Wednesday, February 12, 2020


शिमगी बोर
तिचं नाव 'शिमगी'. नाव ऐकल्यावर वाटेल की ती असेल एखादी गावाकडची म्हातारी बाई वगैरे.पण तसे नाही.ती कोणी म्हातारी नाही,  बाई नाही की, कोणी माणूसही नाही. तर ती आहे चक्क एक बोरीचं झाड.  अर्थात आता कुणालाही वाटेल की, हात्तिच्या!!  मग त्या बोरीच्या झाडात एवढे काय विशेष असेल. पण आमची 'शिमगी' खरंच विशेषच होती. त्याचे कारणही तसेच होते. एकतर तिचे नावच मुळी पडले ते तिच्या फळे येण्यावरूनच. साधारणपणे बहुतेक बोरांच्या झाडांना बोरे पौष महिन्यापासून यायला सुरुवात होते आणि एक-दीड महिन्यात त्यांचा भर ओसरून ती संपूनही जातात आणि नेमके त्याच काळात म्हणजेच फाल्गुन महिन्यात या बोरीच्या झाडाला बोरे यायला सुरुवात होते. फाल्गुन महिन्यालाच ग्रामीण भागात शिमगा म्हणतात आणि शिमग्यात बहरणारी ती 'शिमगी' असे चपखल नाव तिला पडले.
           प्रत्येक गावाभोवतीच्या काही विशिष्ट ठिकाणांना काही ना काही नावाने ओळखले जाते. काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असे नाव तेथील भूरचना,  एखादे  झाड,देऊळ किंवा काही वेगळेपण यावरून असे नाव पडलेले असते. ही शिमगी बोर ज्या भागात होती त्या भागाचे नावही असेच पडलेले होते. त्या भागातील शेतात एक 'धोंडी' म्हणजेच गावच्या लोकांच्या भाषेत 'पाणबुरकी' या देवतेचे स्थान आहे. त्यावरून तो पुर्ण भाग "देवशेत" म्हणूनच परिचित आहे . अर्थात नाव जरी देवशेत असले तरी हा भाग तसा भुताटकी साठीच जास्त प्रसिद्ध होता. त्या भागात रात्री तर सोडाच पण भर दुपारीही एकटयादुकटयाने जाणे मोठे धाडसाचे मानले जाते. पण शिमगीचा ओढा मात्र एवढा असायचा की, सकाळ,दुपार,संध्याकाळ या तिन्ही त्रिकाळी कधीही जा.या झाडाखाली किंवा झाडावर कोणी ना कोणीतरी हमखास असणारच.कारण शिमगीखाली गेला आणि कुणाला बोरे खायला मिळाली नाहीत अन् त्याला हात हलवत परत फिरावे लागले ,असे कधीच घडले नाही. कोणीही निराश होऊन येथून परत जात नव्हता. जास्त नाही पण खाण्यापुरती बोरे तर नक्कीच मिळणार याबद्दल सगळयांनाच खात्री असायची.
        एका शेताच्या बांधावर हे झाड होते. दोन ते अडीच पुरुष म्हणजे जवळपास दहा-बाराफूट उंचीचा आणि तेवढयाच रूंदीचा  लांबलचक असा हा शेताचा बांध होता.  त्यावर दोन तीन बोरीची झाडे होती.  बाकी झाडे बारा,पंधरा फूट उंचीची लहानखुरीच होती पण मधोमध असलेल्या शिमगीच्या मानाने तर ती छोटी झुडपेच म्हणावी लागतील. या शिमगी बोरीच्या झाडाच्या खोडाचा व्यासच चार-साडेचार फूट असेल, साठ फूटांपेक्षा जास्त उंची आणि तेवढाच फांदयांचा घेर असा विस्तार असलेले हे झाड होते. पण शिमगीचे फळ आणि त्या झाडाचा आकार यांचे प्रमाण मात्र अगदी व्यस्त होते. झाडाच्या प्रचंड विस्ताराच्या मानाने बोर अगदीच छोटे होते. हत्तीच्या पोटी मांजराचे पिल्लू जन्माला यावे असा काहीसा प्रकार येथे होता.  या प्रचंड वृक्षाचे बोर आकाराने फक्त मटरच्या दाण्याएवढेच मोठे असायचे. आकाराने जरी लहान असले तरी चवीला मात्र अगदी गोड होते. कच्चे,अर्धकच्चे बोर जरी खाल्ले तरी आंबटपणा असा नसायचाच. पिकलेले बोर मिळाले तर खाणारा ते बोर खायचाच परंतु त्याच्या आत असलेली बी सुद्धा चघळत बसायचा.कधीकधी तोंडात टाकायला दुसरे बोर लगेच मिळाले नाहीच तर चघळता चघळता ती बी तोंडातल्या तोंडात फोडून आतला गर खाऊन टाकत असे. झाडाच्या खाली असलेल्या शेतातील जमिनीवर पालापाचोळा पडलेला तर असायचाच, पण त्याचबरोबर शेतातील जमिनीला भेगाही पडलेल्या असायच्या. वटाण्याच्या आकाराची बोरे जर खाली पडली तर या पालापाचोळा आणि फटीमधून मिळणे थोडे जिकीरीचे काम होते. पण त्यामुळेच ही बोरे नंतर येणाऱ्या कुणाला ना कुणाला मिळत असल्याने तेही चांगलेच होते असे म्हणावे लागेल. त्याचबरोबर प्रचंड आकार आणि तेवढीच छातीत धडकी भरवणारी उंची यामुळे झाडावर चढून बोरे काढणारे कितीही तरबेज असले तरी सगळीच्या सगळी बोरे काढणे त्यांनाही शक्य होत नसल्याने त्यानंतर तेथे येणा-याला बोरे शिल्लक राहिलेली असायचीच. त्याच बरोबर फांदयांची जाडी जास्त असल्याने फांदया हलवून बोरे पाडण्यालाही मर्यादा पडत होता. इतर बोरींची झाडे कमी उंचीची असल्याने त्यावरची बोरे काढण्यासाठी आकडी चा वापर करत असत.  आकडी म्हणजे बांबूच्या काठीला वरच्या टोकाला एक अर्धापाऊण फूट लांबीचा काठीचा तुकडा तिरकस बांधून हूक बनवलेला असायचा.पण ही आकडी या झाडावर पोहचणे अशक्यप्राय असल्याने हा आकडीचा उपाय ही येथे कुचकामी ठरत असे. त्यामुळे झाडावर बोरे शिल्लक असायची. मग डोंगरावरून येणारा वारा आपले काम चोख बजावत असे. प्रत्येकवेळी येणारी हवेची झुळूक बोरीच्या फांदयांची टोके अल्लद हलवून खाणा-यांसाठी बोरे खाली पाडत असे. जिथे कोणी पोहचत नसेल तेथे हा वारा पोहचून बोरे पाडायला मदत करत असे. शिमगी आणि वा-याच्या या संगनमतामुळे बोरांच्या खवय्यांची मात्र नेहमीच चांदी होत असे.
        कित्येक वर्षे झाली शिमगी बोर नेहमीच सगळयांसाठी आपला खजिना खुला करत आली होती. आता मात्र तिचेही वय वाढू लागले होते. वयोमानानुसार तिचीही उत्पादन क्षमता आता कमकुवत होऊ लागली होती. बोरांचा भर कमी होऊ लागला. फांदयाही कमकुवत होऊ लागल्या. पण त्याचबरोबर आजपर्यंत शिमगीच्या अंगाखांद्यावर खेळलेली,  बागडलेली अन् शिमगी बोरे खाउन वाढलेली पिढी आता मोठी झाली.कोणी नोकरीला, कोणी उदयोगाला, कोणी पोटापाण्याच्या सोईसाठी शहराकडे वळला. नवी पिढी तयार झाली पण ती पिढी समृद्धतेत वाढलेली.जे हवे ते विकत घेऊ शकत असल्याने आणि ते पैसे फेकून सहज उपलब्ध होत असल्याने ती पिढी डोंगराकडे वळायला, फिरकायला तयार होईना. शिक्षणाचा भार वाढला.मागची पिढी जशी शाळेतून घरी आल्या आल्या दप्तर फेकून खेळण्यासाठी बाहेर धाव मारत असे, तसे करणे आता शक्य नाही. त्यांना लगेच टयुशन,  हाॅबी क्लासेस यात ढकलले जाते. उरलेला वेळ या सगळ्याचा 'होम वर्क' पूर्ण करण्यात जातो. आताशी झाडांवरची आंबा बोरे पोरांच्या दगडाने नाही , तर स्वतःहून पिकून नाईलाजाने खाली पडतात. अशा परिस्थितीत शिमगीकडे तरी कोणाचे लक्ष जाणार??  . एवढी मेहनत करून बोरे मिळवण्यापेक्षा दहा वीस रूपयांत हवी तेवढी विकत मिळतात. चायनीज,फास्टफूडच्या जमान्यात हे सगळे खाणेही मागासलेपणाचे वाटते.परिणामी शिमगी एकटी पडत गेली आणि एके दिवशी समजले की, बिन उपयोगी म्हणून शिमगीवर कु-हाड चालवली गेली. समजेपर्यंत लाकडाचे सरपण बनून गेलेले होते. शिल्लक राहिला होता तो बांधाशी समांतर तोडलेला शिमगी बोरीचा बुंधा आणि तो पाहून डोळयात येणारे पाणी. आज ती बोर नसली तरी तिच्या आठवणी मात्र कायम ताज्या राहतील. कायमस्वरुपी !!!!
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com

No comments:

Post a Comment