे ना गंमत !
मोगली एरंडाचे मूळ स्थान मध्य अमेरिका आहे. शास्त्रीय नाव जँट्रोफा कँराकस(jatropha curcas) असे असून त_ ग्रीक शब्द Jatros ( Doctor) व trophe (food) म्हणजेच डॉक्टरांचे खादय अशा अर्थाने धरले तर याचे औषधी महत्त्व लक्षात येईल.हे झाड बंगालमध्ये बगभेरेंडा या नावाने ओळखतात ,तर हिंदीत बगरेण्डी, जंगली अरंडी, रतनजोत म्हणतात. यामधील रतनजोत हे नाव बियांच्या वापरावरूनच पडले असावे. आयुर्वेदात द्रवन्ति आणि मूषिकापर्षी म्हणून उल्लेख असलेली हीच वनस्पती आहे.
आजकालच्या मुलांना सगळी खेळणी रेडिमेड मिळतात. त्यातही चीनच्या व्यापारीवृत्तीमुळे तर चायनिज वस्तू- खेळणी कमी किंमतीत व आकर्षक रुपात मिळत असल्याने ती पालकांकडून सहज उपलब्ध होतात. आम्ही मात्र आमची खेळणी ब-याच वेळेस ,बऱ्याच वेळेस कसली नेहमीच आम्ही स्वत:च तयार करून त्यांच्याशी खेळत असायचो. त्या आमच्या खेळात जफालीचा चिक(रस) काढून त्याचे फुगे उडवणे हा ही एक खेळ होता. एक बऱ्यापैकी मोठी शिंपली तिही खुबे खाऊन उकिरडयावर फेकून दिलेली असायची. ती घ्यायची आणि जफालीच्या पानांची एकएक काडी वाकवून अर्धी मोडून निघणारा चिक त्या शिंपलीमध्ये जमवत जायचे. शिंपली अर्धी अधिक भरेपर्यंत हे करायचे .कधी कमी चिक निघाला किंवा काढायचा कंटाळा आला तर त्यात थोडे पाणी मिसळून घ़्यायचो.मग आमचा मोर्चा वळायचा घरातील खाटेकडे. त्याकाळी जवळजवळ प्रत्येक घरी काथ्याच्या दोरीने विणलेली खाट असायची. त्या खाटेच्या दोरीचा एक लांबट धागा काढून त्याचा एक गोल लूप (फास) बनवायचा. झाले आमचे खेळणे तयार .मग काय मस्त मजेत फुगे-बुडबुडे उडवत फिरायचे. छानपैकी दोन तीन तास सहज निघून जायचे. स्वत:च निर्मिती करून खेळण्याची गंमत आजकाल जत्रेत मिळणाऱ्या केमिकलच्या पाण्याचे फुगे उडवणारे कसे समजणार....
तर अशी ही जफाल कुंपणावरचे झाड म्हणून सर्वांनाच परिचित आहेच. याची फळे आकाराने गोलाकार लहान लिंबाएवढी असतात. फळ कच्चे असताना खेळायला उपयोगी पडायचे. मग कधी चेंडू म्हणून नाहीतर कधी गोटया म्हणून वापरले जायचे. फळ सुकले की आतमध्ये असणाऱ्या बिया पुर्वी खेडयात आग लवकर पेटण्यासाठी वापरत. मोगली सैनिक तर त्याने मशाली चेतवायचे हा उल्लेख वर आला आहेच. प्रमाणात खाल्ल्या तर पोट साफ होते म्हणजे औषध पण प्रमाण जास्त झाले तर मात्र उलटी-जुलाबाने हैराण झालात म्हणून समजा. त्या चवीला छान शेंगदाण्यासारख्या लागतात असे खाणारे सांगतात, मी खाल्ल्या नाहीत पण याबाबतीत आमच्या मित्रमंडळीचा अऩुभव काय वर्णावा, त्यावर एक स्वतंत्र लेख होईल


प्रविण म्हात्रे
पिरकोन, उरण (रायगड)
8097876540

2 comments:

  1. भारी, आधीच्या माहीतीत नवी भर पडली!

    ReplyDelete
  2. आधी कोणती होती माहिती �������� उलट तुम्ही साबण बनवल्याचे चेतनने यांगून माझ्या माहितीत भर टाकली��������

    ReplyDelete