Friday, March 29, 2019


दोरवे
मार्च महिना उजाडला की होळीचे वेध लागायचे. होळी म्हटले की काटेसावरीचे झाड हे ओघाने आलेच. मग लहान मुलांना आठवण यायची ती दोरव्यांची. दोरवे म्हणजे काटेसावरीचेच फळ लांबट, साधारणतः 12ते 15 सेंटिमीटर लांबीचे व दोन्ही बाजूने निमुळते असे हे दोरवे उकडून खाणे म्हणजे गावातील सर्व लहानथोरांचे आवडीचे. लहान मुले तर शनिवारी, रविवारी दुपारी आकडी(बांबूच्या लांब काठीला वरच्या टोकावर एक छोटी काडी बांधून बनवलेला हूक) घेउन गावाशेजारच्या कुरणांत जात. कधीकधी एखादयाची मोठी बहीण वगैरे सोबतीला असायची. दोरवे आकडीने फांदया हलवून पाडायचे. प्रत्येक दोरव्याचे मागचे टोक दातांनी थोडे दाबून बघायचे. पटकन तुकडा पडला तर तो कोवळा म्हणून फेकून दयायचा व कडक लागला तर जून समजून घ्यायचा, कारण कोवळे दोरवे उकडून खाताना कडू लागतात आणि जून असतील तर मात्र चव.. आहाहा (ती खाल्ल्यावरच समजते) जमा झालेले दोरवे घेउन घरी यायचे. थोडा आराम केला की हीच वानरसेना ती फळांनी भरलेली टोपली ,टोप म्हणजे पातेले घेउन गावदरणीला निघायची, सोबत भाताचा पेंढा, पाळापाचोळा घेउन जायचे. तिथे तीन दगडांचा चुला मांडून आग पेटवायची टोपात दोरवे टाकून पाणी व अंदाजे मीठ घालून उकडत ठेवायचे. मग एकेकाने लागेल तसा पेंढा, पालापाचोळा, वाळलेले गवत जमा करून आणायचे. ही जबाबदारी सगळयांनी समानपणे सांभाळायची. सोबतीला इतरही मुलांच्या गँग आपापले दोरवे उकडायला आलेले असायचे. त्यामुळे कधाकधी जागेवरून, तुमचा धूर आमच्या डोळयात जातो म्हणून छोटीछोटी भांडणेही व्हायची. पण ती शक्यतो घरपर्यंत जात नसत(कारण घरी दोन्ही पार्टयांना मार मिळण्याचीच खात्री असायची).
उकडून झालेले दोरवे समान वाटप करायचे. ज्याचा टोप (पातेले) असेल त्याला तीन-चार दोरवे जास्त दिले जायचे. मग खाणे सुरू. तेही स्टईलिशपणे. उकडलेला दोरवा टोकाकडून दगडावर किंवा कडक जागेवर आपटला की त्याच्या टरफलाचे भाग वेगवेगळे होऊन आत कापसात लपेटलेला दोरवा बाहेर यायचा, त्याच्या फोडी वेगवेगळयाकरून त्यातील बिया खायच्या. कडू असेल तर फेकायच्या आणि छान असेल तर माझी छान लागते म्हणून मित्रालाही तुकडा दयायचा. टरफलाच्या छिलक्या निघायच्या त्यांचा आकार होडीसारखा असायचा (आम्ही त्यांना होडयाच म्हणायचो) त्या मधोमध दुमडून नंतर त्या केसांवर अडकवायच्या. हा नजारा अगदी सध्या काही स्त्रिया रोल लावून केस लावतात तसाच काहीसा दिसायचा. घरी परत आल्यावर प्रत्येक जण दोरवे दे म्हणायचा. आपण आपले कोणाला दयायचे त्याला दयायचे न पेक्षा धूम ठोकून घरी... पुन्हा पुढच्या सुट्टीची वाट बघायची.
घरात सुद्धा दोरवे उकडतात. रात्री जेवण उरकले की चुलीवर हे दोरवे उकडत ठेवायचे मंद आचेवर रात्रभर ते शिजत राहतात. हे पूर्ण मुरलेले दोरवे तर चवीला उत्तम लागतात.... सध्या मात्र गाव सुटले, शहराचा रस्ता धरला. गेले ते दिन गेले, राहिल्या त्या आठवणी......
प्रविण म्हात्रे, पिरकोन -उरण (रायगड)


3 comments:

  1. ब्लॉगिंगच्या क्षेत्रात मन:पूर्वक स्वागत!💐

    ReplyDelete