Wednesday, May 12, 2021

बोर्डाचीच परीक्षा


 कठीण प्रश्न, उत्तर किती कठीण ???


               तो अमिर खानचा *थ्री इडियट्स* सिनेमा आठवतो का ?  अर्थात कोण त्या सिनेमाला विसरला असेल म्हणा !  देशातील एकंदरीत शिक्षणपद्धतीवर बरेच सणसणीत आसूड ओढणारा असाच होता तो सिनेमा. आता तुम्ही म्हणाल यावेळी त्याची आठवण काढण्याचे कारण काय ? त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण त्यातील त्या वीरू सहस्रबुद्धे चे ते पेन तुम्हाला आठवत असेलच. त्यांच्या इंजिनियरींग काॅलेजमधून शिकलेल्या कित्येक तथाकथित हुशार  विद्यार्थी तेच पेन बक्षीस म्हणून मिळवायची स्वप्ने पहात होती.विशेष असेच होते ते पेन कारण अनेक वर्षांच्या संशोधनातून खास अंतराळवीरांना(Astronauts) वातावरण विरहित आणि गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत लिहता येण्यासाठी बनविलेले होते. हीच त्या पेनची खासियत जेव्हा वीरू सहस्रबुद्धे सांगत असतो त्यावेळी रँचो एक साधा सोपा प्रश्न विचारून वीरू सहस्रबुद्धेला निरुत्तर करतो,  आणि तो प्रश्न होता... "सर,अंतराळात लिहण्यासाठी पेन शोधण्यासाठी एवढा प्रचंड खटाटोप अन् संशोधन करण्यापेक्षा त्यांनी पेन्सिलचा वापर का नाही केला ? " 

        विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की नाही ! एखाद्या प्रश्नाचे उत्तर सोप्या पद्धतीने मिळत असेल तर ते सहज सोपे मिळते म्हणून निरुपयोगी, अर्थहीन समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि वेगळे आणि कठिण उत्तर शोधण्यासाठी काथ्याकूट करत बसायचे. हा कुठला शहाणपणा. नाही म्हणायला larger than life , beyond the limits विचार करणारे असा साधा विचार करतच नाहीत म्हणा.  सुमारे दोनशेच्या आसपास शोध लावणा-या न्युटनने नाही का मांजर आणि तिच्या पिलांना येण्याजाण्यासाठी एक मोठे आणि एक छोटे भोक दरवाजाला पाडले होते. 

        एवढे घडाभर तेल नमनालाच वापरल्यावर एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि तुमच्याही तोंडून थ्री इडियट्स मधील प्राध्यापकांच्यासारखा गोंधळलेला प्रश्न बाहेर पडला असेल की,  "अरे, भाई आखिर कहना क्या चाहते हो..?" सांगतो, सांगतो....  विषय आहे दहावीच्या परीक्षेचा,निकालाचा आणि 'पुढे क्काय्य?? ' या सग्ळयांसमोर उभ्या ठाकलेल्या जागतिक(?) समस्येचा. आधी आॅनलाईन, मग थोडा विरोध झाल्यानंतर आॅफलाईन,  नंतर आॅफलाईनच पण शाळेतच परीक्षा केंद्र ठेवून अशा विविध पर्यायांची चाचपणी करता करता   CBSE बोर्डाने दहावीची परीक्षाच रद्द केल्याने हो-नाही करत अखेर SSC बोर्डाची दहावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. एक प्रश्न सोडवला असे वाटत असतानाच पुढचे काही प्रश्न उपस्थित झाले.  त्यातही सर्वात मोठी अडचण CBSE बोर्डाच्या जेमतेम 9 ते 10% शाळांमध्ये 11 वी 12वीचे वर्ग जोडलेले नसतील. बाकि सर्व शाळांमध्ये ते वर्ग असल्याने त्यांना आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यात अडचणी वाटली नसावी बहूतेक, पण SSC बोर्डाच्या शाळांमध्ये परिस्थिती नेमकी त्याच्या उलट आहे.  इथे दहावीपर्यंतच्याच शाळा बहुसंख्येने असल्यामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया ही गंभीर समस्या पुढे आली. उपाय म्हणून शाळांनी केलेल्या अंतर्गत  मुल्यमापनवर प्रवेश देता येतील किंवा नाही याबाबत शाळांची मते मागविण्यात आली. याबाबतीतही उत्तर नकारात्मकच आले. 70% शाळा बोर्डाची परीक्षा होणारच या विश्वासावर विसंबून राहिल्याने अंतर्गत मुल्यमापन केलेच नाही.ब-याचशा शाळा तर वर्षभर निष्क्रिय राहिल्याचेच समोर आले. ज्यांनी केले त्यांनीही आॅनलाईन मुल्यमापनाबाबत अविश्वासच दर्शविला. थोडीशी वाट मोकळी करण्याचा प्रयत्न म्हणून अकरावीला 200 गुणांची प्रवेश परीक्षा घेण्याचा विचारही केला. कोरोनाने सर्व वातावरण एवढे अनिश्चित करून ठेवले आहे की, कोणता निर्णय घेतला तरी त्यावर सहमती कमी आणि असहमतीच जास्त प्रकट होते.  करावे तरी काय असा प्रश्न सध्या बोर्ड आणि शासनाला पडला आहे. अगदी त्या गाढव विकायला घेऊन जायला निघालेल्या गंगारामसारखी त्यांची अवस्था झाली आहे.काहीही करा लोकं बोल लावतातच. 

       सर्व जाणकार,  अभ्यासू आणि अनुभवी लोक सोबत असूनही एवढी वर्षे दहावीच्या परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने विनासायास पार पाडणारे बोर्ड आणि शासन सध्या तरी प्रचंड गोंधळलेले आहेत. आता वेळ आली आहे ती घाईघाईने निर्णय जाहीर करण्याची नव्हे तर शांतपणे विचार करण्याची . सर्व पालकांना विश्वासात घेऊन, थोडा धीर धरायची विनंती करून एक दीर्घ मुदतीची उपाययोजना तयार करण्याची ही वेळ आहे. तोपर्यंत या कठिण समस्येवर थोडा काळ सगळयांना धीर धरायला लावणारा एकच निर्णय आहे तो म्हणजे जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली तर अकरावी प्रवेशप्रक्रिया एका छोटयाशा परंतु सर्वसमावेशक अशा पायाभूत( Baseline) चाचणीने (सर्वांना भारदस्त वाटावे म्हणून लागल्यास तिलाCET म्हणा हवे तर पण स्वरूप विद्यार्थ्याला विदयाशाखा निवडण्यासाठी सोईचे पडेल असेच हवे ) पार पाडली जाईल असे स्पष्टपणे सांगून टाकावे.  परिस्थितीत अशीच अनिश्चितता राहिली तरीही हीच प्रक्रिया परीक्षेचे विकेंद्रीकरण करून मर्यादित विदयार्थीसंख्येसह योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडण्याची. यावेळी शाळानिहाय तुकड्यांचे गणित जुळवणे फार महत्त्वाचे ठरेल.  निकषांमध्ये थोडीफार ढिलाई  दयावी लागेल.  पण जर प्रक्रिया मार्गी लावायची असेल तर सगळयात सोपा मार्ग हाच आहे अर्धा मे आणि अर्धा जून मिळून एक महिना पूर्वतयारीसाठी हाती आहे. मला तरी मांजरीसाठी मोठे आणि पिलांसाठी छोटे अशी दोन दोन भोके दरवाजाला पाडण्यापेक्षा एकच मोठे भोक पाडावे असेच वाटते..... बाकी आमची ' सरडयाची धाव कुंपणापर्यंतच..'  आमचे विचार एवढयावरच सिमित आहेत. खोलात जाणा-यांनी अजून समुद्रमंथन करावे. भले मग अमृत निघो वा हलाहल.... ते आपण काळावर सोपवू या 


प्रविण म्हात्रे

पिरकोन,उरण,रायगड

   

Tuesday, May 4, 2021

 शिक्षणाचा (नविन?) अल्गोरिदम 



शेवटी एकदा तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ , सक्तीच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळांची घंटा 27 जानेवारीला वाजली. कोविड-19 बद्दल अतिपरिचयात अवज्ञा अशी काहीशी अवस्था सध्या सर्वांचीच झाली होती. लाॅकडाऊन ते काऊंटडाऊन बिगेन असा परतीचा प्रवास सुरु झाला होता. नाकावरचा मास्क सरकत सरकत आधी तोंडावर अन् नंतर गळयावर येऊन स्थिरावायला लागला होता. एक एक करत वेगवेगळ्या क्षेत्रात हळूहळू चलनवलन वाढू लागले. महसूलाच्या नावाने प्रथम प्राधान्य मदिरालयांना मिळाले.  त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मग सर्वजण आपापल्या परीने सुरूवात करू लागले होते. पण या सर्व पसा-यात मदयालयांना रान खुले झाले असले तरी विदयालयांना मात्र टाळेच लागलेले होते. नाही म्हणायला आॅनलाईन शिक्षणाचे थोडेफार प्रयत्न केले जात होते.परंतु फार थोडे विद्यार्थी या प्रवाहात सामील झाले होते आणि थोडा समावेश असलेले विदयार्थीच फार होते. त्यातच 4जीचे एक पाऊल टाकून 5जीचे वामनाचे पुढचे पाऊल टाकून समस्त भारत पादाक्रांत करण्याचे मनसुबे रचणारे ख-या भारतात अर्थातच ग्रामीण भागात 4जी सोडाच 2जीची रेंजही पोहचवू शकलेले नाहीत. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणाची लाईन शहरांपुरतीच मर्यादित राहिली होती. आपण कितीही ICT च्या आणि आॅनलाईन शिक्षणाच्या गमजा मारल्या तरी सर्वसमावेशक अशा आॅफलाईन शिक्षणाला पर्याय नाही हे सत्य वारंवार अधोरेखित होत होते. आता हे शैक्षणिक वर्ष संपायला दोन महिने असताना शाळांच्या दरवाजावरचे कुलूप निघाले. काहीशा साशंकतेनेच पण एका वेगळयाच समाधानात विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत पाऊल टाकले.ते टाकलेले पाऊल स्थिरावायच्या आधीच कोरोनाने पुन्हा उसळी मारली. बंद व्हायची पहिली पाळी होती अर्थातच शाळांचीच . जेमतेच चारदोन धडे बालकांनी गिरवले असतील नसतील,पुन्हा ते कुलूप दरवाजा अडवून बसले. 

      एक एक करत सर्व वर्गांच्या परीक्षा रद्द होत गेल्या.आॅनलाईन की आॅफलाईन या साठमारीत दहावीच्याही परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाली आणि अगदी दुसऱ्या दिवसापासूनच सगळयांना चिंता पडली आता अकरावीचे काय???  प्रवेशप्रक्रिया कशी राबवणार. दहावीची परीक्षा न घेता मुलांना अकरावीत घालायचे म्हणजे काय?  कसं होणार बालकांचं!!!   म्हणजे वर्षभर ते मूल जे काही शिकले,  जो अभ्यास- जी मेहनत केली ती कुचकामीच ठरली. कारण काय , तर फक्त त्याने परीक्षा नाही दिली हेच. म्हणजे जर परीक्षा आॅनलाईन झाल्या असत्या तर घरच्यांच्या मदतीने परीक्षेत गुण मिळविले असते किंवा आॅफलाईन झाल्या असत्या आणि प्रत्येक शाळेतच परीक्षाकेंद्र असते(तसे ते ठेवायचे प्रयत्न सुरु होतेच) व वर्षभरात अध्ययन- अध्यापनातील उणीवा पाहता थोडे सैलवातावरण अन् सढळ गुणदान होऊन टक्केवारी राखली असती तर मात्र त्यांचे 'खरे' शिक्षण झाले असते. शेवटी आपण परीक्षार्थीच ना!  की 'परीक्षाजीवी' (?) 

    असो, पण हां हां म्हणता हे शैक्षणिक वर्ष गंगार्पण झाले. जसे आले तसे गेलेही. प्रश्न राहिला तो शिक्षकांचे, शाळेचे तोंडही न पाहता पहिलीचे विदयार्थी दुसरीत गेले. तसेच दुसरीतले तिसरीत.....नववीतले दहावीत गेले. आता पुढचे  वर्ष कधी- कसे सुरू होणार ....अगदी होणार की नाही हे आजच्या घडीला तरी स्पष्ट होत नाही कारण, सप्टेंबरपर्यंत पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची भविष्यवाणी कुण्या कुडमुडया ज्योतिषाने नव्हे तर नामवंत डाॅक्टरांनीच वर्तवली आहे. मग कसे करणार अध्यापन ? कसे होणार अध्ययन आणि कोणत्या निकषावर करणार मूल्यमापन ?  हे प्रश्न आव्हान बनून समोर उभे ठाकले असताना पारंपरिक पद्धतीने विचार करणे परवडणारे नाही. वर्षभराच्या अंतरानंतर लिखाणातील हाताचे वळण, स्थिरता, अवधान टिकवण्याची क्षमता . एकात्मिकता हया सगळयालाच गंज चढला असेल. मग सुरवात कुठून अन् कशी करायची हा यक्षप्रश्न असेल.  तेव्हा आपल्याकडे असलेली उत्तरे त्या यक्षाचे समाधान करण्यात असमर्थ ठरतील. 

    आता गरज आहे ती शिक्षणाची मूळ चौकट मुळापासून बदलण्याची. तिची नुसती पुनर्रचनाच करून भागणार नाही, तर तिची संपूर्ण बैठकच नव्याने रचावी लागेल. जुने ते सोने हे खरे असले तरी भूक लागल्यावर सोने खाता येत नाही.तिथे भाकरीचा तुकडाच दयावा लागतो.तसेच आधीचे अभ्यासक्रम,पाठयक्रम ,अध्यापन पद्धती कितीही उपयुक्त असल्या तरी वेगळी चाकोरी निवडावी लागेल. संगणकाप्रमाणे शिक्षणाचाही अल्गोरिदम नव्याने तयार करावा लागेल. वाटते तेवढे सोपे नाही हे. पण वेगळा विचार केला तर तेवढे कठीणही नाही. गरज आहे ती प्रयत्नात एकसूत्री, एकमुखी सातत्याची.  धरसोड उपक्रम राबविले तर "तेलही गेले तूपही गेले,हाती धुपाटणे आले " हे निश्चितपणे अनुभवायला मिळणार . मग काय करू शकतो आपण? पहिल्यांदा गरज आहे ती आपल्यातला 'मेकाॅले' हद्दपार करण्याची. आजपर्यंत कितीतरी प्रयत्न झाले .पण हा मेकाॅले आपले अस्तित्व प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे टिकवून आहे. अभ्यासक्रमातील शब्दांचा कीस काढून तयार केलेली उद्दिष्टे साधी सरळ भाषेत निश्चित करावी लागतील. पहिली-दुसरी,  तिसरी ते पाचवी,  सहावी ते आठवी आणि नववी ते थेट बारावी या टप्प्यांमधील अभ्यासक्रमातील एकजिनसी भाग एकत्र करावा लागेल. त्यासाठी पुनर्रचनेची आवश्यकता नाही आणि तेवढा वेळ सुद्धा नाही. फक्त थोडी उलटी गंगा वहावी लागेल.म्हणजे आजपर्यंत तज्ज्ञ अभ्यासक्रम तयार करत आणि तो शाळा, शिक्षकांपर्यंत पोहोचवला जात असे. पण सद्यपरिस्थितीत ग्रासरूट वरून मांडणी करून घेऊन तिचे सार्वत्रिकीकरण केले तर कमी वेळेत ते शक्य होऊ शकेल.  ज्याच्या समस्या त्याचे उपाय हा मार्ग सोईस्कर ठरेल.  अन्यथा राज्याच्या कुठल्यातरी कोप-यात कोणीतरी एखादा प्रयोग यशस्वी केलेला असेल आणि तोच राज्यभर राबवायचा अट्टाहास केला तर स्थानिक समस्या सुटण्याऐवजी अपरिचित अनुभवातून वेगळयाच समस्या तयार होतील आणि बुडत्याचा पाय अधिकच खोलात जाईल.  एकाच फूटपट्टीने सगळयांना मोजण्याऐवजी प्रत्येकाच्या हाती असलेल्या मापाने मोजूदया परिस्थिती नियंत्रणात आली की सार्वजनिक मंथनातून निर्माण झालेले नवनीत सगळयांच्याच पदरात टाकता येईल. बघूया थोडी 'टेढी उँगली' करून मला तर वाटते 'घी जरूर निकलेगा और बर्तन भी सलामत रहेगा'... बाकी विचार करायला तज्ज्ञ(?)  आहेतच की त्यांच्या ज्ञानापुढे आपले विचार(की अविचार) बापुडेच ठरतील....चला उत्तर काळच देईल. तोपर्यंत "घरी रहा,  सुरक्षित रहा!!!!! 


प्रविण म्हात्रे

पिरकोन, उरण, रायगड