संक्रांतीचा फेरा
संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस किंक्रातीचा. सकाळ उजाडली ती नेहमीच्या सकाळप्रमाणे नव्हती .सगळ्या गावभर खळबळ माजलेली विहरींवर, गावातील तळयावर जिथेजिथे गावातील बाईमाणसे एकत्र भेटत होती, तिथे तिथे चर्चांना उधाण आले होते. सगळयांच्या तोंडी एकच विषय होता आणि तो म्हणजे कालच्या रात्री जे काही घडले होते ते आणि प्रत्येकजण आपापल्या वर्णनकौशल्याचा अंतिम कस लागेपर्यंत ऐकलेल्या गोष्टीत अजून भर घालून रसभरीत (खरंतर स्वत:ची भिती लपवून) वर्णन करत होते...... कारण विषयच तसा होता... गावात कालच्या संक्रातीच्या रात्री 'संक्रातीचा फेरा' आला होता. एकदोन लोकांनी नव्हे तर गावातील शे-दीडशे लोकांनी अगदी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी संक्रांत आणि किंक्रांतीची जोडी गावभर घुंगराचा खुळखुळ आवाज करत फिरताना पाहिली होती. कुणी खिडकीतून,कुणी दरवाज्याच्या फटीतून तर कुणी आपल्यापासून पन्नाससाठ फूट अंतरावरून हा फेरा जाताना पाहिला होता.गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने तर त्याच्या पाठीमागे जाऊन त्यांना ओरडून थांबवण्याचा प्रयत्नही केला होता, अर्थात दुसऱ्या दिवशी त्यांना का कोण जाणे पण थंडी,हुडहुडी भरून ताप आला होता हे मात्र खरे!.. भलेभले नास्तिक सुद्धा तोंडात मिठाची गुळणी घेऊन अळीमिळी गुपचिळी धरून बसले होते. हा संक्रातीचा फेरा पाहणा-या प्रत्यक्षदर्शींची संख्याच एवढी मोठी होती की, त्यांच्याशी प्रतिवाद करून 'असे काही नसते' हे पटवून देणे त्यांच्याही आवाक्याबाहेरचे होते. मन मानायला तयार नव्हतेच,पण कान जे ऐकत होते ते नाकारणे शक्यही होत नव्हते.
गावातील 'भगत-भगतींनीनी' तर रात्रीच्या प्रसंगाबद्दल आपल्याला आधीच कसे माहित होते.आपण हे आधीच कसे सांगून ठेवले होते हे छातीठोकपणे सांगायला सुरुवात केली होती. कितीकिती दाखले देऊ आणि नको असे त्यांना झाले होते.काहींनी तर आपण आरतीचे ताट घेऊन बाहेर येऊन संक्रांत-किंक्रांतीची आरती करण्यासाठी बाहेर यायचा प्रयत्न केला असता, त्या कशा आपल्यासमोरून गायब होऊन गल्लीच्या दुसऱ्या टोकाला कशा प्रकट झाल्या हे अगदी मनोभावे सांगायला सुरवात केली होती. सगळेच चिंतेत होते. गावात असा संक्रांतीचा फेरा का यावा ? आता त्याचे काय परिणाम होतील ? काही अघटित तर घडणार नाही ना ??? असे ना-ना प्रश्न बहुतेकांना पडले होते.यावर उपाय काय,यातून मार्ग कसा काढता येईल ही चर्चा घरीदारी रंगली होती.प्रत्येकजण मनातून घाबरलेला होता.पण उसने अवसान आणून काहीतरी केले पाहिजे असे सांगतही होता. दिवस कसातरी सरून जाईल, पण रात्रीचे काय... कारण आज तर किंक्रातीचा दिवस आणि 'करिदिन' म्हणजे अजून जास्त घातक.हा विचार कुणालाही शांत बसू देत नव्हता. गावातील कुणीच आज अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडायला तयार होईना. दुपारी शेतावर कामाला जाणाऱ्या स्रियाही आज नकोच जायला असा विचार एकमेकींजवळ बोलून दाखवत होत्या. गावात 'फेरा' आला होता हे आता जवळपास सगळयांनी मान्य केले होते.परंतु "पुढे काय...??" हा एकच यक्षप्रश्न समोर आ वासून उभा राहिला होता. एकंदरीत गाव खरेच संक्रातीच्या फे-यात सापडले होते.
अन् अचानक कोणीतरी रागाने आणि जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला.आजूबाजूच्या आयाबाया हा फुकटचा तमाशा पहायला जमल्या. तेव्हा त्याच्या कानावर दिलेल्या शिव्या पडल्या अन् त्या देण्यामागचे कारणही समजले. ज्यांना हा शब्दांचा मार दिला जात होता, त्यांचा गुन्हा हा होता की त्यांनी एक चांगली नवी कोरी साडी फाडली होती. ती साडी कशी फाटली हे सगळयांना समजले आणि संक्रातीच्या फे-याचे रहस्य व या फाटक्या साडीचा सगळा उलगडा झाला.काय होते हे प्रकरण ? त्यासाठी संक्रातीच्या दिवसात आणि मुख्यतः रात्री घडले होते ते असे होते...
आज मकर संक्रांतीचा दिवस.
संध्याकाळची वेळ सरून रात्र आपले हातपाय पसरायला सुरुवात करू लागलेली.क्रिकेटच्या संघाची मिटिंग सुरू झालेली होती. संक्रांतीचा हा असा एक दिवस जो सर्वजण तिळगूळ देऊन एकमेकांमधली कटूता दूर सारण्याचा संदेश देत "तिळगुळ घ्या , गोडगोड बोला...." अशी विनंती करण्याचा.पण इथे जमलेले सगळेजण मात्र दिवसभर खाल्लेले तिळगूळ जणूकाही पूर्णपणे पचवून वागण्यातला आणि बोलण्यातला गोडवा विसरून गेल्यासारखे एकमेकांवर डाफरत बसले होते.विशेष म्हणजे तीन वर्षे या दिवशी याच वेळी हेच चित्र असायचे आरोपीच्या पिंजर्यात दरवर्षी नवीन वेगवेगळा 'बकरा' असायचा .तेवढाच काय तो फरक , बाकी सर्व प्रसंग मागच्या वर्षीच्या झालेल्या एपिसोडचा "टू बी कंटिन्यूड..." पार्ट असायचा आणि त्याला कारणही तसेच मागच्या दोन वर्षात घडलेले. आजही तेच घडले होते.मकर संक्रांतीच्या दिवशी आयोजित केलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसर्यांदा पराभव झाला होता. हया क्रिकेट संघाचा सेमी फायनलमध्ये पोहचून कोणत्या तरी क्षुल्लक चुकीमुळे हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेऊन पराभवाची माला गळयात पडलेली होती. त्याबद्दल चर्चा व चिंतनाकरीता संघाच्या अध्यक्षांनी मिटिंग बोलावली होती. संघाचा कर्णधार मान खाली घालून मोक्याच्या क्षणी महत्वाचा झेल सोडलेल्या एका सहकाऱ्याला तिरक्या नजरेने बघत बडबडत होता.तसे पाहता गप्प कोणीच बसले नव्हते.एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत पराभवाला कसा हाच जबाबदार आहे हे शेजारी बसलेल्या दुसऱ्या सहका-याला सांगत होता.तर कधीही बॅटही हातात न धरलेले पण नेहमी संघासोबत राहून प्रोत्साहन देणारे, वयाने मोठे असलेले संघाचे 'शुभचिंतक' "काहीही करा पण यंदा आम्हाला एक तरी बक्षीसाचा कप हवा.." असा धोशा लावून वातावरण तापलेले कसे राहील याची काळजी घेत असावेत असा संशय येण्याइतपत खेळाडूंवर दबाब आणत होते.
ब-याच वाद-प्रतिवादानंतर, ब-याच रागवारागवी आणि रूसव्या फुगव्यानंतर एकदाची मिटिंग संपली तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते .आपण अजून जेवलो नाही , आपल्याला भूक लागली आहे याची जाणीव आता प्रत्येकाला(विशेषत: अध्यक्षालाच) झाल्यामुळे अध्यक्षांनी मिटिंग उरकती घेतली. सर्वजण जेवायला आपापल्या घरी गेले....... पण त्यातले काहीजण मात्र तेथेच थांबले. गरम झालेली डोकी आता शांत झाली होती. कुरापती मेंदू उसळया मारायला लागला होता. चला आता 'काहितरी' करू या.... काय करायचे सुचेना...पण या काहितरी करू या विचारातून..." आपण संक्रांतीचे सोंग काढूया का..?" एक भन्नाट आयडिया एकाने मांडली. लगेच मंजूरही झाली. दोघेजण साडी लावायला तयार झाले.पण एकाने फुलपँटवरच साडी गुंडाळली. कपाळावर कुंकवाचा मोठा मळवट भरला. एका गोठयात बांधलेल्या गाईच्या गळयातून घुंगरू घेऊन एकजण आला. एवढया वेळात इतरही सगळे जमले.जवळजवळ तीस-बत्तीस जण होते. मध्यरात्रीचा सुमार,त्यात अंधार आणि त्या अंधारात घुंगरू वाजवत हातातली काठी आपटत हे दोघे निघाले.त्यांच्यापुढे काही अंतर राखून आठदहा जण कानोसा घेत चालत होते. उरलेले मागे दबक्या पावलांनी चालत होते. ते चित्र एवढे भयानक वाटत होते की सोबत असणा-यांच्याही ह्रदयाचे ठोके वाढले होते. जेथून ते जातील तिथल्या घरातील चालू लाईट बंद करून लोक गुपचूप झोपत होते. फुलपँटवर साडी गुंडाळणारा तर जास्तच भितीदायक वाटत होता, कारण यावर्षी संक्रांत अर्धनरनारी रूपात होती आणि हा पँट आणि साडीत. तेवढयात गावातील एक मागून यायला आणि हे दोघे रस्त्यावरच्या दिव्याखाली उजेडात यायला एकच गाठ पडली. तो जोराने "कोण आहे रे..."म्हणून ओरडला तसे हे दोघे तिकडे बघायला वळले......मळवट, साडी, नरनारी रूपातले कपडे यामुळे मागचा हादरला.हयांनीही घाबरून धूम ठोकली. या गडबडीत एकाचा तोल गेला आणि तो खाली पडला.गुडघा फुटला. गुंडाळलेली नवी साडी फाटली .त्या फाटलेल्या साडीनेच शेवटी संक्रांत-किंक्रांतीचे बिंग फुटले......आणि एका भयप्रद ठरली असती अशी गोष्ट दंतकथा बनता बनता राहिली....शेवटी ही भूतांची असो किंवा इतर कशाची असो.भिती बाहेर नसतेच, तर ती माणसाच्या मनातच असते.....
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ईमेल- pravin.g.mhatre@gmail.com
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ईमेल- pravin.g.mhatre@gmail.com

No comments:
Post a Comment