Wednesday, October 16, 2019


परतीचा पाऊस
सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा कडाका एवढा , की अक्षरशः कातडी भाजून काढणे हा शब्दसुद्धा अंगाची काहिली वर्णन करायला कमी पडावा.  पाण्याचे शेकडो झरे उमाळे फुटून वाहू लागल्यासारखे वाटावे अशा घामाच्या धारा लागलेल्या .त्या पुसून पुसून हातरूमाल आणि शर्टच्या बाहया संपृक्त अवस्थेला पोहोचलेल्या. चेहरा लालबुंद होऊन त्याची आग-आग होऊ लागलेली. अंगातले कपडे अंगाला घट्ट चिकटून बसलेले. सगळयांच्या तोंडी फक्त सुस्कारे. प्रत्येकजण नुसता हाशहुश्य करत बसलेला.  पंख्याखाली बसुनसुद्धा गारव्याऐवजी पंखा वाफा टाकत असल्यासारखा गरमागरम हवा सोडत असलेला. काय करू , कुठे बसू असे प्रत्येकाला झालेले. अशातच आकाशाचा रंग पालटू लागतो. पांढरे कापसासारखे ढग जाऊन हळूहळू काळेकाळे ढग जमा होऊ लागलेले. क्षितिजावर दूर कुठेतरी विजेची रेषा चमकून गायब झालेली दिसू लागते. पावसाची चिन्हे दिसू लागली , की येणाऱ्या गारव्याच्या कल्पनेने जीवाला मनातून गारवा आल्यासारखा वाटतो.
             पण शेतावर काम करणाऱ्या शेतक-याच्या मात्र पोटात गोळा उठतो. गेले चारपाच महिने मेहनत केलेले वर्षाचे हाती लागणारे भाताचे पिक आताच कापणी करून शेतात नीटपणे आडवे पसरून ऊन खायला पसरून ठेवलेले असते. ते आता भिजणार या कल्पनेनेच त्याचा जीव वरखाली होऊ लागतो. एकमेकांच्या सुचना देत, कधी रागवत घाईघाईने हात चालायला लागत. काय करावे सुचत नाही .मग मात्र शक्य तेवढया चपळाईने भाताचे भारे बांधायला सुरवात करत. ते तेवढयाच घाईघाईने गावाशेजारी तयार केलेल्या खळयावर आणून त्याचे ऊरवे रचले जाई. आजूबाजूला पडलेला, राखून ठेवलेला हाताला लागेल तेवढा पेंढा त्या ऊरव्यावर टाकून ते झाकून टाकले जात असे. खरंतर पावसापुढे पर्यायाने निसर्गापुढे काही चालणार नाही , याची खात्री असूनही जिवाच्या आकांताने  सारी धडपड सुरु होत असे. एकदा का पाऊस सुरु झाला की मग सा-या आसमंताचा नूरच पालटून जायचा. टपटप करत करत मोठमोठाले थेंब पडायला सुरूवात होते न् होते तोच सोबतीला विजेचा चाबूक आणि ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाचा रथ धो धो पाऊसधारांत ऊधळत सगळे चिंबचिंब करून जसा आला तसाच निघून जायचा. आलेले मळभ दूर व्हायचे. क्षितिजाच्या रेषेवर मात्र विज लवलवत आकाशाच्या पाठीवर सळ्कन् रेघोटी मारून गायब होत असते. ढगांआड गेलेला सूर्य आपला मुखडा ढगांच्या आडून बाहेर काढायला सुरुवात करतो. पण तोही आता पिवळयाधम्मक तेजाऐवजी तांबूस-लालसर  लालीमध्ये मलूल पडून मावळती जवळ करू लागलेला असायचा.  शेतकरी हवालदिल होऊन फक्त चिंताग्रस्त होऊन घरातल्या दो-या सैल झालेल्या बाजेवर बसून विचारात पडलेला असायचा.  मती गुंग होणे म्हणजे काय हे त्याची ती अवस्था पाहून सहज लक्षात येत असते. मनातून सारखे वाटत असते की,  जावं आणि ती पेंढयाने झाकलेली ऊरवी उघडून नेमके किती भिजले आहे याचा अंदाज घ्यावा.पण लगेचच दुसरे मन वस्तुस्थितीची जाणीव करून देते. संध्याकाळ होत आलेली असते. रविराज आपल्या शयनकक्षाकडे पाऊल पाऊल करत चाललेले असायचे.त्यातही आपण वरचा पेंढा काढला आणि रात्री पुन्हा पाऊस आला तर काय होईल ही सार्थ भिती असायचीच. मग तो रात्रभर तसाच अंथरुणावर पडलेला असतानाच दिवसभराच्या श्रम आणि धावपळीने दमल्यामुळे कधी झोपी जात असे.
            दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे डोंगराआडून वर येण्याआधीच हा खळे गाठायचा. ऊरव्याच्या सर्व बाजूंनी गोलगोल  फेरी मारून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत असे. हळूच एका बाजूने वर चढून एक एक करत भाताचे भारे खाली उतरवून घेई .  इतर गडीमाणसे येण्यापूर्वीच स्वत: कामाला लागलेला असायचा. डोळयात अश्रू तरळून गेलेले असत, पण हातातोंडाशी आलेले पिक सुरक्षित घरी पोहोचावे हीच मनोमन इच्छा मनातल्या मनात देवासमोर साकडं घालत असे.पुन्हा कालच्या वातावरणाचा प्रत्यय येण्या अगोदर मळणी, ऊफणणी ऊरकून गोणी भरुन ठेवावी असेच वाटत असेल . झोडून जमा झालेला धान्याचा ढीग एकाबाजूला करून थोडे थोडे सुपात भरून वा-याची दिशा पाहून खाली सोडून केर कचरा साफ करून सुंदरसा कंसाकृती कणा आकाराला  येत असे. तो उंच उंच बाळसे धरू लागतो. तोच आकाशात काळा काळा कापूस पिंजायला सुरुवात झालेली असायची. मग पुन्हा धावपळ सुरू... घाईघाईने पोती एक लाकडी खोक्याच्या मदतीने ज्याला फरी म्हणतात, त्या फरीनेच भरली जात. मोजमापाचीही अनोखी रीत.  दर फरीला पोत्यात भरलेल्या भाताची एक मूठ भरुन बाजूला जमिनीवर छोटीशी रास करायची. प्रत्येक वेळी एक करत करत या राशींच्या उभ्या आडव्या ओळी तयार होत. यातील प्रत्येक राशीला फसकी म्हणतात .सर्व भात भरून झाले की फसक्या मोजल्या जात. मोजताना सुरवात करताना 'एक' या अंकाने न करता पहिली फसकी 'लाभ' व नंतर पुढे दोन,तीन,चार असे. मोजत.एव्हाना आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून थेंब थेंब झरू लागलेले असायचे . सर्व उरकून समाधानाने घर गाठताना पाऊसही आपला बँड-फटाके वाजवत धो-धो कोसळू लागायचा. आता मात्र एक समाधान असायचे, कारण एवढे तरी पिक घरात आलेले आहे.
           काही वर्षांपासून मात्र लोकांनी ही धावपळ करणे सोडून दिल्याचे जाणवते.आताशा लोक परतीचा पाऊस पडायची चिन्हे दिसू लागताच जर जवळ मोठी ताडपत्री किंवा मोठा प्लास्टिकचा कागद असेल तर शेतातल्या शेतातच मळणी सुरू करतात. जेवढे शक्य तेवढया वेगाने पिक पोत्यात भरून घरी आणतात. ना कणा ना फसक्या. फक्त पिक आले बस  झाले अशीच मानसिकता राहिली आहे. अर्थात ती तरी किती दिवस टिकणार आहे,  कारण शेत पिकवणारी जमात लवकरच नामशेष होणार..... शेती जाणार,  तिथे मोठमोठे इमले उभे राहणार .....शेतक-याची धांदल उडवून मनात हसणारा परतीचा पाऊस त्या इमल्यांवरही पडणार ,पण तो उघड पहायला कोणीच नसणार. सगळे सुरक्षित बंद काचांआडून त्रयस्थपणे पाहत राहणार.....
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण- रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Sunday, October 6, 2019



पाटीपूजन...
"दसरा सण मोठा
नाही आनंदाला तोटा....."
अगदी लहानपणापासून हे वाक्य सतत ऐकत आलो आहे आणि लहानपणी तर दसरा हा सण कधी यायचा अन् कधी जायचा हेच कळायचेच नाही. एकतर संपूर्ण वर्षातले गणेशोत्सव, सर्वपित्री अमावास्या आणि होळी एवढेच काय ते सण उत्सवी आणि उत्साही वातावरणात साजरे केले जात. बाकी उरलेले सण अक्षरश: 'उरकले' जातात. दस-याच्या बाबतीत काही वेगळे नसायचे. महत्त्वाचा सण गणेशोत्सवाची उस्तवारी अन् उसनवारीही अंगावर झालेली असायची .त्यातच आपल्या सर्व पितरांच्यासाठीचा भावनिक संवेदनशीलतेचा सण म्हणून सर्वपित्री अमावास्याही औकातीबाहेर जाऊन साजरी केलेली असायची. या सगळ्यात शेतीची कामे खोळंबलेली असायची. परतीच्या पावसाने हस्ताच्या साथीने शेतातील भाताच्या पिकाला शब्दशः लोळवलेले असायचे.  पाऊस जातो कधी आणि तयार झालेल्या पिकांची कापणी-बांधणी करतो कधी असे प्रत्येकाला झालेले असायचे.  डोळयासमोर शेत,भात, विळे, बंध हेच नाचत असल्यामुळे दसराच काय दिवाळीही  दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी परतल्यावर पुढच्या दिवशीच्या तयारीतच साजरी होत असे. खरे वाटणार नाही पण सत्य हे आहे की भाऊबीजेला बहीण भावाची वाट बघत घरी बसत नसे, तर घरातील आपल्या लहानग्यांच्या किंवा त्यांना घरी सांभाळण्यासाठी थांबलेल्या, वयोमानानुसार शेतीची अवघड कामे करणे शक्‍य होत नसलेल्या म्हातारा-म्हातारीच्या जवळ "भाऊ आला की मला निरोप दया" असे सांगून शेत गाठत असे आणि इकडे भाऊही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा भाऊबीज उरकता कशी येईल यासाठीच प्रयत्न करायचा. मग अशा या गडबडीत दसरा कसा साजरा करणार ...?
पण शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी मुलामुलींना मात्र याची ओढ असायची आणि त्याचे कारण शाळेत केले जाणारे पाटीपूजन. सर्व शाळांमध्ये गुढीपाडवा आणि दसरा या दोन दिवशी विदयेची देवता सरस्वतीचे पूजन करण्याची पद्धत आहे. ज्या पाटीवर ज्ञानाचे धडे गिरवतो ती पाटी हेच सरस्वतीचे रुप मानून त्याच पाटीवर सरस्वती यंत्र काढून तिचे पूजन केले जात असल्याने या कार्यक्रमाला पाटीपूजन म्हणूनच ओळखतात.
  पाटीपूजनाची पूर्वतयारी आदल्या दिवशीच शाळेत सुरू होत असे. गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना पाटी धुवायला सांगत. पाटीवर सरस्वती यंत्र (प्राथमिक शाळेतील सर्व वर्षे मी हीच सरस्वती समजत होतो) कसे काढायचे हे फळयावर मराठी एक एक काढून त्यातून छानपैकी यंत्र काढत. सोबत पूजेचे साहित्य आणायच्या सूचना देत असत. सर्वच मुलांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने प्रसादासाठीच्या नारळासाठी सगळयांना पाच-दहा पैसे आणायला सांगत. तेही सर्वांनाच मिळणार नाहीत याची खात्री गुरूजींना असल्याने त्यांनीही वरचे पैसे भरायची तयारी ठेवलेली असायची, त्याकाळी गुरुजींचाही पगार हातात पडल्यापासून जेमतेम सात- आठ दिवस खिशात टिकण्याएवढाच असल्याने महिन्याच्या शेवटची तारीख असेल तर पैसे आणण्याबद्दलचा दबाव जरा जास्तच असायचा. पहिल्या तारखेच्या आसपास असेल तर मात्र थोडी सवलत असे. शाळाही अर्धा एक तास लवकर सोडत असत.मग एकदा घरी पोहचलो की दप्तरातील पाटी बाहेर पडे आणि बाकी दप्तराची पिशवी एखाद्या कोपर्‍यात ठेवून दिली जायची. पहिला मोर्चा वळायचा चुलीकडे. चुलीतली राख चिवडून त्यातून ब-यापैकी मोठा कोळसा शोधून काढला जाई. पाटी दगडी स्लेटची असल्याने ती पाणी टाकून कोळशाने घासून अगदी स्वच्छ काळी कुळकुळीत केली जायची. फडक्याने पुसून कोरडी केली जायची. मग ती पाटी घेऊन घरातील वडीलधा-यांकडे जायचे. गुरुजींनी शाळेत जरी सरस्वती काढायला शिकवली असली तरी स्वच्छ केलेल्या पाटीवर आपल्या अफलातून कलाकारीवर विश्वास( बहूदा अविश्वासच) असल्याने स्वत: काढायची हिम्मत करत नसत. आधीच कामाच्या धबडग्यात दमलेले असूनही कोणीतरी सरस्वती काढून देत.  आधी ११११११११ काढून त्यातून तिरक्या रेषा मारत पुन्हा वर आणून एकत्र केल्या जात असत.  वर मोठया अक्षरात "श्री गणेशाय नम:" लिहले जायचे खालच्या बाजूला एकीकडे चंद्र आणि दुसरीकडे सूर्य काढला जायचा. त्यानंतर ती पाटी अगदी जपून ठेवली जायची. सकाळी लवकर उठून आंघोळ उरकून कपडे करून शाळेत जायची तयारी केली जायची. हातात पाटी पाटीवर हळद व कुंकवाच्या लहान पुडया, तांदळाची पुडी, दोन अगरबत्त्या , पाच पैशाचे नाणे आणि झेंडूची फुले असे सगळे कसरत करत सांभाळत शाळा गाठायची.शाळेत आधी प्रार्थना व नंतर सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजा केली जायची आणि मग पाटीपूजन करण्याचा आदेश मिळाला की,झेंडूची फुले कुस्करून परवून त्यावर हळद कुंकू वाहिले जायचे. त्याचवेळी कुणीही अगरबत्ती पेटवू नये असे गुरुजी सांगत आणि एका मुलाला तांदूळ व अगरबत्ती गोळा करायला सांगत. मग रांगेने सरस्वती प्रतिमेला नमस्कार करायला सांगत. नमस्कार करताना सोबत आणलेले पैशाचे नाणे देवीसमोर ठेवत. पूजा पुर्ण झाल्यावर जमलेल्या पैशातून नारळ आणायला कुणाला तरी पिटाळले जायचे.यावेळी जरी एकाला पाठवलेले असले तरी त्याच्यासोबत दोनचार जण तरी आधीच धावत पुढेच निघत. एकदा का नारळ आणला की त्याचे उपस्थिती बघून लहान तुकडे करून प्रसाद वाटला जायचा.मग सुट्टी.घरी परतल्यानंतर पाटीवरची फुले दारासमोरच्या तुळशीत टाकून नमस्कार केला जायचा.
  आता स्लेटची पाटीच राहिली नाही.त्या ऐवजी वही किंवा पुस्तकाचे 'पाटीपूजन' केले जाते.स्वरुप बदलले तरी परंपरा टिकून आहे हेच काय ते समाधान...
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण,रायगड
मो. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Friday, October 4, 2019


        
आसंचे नये दिशी...
आसंचे नये दिशी,
  आंबा बाहेर निघाली
नेसली सोनशेला,
       गेली कोकण पाहयाला
           नाय पिकला कोकणू.......
   अश्विन महिन्याच्या सुरवातीला गावातील वयस्कर महिला, आया, आज्या लहान मुलांना थोपटवून झोपवताना हे गाणे पूर्वी म्हणत असत. खरंतर ही आंबा कोण ? ती कोकणच का पहायला निघते आणि नेहमीच कोकण कसे पिकलेले नसे ???  हे आणि असेच काही प्रश्न पडत असत. विचारले तर त्याची उत्तरेही मिळत परंतु ती डोक्यात शिरत नसत. उलटपक्षी गोंधळात भरच पडत असल्याने ही उत्तरे शोधण्याचा नाद सोडून दयावा लागे. मात्र त्यातील आंबा म्हणजे देवी असते हे कायमस्वरूपी लक्षात राहिले. पण यातही एक गमतीचा भाग असा होता की नवरात्रीतील देवी म्हणजे फक्त भगत-भगतीनींची पर्यायी ज्यांच्या अंगात येते त्यांचीच असा समज असल्याने व अशा अंगात येणाऱ्या ,घुमणा-यांची भितीच वाटत असल्याने या देवीचीही भितीच वाटत असे. देवीचा कोप होईल किंवा जर ती आपल्याच अंगात आली तर काय घ्या ....असे वाटत असल्याने ही कोकण पहायला निघणारी आंबा झोप आणण्यापेक्षा झोप उडवणारीच वाटायची.
            पण हळूहळू जसजसे मोठे होत गेलो तसे या गाण्याचा अर्थ कळू लागला. यातील कोकण म्हणजे कोकण विभाग असा अर्थ नसून पिकलेले शिवार असा आहे मात्र या भागाशी संबंधित हे गाणे असल्याने तसा उल्लेख असावा , त्याचप्रमाणे यावेळी घटासोबत धान्य रूजवले जाते त्याचाही संबंध आहेच. जणूकाही घटासह लागणारे धान्य , वस्त्र गोळा करण्याची जबाबदारी स्वत: देवीनेच स्विकारली आहे आणि तीच एक एक करत माळी, शिंपी अशा त्यावेळच्या बलुतेदारांना भेटायला निघत असते.पण त्याचबरोबर त्याकाळातल्या दुष्काळी परिस्थितीचे अप्रत्यक्ष वर्णनही आलेले दिसते. खरे पाहता या दिवसांत वातावरण पिकांच्या व गवताच्या वाढीसाठी खूप पोषक असते ,  लोक असे मानतात की या नऊ दिवसांत शेताच्या बांधावर वाढणारे दर्भासारख्या बेर नावाच्या गवताच्या नऊ गाठी म्हणजे नऊ पेरं वाढतात .वास्तविक वाढ एवढी नसली तरी गवताच्या वाढीचे प्रमाण आणि वेग खूपच जास्त असतो हे मात्र निश्चितच खरे आहे. हे जसजसे उमजू लागले तसतसा नवरात्र हा सण आवडू लागला. वर म्हटल्याप्रमाणे गावात नवरात्रीत घटस्थापना  ही जे भगत-भगतीनींची आणि काहीशी देवदेवस्कीची कामे करत किंवा ज्यांच्या अंगात कुठलीतरी देवता येते असे लोकच करत असल्याने, तसेच मध्यरात्री बाराच्या ठोक्याला त्यांचे ते अंगात येणे व घुमणे यामुळे नवरात्री फारच गूढ वाटत. बरं देव 'बसवलेले' असल्याने देवळात घंटा वाजवून कोणी त्यांना उठवू नये म्हणून घंटेचे लोलक किंवा पुर्ण घंटाच बांधून ठेवलेली असे.त्याचबरोबर काहीजण  लहान मुलांना घाबरवण्यासाठी सांगत की नवरात्रीत सगळे देव 'बसत'  असल्याने ते एकाच जागी अडकून राहत असल्याने याकाळात भूते जास्त शक्तीवान बनतात. बरं ते भूत उतरवणारे भगत पण 'बसलेले' असल्याने भूत उतरवणार कोण ???  हा यक्षप्रश्न असल्याने भितीत भरच पडायची.  पण भिती जरी वाटत असली तरी जागरणाची आवड असल्याने रात्री बारापर्यंत जागत बसत असत. पण नंतर रात्रीच्या काळोखात स्वत:चे घर गाठताना जो काही जिवाचा थरकाप उडायचा आणि जिवाच्या आकांताने कसे धावत जावे लागायचे ते शब्दांत सांगून तसे कळणे अशक्यच .तो अनुभवायलाच हवा. आता मात्र भूतेखेतं काहीच नसते, असतो तो आपल्या मनाचा खेळ .हे कळल्यावर तोच अनुभव गंमतीदार वाटतो आणि हसूही येते.
         काळ बदलत गेला तसा नवरात्रीचे स्वरुपही बदलत गेले. महाराष्ट्रातील घटस्थापनेच्या बरोबरीने देवीची मूर्ती आणून पुजा होऊ लागली. वेगवेगळी मंडळे तयार झाली. नवरात्र हा इव्हेंट बनू लागला. त्यातच दूरदर्शन/मेट्रो ऐवजी मोठमोठया डिशचे केबलचे जाळे पसरू लागले. शेकडो चॅनल्स आली. टेपरेकॉर्डरचा जमाना जाऊन कॉम्पॅक्ट डिस्क (C.D.) चा जमाना आला.  फाल्गुनी पाठक सारख्या गायक गायिकांनी गुजराती दांडिया महाराष्ट्राच्या गळी उतरवलाच पण त्याला खरे खतपाणी घातले ते ABCL ने दोनेक वर्षांसाठी का होईना आयोजित केलेल्या "स्टारट्रेक" च्या ग्लॅमरने. आता तर सगळीकडे मोठमोठ्या गरबा नाईटसचे इव्हेंटच असतात. घटाची स्थापना केलेली असते पण कुठेतरी एका कोपर्‍यात .कटू असले तरी सत्य हे आहे की, देवीसुद्धा नावापुरतीच आणली जाते.देवळातली घंटा वाजवू नये याची काळजी घेणारे देवीसमोर डिजे लावून दणदणाट करत नाचत असतात. मनातील भाव कधीच संपला ,शिल्लक राहिलेत ते मोठमोठ्या फ्लेक्सवर झळकणारे व भाव(सोबत देणगी रुपात मिळालेला मालही) खाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेणारेच भक्तीचा लवलेशही नसतो. सगळयांचे लक्ष असते फक्त गरबा-दांडियाकडेच. ....भले लावलेल्या गाण्यातल्या एकाही शब्दाचा अर्थ तर सोडाच पण तो शब्द तरी काय आहे हे माहीत नसले तरी. ठेका धरायला तयार असतात.....भले मग आयुष्याचा ठोका चुकला तरी चालेल....
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.नं. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com