दिवस डोंगरात, कुरणांत जात होता. रात्री ही गप्प घरात झोपणे होत नव्हते. याकाळात रात्रीचे मनोरंजन म्हणजे गावात किंवा आजूबाजूच्या गावात लग्न, वैयक्तिक किंवा सार्वजनिक मंडळाची सत्यनारायण महापूजा,वाढदिवस अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने ठेवले जाणारे पडदयावरचे - व्हिडिओवरचे सिनेमे पहाणे. सिनेमाची इतकी हौस की, व्हिडिओवर रात्रीत तीन तीन चार चार सिनेमे पहात बसायचो. सकाळी होऊन शेजारच्या घरातील माणसे दातांना मिश्री लावत दात घासत येत तरी आम्ही सिनेमातच घुसलेलो असायचो. एकंदरीत काय तर सिनेमाच्या शौकापायी आमच्या रात्री घरात किंवा गावात जाण्यापेक्षा आजूबाजूच्या गावांतच जास्त साज-या होत होत्या.
असेच एकदा शेजारच्या गावात पडदयावर 'धरम वीर' हा सिनेमा असल्याचे समजले. आमची गँग नेहमीप्रमाणेच तयार होतीच. रात्री प्रत्येकजण घरातल्या अतिमहत्त्वाच्या कामाचा निपटारा करून म्हणजे जेवण उरकून मोहिमेवर जाणाऱ्या सैनिकाच्या जोशात बाहेर पडला.फरक एवढाच सैनिक त्याच्या सामानाच्या बॅगेसह बाहेर पडतो, आम्ही अंगात एकावर एक अशी दोन स्वेटर घालून,कानाला मफलर गुंडाळून जय्यत तयारी करून निघालो. सिनेमाच्या ठिकाणी पोहचलो आणि आम्हाला प्रश्न पडला... 'नक्की आजच सिनेमा आहे की उदया , की कालच झाला ? ' तिथेच एक माणूस बसलेला होता, त्याला विचारले 'पिक्चर कधी हाय दादा? '. त्याने उत्तर देण्याआधीच त्याच्या 'हाले-डुले-सरकार' वरून समजले की तो पिऊन तर्र.. आहे. त्याचे काही ऐकण्याआधीच आम्ही युटर्न घेतला. पण त्याचे फक्त शब्द कानावर पडले " बयनं, काल झाला पिक्चर नि हये आज आले." ते सगळयांनी ऐकले आणि ज्याने खबर आणली होती त्याला सगळे सभ्यपणे असभ्य शिव्या दयायला लागले.आता काय करायचे??? एवढयात एकजण बोलला ,"चला ! आता डोंगरातल्या रस्त्याने शाॅर्टकट जाऊ या." नाहीतरी पोपट झालाच होता. "चला , जाऊया..." सर्वांचे अनुमोदन मिळाले.
रस्ता सोडून आम्ही जंगलातील पायवाट पकडली. तशी सगळयांच्याच माहितीची वाट होती, पण रात्रीचे साडे अकरा होऊन गेलेले आणि उजेडाला हातात असलेली बॅटरीही सेल संपल्याने अगरबत्ती पेटवल्यानंतर जेवढा उजेड पडेल तेवढाच देत असल्याने ती असली काय आणि नसली काय,काहीच फरक पडत नव्हता. पण प्रत्येकजण आपापल्या मस्तीत चालत होता. डोंगराच्या अर्ध्या चढावर पोहचलो आणि सगळ्यात पुढे असणारा थबकला. जागीच थांबला. त्याच्या अचानक थांबण्याने मागोमाग चालणारे धडाधड एकमेकांवर आदळले. ते रागाने काही बोलणार तोच त्याने तोंडावर हात ठेवत गप्प बसायची खूण केली. तो थरथरत होता. त्याने दाखवलेल्या दिशेकडे पाहिले तर तिथे एका आंब्याच्या झाडाखाली तीन आकृत्या डोके वरखाली करत नाचत होत्या. तिथेच भूत पाहिल्याचे किस्से ब-याचजणांकडून ऐकले होते. सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. सगळे उलट पावली धूम पळत सुटले. घाई,भिती आणि रात्रीची वेळ . उतारावरून धावताना पहिला घसरला. दुसरा त्याला अडखळून पडला तो कोलांटया उड्या मारत वीस-पंचवीस फूट खाली कोलमडत गेला. तिसरा दगडावरून पाय घसरून पडला, त्याचे दोन्ही गुडघे सोलवटून निघाले. पडत- धडपडत कसेबसे परत येऊन मुख्य रस्त्याने गाव गाठले. गुपचूप घरात झोपलो. रात्रभर खुट्ट जरी झाले तरी. दरदरून घाम फुटत होता.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे एकत्र जमलो.रात्रीच्या घडलेल्या प्रसंगाची चर्चा सुरू झाली.रात्री पळपळत आलेले आता मात्र बारा हत्तीचे खोटेखोटे बळ दाखवत होते. प्रत्येकजण "मी नाही घाबरलो, पण हा पळाला म्हणून त्याच्यासोबत मी फिरलो." असे म्हणत होता. शेवटी एकजण म्हणाला,"चला त्या झाडाजवळ जाऊन बघू." तसे सगळे टरकले,पण आपण घाबरतो हे दुसऱ्याला समजले तर चिडवून हैराण करतील हे माहित असल्याने कोणीच तसे दाखवत नव्हते. "चला..!" कोणीतरी बोलला आणि सगळे पाय ओढीत निघाले. डोंगर चढायला सुरुवात केली. दुरुनच समोर ते झाड दिसू लागले. थोडे जवळ पोहचले तर झाडाच्या पाठीमागे तशीच पांढरी डोकी वरखाली होताना दिसत होती. "नको,आपण नंतर कधीतरी जाऊ, आज नको." फक्त आपल्यालाच ती दिसली असे समजून एकजण बोलला. सगळ्यांच्या मनात तेच होते.आता मागे फिरणार तोच एकाला हुक्की आली. "नको ! आता आलो आहोत तर जाउन बघू या." आता मात्र नाईलाज झाला. तसेच सगळे पुढे झाले. ह्रदयाचे ठोके शंभररीपार झाल्यासारखे धडधड पडत होते. थोडे जवळ पोहचले आणि सगळे एकसाथ हसायला लागले.
तिथे कोणीच नव्हते. होत्या त्या झाडाखालच्या करवंदीच्या जाळीत अडकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या. वा-यावर जाळी हलत होती आणि पिशव्याही. नसलेल्या खोटया भूताने सगळयांचीच आधीची रात्र 'डरावनी' केली होती हे मात्र खरे होते.
प्रविण गिरीधर म्हात्रे
मु.पिरकोन,ता.उरण,जि.रायगड
मो.नं.8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com
