Tuesday, May 26, 2020

बिब्बा


बिब्बा
'चिडका बिब्बा' ब-याच वेळा एखादयाचे चिडखोर,भांडखोरपणाचे वर्णन करताना हा शब्दप्रयोग आपण केलेला असेल किंवा दुसऱ्याला तरी बोलताना ऐकलेला असेल."बिब्बा घालणे" हा वाक्प्रचारसुद्धा ऐकला असेल आपण. हा बिब्बा असतोही तसाच चिडका!  कारण याच्या बीमध्ये असणारे तेल खूपच तीव्र दाहक असते. काजूसारखे दिसणारे आणि काजूसारखीच बाहेरच्या बाजूला बी असणा-या बिब्ब्याच्या बी मधील तेल काजूच्या बी मधील तेलापेक्षा जास्त तीव्र असते. एकवेळ काजू परवडला पण बिब्बा..बापरे बाप!!!  औषधी गुणधर्म असलेल्या याचा वापर फार जपून करावा लागतोच, परंतु जर एखाद्यावर जर बिब्बा ऊतत(त्वचेवर साईड इफेक्ट होऊन फोड येणे, जखम होणे) असेल तर स्वतः वापरायचे सोडूनच दया घरातील दुसऱ्या कुणी जरी लावला आणि तो लावताना एखाद्या टोकदार तारेत घुसवून(शक्यतो गोधडीची सुई वापरतात)  तापवावा लागतो.नंतर त्यातून फक्त थेंबभर निघणारे तेल  काढताना हवेत त्याची जी थोडीफार वाफ मिसळते त्या वाफेनेही त्रास, अ‍ॅलर्जी होऊ शकते. काहीजणांना तर बिब्ब्याच्या झाडाखालून गेले तरी  हातपाय,तोंड सुजण्याचा त्रास होतो.याचे तेल लाकूड टिकावे व त्याला भुंगा,वाळवी लागू नये यासाठी लावतात.पण लावताना जपून लावावे लागते. नाहीतर हात,तोंड,डोळे,घसा सुजलाच म्हणून समजा. मी आठवी नववीत असताना सारडेगावाच्या डोंगरात दात्यावर असलेल्या झाडावर बिब्ब्याची बोंडे खाण्यासाठी काढायला चढलो होतो. एक दोन मिळाली पण हातपाय लालभडक झाले होते व चेहरा जड झाला होता. घरी हे समजू दिले नाही, नाहीतर अजून घरचा प्रसाद मिळाला असता.
         बिब्बा,भिलावा,भल्लातक अशी अनेक नावे आहेत.  इंग्रजीमध्ये तर मार्किंग नट(marking nut) म्हणतात.  'अॅनाकार्डिएसी' कुळातला बिब्बा ' सेमेसरपस अॅनाकार्डियम(semecurpus anacardium) या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. जहाल,जहरी असला तरी औषधी गुणही तेवढेच आहेत. पोटाच्या विकारासाठी तेलाचा एक थेंब दुधात टाकून ते तोंडात दात,ओठ,जीभ यांना स्पर्श न करता सरळ घशात ओतून पितात. त्याचबरोबर काही काळ मीठ खाणे थांबावे लागते. ग्रामीण भागात घरोघरी तसेच आजीच्या बटव्यात बिब्बा हमखास असतो. पायात मोडलेला काटा काढल्यानंतर त्यावर बिब्ब्याच्या तेलाचा चटका देऊन राखेने दाबून धरताना अनेकांनी आपल्या घरातील आजी किंवा आईला पाहिले असेलच.  वेदनाशामक म्हणून आयोडेक्स सगळयांना माहित आहेच, या आयोडेक्समध्येही बिब्बा वापरलेला असतो. संजीवनी वटी, भल्लातकहरितकी,भल्लातकासव यासारख्या आयुर्वेदिक औषधे यापासून तयार केली जातात. जपून ,पूर्ण माहिती घेऊन वापर केला तर खूप औषधी गुण असलेला बिब्बा अनाठायी वापरला तर मात्र घातक ठरू शकतो. याने झालेली जखम लवकर बरी होत नाही. त्यामुळे काळजी घ्यावी. मी शिकलेला/ली आहे मला सर्व येते हा वृथाभिमान सोडून वय आणि अनुभवाने समृद्ध असलेल्या गावातील आजी आजोबांकडून माहिती घ्या. यासारख्या अनेक आसपास असलेल्या संजीवनी बुटींचा खजिना ते तुम्हाला दाखवून देतील.
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540

Monday, May 25, 2020

शाळा सुरू करताना



        शाळा सुरू करताना....
         लाॅकडाऊन 4.0 संपायला आला आहे. कोरोनाचा कहर सुरूच आहे. पण बंद पडलेले जनजीवन हळूहळू सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचवेळी मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सुरू होणार का ?  केव्हा होणार ?? आणि कशा सुरू होणार हे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले. शिक्षण आॅनलाईन की आॅफलाईन यावर चर्चा झडू लागल्या. आॅनलाईनचे फायदे-तोटे जो तो आपापल्या परिने मांडत आहे. ब-याचवेळेस फायदे मांडताना शाळा फक्त शहर वा शहरालगत आहेत असे मानून मांडणी केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि शिक्षण यांचा विचार करायला कोणालाही वेळउसंत नाही. अभ्यासाची एक लिंक पाठवली की विदयार्थी अभ्यास करतील,पालकाजवळ मोबाईल आहे म्हणजे तो आपल्या पाल्याला तो वापरू देईल,स्वत: त्याला शिकविल अशी अनेक मते गृहित धरली जात आहेत.
     आधी सप्टेंबरला, नंतर जुलैच्या उत्तरार्धात , मग 1 जुलै असे करत करत आता शासनस्तरावर 15 जून पासून शाळा सुरू करण्यासाठी हालचाल चालू झाली आहे. सध्या तरी रेडझोन वगळता ग्रीनझोनमध्ये शाळा सुरू करणे प्रस्तावित आहे. पण रेड झोन मधील शाळांचे काय???  या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळण्यापुर्वीच काही शिक्षणतज्ञ(?) वेगवेगळे उपाय सुचवायला लागले आहेत. विशेष म्हणजे यातील कोणाचेही विचार ग्रामीण भागातील शिक्षण,शाळा आणि शिक्षक यांच्या समस्या विचारात घेऊन मांडणी केली आहे असे आजघडीला तरी दुर्दैवाने घडत नाही.
       खरे पाहता काळाची गरज आहे ती सरकारी शाळा व त्यात दिले जाणारे शिक्षण सक्षम होण्यासाठी प्रयत्न करण्याची. गावातील हजारो कुटुंबे पुर्वी जी मुलांच्या शिक्षणासाठी शहराकडे धाव घेत होती,त्यातील शेकडो कुटुंबे आज कोरोनाच्या भितीने गाव जवळ करताना दिसत आहेत. त्यातील बहुतांश हातावर पोट असणारे लगेचच शहराकडे येतील असे वाटत नाही.आलेच तरी एकेकटे येतील ,सहकुटुंब येतीलच अशी परिस्थिती नक्कीच नाही. परिणामी गावाकडील शाळांना बुस्टर डोस मिळाला तर येथील रोडावणारा पट वाढेलच .पण जर चांगल्या सुविधांसह ( कारण अजूनही पालक काय भुललासी वरलीया रंगा रे.... या मानसिकतेचेच आहेत.) उत्तम शिक्षण मिळण्याची शक्‍यता वाटली तर तो पट टिकेलही आणि पालकांच्या खिशाला कमीतकमी कात्री लागून तो शिकेलही.
       ज्ञानरचनावाद शाळांमध्ये रुजू लागलेला आहेच. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत अशात शिकवणे दुय्यम व शिकणे प्रथम होताना दिसत असूनही काही विचारवंत उशीरा शाळा सुरू झाल्याने मुलांचे खुपच शैक्षणिक नुकसान होणार असे म्हणत आहेत. वास्तविक पाहता मागील सत्रातील 'अध्ययन- अध्यापन' ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. फक्त मुल्यमापन बाकी राहिले होते.परंतु मुल्यमापनालाच शिक्षण समजण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असे ते मानत आहेत आणि त्याच मानसिकतेतून शाळा सुरू होण्यास थोडाफार विलंब झाल्यास फार मोठे नुकसान होईल असे भासवले जात आहे. (हेच लोक एखाद्या शिक्षकास अध्यापन सुरु करण्यास पाच मिनिटे उशीर झाला तर 5 गुणिले वर्गातील विद्यार्थी संख्या एवढी मिनिटे शैक्षणिक नुकसान झाले असे मानत होते) .  गेल्या तीन चार वर्षात 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वीतेचा' थोडा विचार केला तर हा अतिरेक आहे हे कोणीही मान्य करेल.
       उशीरा शाळा सुरू झाल्याने होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा वेळेआधी व नंतर जास्त वेळ भरून नुकसान भरून निघेल असे मानणारे अनेक लोक आहेत त्यामध्ये पालक, शिक्षक आणि अधिकारीही आहेत.  कारण अभ्यासक्रम पुर्ण करणे म्हणजे शिक्षण झाले अशी ठाम समजूत सगळयांच्या मनात आहे. पण जरा थोडे मागे जाऊन असेच वेळेआधी जादा तासिका घेऊन विदयार्थी प्रगत करण्याचे उपक्रम आठवून पहा. ज्यांनी ते ग्रासरूटवर राबवले त्या शिक्षकांना आणि ज्यांनी ते सहन केले त्या विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन विचारा की, सकाळी 9 ते 10 असा एक तास जादा घेतल्यानंतर परिपाठानंतर लगेच शिकवावेसे वाटत होते का ?  दुपारनंतर 3 ते 5 या वेळेत त्यांची मानसिकता काय होती. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही यावेळी अध्ययन- अध्यापनाच्या मानसिकतेत नसायचे ही वस्तुस्थिती आहे.फक्त ती कागदोपत्री नोंदली गेली नाही एवढेच.
      आज जी आपत्कालिन परिस्थिती आहे तिचा विचार करता बौद्धिक पेक्षा मानसिक सक्षमतेची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे वेळ वाढवून, अतिरिक्त ताण देऊन फायदयापेक्षा तोटेच जास्त होतील. पाठयक्रम-अभ्यासक्रम स्वतंत्रपणे पुर्ण करणे हे उद्दिष्ट ठेवले तर आधिच ताणलेले रबर तुटण्याच्या बेतास येऊ नये म्हणजे मिळवले. आता नजरेसमोर हवीत ती शिक्षण आणि त्याची उद्दिष्टे .त्यासाठी सामाईक विषयांचे, सामाईक घटकांचे एकात्मिकरण करून घागर में सागर भरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असायला हवा. एक ना धड भाराभर चिंध्या करण्यापेक्षा नीर-क्षीर विवेक साधून नवनीत काढणे कधीही चांगलेच. शिक्षण हे आनंददायी हवे हे बोलण्यातून नव्हे तर कृतीतून दिसायला हवे.
     कोरोना जाईल किंवा त्यासोबत जगावे लागेलही पण त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक मनाने तरी खंबीर राहिल याचा विचार प्राधान्याने व्हावा हीच अपेक्षा...
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
      

Monday, May 4, 2020

तल्लफ



तल्लफ
       

            हा आहे चंद्रू. आईबापाने आवडीने चंद्रशेखर असे छान नाव ठेवले. पण हा ना धड चंद्र झाला ना शेखर.  मात्र आपल्या कर्माने असे काही चार चाँद लावले की, घरच्यांना हा आमचा आहे. हे सांगायलाही लाज वाटावी. स्वतःच्या नावातील चंद्राला जागायचे म्हणून की काय .. हे वीरवर सोमरस प्राशनात कुणाला हार जाणा-यातले नव्हते. सकाळी तोंड धुण्याअगोदर पावशेर चे आचमन,नंतर आंघोळीनंतर नवटाक असे प्रतिप्रहरी करत करत रात्री मित्रमंडळीला सोबत घेऊन सार्वजनिक पेयपान कार्य सुरू होत असे ते, हे महाशय जमलेल्या गोतावळयासह जागच्या जागीच आडवे होऊन दिवसाचा शेवट केला जाईपर्यंत.नेहमीच्या बोलण्यात नवटाक,पावशेर चपटी,हाफ,खंबा  असे शब्द असायचे.सोबतीला 'चाकना' म्हणून आयला,मायला,साले अशा सभ्य शिव्या दिल्याशिवाय वाक्यच पुर्ण होत नव्हते.
         तसे सगळे चांगलेच चाललेले होते. "पिओ,पिलाओ और कहीं भी जाकर गिरो !" हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे ही याची ठाम समजूत होती. अर्धी बाटली रिचवल्यावर तर ती समजूत अधिकच दृढ होत असे. रोजच्या दिनक्रमात तसूभरही...... नव्हे छटाकभरही बदल चालत नाही. जर चुकून कधी या मदिराप्राशनाच्या पुण्यकर्मात खंड पडलाच तर मात्र मदिरादेवीचा कोप चंद्रुच्या हातापायांवर लगेच जाणवायचा. चांगलीच तल्लफ लागायची.त्याचे हातपाय व्हायब्रेट मोडवर ठेवलेल्या मोबाईल फोन सारखे थरथरायला लागायचे. तोंडातून सायलेंट विथ् व्हायब्रेशन मोडवर ठेवलेल्या मोबाईलसारखा 'घुंर्रर्र..घुंर्रर्र...' असा आवाज निघायचा. त्याला काही म्हणजे काहीच सुचत नसे. कुठूनतरी नवटाकभर पोटात गेली की मग मात्र  100% रिचार्ज झालेल्या मोबाईलसारखा चालायला लागायचा. बरं! हे महोदय शराबी चित्रपटातील अभिताभ बच्चनना मानणारे. मग काय "जहाँ चार यार मिल जाये वही रात हो गुलजार..." ही हया 'अखिल भारतीय मदिराप्राशक मंडळा' ची टॅगलाईनच होती. सगळे जण ही टॅगलाईन नुसते पाळत नव्हते, तर अक्षरशः जगत होते. सगळा कसा आनंदी आनंद गडे असा मामला होता. पिणारे पित होते.पाजणारे पाजत होते. गटारात, रस्त्याच्या कडेला पडणारे पडत होते.
       पण देव आपल्याला वाटतो तेवढा दयाळू नाहीच ना ?  लोकांचे सगळे बिनबोभाट,शांतपणे चालू असले की त्याला लोकांची परीक्षा घेण्याची लहर येते. मग काय कुठेतरी मिठाचा खडा टाकलाच म्हणून समजा. तसेच झाले नेमके. जगभर कोरोनाची साथ आली. मार्च महिना अर्धा संपेपर्यंत भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली.देशात लाॅकडाऊन जाहीर केले. सगळे बंद झाले. दुकाने,गाडया,बार सगळेच. चंद्रुला प्यायला मिळेना.चार दिवस इथून तिथून कशीतरी मिळेल त्या भावात विकत घेऊन घसा ओला करत राहिला.पण तिही मिळेनाशी आणि मिळाली तरी परवडेनाशी झाली. दारूची तल्लफ यायची. बैचेनी वाढत चालली. पंधरा एप्रिल आली की,  सर्व ठीक होईल या आशेने तो दिवस ढकलत राहिला.पण कसले काय नि कसले काय... तो पुढे 3 मे पर्यंत वाढला. बेचैनी वाढत होती. विड्राॅवल सिम्प्टम्स वाढू लागले, हातपाय थरथरू लागले.कसाबसा मे महिना उजाडला.आता फक्त तीनच दिवस आणि मग काय!  त्यानंतर 'झुम बराबर झुम शराबीचाच ठेका धरायचा अशी स्वप्ने त्याला पडू लागली. पण हाय रे कर्मा तो लाॅकडाऊनही सतरा तारखेपर्यंत वाढवला. चंद्रुला आता आपण जगू शकणार नाही असे वाटायला लागले. इतके दिवस त्याच्या दारू पिण्याला वैतागलेली घरातली माणसेही त्याची कीव करू लागली. आणि मग ती आनंदाची बातमी आली. उद्यापासून म्हणजे 4 मे पासून वाईन शाॅप उघडणार. बातमी ऐकून त्याची अवस्था अगदी "आनंद पोटात माझ्या माईना रे माईना.." अशी झाली .रात्रभर डोळयाला डोळा लागला नाही.कधी एकदा उजाडते आणि वाईन शाॅपसमोर लाईनला उभा राहतो असे त्याला झाले होते. सकाळी लवकर उठून तो तयार झाला. छान आंघोळ केली. कपडे घातले.एवढी तयारी जत्रेला किंवा सणाला देवळात जायला ही केली नव्हती कधी. पण आजचा मूड काही औरच होता. शर्टच्या खिशात हात घालून पैशांचा अंदाज घेतला .फक्त वीस रूपयेच होते त्यात. पँटचे तिन्ही खिसे तपासून पाहिले.सर्व मिळून पंचेचाळीस रूपये मिळाले. फक्त पासष्ट रूपयांत काय येणार??  त्याचा आनंद कुठल्या कुठे विरून गेला.
       चंद्रुचा बाप हे पहात होता. तो खूप चिडला होता चंद्रुवर. पण जसा त्याचा चेहरा उतरलेला पाहिल्यावर बाप मनातून हलला. काय वाटले कोण जाणे पण, बाप उठला आणि आपल्या शर्टाच्या खिशात घरखर्चाला ठेवलेली शेवटची पाचशेची नोट काढून चंद्रुच्या हातावर ठेवली. बोलला काहीच नाही पण डोळे पाण्याने डबडबले होते. चंद्रुचे तिकडे लक्षच नव्हते. आपल्या खडूस बापाने पैसे दिले हेच विशेष हे मात्र त्याच्या मनात आलेच. पण विचार करायला वेळच नव्हता त्याच्याकडे. तो जवळजवळ धावतच  गेला.  वाईनशाॅप समोर लांबच लांब रांग लागली होती. सर्वजण ठराविक अंतर राखून उभे होते. जशी दुकान उघडण्याची चाहूल लागली, तशी मात्र रांग उधळली. जो तो पुढे घुसू लागला.एकच गोंधळ माजला. तेवढयात पोलिसांची गाडी आली. दुकानदाराला दुकान न उघडण्याची सूचना केली.पोलिसांनी शिस्त पाळण्याची सूचना दिल्या.पण कोणी ऐकेनात. झाले!  पोलिसांनी दणादण दणादण बॅटिंग करायला सुरवात केली. समोर आलेल्याचा पार्श्वभाग चेंडू आणि हातातला दंडूका बॅट आहे अशा अविर्भावात प्रत्येक चेंडूवर सिक्सर मारायला सुरवात केली. चंद्रुचे फुटबॉलच काय, आख्खी पाठीमागची पीचच पोलिसांनी खेळून काढली. दणादण बसणा-या दंडूक्यात हातातली पाचशेची नोट कुठे पडली याची शुद्धही त्याला राहिली नाही. धडपडत, वाकडातिकडा खेकडयाच्या चालीने तो घरी पोहोचला. घसा कोरडा पडला होता.पण आता तहान पाण्याची लागली होती. दारूची तल्लफ मात्र चांगलीच जिरली. आता तो घरात पोटावर झोपून आहे. पाठीवर काळया रेघांची नक्षी आणि काळे फुटबॉल घेऊन !!!
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ईमेल peavin.g.mhatre@gmail.com

Friday, May 1, 2020

बेभरवशाच्या पुलाखाली


        बेभरवशाच्या पूलाखाली....


        "ऐ ! कोन है रे तू , कहाँसे आया है ?" एक पोलिस उड्डाण पुलाखाली खांबाला टेकून झोपलेल्या शिवरामला त्याच्या दंडुक्याने ढोसत विचारत होता. शिवरामला तो आवाज दूरवरून कुठून तरी आल्यासारखा भासत होता.दंडुक्याचे टोक टोचत होतं, पण अनावर झोपेमुळे मेंदूच्या संवेदना शिथिल झालेल्या आणि डोळयांवर आलेली झापड यामुळे  डोळे उघडताना पापण्यांवर मणामणाचे ओझे ठेवल्यासारखे उघडायला त्रास होत होता. गेल्या तीन दिवसांपासूनची ती झोप अशी थोडीच झटकन उडणार होती.मागच्या दोन रात्री पुर्ण जागून काढलेल्या.म्हणूनच तर आज बसल्या जागी कधी डोळयाला डोळा लागला हे शिवरामला कळले सुद्धा नाही. पोलिसाच्या दंडुक्याचा दाब वाढल्यावर मात्र तो जागा झाला. आजूबाजूचे भान यायला काही वेळ गेला. पोलिसाने परत तोच प्रश्न विचारला. एव्हाना झोप उडालीच होती. आपल्या दोन्ही बाजूला आपल्या दोन लहानग्या मुली अजून झोपलेल्याच आहेत याच समाधानात चेह-यावर नकळत थोडे स्मित उमटले. पोलिसाच्या प्रश्नांचे उत्तर दयायला हवे होते. दोनवेळा एकच प्रश्न विचारावा लागल्याने तोही थोडा तापला होता. पण काय सांगावे, कुठून सुरुवात करावी हे काही त्याला सुचेना . काय सांगणार होता तो....  त्याच्या डोळयांसमोरून मागचा सगळा चित्रपट झरझर झरझर सरकत गेला.
       आपली बायको आणि दोन मुली असा त्याचा छानसा आटोपशीर संसार होता. श्रीमंती अशी नव्हती, पण चारजणांचे पोटभरेल एवढी कमाई होईल अशी नोकरी होती. सुशील,सुगरण पत्नी होती. दोघांचे एकमेकांवर आणि आपल्या दोन मुलींवर खूप प्रेम होते.घरात आनंदाला तोटा नव्हता. 'हम दो हमारे दो' असा सुखी संसार होता. पण नशीबाने वाकडी नजर फिरवली आणि दोन वर्षांपूर्वी पत्नी साधे तापाचे कारण होऊन आजारी पडली. एकातून दुसरे निघत निघत तिने जी खाट पकडली ती सहा महिन्यांपूर्वी शेवटचा श्वास घेतला तेव्हाच सुटली. संसाराचे एक चाक निखळलेच पण जाता जाता संसाराचा गाडाही खिळखिळा करून गेले.पत्नीच्या आजाराच्या दीड वर्षात शिवरामच्या गाठीशी असलेला सगळा पैसा तर संपलाच वर तिच्या उस्तवारीत कामाकडे दुर्लक्ष झाल्याने नोकरीही सोडावी लागल्याने घरात येणारा पैशाचा ओघही थांबला. शिवरामवर दोन मुलींची जबाबदारी टाकून पत्नी निघून गेली . तो पुरता हतबल झाला .पण त्याने छोटया मुलींकडे पाहून स्वत:ला सावरले. पुन्हा कामाला सुरुवात केली. आईची कमतरता भासू नये म्हणून जपू लागला. दोघींच्या चेह-यावरचे विरलेले हसू पुन्हा दिसू लागले,तसा त्याचा हुरूप वाढला. दोन मुली हेच त्याचे विश्व बनले.
         नशीबाला मात्र ते सुखही पहावलं नाही.एके दिवशी तो छोट्या मुलीला आंघोळ घालत होता. सहज मानेवरून हात फिरवताना त्याचा हात थबकला. मानेवर कसलीशी गाठ होती. मनात शंकेची पाल चुकचुकली. वेळ न घालवता सरळ दवाखाना गाठले. डाॅक्टरांनी तपासणी केली.  "आता निश्चित काही सांगता येणार नाही .पण तरीही मोठया डाॅक्टरकडे तपासून घे", डॉक्टर म्हणाले. "पण नेमकं काय झालं आहे डाॅक्टर ? "  डाॅक्टर काय सांगणार याचा अंदाज त्याला आला होताच. पण मन धावा करत होते की देवा माझा अंदाज खोटा ठरू दे, डाॅक्टरांच्या मुखाने तूच बोल,की माझी मुलगी ठीक आहे. "मला तरी साधी गाठ वाटत नाही,कॅन्सरची शक्यता नाकारता येत नाही. मी चिठ्ठी लिहून देतो. तू मुंबईला जाऊन चेक करून घे " डाॅक्टर म्हणाले आणि त्यांनी समोरच्या पॅडवर चिठ्ठी लिहून ती सखारामच्या हाती दिली.
       दोन मुलींना घेऊन मुंबई गाठली. चेकअप,औषधे,जेवण यात ब-यापैकी पैसा खर्च झाला.पण आनंदाची गोष्ट ही की सगळे रिपोर्टस नाॅर्मल आले. कॅन्सरची वाटलेली भिती खोटी ठरली याचा आनंद मोठा होता. खिशात फक्त परतीच्या प्रवासाइतके पैसे उरले होते. उदया सकाळची गाडी पकडून गावी परत जायचे याच आनंदात लाॅजवरच्या काॅटवर झोपी गेला. सकाळी लाॅजच्या मालकाने उठवले तेव्हा जी बातमी ऐकली त्याने तो घाबरला. देशभर लाॅकडाऊन केल्याने सर्व गाडया, रेल्वे रात्री बारा वाजल्यापासून बंद झाल्याचे ऐकताच घाईघाईने सामानाच्या पिशव्या उचलून तो मुलींसह स्टेशनवर जायला निघाला. रस्त्यावर येताच समोर पोलिस बाहेर फिरणा-यांना दंडुक्याने झोडपत असल्याचे पाहिले आणि तो घाबरला. परत येऊन पाहतो तर लाॅजवाला लाॅजला कुलूप लावून निघून गेलेला. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली. बाजूलाच उड्डाणपूलाखाली काही माणसे बसलेली पाहिली आणि तो त्यांच्या जवळ गेला. "कुठं जायचंय पाव्हनं? " त्यांच्यापैकी एकाने विचारले. "गावाला, सांगलीला जायचंय." शिवरामने सांगितले. "कसं जाणार दादा!  सगळंच बंद हाय की." त्याने फक्त मान डोलावली. एक दिवस गेला, दुसरा -तिसरा करता करता चौथा दिवस उजाडला . बाकीचे मनाचा हिय्या करून चालतच गावाला पायी चालत जायला निघाले .पण लहान मुलींना घेऊन आपल्याला ते शक्य होणार नाही हे समजून तो तेथेच पूलाच्या खांबाला टेकून बसून होता.पोलिस दिसताच लपायचे. कोणी खायला दयायला आले तर घेऊन मुलींना खाऊ घालायचे,सकाळी कुठे दूध मिळाले तर मिळेल त्या भावात घेऊन  मुलींना दयायचे, रात्रभर जागून त्यांच्यावर लक्ष ठेवायचे असे चालले होते. पण शेवटी झोप अनावर झाली आणि नेमका पोलिसांना दिसला. सगळी हकीकत त्याने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्याला तेथून दुसऱ्या एका पूलाखाली नेले. तेथे हिरवे कापड लावून तात्पुरती राहण्याची सोय केली होती. बरीच लोकं होती तिथे.किमान आधार तरी झाला. खायला देणारे अन्न देत होते पण देताना फोटो काढत होते.त्यामुळे घेताना उगाचच भिकारी असल्यासारखे वाटून ते नको वाटायचे. नाईलाज होता, उपाशी तरी किती दिवस राहणार ,घेणे भागच होते !!!
        पण आता वेगळीच भिती सखारामचे मन खाऊ लागली होती. जेव्हा कधी ही बंदी उठेल तेव्हा काय ?? जवळचा पैसा संपत आला होता.तिकिटाला ठेवलेले पैसे दूधात अर्धेअधिक संपले होते.काही दिवसांत तेही संपणार !  बंदी उठल्यावर आज खाऊ घालणारेही बंद होणार. ना घरी परतायला पैसा, ना खाण्याची,राहण्याची सोय.  एका   न सुटणा-या कोडयात शिवराम पडला. ते कोडेही कधी सुटेल याचीही मुदत नाही. सगळेच बेमुदत.  कसलीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या एका निर्णयाचे परिणाम हजारो शिवराम भोगत आहेत..... त्याच बेभरवशांच्या भरोशावर.

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540