Thursday, November 21, 2019


मेंढरांमागची भटकंती....


नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस काही परत फिरायचे नाव काढायला तयार नाही.धडधड एकामागोमाग एक अशी तीन तीन वादळे येणे आणि ती सुद्धा पाऊस आपले चंबू गबाळे आवरून भैरवीचे सूर आळवावे तसे ढगांचे नगारे आणि विजांच्या नाडमोडी, सळसळणा-या तारा छेडत निरोप घेत असताना ...हे अति म्हणण्याच्याही पलिकडचे आहे. या अचानक कधीही उद्भवणाऱ्या कमी दाबांच्या पट्टयांनी तर एवढी धडकी भरवून ठेवली आहे की, अर्धाअधिक महिना संपला तरी पाऊस गेला असे छातीठोकपणे सांगायची कोणाचीही छाती होणार नाही.अगदी हवामान खात्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले तरीही...नाही म्हणायला त्यांचे काही काही अंदाज ठरतात हो खरे ! रोजरोज खरी भविष्ये सांगायला ते काही बांधिल नाहीत कुणाचे.त्यांनी नेहमी 'अंदाज'च वर्तवलेले असतात आणि ते 'अंदाज' ते इमानेइतबारे 'अंदाजे' च सांगतात. परंतु या सगळ्या बेभरवशाच्या परिस्थितीमुळे काही नियमितपणे घडणाऱ्या घटनांचे चक्रसुद्धा बिघडले आहे. वर्षभर राबराब राबून पिकवलेल्या पिकाचे आणि शेतक-याच्या काळजाचेही शब्दशः पाणी-पाणी झालेच आहे. हे सगळेजण जाणतातच पण त्याचबरोबर दाणागोटयाने भरलेल्या घरातला समाधानी झालेल्या शेतकऱ्यांकडून आपलीही वर्षातील काही महिन्यांची तरी का होईना पण बेगमी करून घेण्यासाठी याच कालावधीत कोकणात उतरणारे विविध प्रकारचे मेंढपाळ, नंदीवाले,  पोतराज म्हणजेच भवानी किंवा मरूआई घेऊन येणारे असे लोकही साशंकताच बाळगून आपली कोकणची वाट सावकाशपणे धरत आहेत असे जाणवते.
        याच काळात सर्वात आधी येतात ते मेंढरांवाले... हो त्यांची ओळख इकडे 'मेंढरांवाले' अशीच आहे. साधारणतः सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील हे मेंढपाळ नोव्हेंबरच्या सुरूवातीला आपल्या कुटुंबकबिल्यासह भटकंती करत,  शेतांशेतांमध्ये आपली मेंढरं घेऊन जवळजवळ चार-पाच महिने फिरत असतात. वाटेत दिवस ढळू लागला की त्या कबिल्याचा म्होरक्या जवळपास असलेल्या गावात जातो . ब-याचवेळेस हा म्होरक्या आपली 'तहान' भागविण्यासाठी (पाण्याने नव्हे बरं का..) धंदयाच्या शोधात निघालेलला असतो.  तसा तो याआधीही अनेक वर्षे या भागात येत असल्याने तो नेमके घर शोधून काढतोच आणि नसेलच माहित तर ते शोधून काढण्याचे कौशल्य कसे कोण जाणे हयांना साध्य झालेले असते कोणास ठाऊक पण शोधून काढतातच.कदाचित तळीरामाचा आत्मा त्यांना मदत करत असावा असे वाटते.यामध्येही एक दुसरे छुपे कामही त्याला करायचे असते . ते काम म्हणजे गावातील कुणी शेतकरी 'मेंढरं बसवायला' तयार आहे का याबद्दल आदमास घ्यायचा असतो. हे मेंढरं बसवणे म्हणजे रात्री एखाद्या शेतात मुक्काम करून सगळी मेंढरं त्या शेतात बसवून ठेवायची. यामुळे रात्रीच्या मुक्कामासाठी जागाही मिळायची आणि वर ज्याच्या शेतात रात्रीचा मुक्काम करतील त्या शेताचा मालक त्यांना चार-पाच पायल्या तांदूळ किंवा काही ठराविक पैसे ,कधीकधी दोन्ही देत असतो. असा दुहेरी फायदा या मेंढपाळांना मिळतो. त्याचप्रमाणे मेंढरांचे मलमूत्र उत्तम प्रकारचे नैसर्गिक खत असल्याने शेतक-यासाठीही हा सौदा फायदयाचाच ठरतो आणि त्यावर्षी त्याला कमी खत वापरून चांगले पीक येते. त्याबदल्यात दोनचार पायल्या तांदूळ देणे कधीही परवडणारे ठरते. या पैशांवर आणि तांदूळांवर मेंढपाळांचाही उदरनिर्वाह चालतो. त्यामुळेच की काय पण हे लोक रात्रीचा मुक्काम कोणी सांगितले नाही तर सहजासहजी कुणाच्या शेतात करत नाहीत.  नाहीच कोण तयार झाले तर एखाद्या कातळ किंवा माळरानावर मुक्काम करून आपला 'बिझनेस माईंड' जपतात. अगदीच अशक्य असेल आणि शेतातच मुक्काम करण्यास पर्याय नसेल तर रात्री मुक्काम करून दुस-या दिवशी तो म्होरक्या शेताच्या मालकाला शोधून काढतो आणि त्याच्याकडून काहीतरी वसूल करतोच.तशी त्याला जास्त शोधाशोध करावी लागतच नाही कारण, शेताच्या मालकापर्यंत ही खबर गावखेडयातील अनधिकृत सूत्रांकडून पोहोचलेली असायचीच त्यामुळे तो सकाळीच शेताच्या बांधावर  हजर होतो आणि आयताच सापडतो. थोडी खळखळ करतो पण देतो काहीतरी. तरीही हा मिळणारा मोबदला मेंढपाळांच्या संपूर्ण कुटुंबाला पुरेसा नसतोच.त्यातच हाच शिधा आणि पैसा पुढील वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असतो.तो संपवून टाकला तर नंतर काय खाणार हा प्रश्न असायचाच. त्यामुळे मग संध्याकाळी काही वयस्कर महिला गावात फिरून भाकरतुकडा मागत फिरत,  तर काही मुले गावात आपल्या बोलीतील गाणी म्हणत .कोणी एक-दोन रुपये देत त्याचा खाऊ खाऊन आनंद साजरा करत.खारेपाट भागात फिरताना गावापासून दूर असतील तर लहान मुले शेतातील पाण्याच्या खड्डयांमध्ये लहानलहान मासे पकडत. नंतर तेथेच गवत जमवून त्याची शेकोटी पेटवून त्यात ते मासे भाजून खात.त्यात कधीकधी एखादा आपल्या गलोलीने एखादे पाखरू मारून तेही भाजून खात,  तीच त्यांची तंदुरी.एवढयानेही नाही भागले तर मग कधीकधी पोटाची आग शमवण्यासाठी नाईलाजाने पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या मेंढराला-कोकराला विकून त्यातून दिवस भागवावा लागतो.
       या भटक्या जीवनामुळे खरे हाल होतात ते लहान मुलांचे. थंडी,ऊन,वारा या सगळ्यात ती करपून जातात. अर्धे वर्षे भटकंतीतच जात असल्यामुळे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजांचीच जिथे पूर्तता होऊ शकत नाही तिथे शिक्षणाची काय बात.... शिक्षणासाठीच्या शाळेच्या हजेरीपटावर नाव पण  शाळेच्या वाटेपासून मैलोन् मैल दूर ही मुले आयुष्याच्या शाळेत जगण्याचे खडतर धडे गिरवत असतात. इथे शासनाच्या शेकडो योजनाही थिटया पडतात.कोणाला दोष देणार ??? ... शासनाला,  पोटासाठी वणवण फिरणा-या त्याच्या पालकांना,  त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आणि हजेरीपटावर आज काय शेरा मारू या विवंचनेत अडकलेल्या त्यांच्या शाळेच्या शिक्षकांना की स्वत:ची काहीच चूक नसताना परिस्थितीच्या चरकात पिळवटून निघणा-या त्या बालकांना. परिस्थिती योग्य नाही म्हणून शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून परिस्थिती बदलत नाही .अशा विचित्र खोडयात अडकलेल्या मुक्या जनावरांसारखेच जिणे त्यांच्या नशीबी येते.
           या गावाहून त्या गावी  , त्या गावाहून  पुढच्या गावी असे करत करत  चार सहा महिन्यांनी घरी पोहोचायचे. जमवलेल्या बेगमीवर उन्हाळा,पावसाळा पार पाडायचा. त्यातच जत्रा,पालख्या, नवस सायास पार पाडायचे. मुलींची लग्ने कितीतरी लहान वयातच उरकून टाकली जातात . इथे कायदाही हतबल होतो. पुन्हा एका दुष्टचक्राला सुरुवात होते.लवकर लग्न,  लवकर मुले, लवकर जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी पुन्हा नशिबी भटकंतीच.डार्विंनचा उत्क्रांतीवाद काहीसा या समाजाने जणू गोठवून ठेवला आहे. शेती करून स्थित झालेला यांचा मूळ पुरूष जन्मालाच आला नसावा असे वाटते. मान्य आहे काहीजण शिकले नोकरीही करू लागले.त्यांचे जीवनमान उंचावले. पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच असतील.  शेवटी घटनात्मक आधार नसल्याने हा समाज आरक्षणाच्या आशेत आहे.पण त्यांच्या या आशेच्या आगीत त्यांचे तथाकथित उद्धारक आपल्याच पोळया भाजून घेत आहेत....बघूया किती दिवस ही भटकंती त्यांच्या नशिबी राहते ती. आशेचा किरण लवकर दिसू दे हीच अपेक्षा आणि प्रार्थनासुद्धा !!!
प्रविण गिरीधर म्हात्रे
पिरकोन,  उरण,  रायगड
मो. नं.  8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Sunday, November 17, 2019


   मातीची तुटलेली नाळ...
          
               घटाघटाचे रुप आगळे,
                प्रत्येकाचे दैव वेगळे
                तुझ्याविना ते कोणा न कळे
                मुखी कुणाच्या पडते लोणी
                कुणा मुखी अंगार....
                विठ्ठला तू वेडा कुंभार....
या गाण्यात वर्णिलेले त्रिवार सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.एकाच मातीने , एकाच कुंभाराने, एकाच वेळी तयार केलेले असूनही कोणत्या मडक्याच्या नशीबी काय येईल हे सांगणे अशक्यच.ज्याच्या मुखी अंगार पडेल त्याचे आयुष्य काही पावलांचेच आणि लोणी पडेल ते मात्र वर्षानुवर्षे घरात हक्काने स्थान मिळवणार . तसे पाहिले तर अगदी वर्षानुवर्षे प्रत्येक घरात या मडक्यांनी अढळपद मिळवलेलेच आहे.काळ बदलत चालला तसे ते स्थान थोडे डळमळीत झाल्या सारखे वाटते. पण जर आपण काही वर्षे मागे जाऊन पाहिले तर मडकी आणि त्याचेच काही भाऊबंद माठ,  रांजण,  घागर,  सुगड,  घरोघरी असायचेच पण त्यासोबत खापरी ,जोगली, तई(तवी) , भगोले अशी नानाविध मृत्तिकापात्रे असायची.प्रत्येकाचे रूपरंग, आकार,उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे असायचे.
      
   लहानपणापासून आमच्या घरात माळयावर ठेवलेले जवळजवळ चार फूट उंच आणि अडीच ते तीन फूट घेर असलेले दोन मोठे आणि अडीचेक फूट उंचीचे दिड फूटापर्यत घेर असलेले एकदोन रांजण पाहत आलो आहे. वास्तविक पाहता रांजण  हे ब-याचवेळी पाणपोईच्या ठिकाणी पाण्याने भरून ठेवलेला कित्येकांनी पाहिलेले असतील, पण आमच्या घरी मात्र हे रांजण तांदळाच्या कोठया म्हणून तांदूळ साठवून ठेवण्यासाठी वापरले जात असत.  वर्षानुवर्षे हे रांजण घरात याच कामाकरिता वापरत असल्याचे मला आठवते. काही वर्षांपूर्वी (म्हणजेच सुमारे पंचवीस-तीस वर्षापूर्वी बरंका!)  तांदूळ साठविण्यासाठी पत्र्याची टाकी आणली. पण तरीही या रांजणांचा वापर सुरूच होता. सांगण्यासारखे वैशिष्ट्य हे आहे की, टाकी पेक्षा या रांजणामध्ये तांदूळ चांगल्याप्रकारे सुरक्षित राहत असत. कारण पत्र्याच्या लगतचे तांदूळ खराब होऊन त्यांना हमखास काळपट व भूरभुरीत होऊन ज्याला करपट (गावच्या भाषेत 'भासटान') वास येत असे. तसेच या रांजणांची विशेष अशी देखभालही करावी लागत नसे. फक्त जेव्हा कधी भातगिरणीतून भात दळून तांदूळ आणले जात तेव्हा हे मोठे रांजण सावकाशपणे माळयावरून उतरवून कडक उन्हात ठेवून झाडूने आतून बाहेरून साफ करून आत चिकटलेली किडे-पाखरे काढून टाकत. नंतर चूना पाण्यात कालवून त्याने आतल्या बाजूला रंगवले जात असे. जेणेकरून उरलेसुरले किडे मरून जावे व पुन्हा दुसरे होऊ नयेत. मग संध्याकाळी परत माळयावर नेहमीच्या जागी नेऊन ठेवले जायचे आणि नंतर त्यात तांदूळ भरून वर कडूलिंबाचा पाला टाकून रांजणाचे तोंड फडक्याने बांधून टाकत असत. आजही तो रांजण माळयावर आहे फक्त त्याचा वापर करायला कोणीही नाही.
        अशीच घरात हक्काचे स्थान असलेली मातीची वस्तू म्हणजे 'खापरी'अर्थात मातीचा 'तवा' . चूलीवर भाजलेल्या मातीच्या खापरीतल्या भाकरीची चव काय सांगावी ...आज ती चव मिळवण्यासाठी लोक शेकडयाने पैसे खर्च करतात, पण पूर्वी हीच भाकरी गावातील गरीबातल्या गरीब घरीही स्वत: बनवली जायची. 'घरोघरी मातीच्या चुली' ही म्हण आज लागू पडत नाही ,कारण आता मातीच्या चुलीच राहिल्या नाहीत .घरोघरी त्यांची जागा गॅसच्या  स्टीलच्या चुलींनी घेतली आहे. आता ती म्हण फक्त आपल्या जुन्या संस्कृतीची आठवण एवढयासाठीच आहे.  चूल गेली सोबत मातीची खापरीही गेली.चूल काही ठिकाणी अजून टिकून असली तरी तिची जागा घरात मुख्य स्वयंपाक घरातून घरामागच्या पडवीत स्थलांतरीत झालेली आहे . धूराने भिंती काळया पडतात ना...मग काय करणार..? . खापरीने आपले अस्तित्व थोडेफार टिकवून ठेवले असले तरी तिच्या बहिणी मात्र आज सगळयाच घरांमधून नाहिशा झाल्या आहेत  . त्या आहेत ' तवी' , 'जोगली' आणि 'भगोले'. जोगली हे त्यावेळचे पातेले आणि भगोले म्हणजे जेवणाचे ताट . यांचा आज कुठेही नामोनिशाण शिल्लक राहिलेले नाही .असलेच तर कुठल्या तरी जुन्या घरात अडगळीत टाकलेल्या व फुटक्यातुटक्या अवस्थेत असलेल्या आढळतील. छोटी छोटी सुगडे, मडकी घर बांधतानाच घराच्या भिंतींमध्ये तिरकी पूरून ठेवत असत. अनेक छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्याचे हे कप्पे असत. विशेषतः चुलीला लागून असलेल्या भिंतीत तर अशी दोन तीन मडकी असत. त्यातच खडेमीठ, सुक्या मिरच्या असे पदार्थ ठेवलेले असत. घरमालकीणीला आवश्यक वस्तू चटकन हातासरशी असाव्यात अशी ही सोय असे. लहान मुलांची खेळणीही मातीचे जाते, मातीची चूल अशीच असत.शाळेतून जर मातीची वस्तू बनवून आणायला सांगितली तर नव्व्याण्णव टक्के मुले मातीची चूलच बनवून नेत असत. हळूहळू तांबे, पितळ करत करत अॅल्युमिनियम ज्याला गावकरी 'जर्मन' म्हणतात अशा धातूची भांडी आली. त्यानंतर आलेल्या स्टेनलेस स्टीलच्या भांडयांनी तर सर्वच बदलून टाकले ना फुटत,  ना गंजत.  कल्हईची गरज नाही की तांब्याच्या भांडयांप्रमाणे घासून स्वच्छ करण्याची मेहनत अशा स्टीलच्या वस्तू धावपळीच्या जीवनात अत्यंत चपखल बसल्या आणि मातीच्या बहुतांश वस्तूंना मूठमाती मिळाली.
           खरंतर हया मातीच्या वस्तू बनवणारे कुंभार अतिशय मेहनत करून एक एक वस्तू तयार करत असतो. साधी वाटणारी खापरी तयार करायची तर माती आणण्यापासून ती चाळून व भिजवून मळून त्याची हवी तशी खापरी बनवून ती भट्टीत भाजणे (या भट्टीला आवा म्हणतात) या सर्व मेहनतच्या कामांनंतर स्वत:च त्याची विक्री करणे आणि ती घेणा-याचे किमतीच्या बाबतीतह घासाघीस करणे या सगळ्याच गोष्टी शारीरिक व मानसिकदृष्ट्या कस पाहणा-या असतात. एवढया परिश्रमाने तयार केल्यावर.. "काय एवढी महाग..??? काय सोनं लागलं आहे का..???  जरा किंमत कमी कर..."  अशी बोलणी ऐकायला लागत असतील तर पुढची पिढी या व्यवसायात उतरणार तरी कशी.मग हळूहळू माल नाही म्हणून गि-हाईक नाही आणि गि-हाईक नाही म्हणून माल तयार नाही अशी गत होईल. त्यानंतर अश्मयुगीन आदिमानवाला नागरी संस्कृतीत स्थिरावयाला महत्वपूर्ण भूमिका बजावणारी अन् शतकानुशतके जोपासलेली ही कला अस्तंगत व्हायला कितीसा वेळ लागणार...त्यातही देशी माल दिसायला आकर्षक नाही पण टिकाऊ असूनही 'युज अँड थ्रो' च्या जमान्यात ती प्रत्येक वस्तू 'देशी/गावठी' या नावाने हिणवत त्यांचा वापर करणे टाळतात. त्याऐवजी 'औट घटकेचा' चमचमाट आणि वरवरचा थाट बघून खरेदी करण्याच्या फॅशनमुळे मातीकाम करणारे कलाकार कमी होत गेले. ब्रिटीशांनी आपले साम्राज्य टिकावे म्हणून वापरलेली स्थानिक व्यवसायिकांना संपवून इकडचा कच्चा माल स्वत:च्या देशात नेऊन त्यापासून तयार केलेला पक्का माल जादा किमतीत विकून आपली तुंबडी भरण्याची व्यवसायिक निती आता देशातील कंपन्याही वापरू लागल्या आहेत . बाहेर रस्त्यावर वीस रुपये डझन मिळणाऱ्या पणत्या माॅल मध्ये जाऊन चकचकीत वेष्टनात गुंडाळून आठ ते दहा रुपयाला एक पणती विकत आणून दिवाळी(की अकलेचे दिवाळे) साजरी केलेली असेलच. कंपन्यांनी आणि गल्लाभरू धंदेवाईकांनी कसे पद्धतशीरपणे लोकांचे कसे मनपरिवर्तन केले याबाबत
एक आठवण येथे आवर्जून सांगावीशी वाटते , ती म्हणजे जेव्हा पहिल्यांदा स्टील आले तेव्हा त्याचे न गंजण्याच्या व इतर उपयोगांचे असे काही वर्णन भांडीवाल्याने केले की आईने घरातील चांदीची मोड देऊन स्टेनलेस स्टीलच्या दोन बशा त्याकडून विकत घेतल्या. अजूनही त्या बशांना हात लावताना त्या किती महाग मिळाल्या हे आठवतेच आठवते.पण सोबतच मातीची आणि आपली नाळ तुटली हे ही प्रकर्षाने जाणवते.

  

प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण-  रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Saturday, November 9, 2019

?????????????????????

का... (देवनागरी)

त्यांना बसू दे ना बाजारात
तुला विकायचे भय कशाला
सौदा तर तुझ्याच हाती आहे
मोलभावाची उगाच चिंता कशाला...

देऊ दे ना त्यांना भरपूर माल
तुला त्याची हळहळ कशाला
घेण्याची जर गरजच नाही
तर देणा-याचा विचार कशाला...

मनावर तुझ्या आहे तुझाच भरवसा
खरेदीदाराची गोष्ट काढायची कशाला
जाणंच नाही ज्या वाटेने
तिचा पत्ता विचारायचाच कशाला...

जाणतात येथे सगळ्यांचेच सगळे
नुसताच देखावा करता कशाला
विकले गेलेत तुम्ही त्या दिवशीच
आता त्याचे ढोल बडवता कशाला...

?????????????????????

कला.... ( आगरी)

त्याना बसू दे नं बाजारान
तुला इकत घेवाची चिंता कला....
सवदा तं तुजेच हातांन हाय नं
मं भाव कराची फिकीर कला...

देवदे नं त्याना जाम माल
त्याची तुला हलहल कला
घेवाची जर जरुरच नाय
तं देनाराचा इचार कला...

मनावर तुमचे तुमचा हाय भरवसा
तं इकत घेनाराची गोष्टच कला
जांवाचा नाय ज्या वाटंला
तिचा पत्ता इचाराचाच कला....

जानतान सगलं आहयां सगल्यांचा खरां
नुसताच देखावा करतांव कला
इकलंव तं तुम्ही त्या दिसालाच
आथा त्याचा गोंगाट भरतांव कला....

????????????????????

क्यूँ... (नागरी)

वो भले बैठे हो बाजा़रमें
तुम्हे बिकने का डर क्यूँ
सौदा तो तुम्हारेही हाथ है
फिर मोल भाव की फिक्र क्यूँ....

चाहे दे दे वे बडा़ माल
तुम्हे उसका मलाल क्यूँ
लेने की जरुरतही नही
तो देनेवाले का खयाल क्यूँ..

दिलपे तुम्हारे तुम्हारा है भरोसा
तो खरीददारों की बात क्यूँ
जब जाना ही नही उस गली में
तो उसके पते की जरूरत क्यूँ....

सब जानते है यहाँ सबका सच
आभास झूठा जताते क्यूँ
बिके तो तुम उसी दिन थे
आज उसका पिटते ढिंढोरा क्यूँ...
=================
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
email - pravin.g.mhatre@gmail.com
!=!==!=!=!=!=!=!=!=!=!=!=!

Monday, November 4, 2019


      ऐरणीच्या देवा तुला...
         
दिवाळीची सुट्टी नुकतीच संपलेली. पण सुट्टीचा रंग अजूनही मनावरून उतरलेला नाही. शाळेत जायचे म्हणजे पॅरोलवर सुटलेला कैदी परत तुरूंगात जाताना जशी अवस्था असेल ,अगदी तशी सर्व बच्चेकंपनीची स्थिती असते. नेहमीप्रमाणेच गुरूजी शाळेत शिकवत असताना निम्म्याहून अधिकांचे लक्ष बाहेर जाणा-या - येणार्‍या रहदारीतच गुंतलेले असते. तब्बल एकवीस दिवसांची सुट्टी कधी आणि कशी संपली हे कुणालाही कळलेले नसते. त्यातच सुट्टीचा म्हणून दिलेला भरभक्कम अभ्यासही थोडा थोडा गाळून पण सर्व अभ्यास पूर्ण केल्याचा आभास करून गुरूजींना गुंडाळण्याचा केलेला प्रयत्न गुरुजींनी पहिल्या नजरेतच उधळून लावल्याने आणि दोन दिवसांच्या वाढीव मुदतीच्या बोलीवर पूर्ण करण्याच्या विचाराने अस्वस्थ होऊन "कशाला दिली होती ती सुट्टी" असा समग्र सुट्टी उपभोगताना डोक्याच्या आसपासही न फिरकलेला विचार आता मात्र डोक्याचा अक्षरशः 'गोविंदा' करत असतो. अशातच समस्त शिष्यवर्गाची अभ्यासाबाबतची आवड आणि तळमळ जाणून असल्याने तसेच त्यांचा वकूबही जाणून असणा-या गुरूजींनी गेल्या तीन आठवड्यांत सगळयांच्याच पाटया को-या झाल्या असणार,  किंबहुना थोडाफार विस्मरणाचा गंजही चढलेला असणार हे माहित असल्याने पाढे पाठांतराचा हूकूम सोडून एक तासाची डेडलाईन देऊन त्यांनी आपल्या लेखी कामात आपली मान घातलेली असल्याने आणि काही केले तरी पाढयांना आपल्या डोक्यात घुसण्याचा मार्ग सापडण्याची शक्यता अंधूक असल्याने पाढे पाठांतर करण्याऐवजी टंगळमंगळ करण्यात शाळेच्या छपराची कौले, खिडक्यांचे गज, अगदी समोरच्याच्या शर्टाला पाठीवर पडलेले डाग (कधीकधी भोकं ही) मोजून झालेली असल्याने बाहेर लक्ष घोटाळत राहते.
         अशातच शाळेच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काहीशी लगबग सुरु झालेली असते. एक लोहारदादा त्याचे बि-हाड घेऊन आलेला असायचा. त्याचीच सामान लावायला सुरुवात झालेली असायची.  एवढा वेळ पाठांतराचा नुसता अभिनय करणारे सर्वजण खिडकीकडे धावून खिडकीच्या गजांवर चढून तिकडे पहात गलबला करायला सुरुवात झाल्यानंतर गुरुजीही मान वर करून एकदा टेबलावरचा रूळ आपटून वर्गात शांतता प्रस्थापित करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करतात. पण आपल्यातच गुंग असलेल्यांना तो आवाज ऐकूही गेला नाही.नाईलाजाने त्यांना आपले काम सोडून उठावे लागते. ते उठलेले पाहताच सगळी पाखरे पटापट आपापल्या जागेवर जाऊन बसतात.वर्गात पुन्हा अस्वस्थ शांतता पसरते. हळू आवाजात कुजबूज करत नजरेनेच एकमेकांना खुणावत असतानाच घंटेचा टण्णटण्ण आवाज कानावर पडतो. पाखरांनी भरलेल्या झाडावर कोणी दगड मारला तर ती जशी फुर्रकन उडतात तशीच सर्व मुले वर्गाबाहेर पडली. सगळा घोळका लोहार उभारत असलेल्या तंबूजवळ पोहोचला.एव्हाना त्याने चार पहारी चार कोप-यांना ठोकून मध्ये एक काठी उभी केलेली होती आणि त्यावरून तंबूची कनात  ओढून घेऊन तिचे चार कोपरे ठोकलेल्या पहारींना ताणून बांधलेले असतात.तंबू तयार झाल्यावर एक छोटा खड्डा खणून त्यात भाता बसवून घेतो व नंतर पुढे थोडया अंतरावर खड्डा खणून ऐरण पक्की बसवून घेतो. या  सगळ्या कामात आजूबाजूला जमलेले छोटे प्रेक्षक आणि त्यांची लुडबूड,ढकलाढकली यांमुळे अडथळा येत असल्याने मध्येच त्यांच्यावर ओरडत बाजूला होण्यास सांगत होता. इतक्यात शाळा भरल्याची घंटा वाजते. सगळे वर्गात जातात अर्थात दोनचार टाळकी अजूनही घुटमळत असतातच, पण गुरूजींनी आवाज दिल्यावर नाईलाजाने तेही वर्गात जातात. त्यानंतर शाळा कधी सुटते याकडेच लक्ष असल्याने वारंवार खिडकीकडे पहातच वेळ जातो आणि एकदाची शाळा सुटल्याची घंटा वाजताच. बाहेर काढलेली पाटी - पुस्तक दप्तरात भरतच धाव ठोकतो ते थेट तंबूजवळ थांबायला जातो. आता भाता सुरु केलेला असतो पण त्याच्या आगीवर ठेवलेले असते एक बारा ठिकाणी चेपलेले, पोचे आलेले पातेले... आणि त्यात शिजत असते डाळतांदूळ एकत्रच घातलेली खिचडी. त्याची मुले ती कधी शिजते आणि खायला मिळते याकडे आशाळभूतपणे पहात बसलेली असत... कदाचित दिवसभरात त्या बिचा-यांच्या पोटात काही गेलेले नसावे. गडबड करणा-या पोरांना तो लोहार जवळजवळ हाकलूनच लावतो. नाईलाज म्हणून आणि दिवसभरातून घरी जायचे असल्याने ती सगळी घरचा रस्ता धरतात.
                 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच येऊन सर्व मुले त्या तंबूभोवती गम्मत पहात उभी असतात. आता मात्र लोहारदादाला त्यांच्याकडे लक्ष दयायला वेळ नसते, तो आपल्या कामात गर्क असायचा. त्याची घरवाली भाता हलवत स्वत:च्याच तंद्रीत बसलेली असायची. तिलापाहून 'साधीमाणसं' चित्रपटातील
           " ऐरणीच्या देवा तुला
            ठिणगी ठिणगी व्हाऊ दे
           आभाळागत माया तुझी
           आम्हांवर -हाऊ दे..."
असे म्हणणारी जयश्री गडकर डोळयासमोर तरळून जायची. ऐरणीच्या देवाची आभाळागत माया हयांना मिळत असेल की नाही ही शंकाच आहे, पण आभाळाच्या मायेच्या छताखाली आयुष्यभर झोपावे लागते हे मात्र खरे....डोळयासमोर साक्षात बसलेली जयश्री गडकर आणि तिचा अवतार एकदम पाहण्यालायक असायचा, तोंडावळयावरून  मूळ सुस्वरूप असल्याचे जाणवत असूनही कित्येक दिवस अंगाला पाणी लागले नसावे असे मळकट ध्यान , केसाचा पिंजरा आणि सतरा ठिकाणी ठिगळं लावलेले दोन तुकडे जोडून तयार केलेले पातळ .नेहमी मनात विचार यायचा की कपडयांचे ठिक आहे, नसतील परवडत पण बाकी स्वच्छ रहायला काय हरकत असावी. पण जेव्हा खरे कारण समजले तेव्हा मात्र बसलेला धक्का खूप मोठा होता.त्याचे कारण असे होते की अशा भटकंती करणा-या आणि उघडयावर संसार असणा-या समाजातील स्त्रिया आपल्या रक्षणा करता जाणूनबुजून तशा रहात. गावात सुया-दाभण,बांगडया विकायला येणाऱ्या गोसाविणींच्या काळया दातांचे रहस्यही तेच होते. जास्तीत जास्त कुरूप दिसण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे.
          आगीत लालभडक झालेले लोखंड चिमट्याने पकडून ऐरणीवर ठेवून लोहारदादा तिला काही तरी बोलतो.तोंडातील तंबाखूच्या तोब-यामुळे तो काय बोलला हे कोणालाच समजत नाही पण ती मात्र लगेच भात्याची दोरी सोडून पटकन उठून उभी राहते, शेजारी पडलेला घण उचलते आणि त्या रसरशीत लालबुंद लोखंडावर दणादण घाव घालायला सुरुवात करते. शून्यात नजर ठेवून बसलेल्या तिला पाहून एवढी ताकद तिच्या अंगात असेल असे वाटतच नव्हते. हळूहळू तो लोखंडाचा तुकडा आकार घेऊ लागतो.  कोयता, विळा असे वळण घेतो, अर्थात ते तापवून लालभडक करणे व घणाचे घाव घालणे या क्रियेची चारपाच आवर्तने झाल्यावरच. मनाजोगते तयार झाल्यानंतर त्याला पाणी दयावे लागे. पाणी देणे म्हणजे गरम असतानाच लगेच पाण्यात बुडवून ते थंड करणे. असे केल्याने त्याचा कठिणपणा वाढतो व धार जास्त काळ टिकते. त्यानंतर धार लावून त्याला लाकडी मूठ (थरव) बसविले जाते.  ती मूठ बसवताना पाहणे हेही बघण्यालायक असे.पण खरी एकाग्रता पहायला मिळायची ती विळयाला धार लावतानाच.  खरं पाहता हे दिवस शेतीच्या कापणीचे. शेतात भाताचे पिक कापणीसाठी तयार  झालेले असायचे. कापणीसाठी विळे आवश्यकच अन् तेही धारदार हवेत. त्यामुळे गावकरी विळयांना धार लावायला येणार हे वर्षानुवर्षांच्या अनुभवाने माहित झाल्यानेच तर तो गावात आलेला असायचा. विळयाला धार लावणे हे खरे कसब,  कारण त्याचे बारीक बारीक दात नीट योग्य वळणासह धार देउन तयार करणे सोपे नसायचे . त्यासाठी आधी धार लावायची आणि मग नंतर तो विळा पायात पकडून काणस घेऊन एक एक बारीक दाता पाडत जायचा, सरळ भागावर सरळ त्रिकोणी आणि जसजसे वळण येईल तसे त्या वळणाला अनुसरून दाता तिरका करत जायचे हे काम अगदी तल्लीन होऊन तो करत असे.मध्येच डोळयासमोर पकडून एक डोळा मिटून दुसऱ्या डोळयाने दाते आणि धार ठीक असल्याचे पहायचा हे पाहताना गंमत वाटायची. पण मोठया माणसांना त्याच्या श्रमाची किंमत वाटत नसे  ते धार लावून घेतल्यानंतर पैसे देताना कुरकुर करत. एखाददुसरा विनाकारण शिव्याही दयायचा.  तसे लोहारदादाची शरीरयष्टी पाहता त्या माणसाला तो एका हाताने उचलून सहज पंधरा फूट फेकून देऊ शकेल असे वाटायचे, पण तो मात्र कधी हसून तर कधी दुर्लक्ष करून वेळ मारून न्यायचा.  काय करणार??  प्रश्न त्याच्या आणि कुटूंबाच्या पोटाचा असायचा तेथे मनाला आणि रागाला मुरड घालावीच लागते हे बारा गाव हिंडणारा लोहारदादा जाणून असायचा. 
      एवढया वेळात शाळा उघडून प्रार्थनेची घंटाही झालेली असायची.  सोबत गुरूजींनी मारलेली हाकही ऐकू यायची.  मग तो रूपाने काळाकभिन्न ,आडदांड असलेला लोहारदादा मुलांना लटक्या रागाने म्हणायचा " जा बाबांनो जा शाळेत, इथे काय बघून मिळणार तुम्हाला ????  चार बुकं शिकाल तर आरामात सावलीत बसून कमवाल..जा... " मुलंही निघून जायची. दोनतीन दिवसानंतर संध्याकाळी कधीतरी तो आपले बस्तान उचलून दुसऱ्या गावी जायचा.  त्या जागी उरलेल्या असायच्या ठोकलेल्या पहारींच्या आणि भाता पेटवलेल्या आगीच्या राखेच्या खुणा.....  सोबत मनात घुमत राहणारे त्याचे बोल "चार बुकं शिकाल तर सावलीत बसून कमवाल..."
शिक्षणाचं महत्त्व एक निरक्षर,अनाडी माणूस किती चपखल शब्दात सांगू शकेल याचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण नसावे बहुतेक....
 
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com