Monday, December 30, 2019


झटपट 'तापोटी' पेटवा

आला थंडीचा महिना
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला
     
मधाचं बोट कुणी चाटवा...  
  
          तुम्ही जर दादा कोंडके यांचे चाहते असाल (तसा उभा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे म्हणा) तर थोडी जरी थंडी पडली की हे गाणे आठवणार नाही असे होऊच शकत नाही. जरा कुठे गारठा वाढायला लागला की हे गाणे आठवणा-यांची संख्याही वाढायला लागते. याच शेकोटीला उरणच्या काही भागात 'तापोटी' म्हणतात. वास्तविक पाहता ही तापोटी किंवा शेकोटी माहित नाही असा कुणी असणे शक्यच नाही , परंतु बहुतेक वेळा ही गरज म्हणून पेटवली जाणारी असल्याने ती तेवढयापुरतीच लक्षात राहणारी असते तिच्याशी संबंधित काही आठवणी असण्याची तशी शक्यता नसल्यातच जमा असते. खरंच थंडीचा कडाका वाढला म्हणून आजूबाजूचा ओलसर कचरा गोळा करून पेटवलेली,  जुन्या टायरची शेकोटी पेटवून शेकत बसलेले असताना काळकुट्ट धूर निघणारी आणि तो चुकून श्वासाबरोबर जोराने आत ओढला गेला तर दम कोंडून झालेली घुसमट आठवण्याची बाब आहे का ???? .तसेच आग पेटत रहावी म्हणून प्लास्टिकची पिशवी टाकून आग पेटवत ठेवली पण अनवधानाने त्याच वितळलेल्या प्लास्टिकवर नेमका पाय पडल्याने आलेले फोड कुणाला आठवावेसे वाटणार ?? .. गरज आणि नाईलाजाने पेटत्या आगीजवळ बसून हात-पाय शेकून घेणे एवढीच तिची ओळख असते. बाकी तिच्यात काहीच विशेष वाटत नाही....पण या तापोटीच्या ख-या आठवणी म्हणजे काही फक्त ती गवतपेंढा टाकून पेटवलेली आग नसते,तर  तीस-पस्तीस वर्षापूर्वीच्या काळातील ग्रामीण जीवनाचे एक वेगळया प्रकारचे दर्शन त्यातून अप्रत्यक्षपणे घडत असते .त्यावेळी तापोटी ही थंडी आहे म्हणून नाही तर आनंद मिळवण्यासाठी पेटवली जायची .
        आज घरोघरी गॅस आहेत. पूर्वीची "घरोघरी मातीच्या चुली..." ही म्हण आता कालबाह्य झाली असली तरी .दोन-तीन दशकांपूर्वी खरोखरच घरोघरी मातीच्याच चुली होत्या. चूल म्हटले की त्यासाठी सरपण ,लाकूडफाटा आवश्यक आहेच. ते सरपण आणणे हे काम घरातील स्त्रीयांनाच करावे लागायचे. ते काम वाटते तितके सोपे नव्हते ,कारण तात्पुरता लाकूडफाटा गावाशेजारच्या माळरान किंवा कुरणांतून जमवता यायचा. मात्र वर्षभराच्या सरपणाची सोय करण्यासाठी मात्र दूरच्या डोंगरावरील जंगलात जावे लागायचे.  जवळपास आठ-नऊ किलोमीटरचे हे अंतर पायी चालत जायचे जंगलात लाकडे तोडायची. त्याची मोळी बांधायची आणि परत तेवढेच अंतर परत यायचे हे काही साधेसोपे काम नव्हते. तरीही त्याचे छान नियोजन त्यांनी केलेले असायचे सगळ्याजणी पहाटे उठून स्वत:साठी व घरातल्यांसाठी भाक-या, कालवण बनवून एकत्रितपणे निघत.काळोखातच  सहा-सात किलोमीटर अंतर कापून उजेड पडण्यास सुरुवात झाली की नेहमीच्या ठिकाणी पाण्याची सोय पाहून थांबून भाकरी खाऊन घेत. साधारणतः दिसू शकेल एवढा उजेड पडला की मग वेगवेगळ्या गटाने पुढे डोंगरावरील झाडी झुडपांत घुसून जाळण्या योग्य अशा झाडांची लाकडे तोडून जंगलातील वेल किंवा झाडांच्या सालींची दोरी वळून लाकडांची मोळी बांधून परत ठरलेल्या ठिकाणी येऊन इतरजणींची वाट पहात आपल्या सोबतच्या सगळयाजणी जमल्यानंतर मोळया उचलून घरचा रस्ता धरत. पुन्हा तेवढेच अंतर चालत निघायचे तेही एवढे थकून डोक्यावर मोळीचे वजन घेऊन. यात थोडी आनंदाची बाब एवढीच असायची की, परत येताना घरातील दुसरी कोणीतरी व्यक्ती अर्ध्या रस्त्यात मदतीला येत असे. डोक्यावरचा भार जरी कमी झाला तरी परत तेवढे अंतर पायीच चालावे लागत असे. त्याबाबतीत कोणतीही पर्यायी सोय नव्हती. वातावरणाच्या दृष्टीने हे थकवणारे काम हिवाळयातच करावे लागे, कारण थंड वातावरणात ते सुसहय व्हायचे. त्याचबरोबर पावसाळा नुकताच संपून गेलेला असल्याने झाडे झुडपेही वाढून पाने गळायला सुरवात झालेली असायची. त्यामुळे जास्त उपलब्धता आणि तोडण्यास सोपी,  झटपट लाकडे जमवणे शक्य होत असे.
         हिवाळा सुरू झाला की घरातील आई, काकी, ताई या सरपण आणण्यासाठी पहाटे लवकर उठल्या की मग लहान मुलांनाही जाग यायची.तो काळ असा होता की कुणाजवळ स्वेटर असणे , घरात चादरी असणे हे चैनीचेच आहे असे वाटायचे. मोठया माणसांसाठी जास्तीत जास्त एखादा वर्षानुवर्षे वापरत आलेला भोकं पडलेला मफलर असायचा. अंथरुण आणि पांघरुण दोन्हीसाठी आईचे लुगडेच असायचे. त्यामुळे रात्रभर आईच्या ऊबदार कुशीत निजलेली मुले थंडी आणि घरात आईची कामाची चाललेली खुडबूड यामुळे आईसोबतच उठून आईने पेटवलेल्या चुलीजवळ येऊन शेकत बसत.पण आईला मात्र कामाची घाई असल्याने तिला मुलांची मध्ये होणारी लुडबूड अडचणीची ठरायची.मग आई त्यांना घराशेजारी साठवून ठेवलेल्या भाताच्या पेंढयाच्या दोनचार गुंडया देउन तापोटी कर जा असे सांगून त्यांना बाहेर पिटाळत असे. खरेतर मुलांनाही तेच हवे असायचे, पण त्या दिवसांत शेतीची मळणीची कामे नुकतीच उरकलेली असल्याने घराशेजारी,घरावर,आजूबाजूला भाताच्या पिकाचा पेंढाच पेंढा असल्याने आग पेटवणे धोक्याचे असल्याने घरातील वडीलधारी माणसे तापोटी केल्यावर ओरडत असत.  आता मात्र आईनेच सांगितल्यामुळे त्यांचे भागून जात असे.मग काय लगेच सुरक्षित असा कोपरा शोधून पेंढा पसरवला जायचा.घरात जाऊन चुलीतील पेटते लाकुड सावकाशपणे उचलून आग सांभाळत बाहेर आणून आग पेटवायची.सावकाश थोडा थोडा करत पेंढा टाकून आग पेटवत ठेवायची. मस्त शेकत बसायचे.  हा आगीचा उजेड दिसल्यावर शेजारची मुलेसुद्धा उठून शेकायला येत. यावेळी मात्र तापोटी करणा-यातला मालक जागा व्हायचा. तो लगेच मालकी हक्क दाखवत येणाऱ्या प्रत्येक मुलाला आधी थोडातरी पेंढा आणायला सांगायचा.त्याने पेंढा आणल्याशिवाय त्याला जवळ घेतले जात नसे. तो जबरदस्तीने आलाच तरी त्याला दूर करणे, त्याच्या आणि शेकोटीच्या मध्ये उभे राहून ऊब मिळू न देणे असे चालायचे. कधी त्यांना धूर ज्या दिशेला जात असेल तिकडे उभे करणे किंवा चक्क हाताने धूर त्यांच्या दिशेने ढकलणे असे प्रकारही करत असत. बिचा-यांचे डोळे आधीच झोपेमुळे लाल झालेले असायचे त्यात धूर डोळ्यात गेल्याने डोळ्यांना पाण्याच्या धारा लागत.तो तापोटी पेटवणारा तिथला बाॅस असायचा. पेंढा कमी पडल्यावरही पेंढा आणायला तो इतरांनाच पिटाळून स्वत: शेकत बसायचा. असे जरी असले तरी सगळयांनाच शेकत बसायला मज्जा वाटायची. जर यातून आनंद मिळत नसता तर अंथरूण सोडून कोण कशाला घराबाहेर पडले असते.सकाळी सकाळी तापोटीजवळ बसून शेकायची गंमतच न्यारी.....पेटत्या तापोटी जवळ बसून मग 'कोंबडा-कोंबडा'  खेळाला सुरुवात होत असे. पेंढा पेटला आणि आगीचा लोळ वर उठला की सोबत पेटत्या काडयाही वर उडत याच पूर्ण जळून विझलेल्या काडयांना कोंबडा म्हणत .प्रत्येकजण आपापली वर उडालेली काडी निवडून 'माझा कोंबडा जास्त वर गेला,तुम्हाला हरवले...' असे ओरडत.खेळ म्हणावे असे काही नसले तरी मिळणारा आनंद काही वेगळाच असायचा.याच वेळी काही म्हातारी माणसे पण येउन शेकत बसत.ती मात्र हयाची बाॅसगिरी उडवून लावतच वर कुरकुर करत हळूहळू इतरांना बाजूला ढकलत मोक्याची जागा बळकावत.
     आजकाल स्वेटर , शाल व इतर वेगवेगळी साधने उपलब्ध झाली आहेत. भाताचा पेंढाही साठवून ठेवत नाहीत त्यामुळे तापोटी करणे शक्‍य नाही आणि तशी गरजही उरली नाही.उरल्यात त्या आठवणी.....
प्रविण म्हात्रे
पिरकोन -उरण-रायगड
मो. 8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com
          

Friday, December 20, 2019


दीपवनी

आपल्या महाराष्ट्र राज्याला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि त्यापैकी साधारणतः 180 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या रायगड जिल्ह्यात आहे. उरण,अलिबाग,मुरूड,म्हसळे,श्रीवर्धन हे तालुके किनारपट्टीवरचे आहेत. या तालुक्यात राहणारे बहुतेक लोक हे आगरी आणि कोळी समाजाचे आहेत. भरभरुन पडणारा पाऊस आणि त्यावर पिकणारे तांदळाचे पिक, किना-याला लागून असलेल्या खाडया आणि त्यात मिळणारे मासे... यांच्या सहज उपलब्धतेनुसारच या भागातील लोकांच्या दररोजच्या आहारात भात आणि मासे यांचा समावेश असणे म्हणजे काही विशेष नाही. पनवेलची खाडी,  धरमतरची खाडी, रोहयाची खाडी,  राजापूरची खाडी यांनी याभागातील सगळयाच लोकांच्या ताटात भात अन् माशांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही याची  कायमस्वरूपी सोय करून ठेवलेली आहे. बरे या मासेमारीचे स्थळ-कालपरत्वे प्रकार तरी किती आहेत हे सांगणे देखील कठिण आहे. पावसाळ्यात सुरवातीला अंडी घालण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वर चढणा-या माशांची उधवण किंवा वलगण असूदे नाहीतर किना-यावर लांबलचक जाळे पसरून धरलेले वाणं असो. डोल लावून मासे धरने असो किंवा छोटे जाळे म्हणजेच आसूने मासेमारी करणे असो... या तालुक्यातील लोक या मासेमारीच्या परंपरागत कलेत अगदी निपुण आहेत. यातीलच एक वेगळा आणि थोडा अपरिचित प्रकार आहे,तो म्हणजे 'दीपवनी'.
     दीपवनी हा मासेमारीचा प्रकार जास्त परिचित नसण्याची कारणे अनेक आहेत. एकतर याप्रकारासाठी विशिष्ट नैसर्गिक अरुंद खाडी असावी लागते. त्याचप्रमाणे   थोडा संथ पण समुद्राकडून खाडीच्या वरच्या चिंचोळ्या भागाच्या दिशेने वाहणारा वारा, कमी थंडी ,ऊबदार वातावरण आणि संध्याकाळ व रात्र यांच्यामधल्या वेळात पूर्ण ओहोटी लागणे याचाच अर्थ सर्वसाधारणपणे शुद्ध पक्षातील षष्ठी ते अष्टमी अशी तिथी असणे आशा सर्व बाबी जुळून येणे आवश्यक असते. तसेच यासाठी किमान पाच-सहा माणसांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकत्रित, सुसूत्रतेने काम करणे गरजेचे असते. विशेषतः शेवटच्या क्षणी थकल्याने किंवा आळसाने जर एक दोघांनी दुर्लक्ष केले तर हाती काहीच पडत नाही.जवळजवळ चारपैकी एका फेरीत यश मिळते. तीनवेळा थोडक्यातच समाधान मानावे लागते.कधीकधी अगदी रिकाम्या हाताने हात हलवत परत फिरावे लागते.
         दीपवनीला आवश्यक योग्य वातावरण बहूदा माघ -फाल्गुन महिन्यात असल्याने या काळातच दीपवनीला जायचा बेत चतुर्थीलाच एखादयाच्या मनात घोळू लागतो. मग तो आपल्या काही साथीदारांना आपला बेत सांगतो .कोणकोण येणार याची चाचपणी झाली की मग आवश्यक असणारे साहित्य जमविले जाते. फारसे काही विशिष्ट सामान हवे असते असे नाही , पण तरीही प्रत्येकासाठी एक एक आसू व उजेडासाठी कंदील-बॅटरी यांची जमवाजमव केली जाते.  आसू म्हणजे बांबू वळवून त्याची एक गोल फ्रेम बनवलेली असते. दिसताना हा आकार मराठी चार (४) या अंकासारखा परंतु त्या चाराची गाठ खूप मोठी व वरचे दोन्ही हात अगदी छोटे असतील असा हा आकार असतो. त्यावर लहान विणीचे जाळे लावलेले असते.कोकणात साधारणतः प्रत्येक घरी ही आसू पूर्वी असायचीच.म्हणूनच ती सहज उपलब्ध होते. सोबतच उजेडाची पक्की सोय झाली की,  दुसर्‍या दिवशी एक दोघेजण संध्याकाळच्या वेळेत खाडीकडे सहजच रमतगमत फिरायला जाऊन भरती ओहोटीचा अंदाज घेऊन पुढील दिवशी पाण्याची स्थिती कशी असेल याचा आदमास घ्यायचे. त्या अंदाजाने त्यानंतरच्या दिवशी संध्याकाळी किती वाजता निघायचे याची निश्चित वेळ ठरवत असत.
         ज्या दिवशी दीपवनीला जायचे असेल त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या आसूची डागडुजी(यालाच ग्रामीण भाषेत 'तांगलान-तुंगलान' म्हणतात) करून कुठे फाटलेले जाळे तांगलुन घेत. आसूचा गांरां म्हणजेच बांबूची फ्रेम मोडली वा सैल झाली नाही ना , जाळे सर्व बाजूंनी योग्यप्रकारे घट्ट बांधले आहे ना याची खातरजमा करून आपापली आयुधे जय्यत तयार ठेवत.  कंदील असेल तर त्यात राॅकेल भरून काच स्वच्छ पुसून साफ करणे ,पट्टीची वात योग्य लांबीची आहे किंवा नाही , नसेल तर किराणा दुकानातून ती विकत आणणे. ती कंदीलात भरणे ही कामे उरकून घेतली जात. संध्याकाळी सुर्य मावळतीकडे झुकू लागला की हे सगळे वीर आपापल्या आयुधांसह खाडीच्या मुखाशी समुद्राजवळ पोहोचत.  कधीकधी या सगळ्यां वीरांसोबत  माझ्यासारखा एखादा बाजारबुणगाही असायचा. जो प्रत्यक्ष या कामगिरीत सहभागी होऊन चिखलात उतरत नसे. पण बांधावर उभा राहून कंदील-बॅटरी सांभाळणे,  पकडलेले मासे जवळच्या पिशवीत भरणे किंवा त्यांचे कपडे वागविणे अशी कामे तो करत असे.  म्हणून त्याला 'वागव्या' असेच म्हणत. यावेळेपर्यंत ओहोटी लागायला सुरवात झाली असायची.पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आणि सूर्य मावळून अंधार पडायला सुरूवात झाली की ते पाण्यात उतरून आसूने मासे पकडत पकडत समुद्राच्या उलट दिशेने वरवर येत . ते सगळे एका रेषेत सर्व खाडीची रुंदी अडवून धरत, पाण्यात जोरजोराने खळबळ माजवत पुढेपुढे सरकत येत. जेणेकरून मासे घाबरून वरच्या दिशेने पळतील. यावेळी खरेतर कोणीही आपल्या जाळयात मासे मिळतात किंवा नाही याची काळजी न करता जास्तीत जास्त पाण्यात खळबळ माजवणे हे उद्दिष्ट ठेवूनच चालत असत. मिळालाच एखाददुसरा मासा तर तो बोनस समजून वागव्याच्या दिशेने भिरकावून देत आणि तोही चपळाईने तो मासा उचलून पिशवीत टाकत असे,कारण नंतर दीपवनी यशस्वी झाली नाही तर हेच मासे कालवणापुरते म्हणून आधार ठरत.
           हळूहळू रात्र चढायला सुरवात होई, भरतीचे पणीही कमीकमी होत जाई. कंदील धरणा-याने तो एव्हाना पेटवलेला असे.बॅटरी असेल तर मात्र गरजेपुरती चालू बंद करीत असे .छातीभर पाण्यात मासे पकडायची सुरवात केलेली असायची ती आता गुडघाभर पाण्यापर्यंत आलेली असायची. आता खाडीची रुंदीही कमी झालेली असल्याने अडकलेले मासे इकडेतिकडे उडया मारताना दिसू लागत. खरी मासे पकडायची संधी आता मिळू लागलेली असायची. हीच वेळ असायची ज्यात या मासेमारांचे कौशल्य पणाला लागणार असायचे. नीट एकमेकांच्या सहकार्याने आता माशांची वाट अडवून धरत, त्यांना खाली समुद्रात परत जाऊ न देता वरवर पळवणे हे कठीण काम आता सुरू झालेले असायचे. कमी पाण्यात अडकलेले मासेही जाळयात सहज मिळू लागत असतानाच ,त्यांना अडवून ठेवण्यासाठी लगेच पुन्हा जाळे पाण्यात मारावे लागत असल्याने जाळयात आलेला मासा पटकन पकडून पिशवीवाल्याकडे फेकून पुन्हा पाण्याकडे वळावे लागत असते. हे सर्व एकदम पाच सहा जण करत असल्याने पिशवी वागव्याचीही तारांबळ उडालेली असायची. टण् टण् उडया मारत माशांना पाण्यात पुन्हा जाऊ न देता पटापट पकडून पिशवीत टाकताना जी काही कसरत करावी लागे की, त्यालाही दमायला होई.त्यातच मासा जर पाण्यात गेला हे पकडणा-याला दिसले तर त्याच्या शिव्याही खाव्या लागत .पण त्याबरोबरच मज्जाही यायची व आनंदही वाटायचा. मासा पकडला आणि यशस्वीपणे पिशवीत गेला की लढाई जिंकल्याचा आनंद व्हायचा ,पण ही लढाई मात्र हातघाईवरची असायची. शेवटचे टोक जवळ आलेले असायचे ओहोटीचे पाणी पुर्ण खाली गेलेले असे.आता पायाच्या खुब्यापर्यंतच्या पाण्यात आणि छोटया छोटया खडड्यांत अडकलेले मासे जाळे बाजूला फेकून नुसत्या हातांनीच पकडायला सगळेजण सुरूवात करत.  सगळं व्यवस्थित जुळून आलेले असेल तर सगळीकडे मासेच मासे असत. फक्त उचलून पिशवीत टाकायची लगबग असायची.पिशव्या माशांनी भरून टरारून फुगलेल्या असायच्या.  नीट काही जुळले नसेल तर गुडघाभर पाण्यापासूनच अंदाज आलेला असायचा .सगळेच निराश होऊन मिळेल तो लहानमोठा मासा पकडून रात्रीच्या कालवणापुरते तरी मिळावेत अशी आशा करत असत. ब-याचवेळी निराशा पदरी घेऊनच परत फिरावे लागले तरीही पुन्हा मिळतील या आशेने ते पाण्याबाहेर पडत. तिथल्याच खड्डयात चिखलाने बरबटलेले अंग आणि आसू स्वच्छ धुवून घरचा रस्ता धरत.
            दीपवनीचे वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारे मासे हे फक्त बोय (बोईट) या प्रकारचेच असतात. वेगळयाप्रकारचे मासे क्वचितच असतात. या मासे पकडण्याच्या पद्धतीत खूप कष्ट करावे लागते. जवळजवळ दोन तीन किलोमीटर छातीभर पाण्यापासून ते टीचभर पाण्यात येईपर्यंत चिखलातून सलग मासेमारी करावी लागते त्यामुळे शारीरिक क्षमतेचाही कस लागतो. यशापेक्षा अपयशाचीच हमी जास्त असते .तरीही "लाख नाहीतर खाक " या न्यायाने उत्तम एकजूटपणे काम करण्याची कुवत आणि मिळेल त्यात आनंद मानण्याची वृत्ती यामुळे दीपवनीला जाणारे बहाद्दर पुढचा दीपवनीचा मुहूर्त साधायला आनंदाने तयार होतात. काही दिवसांनंतर पुन्हा तेच नियोजन अन् तीच कृती त्याच उत्साहाने करायला तयार होतात. शेवटी नियतीही त्यांच्यापुढे हात टेकते आणि मग भरभरून मासे घेऊन येतानाचा त्यांचा आनंद काय वर्णावा .....तो आनंद प्रत्यक्ष अनुभवण्याचाच असतो.
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com

Monday, December 9, 2019


आठवणीतली उध्वस्त धर्मशाळा

उरण तालुक्यातील खोपटे गावाकडून खाडीवरील पूल ओलांडून गेल्यानंतर लगेच डाव्या हाताला एक नविन रस्ता सुरू झाला आहे. द्रोणागिरी नोड मार्गे उरण किंवा नविन होणा-या करंजा जेट्टीकडे जाण्यासाठी हा एक चांगला,वेगवान आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त असा हा रस्ता मोटारसायकल- कार किंवा इतर खाजगी वाहनाने जाणा-यांसाठी पसंतीचा ठरत आहे. याच रस्त्याने जाताना आज ज्यांचे वय अदमासे पस्तीस-चाळीशीपार असेल अशांचे लक्ष एक वास्तूच्या शोधात त्यांच्याही नकळत भिरभिरत राहते.खरंतर पहिल्या फेरीत ती वास्तू त्यांना ओळखूही येत नाही.मग पुन्हा कधीतरी तरी थोड्या अंदाजाने आणि सावकाशपणे पाहिल्यावर दिसते ती झाडावेलींनी जवळपास पूर्ण झाकलेली आणि वरचे छप्पर नावालाही शिल्लक नसलेली , फक्त दगडी भिंतीच शिल्लक राहिलेली ती तो शोधत असलेली वास्तू.  कित्येकजण मुद्दाम थांबून गाडी रस्त्यावर कडेला लावून रस्त्यापासून शंभर-दीडशे मीटर अंतरावर असलेल्या त्या पडक्या भिंती पहायला जातात. जाताना मनात पंचवीस-तीस वर्षापूर्वीच्या काही आठवणी मनात घोळवत त्याच्याशी साम्य असणारे काही दिसते का हे शोधू पाहतात..... कारण काय तर निव्वळ 'विनाकारण'.
   काय शोधत असतील तेथे???
  नेमके काय होते तेथे???
  कोणता ऐतिहासिक वारसा आहे का या वास्तूला ???...... तर नाही.
मग काही पौराणिक संदर्भ तरी ???....अजिबात नाही.
बरे काही पुरातत्विय वैशिष्ट्ये ???....तर तेही नाही.  मग कोणी खास थांबून पाहण्यासारखे काय आहे तेथे ...
कोणती आहे ती पडकी वास्तू ??? 
ती आहे एक मोडकी तोडकी वापराविना बिनउपयोगाची उध्वस्त 'धर्मशाळा'. आता जर ती एक पडकी वास्तूच असेल तर त्यात एवढे काय विशेष आहे की ती लेखाचा विषय व्हावी.....           रायगड जिल्ह्यातील उरण तालुका हा आकाराने लहान तालुका . पण लहान असला तरी हा तालुका नेहमीच दोन भागांत विभागला गेलेला आहे. पुर्वी तो राजकीय दृष्ट्या अर्धा अलिबाग मतदारसंघाशी आणि अर्धा पनवेल मतदारसंघाशी जोडला होता. सध्या तोच सिडको-नाॅन सिडको असा दोन भागात विभागलेला दिसतो. तालुक्यातील पूर्व भागातील गावे आणि उरण भागातील महालण विभागासह गावे यांना वेगळे केले आहे ते खोपटे गावाजवळून जाणाऱ्या खोपटा खाडीने. आज जरी हा भाग गोडाऊन्स आणि वेअर हाऊसेस मुळे प्रचंड रहदारीचा झाला असला तरी दोन दशकांपूर्वी हा भाग फक्त चिखलाचा आणि खारफुटीने भरलेला होता. ना रस्ते होते , ना दळणवळणाची साधने. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष तर एवढे की गावातील तलावाचेच पाणी प्यावे लागे. शेताच्या मोठमोठया बांधावरून जाणारी पायवाट हेच त्यावेळचे महामार्ग होते.त्यात वर मध्ये असलेली खाडी हा दळणवळणातील सर्वात मोठा अडथळा होता. तालुक्याच्या गावावरून येणारी एस्.टी. एकतर संपूर्ण तालुक्याला फेरी मारून चिरनेर पर्यंत यायची किंवा या खाडीच्या पश्चिमेकडील किना-यापर्यंतच यायची. खाडी पार करायची असेल तर छोटी होडी होती. याच होडीतून पैलतीरावर गेल्यावर जिथपर्यंत एस्.टी. येऊन थांबायची तिथे प्रवाशांना थांबण्यासाठी ही धर्मशाळा एका जैन माणसाने बांधून दिली होती. होडीतून उतरून येथपर्यंत पोहोचताना जर एस्.टी. निघून गेली तर पुढील बस दोन तासानंतर असल्याने .पुढची बस येईपर्यंत विसावा घेण्यासाठी आणि ऊन,वारा,पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी हक्काची जागा म्हणजे ही धर्मशाळा होती.
         काय काय नसेल पाहिले या वास्तूने....सणासुदीला हौसेने तालुक्याला जाऊन आपले बजेट सांभाळून केलेली वेगवेगळ्या वस्तू,कपडे यांची खरेदी जपून आणताना .तर कधी बजेटबाहेर खरेदी गेल्याने प्रवासात उतार देण्यासाठीही पैसे न उरल्याने आता होडीतून पलिकडे कसे जायचे या विवंचनेत असलेले बाबा आणि या सगळयाची काहीच कल्पना नसलेली पण आवडीची वस्तू मिळाल्याने खूष झालेली बालके या सर्वांच्या आनंद-दु:खाचा  साक्षीदार ही वास्तू आहे. गाव सोडून मुंबईला हाॅटेलात काम करून चारपैसे मिळवण्यासाठी निघालेल्या नुकताच लग्न झालेल्या तरूणाच्या आणि त्याला सोडायला म्हणून आलेल्या त्याच्या पत्नीच्या मनातील अबोल खळबळ या वास्तूने अनुभवलीच पण त्याचबरोबर होळी किंवा गणपतीच्या सणाला मुंबईहून येणा-या घरधन्याने सात आठ दिवस आधी कोणाकरवी तरी मी अमुक दिवशी येतो असा निरोप दिलेला असल्याने ते मधले दिवस कसेतरी ढकलून ठरल्या दिवशी ठरल्या वेळेपेक्षा दोन चार तास आधीच येथे पोहचून नव-याच्या वाटेला डोळे लावून बसलेल्या अन्  दर पाच मिनिटांनी डोळयांवर आडवा हात धरून दूरवर येणारी बस दिसते का...हे पाहणा-या पत्नीची अधीरताही जवळून पाहिली असणार. वाट पाहून थकल्यावरही बस आल्याबरोबर त्यातून सामानाच्या पिशव्या घेऊन खाली उतरणा-या आपल्या नव-याला बघून आनंदाने धावत जाणाऱ्या बायकोचा आनंदही पाहिला आणि कधी काही कारणाने ठरल्या वेळी येऊ न शकलेल्या नव-याची वाट बघून परत फिरलेल्या बायकोच्या डोळयातील कुणाला दिसू नये म्हणून लपवत असलेले अश्रूही पाहिले असणारच.
        प्रथमदर्शनी एक दगडी भिंतींची इमारत एवढीच जरी ओळख आपल्याला वाटत असली तरी ही धर्मशाळा हे संपूर्ण तालुक्याच्या दळणवळणाच्या सोई-गैरसोई, त्यात होत जाणारी स्थित्यंतरे या सर्वाचा एक मूक साक्षीदार आहे. आपल्या जिल्ह्यात ब-याच ठिकाणी अशा काही वास्तू निश्चितच असणार. ही पडलेली धर्मशाळा त्या सर्व वास्तूंचे प्रतिनिधित्व करते.  आज जर हा सगळा भाग बघितला तर याच भागातून कधीकाळी गुडघाभर चिखल तुडवत आज जीला आपण टिन का डिब्बा म्हणून हिणवतो किंवा गरीबांची लालपरी म्हणून अनादर करतो त्या एस.टी बसने प्रवास करणेही विमानात बसल्याचा आनंद मिळवून देत होती हे आताच्या नव्या पिढीला पटणार नाही. सध्या अर्ध्यामुर्ध्या भिंती पाहून आजची पिढी कदाचित तिच्याकडे पाहून नाक मुरडेल,पण आपली जबाबदारी आहे ती या वास्तूची खरी ओळख त्यांना करून देण्याची.  हा विषय फक्त एका गावातील एखाद्या इमारतीचा नाही तर गावोगावी असलेल्या अशाप्रकारच्या अनेक ठिकाणांचे काळाच्या ओघात म्हणा किंवा विकासाच्या वाटेवर चालताना उपयोगशून्य होऊन आज विस्मरणात गेलेल्या , पण आपल्या गतकालात वैभवशाली सुवर्णकाळ पाहिलेल्या यांसारख्या कित्येक वस्तू, वास्तू वा ठिकाणांची किमान माहितीतरी आज उपलब्ध व्हावी व अशा  दुर्लक्षित होऊन विमनस्कपणे कसाबसा तग धरून उभ्या असलेल्या वास्तूंचा परिचय व्हावा हीच अपेक्षा. या धर्मशाळेच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील अशाच काही स्थळांच्या आठवणी जागवल्या गेल्या तर त्यासारखे आनंददायी दुसरे काही असेल असे वाटत नाही....हे सर्व लवकरात लवकर होऊ दे. नाहीतर उरणच्या या परिसरात होणारी विकासकामे,  तयार होणारे रस्त्यांचे जाळे पाहता या उरल्या सुरल्या भिंतीही फारतर चार पाच वर्षेच टिकतील.नंतर कुणालाही समजायच्या आत त्यावरून बुलडोझर फिरवून भुईसपाट केली जाईल. मग मात्र दाखवून सांगण्यासारखे काहीच उरणार नाही.कुणाच्याच हातात नसेल ते,  अगदी काळाच्याही......

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ई मेल pravin.g.mhatre@gmail.com
       

Wednesday, December 4, 2019


कळीदार कपुरी पान........





"कळीदार कपुरी पान , 
कोवळं छान केशरी चुना
रंगला कात केवडा, 
वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा....."
सुलोचना चव्हाण यांनी गायलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले हे अजरामर गीत असो किंवा
"पान खाएँ सैया हमारो, साँवली सुरतीया होंट लाल लाल... " हे आशाताईंच्या आवाजातील शंकर जयकिशन यांचे गाणे आसो...पान म्हटले की सगळयांनाच 'होंट लाल लाल... ' ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.त्यात अजून 'खईके पान बनारसवाला... म्हटल्यावर तर 'बंद अकलका ताला ' खुलायला पण वेळ लागत नाही. असे हे पान आपल्या सर्वांना 'विडयाचे पान ' या नावाने परिचित आहे. भरपेट झालेले जेवण आणि त्यावर केलेले तांबुलप्राशन' आपल्या आयुर्वेदातही मानाचे स्थान पटकावून बसलेले आहे. पण हे खायचे पान फक्त खाण्यासाठीच वापरले जाते असे नाही.आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात यानेच आदयपूजन केले जाते .ते आणि या पानावर ठेवलेली सुपारी हेच त्या गजाननाचे रुप मानले जाते आणि त्याचेच पूजन करुनच शुभकार्याला सुरुवात केली जाते.
नागवेल पानाच्या उत्पत्तीची एक कथा सांगितली जाते ती अशी......
देव दानव मिळून समुद्रमंथन केले. एक एक करत रत्ने निघत गेली आणि एकदाचे ज्यासाठी हा सर्व खटाटोप केला होता त्या अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी अवतरला. अमृत प्रथम आपल्यालाच मिळावे यासाठी देव आणि दानव दोघेही आतुर झाले .शेवटी श्रीविष्णूने मोहिनीरुप घेऊन देवांना अमृताचे वाटप केले व राहिलेले काही थेंब नागराज नावाच्या हत्तीच्या म्हणजेच गजराजाच्या साखळदंड बांधलेल्या खांबाजवळ झटकले त्यातनच एक वेल उगवून ती नागाप्रमाणे वळसे घेत सरसर त्याखांबावर वर चढत गेली.तिच्या त्या सर्पाकार चढण्यामुळे आणि नागफणीसारख्या पानांमुळे तिला नागवेल म्हणू लागले .अमृतबिंदूंपासून उत्त्पत्त्ती झाल्यामुळेच त्या पानांचा विडा भोजनानंतर खायला देवांनी सुरुवात केली आणि अर्थातच मग त्याला सर्वमान्यता मिळाली .यथाकाल हे खायचे पान म्हणून परिचित झाले.
नागवेल पायपरेसी कुलातले आहे अन् त्यामुळेच पायपर बीटल हे शास्त्रीय नाव दिल गेले आहे. नागवेलीचे मूळ स्थान जावा बेटे असून कपूरी, मलबारी, अशा जाती प्रसिद्ध आहेत.वेलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे कांडे आलटून पालटून कलंडतच चढत जाते आणि आपल्या नावातील नाग या शब्दाला न्याय देते.नागवेलीचा त्रयोदशगुणी विडयाला तर धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही ठिकाणी सर्वगुणसंपन्न मानले जाते आणि ते खरेही आहे ,कारण यात कात, चुना, सुपारी, विलायची, लवंग, बडीसोप, खोबरे, जायपत्री, जेष्ठमध, कापूर, कंकोळ, केशर आणि खसखस असे तेरा आरोग्यदायक घटक असतात. यातील प्रत्येकाची गुणकारी अशी ओळख आहे .मग हे तेरा एकाच विडयात असतील तर मग काय बोलायलाच नको. यासह गोविंदविडा, पानपट्टी , पुडीचा विडा, पुनेरी, मद्रासी, तिखट, कलकत्ता , बनारसी असे कितीतरी प्रकार व रुपाने हे पान आपल्याला भेटतच राहते. कोणी पान खात असेल किंवा नाही पण प्रत्येकाने कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी मसाला पान हे खाल्ले असेलच. अगदी लहानपणी किंमत परवडत नसल्यानेदोन तीन मित्रांनी एक मसाला पान विकत घेऊन ते वाटून खाल्लेले असणारच नाही का...
पान खातानाही काही संकेत पाळले जातात.पानाचा विडा तयर करताना प्रथम त्याचा देठ आणि शेवटचे टोक तोडून टाकतात. देठ आणि टोक खाऊ नये असे मानले जाते. यामागे पानाच्या आत वास्तव्य करत असलेल्या देवदेवता आहेत, कारण पानवेलीच्या पानाची उजवी बाजू ब्रम्हदेवाची , डावी बाजू पार्वतीची, मध्ये सरस्वती , लहान देठात श्रीविष्णू ,मोठया देठात अहंकाराची देवता व टोकात दारिद्रयलक्ष्मी, तर पानाखाली मृत्यूदेव आहे असे मानतात आणि त्यामुळेच देठ व टोकाची गच्छंती होते.
नागवेल पानाचे औषधी गुणधर्म ब-यांच जणांना माहीत असतील .वात व कफाच्या विकारावर तसेच मुखशुद्धीसाठी पान खाल्ले तर आराम पडतो. डोके जड होणे, दुखणे, शिंका येणे- नाक गळणे यावरही रामबाण उपाय आहे.
मात्र याच दैवी पानासोबत काही लोक तंबाखू , मावा असे विघातक पदार्थ खातात आणि कुठेही लाल पिचकाऱ्या मारुन भिंती, जिन्याचे कोपरे, सार्वजनिक वाहनांतील खिडक्या घाण करतात तेव्हा मात्र राग तर येतोच पण किळसही वाटते. यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणवणारेही असतात हे दुर्दैव !! अशावेळी लहानपणी प्रत्येक लग्नघराच्या चुना व निळीच्या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर अगदी बाळबोध लिपीत, वाकडया तिकडया अक्षरात लिहलेला.... " या बसा पान खा, पण भिंतीवर थुंकू नका..." हा वरवर प्रेमळ वाटणारा पण सूचनावजा सल्ला आजही ठिक ठिकाणी असावा असे जरूर वाटून जाते.....भोजनानंतर खाल्लेला पानाचा विडा हा अन्नयज्ञातील सांगतेची आहुती समजून त्याचे पावित्र्य राखून खावा हीच अपेक्षा...
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण
मो.8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com

Tuesday, December 3, 2019


दगडाच्या वस्तू..
सुंदर माझे जाते गं
फिरते बहुत ।
ओव्या गाऊ कौतुके
तू ये रं बा विठ्ठला ।।
जीव शिव दोन्ही सुंडे गं
प्रपंचाच्या नेटे गं ।
ओव्या गाऊ कौतुके
तू ये रं बा विठ्ठला.........
        काही वर्षे मागे गेलो तर खेडयातली पहाट अशा जात्यावरच्या ओव्यांनी आणि सोबत जात्याच्या एकलयीतील घरघरीने उगवत असलेली आपण अनुभवलेली असेलच. नसेल अनुभवली तर आपण एका स्वर्गीय सुखाला पारखे झालो असे समजायला काहीच हरकत नाही. काय छान, सुखद अनुभव असायचा तो. पहाटे पहाटे कोंबडा आरवला की , घरातल्या कर्त्या स्त्रिया उठून झाडलोट करून जात्यावर बसत. जमिनीवर अंथरलेल्या एका धडशा फडक्यावर दगडी जाते ठेवून जात्याच्या वरच्या पाळीवर असलेल्या छोटया छिद्रात लाकडी खुंटा ठोकून बसवत.  शेजारी सुपात दळणासाठीचे, आदल्यादिवशी पाण्याने धुवून कडक उन्हात वाळवून ठेवलेले तांदूळ भरुन ठेवलेले असायचे. मग दोघीजणी जात्याच्या दोन बाजूला समोरासमोर बसत. दोघींनीही आपला डावा पाय घडी करून जवळ घेतलेला असायचा तर दुसरा पाय जात्याच्या समांतर बाजूला लांब पसरलेला असायचा . शेजारी असलेल्या अंथरूणावर लहान मुले अर्धवट झोपेत लोळत पडलेली असत ,त्यांचा डोक्यावरून मायेने सावकाश हात फिरवत फिरवत नंतर एक हात खुंटयाला व दुसर्‍या हाताने सुपातील दाणे जात्यात टाकत. जात्याच्या मुखात दाण्यांची मूठ पडताच. त्यांच्या मुखातूनही सुरेल ओव्या आपोआपच बाहेर पडत. दोघींही खुंटयाला धरलेला हात अगदी सहज ताळमेळ राखत जात्याला गोलाकार फिरवत. 'जात्यावर बसले की ओवी आपोआप सुचते' अशी एक म्हण आहे आणि ती खरीही आहे.सूर्योदयापर्यंत एक दोन पायल्यांचे दळण सहज दळून काढत. ब-याच वेळी तर एकटीच जाते ओढून दळण करत असे. जसजशा ओव्या बाहेर पडत तसतसे पीठही जात्यातून बाहेर पडू लागायचे. हे जाते म्हणजेच जुन्या काळातील हा एक ग्राईंडरच होता. जात्याचेही दोन तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार हे तांदूळ दळणासाठी वापरले जाते जे साधारणत: दीड फूट व्यासाची एकावर एक ठेवलेली दोन गोल पाळं असलेले ते "पीठजाते" . तर दुसरे दगडाचेच पण जवळपास अडीच ते तीन फूट व्यासाचे जाते असायचे जे भात दळून तांदूळ काढण्यासाठी उपयुक्त पडत असे.त्याची ओळख "भात जाते " अशी आहे .....आणि हो , जात्याचा एक अनोखा उपयोगही क्वचित प्रसंगी खेडेगावात करत. जर कोणी पाण्यात बुडाला आणि त्याला पाण्याबाहेर काढले की त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला जात्यावर बसवून गरगर फिरवत.  एकदा का त्याचे पोट ढवळून निघाले की उलटीवाटे सर्व पाणी पोटाबाहेर पडे. अशाप्रकारे माणसाचा जीव वाचवण्यासाठीही हे जाते उपयोगी पडे........प्राचीन काळापासून माणूस जाते वापरत आला आहे. अगदी मोहेंजोदडो उत्खननात लोथल येथे दगडी जाती सापडली आहेत.हे जाते म्हणजे अश्मयुगीन माणसाची भटकंती संपून शेती करणा-या स्थिर मानवी समाजाची निर्मिती झाल्याचे निदर्शक असल्याचे सक्षज लक्षात येते.           जाते हा जसा जुन्या काळातील ग्राईंडर होता, तसाच त्याकाळी घरोघरी एक दगडी 'मिक्सर' असायचा.आठवला का हा मिक्सर कसा असायचा तो ???.... हो ! बरोब्बर ... तोच आपला " पाटा-वरवंटा" . छान पंचकोनी आकाराचा दगडाचा पाटा आणि दंडगोलाकार मधला भाग फुगीर असलेला वरवंटा प्रत्येक घरात हमखास आढळून येत असे. मिरची - खोब-याचं वाटण वाटायचे असो ,की खरपूस भाजलेल्या सुकटीची सुक्या किंवा ओल्या मिरच्या घालून वाटलेली झणझणीत चटणी असो, पाटा-वरवंटा हा लागायचाच. जंगलातून आणलेली हिरवी करवंदे ठेचून त्यांची छान 'कंदोरी' बनवायची असेल तर पाटा-वरवंटा हवाच असायचा. पण हा पाटा फक्त वाटण वाटणे किंवा चटणी वाटण्यापुरताच मर्यादित नाही , तर नवीन जन्मलेल्या बालकाची पाचवी करताना सटवाईची पूजा करण्यासाठी हाच दगडी पाटा अजूनही वापरतात.तीच गोष्ट तेच लहान मूल मोठे होऊन त्याचे लग्न करायचे ठरले की,लग्नात  देव उठवण्यासाठी आवश्यक असतो तो पाटा वरवंटाच. एवढेच नव्हे तर घरातील आजी आजोबा आपल्या उरल्यासुरल्या दातांनी जेव्हा चणे-फुटाणे खाता येत नसतील तर ते यावरच छानपैकी वाटून खात.
     जाते असो किंवा पाटा-वरवंटा असो. पीठ नीट दळून बारीक होण्यासाठी , वाटण बारीक वाटून होण्यासाठी त्यावर तिरक्या,आडव्या तिडव्या बारीक खाचा पाडलेल्या असायच्या. या अशा खाचा पाडण्याला 'टाकी लावणे' म्हणतात.दर दोन तीन वर्षांनी जात्याला आणि पाटयाला लावावी लागत असे (ते प्रल्हाद शिंदेंचं 'तुझ्या जात्याला लाव गं टाकी... हे गाणं आठवतं का.).. त्या टाकी लावणा-यांची म्हणजे पाथरवटांची "जात्याला,पाटयाला टाक्की लावून घे गं बाई.... किंवा 'ऐ टाक्कीय्य.."अशी हाक गेल्या काही वर्षांत ऐकायलाच मिळत नाही. घरोघरी आलेल्या इलेक्ट्रिक मिक्सर,ग्राईंडरने त्यांचा व्यवसाय कधीचाच मोडकळीस आला आहे.
          आणखी एक दगडी वस्तू पूर्वी घराघरात असायची. ते म्हणजे घराचे नाभी स्थान मानले जाणारे 'दगडी ऊखळ.'  याबात जुने लोक किती आग्रही असत त्याचे उदाहरण दयायचेच झाले तर........
    एकदा एक माणूस घरात पाहुणा आला. त्याला पाणी हवे होते पण दिलेले पाणी त्याने प्यायला नकार दिला .कारण म्हणे तुमचे घर अपूर्ण आहे.घराला नाभीच नाही,म्हणजे घरात उखळ नाही आणि अशा घरचे पाणी मी पिऊ शकत नाही.नंतर त्याला घरातील उखळ दाखवल्यानंतर त्याने पाणी घेतले. आता शहरात तर अजिबात उखळ नसते. बिल्डरांनी जागेची कमतरता आणि ग्राहकांची अगतिकता याचा अचूक फायदा घेत अशा भारतीय अन् त्यांच्या मते बिनउपयोगी वास्तूशास्त्रानुसार घर मिळणेच शक्य नाही अशी मखलाशी करून आपले स्वत:चे उखळ मात्र पांढरे करून घेतले.तर गावात खूप जुनी घरे वगळता ते कुठेही पहायला मिळणार नाही. नवीन पिढीला हे सगळं थोतांड आहे पटवून देण्यात तथाकथित 'फुरोगामी'(?) यशस्वी झालेत.त्याऐवजी चायनीज फेंगशुईच्या वस्तू त्यांच्या गळ्यात मारुन आपल्या तुंबडया भरून घेतात. इकडे आपण घरचे सोडून परक्याला आपले मानून आम्ही 'अॅडव्हान्स' झाल्याचा तोरा मिरवत बसलो आहोत आणि आम्हीच दगड आहोत हे जगाला दाखवून देत आहोत.
        दगडी वस्तूंबद्दल बोलायचे आणि खलबत्त्याची आठवण काढायची नाही हे कदापि शक्य नाही. स्वयंपाकघरातील एखादया कोप-यात का होईना पण आपले स्थान पक्के करून ठेवलेला खलबत्ता गृहिणींसाठी बहुपयोगीच. आले लसणाची पेस्ट बनवण्या पासून खोबरे कुटण्यापर्यंत खलबत्ता कामी यायचा. कधीकधी हाताशी हातोडी नसेल किंवा नेमक्या वेळी ती सापडत नसेल तर खलबत्त्यातील बत्ता हातोडी म्हणून वापरता येत असायचा.(कित्येकांना खल आणि बत्ता हे दोन शब्द आहेत हेच माहित नाही, ज्यांना माहित आहे त्यांना खल कुठला आणि बत्ता कुठला हेच ओळखत नाही..अगदी 'नटबोल्ट' सारखे) अर्थात याच्या दगडी रूपाबरोबरच लोखंडी,  पितळी असे वेगवेगळे अवतार साथीला असतातच. अगदी आयुर्वेदातील काही चाटणे,भस्मे घोटण्यासाठी तर संगमरवरी खलबत्तेही वापरतात.
       काळ बदलला , माणसे बदलली , घरे बदलली,  तशा घरातील वस्तूही बदलल्या . अगदी आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांसाठी खस्ता खात त्यांना मोठे केल्यानंतर जसे त्या मुलांच्या घरात म्हातारे आईवडिल अडगळीत पडतात, अगदी तशाच यावस्तूही आता एकतर अडगळीत पडलेल्या दिसतात नाहीतर घराबाहेर फेकलेल्या दिसतात. काळाची चक्रे उलटी फिरवता येत नाहीत हे निर्विवाद सत्य असले तरी कधीकाळी माणसाचे जीवन सुकर करणा-या या वस्तूंचा किमान परिचय तरी आपल्या भावी पिढीला करून दयायला काय हरकत आहे. 
             "राकट देशा, कणखर देशा ,
               दगडांच्या देशा.."
अशी ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्रात तरी हे व्हायलाच हवे नाही का ????

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com