Wednesday, February 5, 2020


  पिंजलेल्या कापसातले जीवन
        
टीर्रिक..टीर्रिक....टीर्रिक...
असा आवाज गल्लीत घुमायला लागला की, गल्लीत अंगणात खेळत असलेल्या लहान मुलांची भितीने गाळण उडून त्यांची पळापळ सुरू व्हायची . जो तो आपल्या हातात जे काही असेल ते टाकून खेळ सोडून घरात जाऊन दरवाज्याच्या आड लपून फटीतून बाहेर बघत बसायचा . घाबरल्यामुळे आणि धावाधावीमुळे छातीचे ठोके वाढून छाती धाड्धाड् उडत असे. घरातल्या कुणाच्या नजरेस ही लपलेली मुले दिसली तर ते लगेच समजून जात की हे का लपून बसले आहेत .त्यांनीही तो आवाज ऐकलेला असल्याने त्यांना लपण्याचे कारण माहित असते.म्हणून ते मुद्दामच बाहेरच्या बाजूला तोंड करून ओरडत "ये, ये जा घेऊन हयाला..." त्यामुळे तर आधीच घाबरलेली मुले अधिकच भेदरून दाराआड लपत. मग मात्र दुसरा कोणीतरी त्यांना धीर देई.
ज्याला घाबरून हया मुलांची पळापळ झालेली असते,  तो खेडयात गावाकडे त्याच्या त्या आवाज करण्यामुळेच 'टीर्रिक..टीर्रिक वाला' म्हणून ओळखला जातो. वास्तविक तो असतो एक 'पिंजारी' . एक साधासुधा गरीब फिरस्ता व्यवसाईक. गावोगावी जाउन कामधंदा करणा-या अशाच भटक्यांपैकी एक हातावर पोट असलेला.  घरोघरी फिरून कुणाच्या गादीसाठी कापूस पिंजून देणे,  कधी जुन्या गादयांमधील कापूस पिंजून नवीन कापड लावून गादी बांधून दे, तर कधी कधी फक्त फाटकी गादी शिवून छानपैकी कडक उन्हात तापवून दंडूक्याने कुटून गाठी झालेला कापूस फोडून मऊ मऊ गादी तयार करून दे....अशी वेगवेगळी कामे तो करत असे.त्याचबरोबर काहीजण कापडाची खेळणी बनवून ती विकतात . एवढे असून मोबदला म्हणून ठरलेले पैसेही मिळणे किंवा खरे बोलायचे तर मिळवणे हा सुद्धा संयमाची कसोटी पाहणारा क्षण असायचा.याबाबतीत मात्र यांच्या शांत राहण्याची कला आणि क्षमता वाखाणण्याजोगी असते.
         मूळ मुस्लिम समाजातील पिंजारी किंवा मन्सूर लोकांचा हा पारंपारिक अथवा वडिलोपार्जित म्हणता येईल असा हा व्यवसाय आहे. गावातील बारा बलुतेदारांमध्ये जरी यांना स्थान नसले तरी अठरा अलुतेदारांमध्ये यांचा समावेश असतो. कायम फिरस्ती,  एकाच ठिकाणी स्थिर वस्ती नसते यामुळे हा समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच असतो. त्यामुळे मागासलेपण हे ओघानेच सोबतीला येते.  त्यांचे मुख्य आयुध म्हणजे त्यांचे कापूस पिंजून देण्यासाठी वापरले जाणारे धनुष्य असते.ते खांद्यावर अडकवून  त्याची दोरी हाताने झटके देत वाजवत 'टीर्रिक...टीर्रिक...टीर्रिक ' आवाज काढतच तो गावभर फिरत असतो. इतरांप्रमाणे त्याला जोरजोराने ओरडत,  हाका मारत फिरायची गरजच पडत नाही.दोरीचा आवाज हाच त्याचा परिचय असतो. पण त्याच्या याच आवाजाला मात्र लहान मुले घाबरतात.एखादी प्रचंड मोठ्या आकाराची सेफ्टी पिन असावी असा त्या धनुष्याचा आकार असतो. जमिनीवर कापूस पसरून त्यावर ते धनुष्य ठेवून ताणलेल्या दोरीवर कापूस टाकत एका डंबेल्ससारख्या दंडूक्याने दोरीवर फटके देउन कापूस पिंजणे बघण्यासारखे असते.ते पहायला लहान मुलांना तर खूप आवडते. थोडया वेळाने घाबरून लपलेली ती मुले हळूच मोठया माणसाच्या मागे येऊन उभी राहून ही गंमत बघतात. कापूस पिंजता पिंजता पिंजारीदादाचे लक्ष त्यांच्याकडे गेले तर ते त्यांच्याशी गालातल्या गालात गोड हसून डोळयानेच पुढे ये असे खुणावत. घाबरलेले  ते मूल अजूनही साशंक असल्याने मोठय़ा माणसाच्या मागे लपते, पण हळूहळू भीड चेपली की समोर येऊन गंमत बघत बसत.
        धनुकलीने कापूस पूर्ण पिंजून झाला की तो पिशवीत भरून देता देता यांच्यामधला व्यापारी जागा होतो. मालकाला किंवा त्याच्या पत्नीला तो नवीन बिछाना बनवून घेण्यासाठी गळ घालतो. माझ्याकडे चांगले कापड आहे,छान मजबूत आहे .स्वस्तात काम होईल अशी पुस्तीही सोबत जोडतो. ब-याच वेळी ही मनधरणी कामी येते.बिछाना बनवून देण्यासाठी पैसे ठरवले जात. एकदीड तासात छान टम्म फुगलेला ,मऊ मऊ बिछाना तयार होतो. अर्थातच त्याचे शिवलेले टाके हे ठरलेल्या किंमतीप्रमाणे कमी-जास्त असत. मजुरी जास्त व मनाप्रमाणे ठरली असेल तर टाके जवळ जवळ घालून दिले जात आणि जादा घासाघीस करून अपेक्षेपेक्षा कमी मजुरी असेल तर टाके लांब लांब मारून झटकन काम उरकून तेथून निघायची घाई असायची. पण काही वेळा कामाला थोडा जास्त वेळ लागला आणि दुपार होऊन गेली तर मग तो आपली शिदोरी तिथेच बसल्याजागी सोडायचा. घरमालकीणही मग घरातील भाकरतुकडा, कालवणाचा रस्सा एखाद्या ताटलीत वाढून आणून देई. खेडयात कदाचित पैशांची श्रीमंती नसेलही,  पण अशी मनाची श्रीमंती मात्र पदोपदी अनुभवायला मिळते. इथे ठरलेली मजुरी आणि ठरलेले काम याचा विचार देणारीच्या मनात कधीच येत नाही. पण खाणारा मात्र न बोलता, न सांगता त्याची परतफेड थोडे जास्तीचे टाके मारून किंवा थोडी घट्ट शिलाई मारून करत असे. अगदी सहज हे घडत असते, प्रत्येकामध्ये असलेल्या माणुसकीचे आणि जाणिवेचे प्रत्यंतर इथे येत असते.लग्नसराईच्या वेळी तर हया पिंजारीदादांची आठवण हमखास काढली जाई.   आपल्या लाडाच्या लेकीला सासरी जाताना दयायच्या कन्यादानाच्या वस्तूंसोबत एक बिछाना दिला जातो.कधी नवीन बनवून नाहीतर ,तेवढी ऐपत तर नसेल जुनाच कापूस पिंजून त्यात थोडीशी विकतच्या कापसाची भर घालून नवीन कापड घालून बिछाना बनवून घेतला जात असे. यावेळी पिंजारीदादा खराखुरा 'माणूस'  असल्याचे दिसून येत असते. यजमानाची आर्थिक परिस्थिती पाहूनच तो मजुरी सांगतो. यावेळी जास्त घासाघीस होतच नाही. कदाचित देणारा आणि घेणारा या दोघांमधला 'बाप' हा सौदा ठरवत असल्याने जरी किंमत कमी मिळाली तरीही जास्तीचे चारदोन टाके मारून तो लेकीला आशिर्वाद देत असावा.
        काळाच्या ओघात जुने बरेच व्यवसाय  बंद पडले. काहींनी वेगळे मार्ग स्विकारले. परंपरागत व्यवसायात अपेक्षित प्रगतीची शाश्वती नसल्याने वडिलोपार्जित व्यवसायात पडायला त्यांची मुलेही तयार होत नाहीत. बरेच जण आजकाल दिसतही नाहीत. पण पिंजारीदादाच्या बाबतीत थोडीफार आशा अजूनही बाकी आहे. मॅट्रेसचा जमाना आला असला तरी घरोघरी आजही कापसाचे बिछाने आपले अस्तित्व टिकवून आहेत. फिरस्ते कमी झाले.काहींनी  दुकाने थाटली .पण आजही कानावर तो चिरपरिचित आवाज पडतो. अजूनतरी तो काही वर्षे असाच पडत राहिल अशी आशा बाळगायला हरकत नसावी..... अर्थात त्यासाठी शेतक-याचा शेतातला कापूस टिकला पाहिजे आणि त्यासाठी शेती व शेतकरी टिकला पाहिजे. कुठून कुठे कशी सूत्रे जुळली आहेत बघा. सगळेच एकाच सूत्रात बांधले गेलो आहोत. म्हणूनच तर एकमेकांच्या हातात हात घालून राहू या.....

प्रविण म्हात्रे
पिरकोन,  उरण, रायगड
मो 8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com
      

1 comment: