Wednesday, February 19, 2020


हाकांचा मार्केटिंग फंडा

एसटी बस ट्रॅफिकमधून वाट काढत स्थानकात शिरते. घुर्रघुर्रघुर्र.... करणारे ते अजस्र धूड सांभाळत , इतर बसेसना चुकवत बसचा चालक आपला प्लॅटफॉर्म गाठून बस उभी करण्यात मग्न असतो. पण गाडीतील ज्यांचे हे उतरण्याचे शेवटचे ठिकाण असते अशा प्रवाशांची मात्र आवराआवर सुरू होऊन उतरण्याची घाई सुरू झालेली असते .त्याचबरोबर आतापर्यंत बसस्थानकावर आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी बसची वाट पहात असलेले प्रवाशीही घाई गडबडीत बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. या गडबडीमुळे गाडीतील  आतापर्यंत पेंगुळलेले, झोप अनावर होऊन "होय-होय,नाही-नाही" अशी मान हलवत डुलक्या देणारे आणि चक्क 'सब घोडे बेच के.. ' झोपणारे असे सर्वच प्रवासी आता टक्क जागे झालेले असतात. एकंदरीत सगळीकडे घाई गडबड उडालेली असते.  कुणाला कुठेतरी जायचे असते, तर कुणी कुठून तरी येऊन पोहोचलेले असते. म्हणूनच तर प्रत्येकाला घाई लागलेली असते. पण या सगळ्यात काहीजण असे असतात जे कुठून आलेलेही नसतात आणि त्यांना कुठे जायचेही नसते.ते काही कोणाला सोडायला किंवा घ्यायला आलेले नातेवाईकही नसतात. पण तरीही आत येणाऱ्या एसटी बसला पाहून चढणा-या किंवा उतरणा-यांच्याही जास्त घाईगडबड त्यांची झालेली असते. चालक गाडी पुढे नेऊन मागेमागे घेत असताना आणि वाहक तोंडातील शिट्टी अन् हातातील पंच सह हात बसच्या पत्र्यावर वाजवत चालकाला गाडी लावायला मदत करीत असताना हे सगळेजण त्या गाडीच्या सगळया खिडक्यांजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. सोबत जोरजोराने हाका मारून प्रवाशांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी धडपडत असतात. बरोब्बर ओळखलेत तुम्ही ! ते असतात बसस्थानकावर चणे,शेंगदाणे,चिक्की विकणारे.
        हे खारे चणे, भाजके शेंगदाणे , गूळ-खोबरे-नारळाची चिक्की विकणारे छोटे विक्रेते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात ते त्यांच्या वेगवेगळ्या, चित्रविचित्र आवाज आणि हाकांमुळे. असे म्हटले जाते की , "ओरडणा-याची पपईही विकली जाते, पण गप्प बसणा-याचे आंबेही संपत नाहीत" .या म्हणीची प्रचिती घ्यायची असेल तर जरूर एखाद्या बसस्थानकाला भेट दयावी आणि त्यांचा आरडाओरडा अनुभवावा. काय एकेक नमुनेदार आरोळ्या हे सगळे चना- शेंगदाणा - चिक्कीवाले मारत असतात की बोलता सोय नाही.प्रत्येकाचा आवाज वेगळा, प्रत्येकाची पद्धत वेगळी , प्रत्येकाचा
ढंग वेगळा  .त्यांच्या हातात असलेली चण्याच्या - शेंगदाण्याच्या पुडया, चिक्कीचे खोके-पिशव्या जरी समान असले तरी त्यांच्या ओरडण्याच्या पद्धतीमध्ये कितीतरी वेगळेपण असतो. कुणी 'खार्रे ~ शेंगदाण्णे..' ,  कुणी 'ऐय्य खार्रे शेंगदाण्णेय्येय्ये...' तर कुणी 'चिक्की चिक्की चिक्की, खार्रा शेंगदाण्णा चिक्कीय्य..'  अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हाका मारत बसच्या खिडकीतून आतल्या प्रवाशाला काहीतरी विकत घे असे सुचवत असतात.त्यातही त्यांचा विक्रीचा फंडा असा असतो की,  जर एखादे लहान मूल खिडकीजवळ बसलेले असेल तर तेथून ते वारंवार फिरत राहतात.कधीकधी तर काहीतरी विकत घेईपर्यंत ते तिथेच "चिक्की चिक्की चिक्की " करत उभे राहतात.  एखादी लेकुरवाली बाई असेल तरीही असेच करतात. त्यामानाने एखादा पुरूष प्रवासी असेल तर मात्र
एक दोन वेळा बोलून आपला मोर्चा पुढच्या खिडकीकडे वळवतात. कारण त्यांना आपले 'साॅफ्ट टार्गेट' माहित असते.
     आपल्या रायगड जिल्ह्यातील पेणचे बसस्थानक कायम वर्दळीचेच.ब-याचशा लांब पल्ल्याच्या गाडया जरी रामवाडी स्थानकात थांबत असल्या तरी सर्व स्थानिक आणि काही लांबपल्याच्या अशा एसटी बसेसचे आवागमन येथे सतत सुरूच असते. रामवाडी स्टेशन होण्याअगोदर तर कोकण, गोवा, कर्नाटक अशा अनेक ठिकाणी जाणा-या, येणाऱ्या  सगळया एसटी बसचे थांबण्याचे महत्त्वाचे स्थानक म्हणजे पेण स्थानकच होते. हेच पेण स्थानक म्हणजे अशा चणे-शेंगदाणे विकणा-यांच्या नानाविध 'कला' हमखास पाहवयास मिळण्याचे ठिकाण होते आणि निर्विवादपणे ते आजही आहेच. खरंच ही त्यांनी विकसित केलेली एक वेगळी कलाच आहे. एकाची हाक मारण्याची एक त-हा तर दुसर्‍याची दुसरीच. जसे 'व्यक्ती तितक्या प्रकृती' , तसेच इथे 'विक्रेते तितक्याच हाका ' असतात.  एकासारखी दुसरी अजिबात नाही.प्रत्येकाची बातच न्यारी. इथला एक चिक्की विकणारा तर इतका अनोखी हाक मारायचा की,  पहिल्यांदा इथे आलेल्या नवीन प्रवाशाला तो नेमके काय विकतो याचा उलगडा  होता होता बसची थांबण्याची वेळ संपून ती सुटायची वेळ यायची .तरी तो काय बोलतो याचे कोडे सुटत नसे. तो विकायचा शेंगदाणे आणि चिक्की.त्याच्या दोन्ही हाताच्या बोटांच्या कैचीत दोन दोन शेंगदाण्याच्या पुडया आणि अंगठ्याच्या बेचक्यात चिक्कीची पाकिटे असत.खांदयावर एक शबनम झोळीसारखी पिशवी असायची.सकाळची वेळ असेल तर ती पिशवीही पुडया आणि पाकिटांनी गच्च भरलेली असायची. दुपार पर्यंत ती ब-यापैकी हलकी झालेली असायची. हातांची एकदोन बोटेही मोकळी झालेली असायची. अशा अवतारात तो "ऐय्य चिक्.......ऐय्य चिक्." एवढीच हाक मारत फिरत असायचा. चिक् म्हणजे चिक्की हे समजताना प्रवासी बससह पेणच्या बाहेर पडलेला असायचा. पण हेच हुकलेले गि-हाईक त्यानंतर मात्र त्याचे कायमचे गि-हाईक बनून जायचे. दुसर्‍या वेळी अन् त्यानंतरच्या प्रत्येक वेळी पेण स्थानकात बस शिरल्याबरोबर त्या प्रवाशाची नजर त्याला शोधत रहायची आणि त्याच्या त्या "ऐय्य...चिक् " या एकमेवाद्वितीय हाकेकडे लागलेले असायचे.
        चणे शेंगदाणे विकणारे जसे वेगवेगळ्या हाका मारून गि-हाईकाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करत असतात,  तसेच इतर विक्रेतेही आपल्या प्रत्येकाच्या शैलीत हाक मारून माल विकत असतात.  असाच एक वेगळी हाक मारणारा फेरीवाला गावात यायचा. तो गोड मेवा विकायला यायचा त्यामुळे गावक-यांनी त्याचे नामकरण गावच्या पद्धतीप्रमाणे 'मेवावाला' असेच केले होते. लांब बाह्यांचा बारीक चौकटीचौकटीचा मळकट पांढरा शर्ट.  शर्टाची वरची एकदोन बटणे आणि कफची बटणे उघडी टाकलेली. तशीच लाल, निळया, काळया चौकटीचौकटीची लुंगी . डोक्यावर कापडाने झाकलेले परातीसारखे मेव्याने भरलेले पसरट भांडे. डाव्या हातात लुंगीचे एक टोक सावरून धरत,  दुसर्‍या हातात बांबूच्या कामटयांचा बनवलेला डमरूच्या आकाराचा मेव्याची परात ठेवण्याचा स्टँड धरून डोक्यावरची परात हात न लावता सांभाळून धरलेली असायची. स्वत: हिंदी भाषिक असूनही हिंदी वळणाच्या मराठीत एका लयबद्ध सुरात ---
"गोड गोड मेवा
सगळयांनी घ्यावा
सासू-सुनेने खावा
नंदा बघत -हावा.."
अशी विनोदी हाक मारत ही स्वारी गावभर फिरायची. गोड मेव्यापेक्षा त्याच्या या गोड हाकेमुळेच कोणीतरी त्याला मेवा घेण्यासाठी थांबवायचाच आणि एकदा का एखादया अंगणात हा थांबला की आजूबाजूला असणा-या सात आठ घरांतील लहान मुले अन् त्यांच्या नावाने मोठी माणसेही मेवा घेत. जरी रोजरोज येत नसला तरी पंधरा वीस दिवसांतून एकदा येणारा हा मेवावाला सगळयांनाच मेव्यासारखा गोड वाटायचा.
कधीकधी अशा हाका अर्धवट ऐकल्याने विनोदही घडत.  "एकदाच विकत घ्या आणि आयुष्यभर बसून खा..." अशी हाक मारणा-या बसायचे पाट विकणा-या पाटवाल्याच विनोद माहित असेलच ! पण त्याच बरोबर गावात फणसाचे गरे विकणा-या पोरांची
"झ्या रं फणसाचं गरं...
नाय खाईल त्याची म्हातारी मरं.."
अशी विनोदपूर्ण धमकीवजा शाप देणारी हाक किंवा खायचे पान विकणा-या पानवाल्या आबंवची ' पान...खाय्याच्चे...' ही हाक आठवत असेलच की ! 
हाक कशीही मारोत पण त्यामागे मार्केटिंगचे कौशल्यही लपलेले असते.आधुनिक जाहिरातबाजी सारखीच ही पारंपारिक जाहिरातबाजीच आहे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती टिकून राहिलच. कधी कान आणि मन उघडे ठेवून ऐका तुमच्याही मनाला काहीही खरेदी न करताही खूप आनंद होईल आणि जर विकत घेतलेतच तर तुमच्यासह विकणा-याचाही आनंद द्विगुणित होईल.
प्रविण म्हात्रे
पिरकोन - उरण - रायगड
मो 8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com

Wednesday, February 12, 2020


शिमगी बोर
तिचं नाव 'शिमगी'. नाव ऐकल्यावर वाटेल की ती असेल एखादी गावाकडची म्हातारी बाई वगैरे.पण तसे नाही.ती कोणी म्हातारी नाही,  बाई नाही की, कोणी माणूसही नाही. तर ती आहे चक्क एक बोरीचं झाड.  अर्थात आता कुणालाही वाटेल की, हात्तिच्या!!  मग त्या बोरीच्या झाडात एवढे काय विशेष असेल. पण आमची 'शिमगी' खरंच विशेषच होती. त्याचे कारणही तसेच होते. एकतर तिचे नावच मुळी पडले ते तिच्या फळे येण्यावरूनच. साधारणपणे बहुतेक बोरांच्या झाडांना बोरे पौष महिन्यापासून यायला सुरुवात होते आणि एक-दीड महिन्यात त्यांचा भर ओसरून ती संपूनही जातात आणि नेमके त्याच काळात म्हणजेच फाल्गुन महिन्यात या बोरीच्या झाडाला बोरे यायला सुरुवात होते. फाल्गुन महिन्यालाच ग्रामीण भागात शिमगा म्हणतात आणि शिमग्यात बहरणारी ती 'शिमगी' असे चपखल नाव तिला पडले.
           प्रत्येक गावाभोवतीच्या काही विशिष्ट ठिकाणांना काही ना काही नावाने ओळखले जाते. काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असे नाव तेथील भूरचना,  एखादे  झाड,देऊळ किंवा काही वेगळेपण यावरून असे नाव पडलेले असते. ही शिमगी बोर ज्या भागात होती त्या भागाचे नावही असेच पडलेले होते. त्या भागातील शेतात एक 'धोंडी' म्हणजेच गावच्या लोकांच्या भाषेत 'पाणबुरकी' या देवतेचे स्थान आहे. त्यावरून तो पुर्ण भाग "देवशेत" म्हणूनच परिचित आहे . अर्थात नाव जरी देवशेत असले तरी हा भाग तसा भुताटकी साठीच जास्त प्रसिद्ध होता. त्या भागात रात्री तर सोडाच पण भर दुपारीही एकटयादुकटयाने जाणे मोठे धाडसाचे मानले जाते. पण शिमगीचा ओढा मात्र एवढा असायचा की, सकाळ,दुपार,संध्याकाळ या तिन्ही त्रिकाळी कधीही जा.या झाडाखाली किंवा झाडावर कोणी ना कोणीतरी हमखास असणारच.कारण शिमगीखाली गेला आणि कुणाला बोरे खायला मिळाली नाहीत अन् त्याला हात हलवत परत फिरावे लागले ,असे कधीच घडले नाही. कोणीही निराश होऊन येथून परत जात नव्हता. जास्त नाही पण खाण्यापुरती बोरे तर नक्कीच मिळणार याबद्दल सगळयांनाच खात्री असायची.
        एका शेताच्या बांधावर हे झाड होते. दोन ते अडीच पुरुष म्हणजे जवळपास दहा-बाराफूट उंचीचा आणि तेवढयाच रूंदीचा  लांबलचक असा हा शेताचा बांध होता.  त्यावर दोन तीन बोरीची झाडे होती.  बाकी झाडे बारा,पंधरा फूट उंचीची लहानखुरीच होती पण मधोमध असलेल्या शिमगीच्या मानाने तर ती छोटी झुडपेच म्हणावी लागतील. या शिमगी बोरीच्या झाडाच्या खोडाचा व्यासच चार-साडेचार फूट असेल, साठ फूटांपेक्षा जास्त उंची आणि तेवढाच फांदयांचा घेर असा विस्तार असलेले हे झाड होते. पण शिमगीचे फळ आणि त्या झाडाचा आकार यांचे प्रमाण मात्र अगदी व्यस्त होते. झाडाच्या प्रचंड विस्ताराच्या मानाने बोर अगदीच छोटे होते. हत्तीच्या पोटी मांजराचे पिल्लू जन्माला यावे असा काहीसा प्रकार येथे होता.  या प्रचंड वृक्षाचे बोर आकाराने फक्त मटरच्या दाण्याएवढेच मोठे असायचे. आकाराने जरी लहान असले तरी चवीला मात्र अगदी गोड होते. कच्चे,अर्धकच्चे बोर जरी खाल्ले तरी आंबटपणा असा नसायचाच. पिकलेले बोर मिळाले तर खाणारा ते बोर खायचाच परंतु त्याच्या आत असलेली बी सुद्धा चघळत बसायचा.कधीकधी तोंडात टाकायला दुसरे बोर लगेच मिळाले नाहीच तर चघळता चघळता ती बी तोंडातल्या तोंडात फोडून आतला गर खाऊन टाकत असे. झाडाच्या खाली असलेल्या शेतातील जमिनीवर पालापाचोळा पडलेला तर असायचाच, पण त्याचबरोबर शेतातील जमिनीला भेगाही पडलेल्या असायच्या. वटाण्याच्या आकाराची बोरे जर खाली पडली तर या पालापाचोळा आणि फटीमधून मिळणे थोडे जिकीरीचे काम होते. पण त्यामुळेच ही बोरे नंतर येणाऱ्या कुणाला ना कुणाला मिळत असल्याने तेही चांगलेच होते असे म्हणावे लागेल. त्याचबरोबर प्रचंड आकार आणि तेवढीच छातीत धडकी भरवणारी उंची यामुळे झाडावर चढून बोरे काढणारे कितीही तरबेज असले तरी सगळीच्या सगळी बोरे काढणे त्यांनाही शक्य होत नसल्याने त्यानंतर तेथे येणा-याला बोरे शिल्लक राहिलेली असायचीच. त्याच बरोबर फांदयांची जाडी जास्त असल्याने फांदया हलवून बोरे पाडण्यालाही मर्यादा पडत होता. इतर बोरींची झाडे कमी उंचीची असल्याने त्यावरची बोरे काढण्यासाठी आकडी चा वापर करत असत.  आकडी म्हणजे बांबूच्या काठीला वरच्या टोकाला एक अर्धापाऊण फूट लांबीचा काठीचा तुकडा तिरकस बांधून हूक बनवलेला असायचा.पण ही आकडी या झाडावर पोहचणे अशक्यप्राय असल्याने हा आकडीचा उपाय ही येथे कुचकामी ठरत असे. त्यामुळे झाडावर बोरे शिल्लक असायची. मग डोंगरावरून येणारा वारा आपले काम चोख बजावत असे. प्रत्येकवेळी येणारी हवेची झुळूक बोरीच्या फांदयांची टोके अल्लद हलवून खाणा-यांसाठी बोरे खाली पाडत असे. जिथे कोणी पोहचत नसेल तेथे हा वारा पोहचून बोरे पाडायला मदत करत असे. शिमगी आणि वा-याच्या या संगनमतामुळे बोरांच्या खवय्यांची मात्र नेहमीच चांदी होत असे.
        कित्येक वर्षे झाली शिमगी बोर नेहमीच सगळयांसाठी आपला खजिना खुला करत आली होती. आता मात्र तिचेही वय वाढू लागले होते. वयोमानानुसार तिचीही उत्पादन क्षमता आता कमकुवत होऊ लागली होती. बोरांचा भर कमी होऊ लागला. फांदयाही कमकुवत होऊ लागल्या. पण त्याचबरोबर आजपर्यंत शिमगीच्या अंगाखांद्यावर खेळलेली,  बागडलेली अन् शिमगी बोरे खाउन वाढलेली पिढी आता मोठी झाली.कोणी नोकरीला, कोणी उदयोगाला, कोणी पोटापाण्याच्या सोईसाठी शहराकडे वळला. नवी पिढी तयार झाली पण ती पिढी समृद्धतेत वाढलेली.जे हवे ते विकत घेऊ शकत असल्याने आणि ते पैसे फेकून सहज उपलब्ध होत असल्याने ती पिढी डोंगराकडे वळायला, फिरकायला तयार होईना. शिक्षणाचा भार वाढला.मागची पिढी जशी शाळेतून घरी आल्या आल्या दप्तर फेकून खेळण्यासाठी बाहेर धाव मारत असे, तसे करणे आता शक्य नाही. त्यांना लगेच टयुशन,  हाॅबी क्लासेस यात ढकलले जाते. उरलेला वेळ या सगळ्याचा 'होम वर्क' पूर्ण करण्यात जातो. आताशी झाडांवरची आंबा बोरे पोरांच्या दगडाने नाही , तर स्वतःहून पिकून नाईलाजाने खाली पडतात. अशा परिस्थितीत शिमगीकडे तरी कोणाचे लक्ष जाणार??  . एवढी मेहनत करून बोरे मिळवण्यापेक्षा दहा वीस रूपयांत हवी तेवढी विकत मिळतात. चायनीज,फास्टफूडच्या जमान्यात हे सगळे खाणेही मागासलेपणाचे वाटते.परिणामी शिमगी एकटी पडत गेली आणि एके दिवशी समजले की, बिन उपयोगी म्हणून शिमगीवर कु-हाड चालवली गेली. समजेपर्यंत लाकडाचे सरपण बनून गेलेले होते. शिल्लक राहिला होता तो बांधाशी समांतर तोडलेला शिमगी बोरीचा बुंधा आणि तो पाहून डोळयात येणारे पाणी. आज ती बोर नसली तरी तिच्या आठवणी मात्र कायम ताज्या राहतील. कायमस्वरुपी !!!!
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com

Wednesday, February 5, 2020


  पिंजलेल्या कापसातले जीवन
        
टीर्रिक..टीर्रिक....टीर्रिक...
असा आवाज गल्लीत घुमायला लागला की, गल्लीत अंगणात खेळत असलेल्या लहान मुलांची भितीने गाळण उडून त्यांची पळापळ सुरू व्हायची . जो तो आपल्या हातात जे काही असेल ते टाकून खेळ सोडून घरात जाऊन दरवाज्याच्या आड लपून फटीतून बाहेर बघत बसायचा . घाबरल्यामुळे आणि धावाधावीमुळे छातीचे ठोके वाढून छाती धाड्धाड् उडत असे. घरातल्या कुणाच्या नजरेस ही लपलेली मुले दिसली तर ते लगेच समजून जात की हे का लपून बसले आहेत .त्यांनीही तो आवाज ऐकलेला असल्याने त्यांना लपण्याचे कारण माहित असते.म्हणून ते मुद्दामच बाहेरच्या बाजूला तोंड करून ओरडत "ये, ये जा घेऊन हयाला..." त्यामुळे तर आधीच घाबरलेली मुले अधिकच भेदरून दाराआड लपत. मग मात्र दुसरा कोणीतरी त्यांना धीर देई.
ज्याला घाबरून हया मुलांची पळापळ झालेली असते,  तो खेडयात गावाकडे त्याच्या त्या आवाज करण्यामुळेच 'टीर्रिक..टीर्रिक वाला' म्हणून ओळखला जातो. वास्तविक तो असतो एक 'पिंजारी' . एक साधासुधा गरीब फिरस्ता व्यवसाईक. गावोगावी जाउन कामधंदा करणा-या अशाच भटक्यांपैकी एक हातावर पोट असलेला.  घरोघरी फिरून कुणाच्या गादीसाठी कापूस पिंजून देणे,  कधी जुन्या गादयांमधील कापूस पिंजून नवीन कापड लावून गादी बांधून दे, तर कधी कधी फक्त फाटकी गादी शिवून छानपैकी कडक उन्हात तापवून दंडूक्याने कुटून गाठी झालेला कापूस फोडून मऊ मऊ गादी तयार करून दे....अशी वेगवेगळी कामे तो करत असे.त्याचबरोबर काहीजण कापडाची खेळणी बनवून ती विकतात . एवढे असून मोबदला म्हणून ठरलेले पैसेही मिळणे किंवा खरे बोलायचे तर मिळवणे हा सुद्धा संयमाची कसोटी पाहणारा क्षण असायचा.याबाबतीत मात्र यांच्या शांत राहण्याची कला आणि क्षमता वाखाणण्याजोगी असते.
         मूळ मुस्लिम समाजातील पिंजारी किंवा मन्सूर लोकांचा हा पारंपारिक अथवा वडिलोपार्जित म्हणता येईल असा हा व्यवसाय आहे. गावातील बारा बलुतेदारांमध्ये जरी यांना स्थान नसले तरी अठरा अलुतेदारांमध्ये यांचा समावेश असतो. कायम फिरस्ती,  एकाच ठिकाणी स्थिर वस्ती नसते यामुळे हा समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच असतो. त्यामुळे मागासलेपण हे ओघानेच सोबतीला येते.  त्यांचे मुख्य आयुध म्हणजे त्यांचे कापूस पिंजून देण्यासाठी वापरले जाणारे धनुष्य असते.ते खांद्यावर अडकवून  त्याची दोरी हाताने झटके देत वाजवत 'टीर्रिक...टीर्रिक...टीर्रिक ' आवाज काढतच तो गावभर फिरत असतो. इतरांप्रमाणे त्याला जोरजोराने ओरडत,  हाका मारत फिरायची गरजच पडत नाही.दोरीचा आवाज हाच त्याचा परिचय असतो. पण त्याच्या याच आवाजाला मात्र लहान मुले घाबरतात.एखादी प्रचंड मोठ्या आकाराची सेफ्टी पिन असावी असा त्या धनुष्याचा आकार असतो. जमिनीवर कापूस पसरून त्यावर ते धनुष्य ठेवून ताणलेल्या दोरीवर कापूस टाकत एका डंबेल्ससारख्या दंडूक्याने दोरीवर फटके देउन कापूस पिंजणे बघण्यासारखे असते.ते पहायला लहान मुलांना तर खूप आवडते. थोडया वेळाने घाबरून लपलेली ती मुले हळूच मोठया माणसाच्या मागे येऊन उभी राहून ही गंमत बघतात. कापूस पिंजता पिंजता पिंजारीदादाचे लक्ष त्यांच्याकडे गेले तर ते त्यांच्याशी गालातल्या गालात गोड हसून डोळयानेच पुढे ये असे खुणावत. घाबरलेले  ते मूल अजूनही साशंक असल्याने मोठय़ा माणसाच्या मागे लपते, पण हळूहळू भीड चेपली की समोर येऊन गंमत बघत बसत.
        धनुकलीने कापूस पूर्ण पिंजून झाला की तो पिशवीत भरून देता देता यांच्यामधला व्यापारी जागा होतो. मालकाला किंवा त्याच्या पत्नीला तो नवीन बिछाना बनवून घेण्यासाठी गळ घालतो. माझ्याकडे चांगले कापड आहे,छान मजबूत आहे .स्वस्तात काम होईल अशी पुस्तीही सोबत जोडतो. ब-याच वेळी ही मनधरणी कामी येते.बिछाना बनवून देण्यासाठी पैसे ठरवले जात. एकदीड तासात छान टम्म फुगलेला ,मऊ मऊ बिछाना तयार होतो. अर्थातच त्याचे शिवलेले टाके हे ठरलेल्या किंमतीप्रमाणे कमी-जास्त असत. मजुरी जास्त व मनाप्रमाणे ठरली असेल तर टाके जवळ जवळ घालून दिले जात आणि जादा घासाघीस करून अपेक्षेपेक्षा कमी मजुरी असेल तर टाके लांब लांब मारून झटकन काम उरकून तेथून निघायची घाई असायची. पण काही वेळा कामाला थोडा जास्त वेळ लागला आणि दुपार होऊन गेली तर मग तो आपली शिदोरी तिथेच बसल्याजागी सोडायचा. घरमालकीणही मग घरातील भाकरतुकडा, कालवणाचा रस्सा एखाद्या ताटलीत वाढून आणून देई. खेडयात कदाचित पैशांची श्रीमंती नसेलही,  पण अशी मनाची श्रीमंती मात्र पदोपदी अनुभवायला मिळते. इथे ठरलेली मजुरी आणि ठरलेले काम याचा विचार देणारीच्या मनात कधीच येत नाही. पण खाणारा मात्र न बोलता, न सांगता त्याची परतफेड थोडे जास्तीचे टाके मारून किंवा थोडी घट्ट शिलाई मारून करत असे. अगदी सहज हे घडत असते, प्रत्येकामध्ये असलेल्या माणुसकीचे आणि जाणिवेचे प्रत्यंतर इथे येत असते.लग्नसराईच्या वेळी तर हया पिंजारीदादांची आठवण हमखास काढली जाई.   आपल्या लाडाच्या लेकीला सासरी जाताना दयायच्या कन्यादानाच्या वस्तूंसोबत एक बिछाना दिला जातो.कधी नवीन बनवून नाहीतर ,तेवढी ऐपत तर नसेल जुनाच कापूस पिंजून त्यात थोडीशी विकतच्या कापसाची भर घालून नवीन कापड घालून बिछाना बनवून घेतला जात असे. यावेळी पिंजारीदादा खराखुरा 'माणूस'  असल्याचे दिसून येत असते. यजमानाची आर्थिक परिस्थिती पाहूनच तो मजुरी सांगतो. यावेळी जास्त घासाघीस होतच नाही. कदाचित देणारा आणि घेणारा या दोघांमधला 'बाप' हा सौदा ठरवत असल्याने जरी किंमत कमी मिळाली तरीही जास्तीचे चारदोन टाके मारून तो लेकीला आशिर्वाद देत असावा.
        काळाच्या ओघात जुने बरेच व्यवसाय  बंद पडले. काहींनी वेगळे मार्ग स्विकारले. परंपरागत व्यवसायात अपेक्षित प्रगतीची शाश्वती नसल्याने वडिलोपार्जित व्यवसायात पडायला त्यांची मुलेही तयार होत नाहीत. बरेच जण आजकाल दिसतही नाहीत. पण पिंजारीदादाच्या बाबतीत थोडीफार आशा अजूनही बाकी आहे. मॅट्रेसचा जमाना आला असला तरी घरोघरी आजही कापसाचे बिछाने आपले अस्तित्व टिकवून आहेत. फिरस्ते कमी झाले.काहींनी  दुकाने थाटली .पण आजही कानावर तो चिरपरिचित आवाज पडतो. अजूनतरी तो काही वर्षे असाच पडत राहिल अशी आशा बाळगायला हरकत नसावी..... अर्थात त्यासाठी शेतक-याचा शेतातला कापूस टिकला पाहिजे आणि त्यासाठी शेती व शेतकरी टिकला पाहिजे. कुठून कुठे कशी सूत्रे जुळली आहेत बघा. सगळेच एकाच सूत्रात बांधले गेलो आहोत. म्हणूनच तर एकमेकांच्या हातात हात घालून राहू या.....

प्रविण म्हात्रे
पिरकोन,  उरण, रायगड
मो 8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com